परीघ आणि केंद्रस्थान

मुंबई महानगराच्या विकास आराखडय़ात आठ वर्षांपूर्वी या कोळीवाडय़ांना ‘झोपडपट्टी’ ठरवलं गेलं,

अभिजीत ताम्हणे abhijeet.tamhane@expressindia.com

वैयक्तिक प्रगती आणि सामूहिक अस्मिता यांची सांधेजोड होत नाही, असं वातावरण सध्या कोळीवाडय़ांमध्ये आहे. ‘कोळी महोत्सव’ साजरे होतात, कोळीवाडय़ाचा अभिमान वाढतो; पण एरवी एकेकटय़ानंच जीवनसंघर्ष करताना, कोळीवाडय़ांमध्ये पिढय़ान्पिढय़ा राहणारे तरुण संस्कृतीच्याही परिघावरच फेकले जात आहेत.. 

दाटीवाटीनं उभ्या राहिलेल्या इमारतींच्या मधली जागा हाच रस्ता. या गल्लीवजा रस्त्यावर मध्येच एखादी र्कुेबाज बुलेट किंवा अ‍ॅव्हेन्जर कलत्या स्थितीत लावून ठेवलेली. मधूनच एखादं बैठं घर. आणि एखाद्या शेडमध्ये कॅरमचा जोरदार खेळ चाललेला. एखाद्या दुमजली घराच्या बाहेरून लोखंडी जिना थेट याच गल्लीत. त्या जिन्यावर ओठंगून चौघे तरुण मोबाइलवर ल्यूडो खेळताहेत. मोक्याच्या जागी असलेल्या गाळ्यांमध्ये ‘राजश्री’ अशी पाटी असलेली ऑनलाइन लॉटरीची दुकानं, तर आडबाजूला- खासकरून एखाद्या बारच्या जवळपास- पत्त्याचा क्लब. ठाणे पूर्व आणि पश्चिम, दोन्हीकडे पसरलेला चेंदणी – महागिरी कोळीवाडा, खाडीच्या पलीकडचा विटावा कोळीवाडा यांपैकी कुठेही दिसणारी ही दृश्यं. थोडय़ाफार फरकानं हीच दृश्यं मुंबईतही. ‘इथले तरुण आज मोठमोठय़ा हुद्दय़ांवर आहेत’, ‘अनेक जण यशस्वी होऊन, आता कोळीवाडा सोडून निघून गेलेत’ हे वारंवार ऐकायला मिळतं. पण कोळीवाडय़ातच राहणारे तरुण अनेक आहेत. ‘आम्ही या भागातले मूळ रहिवासी’ हा अभिमान इथल्या तरुण ते वृद्धांच्या बोलण्यात, वावरण्यात दिसून येत असतो. मात्र आज मुंबई परिसरातले सर्वच कोळीवाडे आणि त्यांतले रहिवासी ही शहररचनाकार, समाजशास्त्रज्ञ यांच्या दृष्टीनं ‘परिघावरचे’ ठरले आहेत. मुंबई महानगराच्या विकास आराखडय़ात आठ वर्षांपूर्वी या कोळीवाडय़ांना ‘झोपडपट्टी’ ठरवलं गेलं, त्याची तीव्र प्रतिक्रिया आधी वरळीत आणि नंतर अन्य कोळीवाडय़ांतून उसळली. कोळीवाडय़ांचं स्वतंत्र अस्तित्व कसंबसं मान्य झालं असलं, तरी इथल्या तरुणांपुढे आज अस्मितेचा प्रश्न आहे. तोच ठाण्यातल्या कोळीवाडय़ांमध्येही जाणवतो.

कुणालाच न आवडणाऱ्या शब्दांत सांगायचं तर, कोळीवाडय़ाचा अभिमान कशासाठी वाटला पाहिजे, असा तो प्रश्न. तो या शब्दांत मांडणं कुणालाही आवडणार नाही. अभिमान वाटण्याजोगी परंपरा आणि इतिहास कोळीवाडय़ांना आहेच. अनेक कोळीवाडय़ांमध्ये ‘कोळी महोत्सव’ साजरे होतात. दोन-चार दिवस इथल्या संस्कृतीची- विशेषत: खाद्यपदार्थाची- ओळख इतरांनाही करून घेता येते. कोळीवाडय़ांचं निराळेपण अशा वेळी अगदी झळाळून उठतं. पण एरवी?

‘आनंद भारती समाज’ ही चेंदणी कोळीवाडय़ातली, ठाणे पूर्वेकडली संस्था. अनेक खेळाडू या संस्थेत, तसंच ‘युनायटेड स्पोर्ट्स क्लब’मध्ये घडले. ‘सत्तरच्या दशकात खेळाडूंना सरकारी नोकऱ्या मिळायच्या. त्यामुळे एक लाटच आली होती, खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं आणि नोकरीला लागायचं!’ असं मूळचा चेंदणीचा, पण आता विटाव्यात राहणारा तरुण शिल्पकार-दृश्यकलावंत पराग तांडेल सांगतो. या नोकऱ्या प्रामुख्यानं, तेव्हा नव्यानंच सरकारीकरण झालेल्या बँकांमधल्या होत्या. मात्र ही झाली गेल्या पिढीतली गोष्ट. सरकारी- निमसरकारी नोकऱ्यांमागे, कोळी समाजाला त्या वेळी असलेलं आरक्षण हाही महत्त्वाचा, उपकारक घटक होता. किनारपट्टीवरील कोळी समाजाला या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय १९८१ मध्ये होऊन १९८३ सालापासून त्याची सर्वत्र अंमलबजावणी झाली. नोकरीची दारं तेव्हापासून बंदच होऊ लागली.

खेळांचाही नूर बदलला. ‘आनंद भारती समाज’च्या मैदानावर खोखोचा खेळ सुरू असलेला रात्रीही दिसायचा. आता खोखोचे खांब दिसत नाहीत. मुलं हल्ली इंग्रजी शाळेत जातात, तिथं अनेक जण बास्केटबॉल किंवा टेबल टेनिसचं कोचिंग घेतात; पण खेळाडूंना सरकारी- निमसरकारी नोकऱ्या मिळतील ही परिस्थिती नाही. ‘क’ वर्गातल्या पदांवर नोकरी हवीच असेल तर ती कशी मिळते, हे सर्वानाच माहीत आहे. ‘जॉबसाठी पैशे नाहीत’ ही हल्ली अनेक तरुणांची तक्रार असते. महापालिकेपासून ते अन्य सरकारी, निमसरकारी कायम नोकऱ्यांमध्ये स्थान बळकट करण्यासाठी काही लाख ‘द्यावे’च लागणार, हा समज अनुभवसिद्ध.

काही जण खासगी नोकऱ्यांत आहेत. ‘‘पहिले सेल्समध्ये होतो, तिथनं इन्शुरन्समध्ये गेलेलो, कंपणी बदलली आणि पगारपाणी चांगलं भेटलं,’’ असं इथला नागेश सांगतो. हिंदी आणि इंग्रजीत अस्खलितपणे बोलून भल्याभल्यांना विश्वासात घेण्याचं कसब त्याच्याकडे आहे. सहकाऱ्यांशी बोलण्याची भाषाही मराठी नाहीच, मराठी ही निव्वळ सोयीची भाषा म्हणून नागेश वापरतो आहे, असं लक्षात येतं.

भाषेच्या या प्रश्नावर एक वेगळाच दृष्टिकोन देवश्री ठाणेकर यांच्याशी बोलताना मिळतो. वास्तविक देवश्री वास्तुरचना आणि शहररचना यांची अभ्यासक. सध्या नेदरलॅण्ड्समधल्या (हॉलण्ड) तीन विद्यापीठांमध्ये कोळीवाडय़ांशी संबंधित विषयावरच आंतरशाखीय पीएच.डी. करते आहे. ‘‘मी ठाण्याच्या कोळीवाडय़ात वाढले, पण मला घरची (कोळी) भाषा नीट येत नाही. मी शिकले मराठी शाळेत. पण अ‍ॅमस्टरडॅममध्ये माझ्या मुलासाठी मी डच शाळाच निवडली.’’ पण देवश्रीपुढला ‘भाषेचा प्रश्न’ आणखी निराळा आहे. तिच्या संशोधन-विषयात ती कोळी समाजाचा उल्लेख ‘मूळ रहिवासी समूह’ – इंडिजिनस कम्युनिटी- असा करते आहे; तो समाजशास्त्राच्या समकालीन परिभाषेत योग्य ठरत नाही, असं हॉलण्डमधल्या त्या तीन विद्यापीठांपैकी एकामधल्या मार्गदर्शकांचं म्हणणं. ‘‘मी नकार दिला. एकवेळ पदवी (पीएच.डी.) नाही मिळाली तरी चालेल, पण आम्ही आहोत मूळ रहिवासी. मुंबई किंवा इतर शहरं नंतर वसली. ठाणे हे काही शतकांपूर्वी व्यापाराचं केंद्र होतं, तेव्हा इथला कोळी समाजही कोचीनपर्यंत व्यापार करत होता. मग ‘मूळ रहिवासी’ का नाही म्हणायचं?’’ हा देवश्री ठाणेकर यांचा बिनतोड प्रश्न.

आज मात्र ‘बिझनेस करतो’ असं सांगणारे इथले तरुण, कोणत्या व्यवसायात आपण आहोत हे सांगणं टाळतात, असा देवश्री यांचाही अनुभव आहे. अगदीच खोदून विचारलं तर ‘गाडी आहे आपली’ एवढंच सांगतात.. ‘गाडी आहे’ याचा अर्थ ‘मी रिक्षाचालक आहे’ किंवा ‘वडिलार्जित जागेवर बांधलेला एखादा गाळा विकून आलेल्या पैशांमधून मी चारचाकी मोटार घेतली असून ती कंपनीला भाडेकरारानं दिली आहे’ अथवा ‘मीच चारचाकीचा चालक आहे’ यापैकी कोणताही असू शकतो. समजा गाडी नसली, तरी आपल्याच जागेत इमारत बांधून, निवासी/व्यावसायिक गाळ्यांचं भाडं मिळवत राहणं हीदेखील (विशेषत: ठाण्यात) अनेकांच्या पोटापाण्याची सोय आहे. हे असे ‘बिझनेस’ करणाऱ्यांचं प्रमाण जवळपास २५ टक्के भरेल.

खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळवत/ बदलत राहण्यासाठी सक्षम झालेले तरुण आहेत, तसे अगदी थोडे तरुण याहीपुढे गेलेले- इंजिनीअरिंग, माहिती-तंत्रज्ञान, फोटोग्राफी, संगीत अशा क्षेत्रांत आपली कारकीर्द स्वत: घडवणारेही आहेत. दहावीपर्यंत कसंबसं शिकून ‘बिझनेस’साठी तयार होणारे, हा तरुणांचा दुसरा प्रकार. या दुसऱ्या प्रकारातले तरुण अधिक सहजपणे समाजकारण, राजकारण यांकडे वळू लागतात. त्याची पहिली पायरी म्हणून उत्सव समित्या, पदयात्रा- पालखी मंडळ, साई पालखीचा भव्य उपक्रम असे अनेक मार्ग आता उपलब्ध आहेत. समाजाचा इतिहास अभ्यासणारे लोक हे सारं पाहून काहीसे खंतावतात. गावातले देव सोडून ही नवी दैवतं कशी आली, हा प्रश्न जाणत्यांना पडतो. नेणते मात्र उमेदीच्या वयात, समाजातलं आपलं स्थान पक्कं करण्याच्या मागे लागलेले असतात.

मुंबईत, खारदांडय़ासारख्या मोठय़ा, पाच पाडे असलेल्या कोळीवाडय़ात किमान ३० ते ३५ टक्के तरी तरुण मच्छीमारीचा पारंपरिक व्यवसाय करणारे आहेत, असं त्या खारदांडय़ाचे अभ्यासक-कार्यकर्ते भगवान दांडेकर सांगतात. ते प्रमाण ठाण्याच्या चेंदणीत तर शून्यच. विटाव्यात काही होडय़ा आहेत, पण त्याही मासेमारीसाठी कमीच वापरल्या जातात. ‘‘समुद्रातच ३० ते ४० ट्रक भरतील एवढा कचरा रोज सापडतो.. खाडीत हे प्रमाण आणखीच अधिक आहे,’’ असं दांडेकर सांगतात. पराग तांडेलनं २०१२ साली मासेमारीच्या जाळ्याला मोठ्ठय़ा माशाचा आकार देऊन त्यात खाडीमध्येच सापडलेल्या प्लास्टिकच्या व रबरी चपला भरल्या होत्या, ती कलाकृती इथं आठवते.

पण ठाण्याच्या कोळीवाडय़ातले तरुण हे नोकरीधंद्यानिमित्त मुंबईच्या परिघावर आणि शहररचनातज्ज्ञांच्या मते ठाणे शहराच्या परिघावर आहेत. आपण जलमार्गे होणाऱ्या व्यापाराच्या केंद्रस्थानी होतो, हे आता त्यांना आठवत नाही.. किंवा आठवलं तरी उपयोग काय, हा त्यांच्यापुढला प्रश्न आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व युवा स्पंदने बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Koli community fishing community issue koli culture in mumbai zws

ताज्या बातम्या