सुहास जोशी suhas.joshi@expressindia.com

मला काय त्याचेही वृत्ती सोडून, पर्यावरणाची काळजी केवळ हिमनग वितळण्यापुरती करण्याऐवजी प्रत्यक्ष आपल्या शहरात काय जळते आहे हे ज्या तरुणांनी पाहिले, त्या सर्वामुळेच आरे वाचवाही लोकचळवळ पुढे गेली..

नवरात्रीतल्या त्या रात्री, मुंबईतील बहुतांश तरुणाई गरब्याच्या तालावर नाचत असताना काहीशे तरुण आरेमध्ये झाडांच्या कत्तलीविरोधात एकत्र आले. त्यांच्यासाठी कोणी नेता नव्हता, ना कोणती संस्था, ना कोणता पक्ष, ना कसले आमिष. तरीही रात्रभर हे तरुण आरेच्या जंगलात ठाण मांडून बसले. एखाद्या संस्थेच्या रचनेसारखी नियमांनी बांधलेली चौकटदेखील नव्हती, पण उद्दिष्ट नक्की होते. त्याच वेळी अमुक एक नेता सांगतोय म्हणून काही करायचे, असेदेखील नव्हते. तरुणांची उपस्थिती ही उत्स्फूर्त होती. आपण येथे का आलो आहोत, याची त्यांना स्पष्टता होती.

आंदोलन, चळवळ हे शब्द महाराष्ट्राला नवीन नाहीत. तरुण वयात क्रांतिकारी, समाजवादी विचारांच्या प्रभावाखाली येऊन काही तरी बंडखोरी करणे हा तारुण्यसुलभ स्वभावाचा भाग. प्रत्येक तरुणाने त्याचा थोडाफार तरी अनुभव घेतलेला असतोच. पण गेल्या काही वर्षांत तरुणांची व्यावहारिकतेची कसोटी थोडी अधिकच स्पष्ट आणि टोकदारदेखील झाली आहे. अशा वेळी लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची उठाठेव कशासाठी, हा प्रश्न पडणे अगदीच स्वाभाविक आहे. नोकरी-व्यवसाय व्यवस्थित असताना, केवळ काही तरी वेगळे करायचे या भावनेने एखाद्या आंदोलनात संख्यादर्शक वाढ करणाऱ्यांसाठी हा मुद्दा तेवढा लागू होत नाही. पण आरेच्या सर्वच घटनांमध्ये एकुणातच तरुणांचा वाढता सहभाग पाहिल्यास तरुणाईच्या केवळ भावनिकच नाही तर व्यावहारिक स्पष्टतेचादेखील विचार करावा लागतो.

मेट्रो-३ च्या कारशेडसाठी २०१५ मध्ये आरेतील जागा वापरायचे ठरले, तेव्हा ‘आरे वाचवा’ ही मोहीम सुरू झाली. अर्थातच त्याला चळवळ वगैरे स्वरूप अजिबात नव्हते. समविचारी लोकांचा अनौपचारिक समूह अशी त्याची रचना होती. आज सहभागींची संख्या वाढली तरी अनौपचारिकता तशीच आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच न्यायालयीन माध्यमांचा वापर होऊ लागला. पण या अनौपचारिक समूहाचे प्रभावी माध्यम होते ते इंटरनेटचे. आजच्या तरुणाईचे परवलीचे शब्द असणारे समाजमाध्यम त्या जोडीला आले. आरे आंदोलनातील तरुण-तरुणींशी संवाद साधल्यावर समाजमाध्यमांचा सहभाग हा सर्वाधिक महत्त्वाचा भाग असल्याचे जाणवते. इंटरनेटवर माहितीचा भडिमार होत असला, तरी नेमके सत्य काय आहे याची शहानिशा करण्याचे ज्ञान त्यांना इंटरनेटनेच करून दिल्याचे हर्षद तांबे सांगतो. केवळ आरेच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यावरणाच्या बदलाची दाहकता त्यातून समजते, असे त्याचे म्हणणे आहे. किंबहुना या बाबी कळत असताना ‘आता जर का बोललो नाही, तर कधीच बोलता येणार नाही’ याची जाणीव झाली. त्यामुळेच, आपणदेखील भूमिका घ्यायला हवी अशीच मानसिकता या तरुणांची कायम दिसून येते. समाजमाध्यमावर लाइक आणि शेअरची बटणे दाबून सहभाग नोंदवणे सोपे असले तरी अनेक तरुण या आंदोलनामध्ये प्रत्यक्षात काम करण्यासाठी आकर्षति झाले ही त्यातील महत्त्वाची बाब. त्याचेच एक कारण म्हणजे या आंदोलनाचे लोकचळवळीचे स्वरूप.

आंदोलनातील बहुतांश तरुणांचे मत आहे की, ही लोकचळवळ आहे म्हणूनच आम्ही यात आहोत. कोणीही नेता नाही की पदांची उतरंड नाही. ‘प्रत्येकाला आवाज आहे, त्यामुळे एक प्रकारे हे समानतेच्या दिशेने जाणारे आंदोलन आहे,’ अशी या तरुणांची भावना आहे. ‘यापुढे अशाच चळवळींची गरज आहे,’ असे ते सांगतात. अशा रचनेत एकाच वेळी अनेक जण बोलत असतात, प्रत्येकाचा दृष्टिकोनदेखील वेगळा असू शकतो. कधी कधी तो मूळ उद्दिष्टाशी फारकत घेणारा किंवा विपरीत जाणारादेखील असू शकतो; पण ते मत मांडले जाणे गरजेचे असल्याचे या तरुणाईचे मत आहे. आज आरेच्या या समूहात सर्व स्तरांतील तरुणांचा समावेश त्याचमुळे टिकून आहे. कोणाही ज्येष्ठांनी हे करू नका, ते करू नका असे कधीच सांगितले नसल्याचे हे तरुण आवर्जून नमूद करतात.

तरुणाईच्या बाबतीत जेव्हा अशा रस्त्यावर उतरून केल्या जाणाऱ्या चळवळींचा मुद्दा येतो, तेव्हा साहजिकच मध्यमवर्गीय स्वभावानुसार अभ्यास आणि करिअर ही दोन कारणं न चुकता पुढे केली जातात. अशा वेळी पाय मागे खेचले जाण्याची शक्यताच अधिक असते. त्याबाबतीतदेखील या पिढीचे विचार स्पष्ट आहेत. त्यांच्या मते, विकास हा शाश्वत नसेल तर भविष्यात त्याचा काहीच उपयोग नाही. व्यवस्थेच्या विरोधात जायचे नाही असेच आपली सारी शैक्षणिक यंत्रणा शिकवत आलेली आहे, त्यातून गुंतागुंत वाढत जाते अशी या तरुणांची भूमिका आहे. करिअर आणि पशाचं महत्त्व ते मान्य करतात; पण त्याचबरोबर एका मर्यादेनंतर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्यायच राहत नाही असे तरुणाईचे मत आहे. अर्थातच हे आंदोलन शांततामय निदर्शनाच्या माध्यमातून करायचे यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

आज आम्ही लढणार!

आरेमधील कारशेडच्या विरोधात तीव्रता वाढू लागली तसे सरकार समर्थकदेखील सरसावले. हा जोर वाढल्याबद्दल तरुणाई सांगते की, कारशेड समर्थकांचे मुद्दे हे प्रपोगंडा स्वरूपात होताना दिसत होते. कारशेड समर्थकांचा हा समूह एका विवक्षित समाजगटाशी निगडित असतो, पण त्याच वेळी आमच्या आंदोलन समर्थकांचा समूह मात्र लिंग, वर्ग आणि धर्मविरहित असल्याचे हे तरुण मांडतात. ‘‘आरेमध्ये यापूर्वी आलेल्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केले जातात. या सर्व घटना आमच्या लहानपणी घडल्या, त्याबाबत आम्ही काही करू शकत नव्हतो; पण जे आमच्यासमोर सुरू आहे त्याचा परिणाम आमच्या भविष्यावर होणार असेल तर आम्हाला उभं राहावं लागेल,’’ असे हृषीकेश पाटील सांगतो.

हे आंदोलन हे केवळ कारशेडपुरते मर्यादित नसून त्याचबरोबर भविष्यात येऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांची ही सुरुवात आहे. कारशेड नाही तर संपूर्ण जंगल (आरेबाबतीत, ‘जंगल’ हे अस्तित्वसुद्धा मतलबीपणाने नाकारले जाणे) हा मुद्दा आहे. ‘‘नव्या पिढीला समाजकारण, राजकारण हे आदर्शवत कसे असायला हवे कळते, त्यामुळेच उच्च शिक्षण घेतलेली मुलंदेखील रस्त्यावर उतरताना कचरत नाहीत,’’ असे हृषीकेश पाटील म्हणतो. किंबहुना त्यांच्या पालकांनादेखील याबाबत स्पष्टता असल्यामुळे घरून त्याबाबत आडकाठी केली जात नसल्याचे हे तरुण नमूद करतात.

आरेच्या या आंदोलनात सुरुवातीला २०१७ च्या दरम्यान तरुणांची संख्या मर्यादित होती. मात्र त्यानंतर यामध्ये सामील होणाऱ्या तरुणांची संख्या वाढत गेली. ज्यांना पर्यावरणाविषयी आवड, जाण होती ते यामध्ये सामील झाले होतेच; पण त्याचबरोबर इतरांनादेखील याविषयी जागरूकता आणण्याचे काम सहभागी झालेल्या तरुणांनीच केले. साहिल पास्रेकर सांगतो की, ‘‘आम्ही पर्यावरणाचे जागतिक मुद्दे मांडण्यापेक्षा स्थानिक मुद्दय़ांवर अधिक भर दिला. त्यामुळे थेट संबंध जोडणे अनेक तरुणांना शक्य झाले. गेल्या सहा महिन्यांत अनेक आंदोलकांनी यासाठी आपापल्या भागातील महाविद्यालये, शाळांना भेटी दिल्या. त्याचबरोबर निसर्ग भटकंती, आदिवासी पाडय़ांवरील भटकंती असे कार्यक्रमदेखील वर्षभर सुरू होते.’’ त्याचाच परिणाम म्हणजे शुक्रवारी रात्री दोनएक तासात इतक्या मोठय़ा संख्येने तरुणाई आरेमध्ये जमा झाली. आरेच्या या आंदोलनाचे स्वरूप हे रचनात्मक वगैरे म्हणता येईल अशा स्वरूपाचे अजिबातच नाही. ते अगदीच खडबडीत आहे, चौकटविरहित आहे; पण त्यालाच तरुणांचा पािठबा आहे. त्यामुळेच तरुणांचा सहभाग अधिक आहे हे अधोरेखित करावे लागेल.

आरेबाबतीत राजकारण हा मुद्दादेखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्याबाबत तरुणाईचे म्हणणे आहे की, ‘राजकारणाचा प्रत्येक घटकावर परिणाम होतच असतो.’ काही तरी घडते आहे ते दुसरीकडे घडते म्हणून आपण पाहायचेच नाही हा मुद्दा आता मागे पडला आहे. त्याचबरोबर राजकारण्यांचा स्वार्थीपणा आणि मध्यमवर्गीय स्वार्थीपणा (मला काय त्याचे) यापलीकडे जावे लागेल असाच सूर या तरुणांच्या बोलण्यातून उमटतो. गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांना सर्वाधिक प्रश्न तरुणाईनेच विचारले आहेत, त्यामुळे तरुणाई या स्वार्थाच्या पलीकडे जाऊ शकते असे या सर्वाना वाटते. झेंडाविरहित आंदोलनातील तरुणाईचा हा सूर चांगल्या भविष्यासाठी स्वत: मैदानात उतरण्याची तयारी ठेवणारा, म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. आज ‘आरे’ला ‘का रे’ करण्याची हिम्मत त्यांनी दाखविली आहे, ती उद्या रचनात्मक कामाकडेही जाऊ शकते.