स्वरूप चिंतन: २२१. संकुचित अन् व्यापक!

सद्गुरूंचा बोध आणि भौतिकाचा बोध, या दोहोंत मोठी तफावत असते. भौतिकाची ओढ ही पसारा वाढवायला आणि तो टिकवण्यासाठी धडपडायला मला उद्युक्त करीत असते. सद्गुरूंचा बोध हा मला अनावश्यक पसारा कमी करायला आणि अचूक कर्तव्यर्कम करतानाच त्यातून अमुक साधावं, या आशेच्या ओझ्यातून सुटायला शिकवत असतो.

सद्गुरूंचा बोध आणि भौतिकाचा बोध, या दोहोंत मोठी तफावत असते. भौतिकाची ओढ ही पसारा वाढवायला आणि तो टिकवण्यासाठी धडपडायला मला उद्युक्त करीत असते. सद्गुरूंचा बोध हा मला अनावश्यक पसारा कमी करायला आणि अचूक कर्तव्यर्कम करतानाच त्यातून अमुक साधावं, या आशेच्या ओझ्यातून सुटायला शिकवत असतो. सद्गुरूंचा बोध आणि भौतिकाची ओढ या दोन्हींपैकी एकाची निवड करावीच लागते. जर सद्गुरू बोधाची निवड झाली असेल तर मग जे आज ना उद्या दुरावणारच आहे, त्या समस्त भौतिकाच्या ओढीतून निर्माण होणारी तगमग, अस्वस्थता, भीती, काळजी क्षणार्धात नष्ट होते. निवड मात्र अंत:करणपूर्वक, खरी आणि पक्की पाहिजे. मगच खरा प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तरही खरेपणानं बिंबतं, आचरणात येतं. ते आलं म्हणजेच मनातले अशाश्वताचे सर्व संकल्प मावळतात. जेव्हा जीवनातलं सर्वोच्च महत्त्व परमतत्त्वालाच येतं तेव्हा काय स्थिती होते? स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ५१वी ओवी ती स्थितीच सांगते. ती ओवी अशी : ‘‘ते वेळीं आपणपेयां सहितें। इये अशेषेंही भूतें। माझ्या स्वरूपीं अखंडितें। देखसी तूं।।’’ (त्या वेळी, म्हणजे सद्गुरुऐक्य होताच आपल्यासकट समस्त चराचरातील भूतमात्रांना तू परम स्वरूपस्थितीतच अखंडपणे पाहशील). मग थेट ७८व्या ओवीतही स्पष्ट सांगितलं आहे की, ‘‘मग भूतें हे भाष विसरला। जे दिठी मी चि आहे सूदला। म्हणौनि निर्वैर जाहला। सर्वत्र भजे।।’’ (मग सर्व भेद मावळला, माझ्याशिवाय चराचरात काहीच नाही, हे उमगल्याने वैरच संपले आणि केवळ माझंच भजन सुरू झालं!). स्वामी स्वरूपानंद यांच्या ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील या ५१ आणि ७८ या ओव्यांदरम्यान अर्थात ५२ ते ७७ या ओव्यांत ही अखंड स्वरूपदर्शनाची आणि निर्वैर अखंड भजनाची प्रक्रिया गुरुकृपेनं कशी पार पडते, गुरुबोधानं आत्मज्ञान कसं जागं होतं, सद्गुरू आणि भगवंताचं कसं ऐक्य असतं आणि त्यांची भक्ती कशी करावी, हे सांगितलं आहे. तर प्रथम ५१वी ओवी आणि तिचं अर्थ विवरण पाहू. ही ओवी अशी :
ते वेळीं आपणपेयां सहितें। इये अशेषेंही भूतें माझ्या स्वरूपीं अखंडितें। देखसी तूं।। ५१।। (ज्ञानेश्वरी अध्याय ४, ओवी १७०).
प्रचलितार्थ : त्या वेळी आपल्यासहित ही सर्व भूते (जीवमात्र) माझ्या स्वरूपात तू निरंतर पाहशील.
विशेषार्थ  विवरण: या ओवीचा प्रचलित अर्थ आणि विशेषार्थ वेगळा नाही, पण त्याचं विवरण आवश्यक आहे. मनातले संकल्प केव्हा खऱ्या अर्थानं मावळतील? जेव्हा ‘मी’ आणि ‘माझे’ची ओढ उरणार नाही! मग ‘मी’ची जपणूक करण्याची क्षणोक्षणी सुरू असलेली धडपड थांबून मन इतकं व्यापक होईल की, या ‘मी’चंही रूप कळून येईल आणि हे जग अशा अनंत ‘मीं’नी भरलं आहे, हेही जाणवेल. अर्थात ‘मी’ हा संकुचितच असतो आणि परमात्मा हा व्यापक असतो. मग अशा अनंत ‘मीं’नी भरलेलं जग परमात्म्याचंच रूप कसं?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wide narrow spiritual concepts

ताज्या बातम्या