05 August 2020

News Flash

संवादांचं पूर्णत्व

मलाच वाईट वाटलं. मग घरात काही वेगळं केलं की मी त्यांना आठवणीनं डबा द्यायला लागले.

‘‘जिथे आपण खूप जीव गुंतवलेला असतो, तिथे अपेक्षाभंग करणारा प्रतिसाद मिळाल्यावर सर्वात जास्त अस्वस्थता येते, पण तर्कसंगत विचार करून सुटण्याची जागाही तीच असते. दुसऱ्याच्या हेतूबद्दल आपल्याला वाटतंय तेच खरं, असं गृहीत न धरता इतर शक्यतांचाही विचार करून पाहायला हवा, आपल्या आणि संबंधितांच्या प्रतिसादाकडे त्रयस्थपणे पाहायला हवं. त्या व्यक्तीपर्यंत योग्य शब्दांत आपली भावना पोहोचवून विषय ‘पूर्ण’ करणंही तितकंच महत्त्वाचं. संवादांचं हे पूर्णत्व मनातला जुना कचरा स्वच्छ करतं.’’

‘‘एक गोष्ट आता मला पक्की कळलीय, आपण लोकांसाठी केलेल्या कष्टांची त्यांना कदर नसते. त्यामुळे कुणाला जीव लावायला जाऊ नये. आपण बरं, आपलं घर आणि जवळची चार माणसं बरी.’’ रसिका तिचं जीवनविषयक तत्त्वज्ञान तावातावानं मांडत होती.
‘‘या वेळी हा साक्षात्कार तुला कुणामुळे झाला रसिका? कारण घरच्यांना माझी किंमत नाही अशीही नेहमी तक्रार करतेस.’’ मी गमतीनं विचारलं.
‘‘अगं, माझ्या समोरच्या ब्लॉकमधली पूजा आहे ना, कॉल सेंटरमध्ये काम करते. मध्यंतरी तापानं फणफणली. पार्टनर्स गावी गेलेल्या. एकटीच पडून होती. उठवतही नव्हतं. तिची अवस्था पाहून मी तिला दवाखान्यात नेलं, काळजी घेतली, घरचं जेवण दिलं, बरी झाल्यावर डोळ्यात पाणी आणून ‘थँक्यू’ म्हणाली. कशा या मुली राहतात गं बिचाऱ्या एकटय़ा. रात्रीचा दिवस, जेवणखाण धड नाही. मलाच वाईट वाटलं. मग घरात काही वेगळं केलं की मी त्यांना आठवणीनं डबा द्यायला लागले. पोरी नावाजून खातात, पण डबे परत करायचं नाव नाही. शेवटी मीच एकदा माझे सगळे डबे उचलून आणले. आता त्यांना प्लास्टिकच्या डब्यात खाऊ पाठवते.’’
‘‘मग प्रॉब्लेम काय? तुझ्यामागे टवाळी करतात का मुली तुझी?’’
‘‘नाही गं, पण एकदा पूजा पार्टनरला सांगत होती, ‘हा कुणाचा डबा पडलाय देव जाणे. इतके डबे येतात कुणाकुणाचे..’ बघितलं तर माझाच डबा होता गं, तिला आजारपणात धिरडी पाठवलेली त्याचा. खूप दुखावल्यासारखं वाटलं मला.’’
‘‘अगं, मग तसं सांगून टाकायचं तिला. अगदी टवाळी केली असती तरी सांगायचं की ‘तुझ्या बोलण्यानं मी दुखावली जातेय..’ एकदा माधुरीबद्दलपण असंच काही तरी सांगत होतीस..’’
‘‘हो. तिची इशिता सहामाहीला दोन विषयांत नापास झाली. आई रागावली म्हणून मुसमुसत होती. मला वाईट वाटलं, मी शिकवते म्हटलं. हसतखेळत शिकवून गोडी लावली अभ्यासाची. दोन र्वष उत्तम मार्क पडले. माधुरी पैसे देत होती शिकवण्याचे, मी घेतले नाहीत..आणि आठवीला, इशिताला त्या नावाजलेल्या महागडय़ा क्लासला जबरदस्तीनं घातलं माधुरीनं. आठवीपासून इंजिनीअिरगच्या तयारीची गरजच काय? मला सांगायची सुद्धा तसदी घेतली नाही. लोक कसं असं वागू शकतात गं? गरज सरो वैद्य मरो? मी रागानं बोलणंच सोडलं तिच्याशी.’’
‘‘लोकांनी असं वागू नये हे खरं, पण बोलली नाहीस म्हणून माधुरी ‘सॉरी’ म्हणायला आली का? अबोला धरून लोकांचे स्वभाव थोडीच बदलू शकतो आपण?’’
‘‘त्याचीच तर चिडचिड करून मैत्रिणीजवळ मन मोकळं करतेय.’’
‘‘तू मैत्रिणींजवळ चिडचिड करणार, पण ज्यांनी हे केलंय त्यांच्याशी मात्र तोंडदेखलं गोड बोलणार किंवा बोलणंच थांबवणार. त्यामुळे मनात आणखी चिडचिड होणार. वर त्या व्यक्तींशी याबद्दल चकार शब्दही न बोलता ‘जगाला माझ्या करण्याची किंमत नाही’ असा निष्कर्ष तूच काढणार आणि दुसऱ्यासाठी केलेल्याचा निखळ आनंद गढूळ करून घेणार. काय भारी लॉजिक आहे गं तुझं?’’
‘‘पण त्यांनी का वागावं असं?’’
‘‘असतील त्यांची कारणं. माधुरीनं तुला त्रास द्यायच्या हेतूनं इशिताला त्या क्लासला घातलं असेल का?’’
‘‘काहीही काय? तिच्या भावाचा मुलगा त्या क्लासला जातो. त्यामुळे इशितालापण इंजिनीअरच करायचंय तिला. ‘इशिताला अभ्यासापलीकडचे अनुभव घेऊन स्वत:ची आवड शोधू दे. मार्काच्या मागे नको लागू’ असं इतके वेळा सांगूनही तिला पटलं नाही.’’
‘‘बघ. तूच उत्तर दिलंस. इशिताला त्या क्लासला घालायला तुझा विरोध होताच. मुलांकडून ते जसं डोक्यावर बसून करून घेतात तसं तुला जमणारच नव्हतं. ‘मतभेद’ होण्याची भीती वाटली, शिवाय तू पैसेही नको म्हणालीस. म्हणून तुला पटवत बसण्यापेक्षा माधुरीनं न सांगण्याचा पर्याय निवडला असेल.’’
‘‘असंही असू शकेल गं, माझ्या लक्षातही आलं नाही.’’
‘‘तिच्याशी बोलणं बंद करूनही तुला त्रास होतोच आहे. तिलाही होत असणार. तू इशितासाठी केलेल्याची थोडी तरी जाण तिला असेल?’’

‘‘हो. रसिकामुळेच इशिताला अभ्यासाची गोडी लागली असं सर्वाना सांगते ती.’’
‘‘तरीही ‘माझ्या करण्याची किंमत नाही’ असं ठरवून टाकलंस आणि जग कसं वाईट आणि मी किती चांगली, म्हणत स्वत:ला कुरवाळत बसलीस. पूजाचंही एकच वाक्य धरून ठेवलंयस. तिनं तुझ्यासाठी कधीच काही केलं नाही का?’’
‘‘तसं नाही, गावी गेल्यावर तिथली खासियत माझ्यासाठी आणते. गरजेला मदत करते.’’
‘‘म्हणजे तिच्या परीनं ती परतफेड करते. डब्याचं किती मनाला लावून घेशील? या वयात मुलींचं भांडय़ाकुंडय़ात कुठे लक्ष असतं? तुझी स्वत:ची मुलगीही या वयात अशीच बेजबाबदार वागली असती. ब्लॉकमध्ये तिघी राहतात, सगळ्यांच्या घरून डबे येणार, कुणी रूम सोडताना वस्तूही सोडून जाणार. त्यात तू स्वत:चे सगळे डबे गोळा करून नेलेही होतेस. तरीही, तशा आजारी अवस्थेत तिनं तेव्हाचा तुझा डबा लक्षात ठेवायला हवा ही अपेक्षा कितपत बरोबर आहे?’’
‘‘ए, तू त्यांचीच बाजू घेतेयस. मी एवढं जीव लावून शिकवलं. पूजाचं आपलेपणानं केलं. त्याचं काहीच नाही?’’
‘‘तुझं दुखावलं जाणं समजतंय ग रसिका, पण तू जीव का लावलास? त्यांना मदत करण्याची गरज तुझ्या आतून आली म्हणून. ‘इशिताला शिकवा’ म्हणून माधुरी विचारायला आली नव्हती किंवा ‘दवाखान्यात न्या, खाऊ पिऊ घाला’ असं पूजा मागायला आली नव्हती. तू माणुसकीनं केलंस, तुझा वेळ सत्कारणी लागला, समाधान वाटलं, त्यांनाही आनंद मिळाला. तिथं तुमच्यातली देवाणघेवाण पूर्ण झाली. प्रश्न उरतो तो तुझी नंतरची अपेक्षा त्यांनी समजून घेतली नाही एवढाच. तर त्यांना सांगून टाक ना नीट शब्दांत, की ‘इशिताला क्लासला घातल्याचं मला सांगितलं नाहीस याचं मला वाईट वाटलं’ किंवा ‘पूजा, माझ्या पदार्थाचं कौतुक करतेस तशीच डब्यांची काळजी घेतलीस तर मला बरं वाटेल.’’
‘‘असं कसं सांगणार? केलेलं बोलून का घालवू मी?’’
‘‘कारण न बोलण्याचाच तुला त्रास होतोय. ‘त्या विशिष्ट प्रसंगांत’ तुला जसा प्रतिसाद अपेक्षित होता तसा त्यांच्याकडून मिळाला नाही म्हणून त्यांचा राग येतोय आणि ते सांगता येत नाही, वर खोटं वागावं लागतंय म्हणून स्वत:चाही. त्यामुळे ‘त्या कशा चुकीचं वागल्या’ याचं माझ्यासोबत गॉसिपिंग करतेयस. तुझ्या त्रासातून मोकळं होणं फक्त तुझ्याच हातात असतं. नाहीतर दर नव्या अनुभवासोबत ‘माझी कुणाला किंमत नाही’च्या दुखावल्या भावनेचा डोंगर वाढत राहील. हा मनात साचलेला कचरा असतो गं, वेळोवेळी काढून टाकून मन जास्तीत जास्त मोकळं ठेवायला हवं.’’
‘‘कचरा कुठे साचलाय ते कळणार कसं?’’

‘‘जिथे आपण खूप जीव गुंतवलेला असतो, तिथे अपेक्षाभंग करणारा प्रतिसाद मिळाल्यावर सर्वात जास्त अस्वस्थता येते, पण तर्कसंगत विचार करून सुटण्याची जागाही तीच असते. आपल्या अपेक्षा आणि गृहीतकं अवास्तव नाहीत ना, ते पाहायला हवं. दुसऱ्याच्या हेतूबद्दल आपल्याला वाटतंय तेच खरं, असं गृहीत न धरता इतर शक्यतांचाही विचार करून पाहायला हवा, आपल्या आणि संबंधितांच्या प्रतिसादाकडे त्रयस्थपणे पाहायला हवं. त्या व्यक्तीपर्यंत योग्य शब्दांत आपली भावना पोहोचवून विषय ‘पूर्ण’ करणंही तितकंच महत्त्वाचं. मग आपल्या मनातला जुना कचरा स्वच्छ होतो आणि रोजची जळमटं रोज झटकून साफ करायचं तंत्रही जमायला लागतं.
‘‘एखादा थेट शॉर्टकट नाही का गं याला?’’
‘‘शोधू या. प्रसंगांकडे आणि प्रतिसादांकडे त्रयस्थपणे बाहेरून पाहायचं आणि मनात त्या प्रक्रियेचं चित्र उभं करायचं. आत्ताच्या या प्रसंगांत मला असं दिसतंय, की तुला आवडणार नाही या भीतीनं माधुरीनं काही तरी लपवलं आणि तू रागावून तिच्याशी कट्टी केलीस. पूजाचा तिच्याही नकळत तुला चुकून जोराचा धक्का लागला तर तू रुसून फुरंगटून बसलीस. वर पुन्हा कुणाचा धक्का लागू नये म्हणून बाहेरच पडायचं नाही असं रागारागानं ठरवून टाकलंस..’’
त्या कल्पनेनं रसिका हसतच सुटली. ‘‘ए, भारी. खरंच बालिश वागले गं मी. ते दिसलं आणि मान्य केल्यावर एकदम मोकळं वाटलं. तू म्हणतेस तसा संवाद ‘पूर्ण’ करणं आता जमेल नक्की.’’
‘‘सुरुवात तर करू. कदाचित आज थोडं जमेल. नंतर सरावानं मनाला झाडणं, झटकणं अंगवळणी पडेल.’’

– नीलिमा किराणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2016 1:11 am

Web Title: conversation completion
Next Stories
1 स्वीकाराचा चष्मा
2 संवादाचा समंजस पॅटर्न
3 मै तो पनिया भरन से छूटी रे
Just Now!
X