गणेश पोकळे ganeshpokale95@gmail.com

एखाद्या विद्यापीठात, मुलींच्या वसतिगृहाच्या आवाराचे एखादेच प्रवेशद्वार खुले ठेवून बाकीची दोन दारे बंद असणे, ही तशी लहानशीच बाब.. पण या कृतीला विरोध असण्यामागचे कारण मात्र मोठे आहे :

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका

‘काही जणांच्या चुकांमुळे सर्वावरच अविश्वास का?’ हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे..

हल्ली अशी परिस्थिती आहे की, मुलींना घराबाहेर पाठवावे की नाही याचा घोर आई-वडिलांना लागलेला असतो. पण मुली घराबाहेर पडूच नयेत, अशी विचित्र खबरदारी घेणाऱ्यांना ‘पालक’ म्हणायचे का? मुलींवर- आणि काही प्रमाणात जगावरही- विश्वास टाकून त्यांना आवश्यक असलेली मोकळीक अगदी अशिक्षित आई-वडीलसुद्धा आज देतात. ही गोष्ट पुण्यामुंबईची नाही, मराठवाडय़ातली आहे. पण आज जे मराठवाडय़ात- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात घडले, ते उद्या अन्य कुठेही घडू शकते. पण इथे एवढे घडले काय? कुणीच थेट काही बोलत नाही. इथल्या मुलींमध्ये नाराजी तर आहेच, पण त्याही गोपनीयतेच्या अटीवर बोलतात.

या विद्यापीठात मुलींची वसतिगृहे एकंदर सात आहेत. ही सगळी वसतिगृहे एकाच परिसरात असल्याने बाहेर ये-जा करण्यासाठी इथे तीन प्रवेशद्वारे (गेट) आहेत. या तीनपैकी दोन दारे गेल्या दीड महिन्यांपासून बंद करून ठेवण्यात आली आहेत. यानंतर विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनांनी निदर्शने केली,निषेधव्यक्त केला. मात्र प्रशासन काही बधले नाही.

इथे शिकणारी मुले-मुली, मोजके सोडले तर, सगळे मराठवाडय़ातले. जिथे मुलगा मुलीशी बोलला तरी पारावरची म्हातारीकोतारी मंडळी तास- दोन तास हे कुणाचे गाबडे म्हणून चर्चा करतात. या वातावरणातल्या मुली विद्यापीठापर्यंत शिकायला आल्यात या अभिमानाने जी मान वर होऊ लागली आहे, तीच मान मुली गेटवर येतात म्हणून ही दारेच बंद करून खाली करायला लागली आहे. ये-जा फक्त एकाच दारातून, तीही ठरावीक वेळी.

पण कारण काय अशा बंद दारांमागचे? मुले आणि मुलीही नीट बोलत नाहीत. पण हळूहळू, त्यांच्या बोलण्यातून लक्षात येते.. सकाळी दहा-साडेदहापर्यंत आणि संध्याकाळी पाचनंतर किमान आठ-साडेआठपर्यंत या तीनही गेटवर आतुरतेने वाट पाहणाऱ्यांची आणि तितक्याच आतुरतेने भेटायला येणाऱ्यांची गर्दी असायची. प्रत्येक गेटच्या आजूबाजूला किंवा बऱ्याचदा बरेच आडबाजूला जाऊन दोघेच, तर काही गटागटाने बोलत असत एकमेकांशी, रोज नव्याने भेटल्यासारखे. या भेटी-गाठी फक्त प्रियकर-प्रेयसीच्या नसत. इथे जिवाला जीव देणाऱ्या मित्र-मत्रिणी असत, कुणाच्या बोलण्यात बहीण-भावाची माया असे- मग नाते सख्खे असो की मानलेले. आजही, कुणी मत्रिणीचा डबा आज येणार नाही म्हणून तिला आपल्या मेसवरून आणलेला डबा देण्यासाठी जातो, कुणी मत्रिणीच्या अभ्यासाच्या नोट्स द्यायला किंवा घ्यायला जातो.. अशा कारणांनी या भेटी-गाठी सुरू होत्या या तिन्ही गेटवर..

..अशा या मुक्त संचारात आचार आणि विचारांनी उचल खाल्ली तसा तो संचार अस्थिरतेच्या भोवऱ्यात अडकला आणि काहींच्या मुक्त संचारातून उतावीळ भावना ‘ओठांपर्यंत’ आल्या, तेव्हा गेट बंद करण्याची कारवाई येथील प्रशासनाने केली. मात्र, एकाच कारणाने, काहींच्या उथळ वागण्याने आणि सवलतीचा गैरफायदा घेणाऱ्या मूठभरांपायी बाकी सगळ्यांना त्याच नजरेने पाहणे आणि त्याच निकषावर शिक्षा देणे हे विद्यापीठीय स्तरावर कितपत योग्य आहे? ‘विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाचे दोन गेट बंद करण्यात आले’ ही बातमी बाहेर काय संदेश घेऊन जाते? इथे राहणाऱ्या दोन मुली नव्हत्या वेळेत परतल्या; तर शिक्षा सगळ्यांना का? मुलाला भेटायला म्हणून गेटवर आल्या आणि दहा मिनिटे गप्पा मारून अनावर झालेल्या तरुण भावना एकवटून त्यांनी चुंबन घेतले तर तुम्ही सगळ्या मुलींना तसेच पाहणार का?

बंद दाराआडच्या मुली, आडून-आडूनच बोलत होत्या.. एका हाताने टाळी वाजत नाही हे खरे. बऱ्याचदा मुलगे एक पाऊल तर मुली दोन पावले जातात; मुली एक पाऊल तर मुलगे दोन पावले जातात. मात्र, अशा वागण्याच्या ज्या आसपासही नाहीत आणि पाऊल टाकणे सोडा, ज्यांनी पाऊल हलवलेच नाही त्यांनाही तुम्ही यामध्ये मोजता आणि शिक्षेचे वाटेकरी करता, हे कितपत योग्य आहे? असे या मुलींचे म्हणणे.

त्याने किंवा तिने ही चूक केली या घटनेचा संदर्भ देऊन सगळ्यांनाच ही मंडळी एकाच तराजूत मोजतात तेव्हा गव्हाबरोबर कीडही रगडली जाण्याची परिस्थिती उद्भवते. जी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्भवली आहे..

सरळ ‘प्रशासकीय निर्णय आहे’ म्हणून दोन प्रवेशद्वारे बंद करण्याचा निर्णय घेऊन हात झटकताना हा निर्णय का घ्यावा लागला हे कुणीच सांगितले नाही आणि कुणाला सांगावेसेही वाटले नाही, हे बरेच काही सांगून जाणारे आहे. हे इथल्या प्रशासनाच्या तरी लक्षात यायला हवे होते..

इथल्या मुली महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आज विद्यापीठात शिकताहेत. मराठवाडय़ातल्या असल्याने सगळ्यांची घरची परिस्थिती जेमतेमच. आई-वडील रोज राबतात तेव्हा महिन्याला पैसे पोहोचतात. त्यांच्या राबण्यात आपली मुलगी विद्यापीठात शिकते आहे आणि ती एक दिवस खूप चांगल्या ठिकाणी जाईल ही आशा मोठे बळ घेऊन उभी असते. मुलाला चार दिवसाला फोन केला तरी चालतो या भावनेने बेफिकीर असलेले आई-बाबा मुलीला न चुकता सकाळ-संध्याकाळ फोन करतात, तो फक्त तिच्या काळजीचा काळोख रोजच्या घटनांनी आणखी गडद केला आहे म्हणून. बाकी आपली मुलगी ‘तशी’ नाही हा विश्वास प्रत्येक आई-बाबांना असतोच. मात्र, काही मुलींकडून या विश्वासाला तडा जातो हे नाकारता येत नाही.

हे सगळे घडत असले तरी जिथे विश्वास मिळत नाही तिथे विश्वास देऊन पुढची पावले टाकावी लागतात. असे गेट बंद करून कुणाच्या चारित्र्याला आणि विश्वासाला सरसकट फरफटत नेणे मुळीच योग्य होणार नाही.. हे मत इथल्या विद्यार्थ्यांचे नसते तर ‘प्रवेशद्वार बंदी’विरोधी निदर्शनांना पाठिंबा मिळालाच नसता. चुकत असतील मुली तर त्यांना घालून दिलेल्या नियमांत काही बदल करा. मात्र, गेट बंद करून प्रश्न मिटेल का? एका गेटने वावरण्याची संधी द्याल, परंतु बाकी गेट बंद करून विद्यापीठात आणि परिसरात जी चर्चा आहे ती कशी थांबवणार? हे प्रश्न बिनतोड ठरतात. उच्चशिक्षणाने समजदारपणाची दारे उघडतात म्हणतात; परंतु इथे साधी ये-जा करण्याची दारे बंद झाली, हे कशाचे लक्षण मानायचे?

आकर्षणाचे महाविद्यालयीन वय जाऊन आता योग्य-अयोग्य काय, याची उकल करण्याचे वय असताना इथल्या मुलींना भेटण्यासाठी गेटवर तरुण मुलगा गेला, तरी हे ‘डेट’वर गेले की काय अशी शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे. इथे मित्र नाही, मत्रीण नाही, भाऊ नाही, बहीण नाही आणि दुसरा कुठला नातेवाईकही नाही; ‘सगळे तसलेच’ असतात, अशा आवेशाने आणि नजरेने पाहणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने या प्रवेशद्वारांवर वेळेची सक्त बंधने आलेली आहेत. मुले-मुली चुकत नाहीत असे मुळीच नाही. मात्र, तुम्ही जो चष्मा लावलेला आहे तो कायमचाच चुकांच्या शोधात असल्याने इथल्या बऱ्याच मुला-मुलींना त्याचा हकनाक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.

पाण्याला वाहता यावे, हवेला फिरता यावे, झाडाला वाढता यावे, डोळ्याला पाहता यावे, गळ्याला गाता यावे, कानांना ऐकता यावे, पायाला चालता यावे आणि मुलींना स्वतंत्र जगता यावे अशा या नैसर्गिक बंधातून उभ्या असलेल्या गोष्टींचा असा चुराडा का करता? मुक्त स्वातंत्र्याच्या भरवशावर वावरणाऱ्या या मुलींना बंद दरवाजांचा धाक का दाखवता? हे प्रश्न निरुत्तर करणारे आहेत.. जरी ‘प्रशासकीय निर्णय’ हे ठरलेले उत्तर त्यांना गेले अडीच महिने मिळतेच आहे, तरीही!