कुंभमेळय़ामागची अमृतकुंभाची कथा रंजक आहे आणि त्या कथेला पंचांगाच्या गणनशास्त्राचा आधार देऊन पुढील कुंभमेळय़ांच्या तारखाही काढता येतात.. पण कुंभमेळय़ात डुबकी मारल्याने पापे धुऊन निघतील, या समजुतीला काय आधार आहे? अशा अंधश्रद्धांमुळे तीर्थक्षेत्री गर्दी वाढते आणि निरपराध भाविकांचे बळी जाण्यासाठी एखादे निमित्त पुरते..

आयुष्यामध्ये नीतिमान, सदाचारी राहून, सन्मार्गाने कर्म करून पुण्य मिळविण्यापेक्षा कुंभमेळ्यामध्ये प्रयागतीर्थात डुबकी मारून पाप घालविण्याचा मार्ग चोखाळणे चुकीचे व अत्यंत दुर्दैवी आहे.
या वेळी अलाहाबाद येथील कुंभमेळ्यामध्ये ३७ भाविकांचा मृत्यू झाला, ही मोठी दु:खद घटना आहे. अंधश्रद्धेमुळे कुंभमेळ्यामध्ये तीन कोटी लोक सहभागी होतात हेही दु:खद आहे.
२७ ऑगस्ट २००६ रोजी नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये ३९ भाविकांचा मृत्यू झाला होता. २५ जानेवारी २००५ रोजी मांढरादेव काळूबाई मंदिरात २४६ भाविक तर ३ ऑगस्ट २००८ रोजी हिमाचल प्रदेशातील नैनादेवी मंदिरात १६२ भाविक आणि ३० सप्टेंबर २००८ रोजी जोधपूर येथील चामुंडा मंदिरात २२४ भाविकांचा चेंगराचेंरीत मृत्यू झाला होता. आपण या घटनांपासून कधी बोध घेणार? प्रगत वैज्ञानिक युगात पाप-पुण्य कशात आहे, हेच जनतेला कळत नाही हेही दु:खद आहे.
सूर्य-चंद्र मकर राशीत, गुरू वृषभ राशीत आणि अमावस्या असताना प्रयाग येथे महाकुंभमेळा भरतो. लाखो साधू-संत, हठयोगी, भाविक पापक्षालनार्थ प्रयाग तीर्थावर डुबकी मारण्यासाठी येत असतात. या महान योगावर प्रयागतीर्थामध्ये स्नान केल्याने एक सहस्र अश्वमेध यज्ञ, १०० वाजपेय आणि पृथ्वीभोवती एक लक्ष प्रदक्षिणा केल्याचे पुण्य मिळते, अशी भाविकांची समजूत (?) आहे.
सदाचरण, सत्कृत्य केल्याने आणि नीतिमान राहून गरिबांना मदत केल्यामुळेच खरे पुण्य मिळत असते. भ्रष्टाचार, गुंडगिरी, फसवणूक, दुराचार, घोटाळे केल्याने अनीतीमुळे घडलेले पाप प्रयागतीर्थावर हजार वेळा डुबकी मारली तरी कसे जाईल, हे या भाविकांच्या कसे लक्षात येत नाही? भारत देशाने चंद्राकडे यान पाठवले, मंगळ ग्रहाकडे गेलेल्या अमेरिकी अंतराळयानाने तेथे खोदकामही केले आहे, संगणकाच्या या वैज्ञानिक युगात नदीत डुबकी मारल्याने पाप जाते अशी समजूत असणे किती चुकीचे आहे! तसेच तीन कोटी माणसे जिथे स्नान करतात ते पाणी आरोग्यदृष्टय़ा शुद्ध असेल तरी काय?
अमृतकुंभाच्या कथेचा आधार कुंभमेळय़ांना आहे. ‘एकदा देव-दानव यांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन सुरू केले, तेव्हा समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ हातात घेऊन बाहेर आले. देवांच्या मनात आले की, दानव जर अमृत पिऊन अमर झाले तर मग आपली धडगत नाही, म्हणून त्यांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन पळून जाण्याची खूण केली. त्याबरोबर इंद्रपुत्र जयंत हा धन्वंतरीच्या हातातील अमृतकुंभ घेऊन पळाला. दानवांना ही गोष्ट लगेच लक्षात आली. अमृतकुंभ मिळवण्यासाठी देव-दानवांमध्ये बारा दिवस युद्ध झाले. या युद्धामध्ये १२ वेळा अमृतकुंभ खाली पडला. त्या वेळी बृहस्पती (गुरू), सूर्य आणि चंद्र यांनी त्याचे रक्षण केले. ज्या बारा ठिकाणी हा अमृतकुंभ पडला, त्यापैकी चार ठिकाणे ही या पृथ्वीवर आहेत (आणि ती सर्व भारतात आहेत).’ या कथेमध्ये चार ठिकाणी दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळय़ाचे मूळ सापडते.
एकदा एका राशीत गुरू येऊन गेल्यावर पुन्हा त्या राशीमध्ये यावयास गुरूला सर्वसाधारणपणे १२ वर्षे लागतात. त्यामुळे त्या त्या ठिकाणी पुन्हा कुंभमेळा येण्यास बारा वर्षांचा कालावधी जावा लागतो. यामुळे प्रयागला जसे गुरू वृषभ राशीमध्ये, चंद्र-सूर्य मकर राशीत असताना हा योग येतो, तसे हरिद्वार येथे गुरू कुंभ राशीत आणि मेष राशीत सूर्य असताना कुंभपर्व असते. त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे हाच योग गुरू सिंह राशीत आणि सूर्य-चंद्र कर्क राशीत असताना येतो; तर उज्जयिनी येथे असा योग गुरू वृश्चिक राशीत आणि सूर्य तूळ राशीत असताना येतो. या गणनानुसार हरिद्वारला १४ एप्रिल २०२१ ते १४ मे २०२१, नाशिक १४ जुलै २०१५ ते ११ ऑगस्ट २०१६, तर उज्जयिनीत १७ ऑक्टोबर २०१८ ते १५ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत कुंभपर्वाचा योग येणार आहे. त्यातही, नाशिकला १५-१६ जुलै (अधिक आषाढ अमावास्येच्या दिवशी) आणि १४ ऑगस्ट २०१५ रोजी निज आषाढ अमावास्येच्या दिवशी, असे दोनदा महास्नान होणार आहे.
कुंभपर्व कालावधीत त्या-त्या ठिकाणी नदीस्नान केल्यास हातून घडलेली सर्व पापे नाहीशी होतात, असे मानले जाते. काही भ्रष्टाचारी राजकारणी नेते जशी स्वत:स ‘क्लीन चिट’ देतात, त्यातलाच हा प्रकार आहे. एकदा कुंभपर्वामध्ये तीर्थस्नान करून पापे धुऊन टाकली म्हणजे पुन्हा पापे करण्यास रान मोकळे झाले, असेही काहींना वाटत असेल; परंतु हे काही खरे नाही.
याज्ञवल्क्य ऋ षींनी असे सांगितले आहे की, ‘नदीस्नान केल्यामुळे हातून नकळत घडलेली पापे नष्ट होतात, इतर पापे जात नाहीत.’ माणसे कळत असताना किती पापे करतात आणि त्यांच्या हातून नकळत पापे किती घडतात, हे ज्याचे त्यांनी आत्मपरीक्षण करून ठरवावे. संत तुकारामांनी पाप-पुण्याची साधी सोपी व्याख्या केली आहे : दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे पाप आणि दुसऱ्याला मदत करणे म्हणजे पुण्य!
समाजातील गरिबांना मदत केल्याने तसेच श्रमदान, नेत्रदान, रक्तदान आणि विद्यादान केल्याने अधिक पुण्य मिळू शकते. विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेत राहून चालणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन जनमानसात, दैनंदिन जीवनात रुजला पाहिजे. श्रद्धा-अंधश्रद्धेबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्यासाठी आपण कधी जागृत होणार?