‘‘विक्या, संबंध तुझाच आहे, ‘ती’ फक्त निमित्त आहे. बिझनेस मनासारखा चालत नसताना योगायोगानं ‘ती’ भेटली. दोन्ही बाजूंनी मनमोकळा संवाद होऊन तुझ्या मनातली एक अपूर्ण इच्छा ‘पूर्ण’ झाली. खूप भारी वाटलं तुला. त्यातून मिळालेल्या ऊर्जेतून तुला व्यवसायात झेप घेता आली असती, पण तू तिथेच रेंगाळलास. कल्पनाविश्वात रमलास. परिणाम? धंद्यात मंदी आणि बायकोची नाराजी. दिवास्वप्नातून बाहेर आलास की वास्तव कळेल तुला..’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘आज संध्याकाळी आपल्या जुन्या कट्टय़ावर येशील का? बोलायचंय यार.’’ विकीचा मेसेज पाहून मानसला आश्चर्य वाटलं. गेल्याच आठवडय़ात शाळेतल्या वर्गमित्रांच्या गेटटुगेदरला विकी भेटला होता. विकी थोडा ‘उद्योगी’ टाइपचा. अभ्यासात यथातथा पण इतर गोष्टींत उत्साही. लोकांना मदत करायला पुढे त्यामुळे ओळखणारे खूप, पण थोडा बढाईखोर. प्रत्येक गोष्टीची ‘स्टोरी’ करून मोठेपणा मिळवणं आणि चर्चेच्या वलयात असणं त्याला आवडायचं. मुलींसमोर मात्र बावचळायचा. बोलतीच बंद व्हायची. मानसचा स्वभाव मात्र संयमी, संतुलित. त्यामुळे त्याची सर्वाशी मैत्री. शंका विचारायला आणि अस्वस्थ झाल्यावर मन मोकळं करायला विकीला मानस लागायचा. कॉलेज संपल्यावर भेटी कमी झाल्या. विकी छोटीमोठी कामं करतो, कधीमधी एका नगरसेवकासोबत दिसतो एवढं मानसला माहीत होतं. ‘‘विकी पूर्वीच्याच हक्काने बोलवतोय, गेटटुगेदरमुळे मधला पंधरा वर्षांचा काळ पुसून गेलाय जसा.’’ मानसच्या मनात आलं.
‘‘एवढं काय काम काढलं विक्या? काही तरी नवा राडा का?’’ विकी भेटल्यावर मानसच्या तोंडून जुन्या सवयीचा प्रश्न गेला.
‘‘नाही यार. राडे सोडवतो माझे मी. जरा पर्सनल प्रॉब्लेम आहे.’’
‘‘बोला.’’
‘‘आजकाल कामात लक्ष लागत नाही, मनात काही तरी विचारचक्र चालू असतं. बायकोशी भांडणं वाढलीत. लोक गरज पडली की मदतीसाठी माझ्याकडे येतात पण अनेकदा पाठीमागे टिंगल करतात असं लक्षात येतंय. काय चुकतंय काही कळत नाहीये रे.’’
‘‘आपल्या गेटटुगेदरला तू सगळ्या ग्रुप्समध्ये काही तरी स्टोरी सांगत होतास, मध्येच दर्दभरी गाणी गात होतास. काय होतं ते?’’
‘‘हां. ती एक स्टोरीच आहे. आमच्या गल्लीतली एक मुलगी मला शाळेपासून आवडायची. फार भारी होती दिसायला. पण जात वेगळी, तिच्या घरची परिस्थिती आमच्यापेक्षा फारच उत्तम. मी त्या वेळी अर्धशिक्षित बेकार. त्यात माझा मुलींशी बोलायचा प्रॉब्लेम तर तुला माहीतच आहे. त्यामुळे ते मनातच राहिलं. तिचं लग्नही लवकर झालं. नंतर मी कामधंद्याला लागलो, लग्न झालं, तिच्याइतकी भारी नसली, तरी माझ्या परीनं चांगली बायको मिळाली, मुलं हुशार निघाली. पण तरीही ‘ती’ कुठे तरी मनात होती. तिच्याशी साधं बोललोही नाही, आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत याची रुखरुख वाटायची.
तीन वर्षांपूर्वी ती मला एकदा बसमध्ये भेटली. हसली, बोलली. चक्क गप्पा मारल्या, खूप भारी वाटलं. आयुष्यात अशी संधी पुन्हा येणार नाही असं जाणवलं आणि धाडस करून एकदाचं तिला सांगून टाकलं की, ‘तू मला आवडत होतीस.’ आणि तुला काय सांगू मन्या, माझा हात धरून म्हणाली, ‘मला पण तू खूप आवडायचास.’ मी तिच्या स्टॉपपर्यंत सोबत गेलो. पूर्ण वेळ हात तिच्या हातात होता..’’
मानसनं विकीच्या खांद्यावर हलकेच थोपटलं. बऱ्याच वेळाच्या शांततेनंतर मानस म्हणाला, ‘‘खूप हलकं वाटलं असेल ना? एवढय़ा वर्षांचं मनावरचं ओझं उतरलं असेल.’’
‘‘हो. माझ्या दिलाची तसल्ली झाली मन्या, आता मेलो तरी चालेल असं वाटलं.’’
‘‘..पण त्यानंतर तू त्या प्रसंगातून बाहेर आलाच नाहीस. ही स्टोरी आख्ख्या जगाला सांगत फिरतोस. दर्दभरी गाणी गातोस, तंद्रीत असतोस. बायकोलापण सांगितलंस का हे?’’
‘‘हो. आपल्याला चोरटेपणा आवडत नाही. बायकोला सांगितल्यावर ती पहिल्यांदा चिडली, पण आमची लव्ह स्टोरी पुढे जाणार नाही, मी घरदार सोडून तिच्यामागे जाणार नाही किंवा तीही येणार नाही हे बायकोला माहितीय. त्या वेळी ‘ती’च्यावरून बायको मला कधी कधी चिडवायचीसुद्धा. हल्ली मात्र तिचं काही तरी बिनसलंय. कशावरूनही भडकते. धंद्यात थोडी मंदी सुरू आहे, त्यावरून तर पट्टाच सुरू होतो तिचा. दारात पाय ठेवताना पोटात गोळा येतो रे हल्ली. गेटटुगेदरला तू भेटलास तेव्हाच ठरवलं की आता हे सगळं मन्याशीच बोलायला पाहिजे. फक्त एकदा ‘तिच्याशी’ बोललो, हा काय गुन्हा केला का? बरं, तेही लपवलं नाही. तरी बायको चिडते. लोक माझी मदत घेऊनच्या घेऊन मागे टिंगल करतात. कशातच रस वाटेनासा झालाय यार.’’
‘‘तुझ्या बिझनेसमध्ये ‘ती’ भेटल्यानंतर मंदी आलीय की थोडी आधीपासून?’’
‘‘ती’ भेटायच्या आधी चार-सहा महिन्यांपासून मंदी जाणवत होती. कितीही धडपडलो तरी गेल्या तीन वर्षांत फार फरक नाही. पण ‘तिचा’ यात काय संबंध?’’
‘‘विक्या, संबंध तुझाच आहे, ‘ती’ फक्त निमित्त आहे. बिझनेस मनासारखा चालत नाही आणि काय करायचं कळत नाही अशा परिस्थितीत तू होतास. योगायोगानं त्याच सुमारास ‘ती’ भेटली. दोन्ही बाजूंनी मनमोकळा संवाद होऊन तुझ्या मनातली एक अपूर्ण इच्छा ‘पूर्ण’ झाली. खूप भारी वाटलं म्हणजे त्यातून खूप ऊर्जा मिळाली असणार. ती कामाकडे वळवून तुला व्यवसायात झेप घेता आली असती. पण तू तिथेच रेंगाळलास. त्या प्रसंगाचं एक बीळ बनवलंस. कष्ट करायची किंवा धाडस करायची वेळ आली, आत्मविश्वास कमी पडला, की तू त्या बिळात जाऊन येतोस. त्या प्रसंगाचीच बढाई मारतोस. एखादा दारुडा जसं सुचलं नाही की दारू पितो आणि प्यायल्यावर त्याला काहीच सुचत नाही असं काही तरी तू केलंस. सतत त्या प्रसंगात राहतोस, तिच्यासोबतची दिवास्वप्नं बघत असशील. कामधंद्यावर फोकस करण्याऐवजी तू असा कल्पनाविश्वात रमत राहिलास तर बायको का सहन करेल? मुलं मोठी होतायत, जबाबदाऱ्या वाढतायत, तिची चिडचिड होणारच ना? पत्नी म्हणून तिचा आत्मसन्मान किती दुखावला आहेस तू.’’
‘‘मी तिच्यापासून काही लपवलं नाही. घरचं बघतो, पैशाची थोडीफार अडचण असते, पण तिला काही झोपडीत ठेवलेलं नाही मी. समाजात वट आहे, लोक ओळखतात. आत्मसन्मान कसला दुखावला रे?’’
‘‘विक्या, झाला प्रसंग लाइटली घेऊन तुझी चेष्टा करण्याएवढी तुझी बायको समंजस आहे. तुझ्या लव्ह स्टोरीत पुढे काही घडणार नाही हे तिला कळतं हे नशीब समज. एखादीनं तुला जगणं मुश्कील केलं असतं. तिला कदाचित नीट शब्दांत तुला सांगता येत नसेल किंवा तू तिला बोलू देत नसशील. पण चोवीस तास ती तुझ्यासाठी आणि तुझ्या संसारासाठी राबत असताना तू त्या बसमधल्या अध्र्या तासाच्या भेटीत आयुष्य गुरफटून घेतलंस, ‘तिचं’ निमित्त करून बिळात जाऊन बसायचं व्यसन लावून घेतलंस, तुझी कुवत मर्यादित करून घेतलीस तर ती चिडणारच. हीच स्टोरी बायकोनं तुला तिच्या मित्राबाबत सांगितली आणि तीही त्या कल्पनेच्या नशेत तुझ्यासारखी बुडून राहिली तर?’’
‘‘हॅ! ती असं करणारच नाही. ती ‘तशी’ नाही.’’
‘‘असं कसं? तुझ्या ‘त्या’ मैत्रिणीच्या आयुष्यात बसमधला प्रसंग घडलाय. ती ‘तशी’ आहे का? तीही तुझ्यासारखी स्टोऱ्या सांगत फिरत असेल का?’’
‘‘….’’
‘‘आता आलं लक्षात काय घडतंय ते? बायकोपासून लपवलं नाहीस ते चांगलंच. पण प्रामाणिकपणाच्या नावाखाली तू तिला फार जास्त गृहीत धरतोयस. एके दिवशी शक्ती संपेल तिची.’’
‘‘अरे यार मन्या, मी तुझ्याकडे मदत मागतोय आणि तू तर घाबरवतो आहेस.’’
‘‘अरे, तटस्थपणे वस्तुस्थिती सांगतोय. प्रत्येक जण असा कशा ना कशात अडकून वस्तुस्थितीपासून पळत असतो. जवळचा मित्रच ते समजून घेऊन सांगू शकतो. लोकांना मदत करणं हा तुझा स्वभाव, तुझी इमेज आहे. एखाद्याने तुझी मदत घेऊन मागे टिंगल केलीही असेल, तो ज्याचा त्याचा स्वभाव. पण तू ‘त्या’ प्रसंगाची स्टोरी ज्याला त्याला सांगतोस, दर्दभरी गाणी गाऊन लक्ष वेधून घेतोस आणि टिंगल करणाऱ्यांना आयतंच निमित्त मिळवून देतोस. वर जगाला, बायकोला दोष देऊन स्वत:च्या जबाबदाऱ्यांपासून पळतोयस. या सगळ्यात प्रत्यक्षातला सोडच, मानसिक वेळ, शक्ती किती वाया गेली. मग व्यवसायाच्या गाडीला ऊर्जा कुठून मिळणार रे?
‘‘माझं अजूनही प्रेम आहे रे ‘तिच्या’वर.’’
‘‘असं म्हणत मरेपर्यंत त्या एका भेटीच्या आठवणीत जगत राहणार आहेस का? तुझ्या उत्कट हळव्या भावनेला पूर्णत्व मिळालं, हे काय कमी झालं? ती भावना जपून ठेवायची, ऊर्जा, आत्मविश्वास मिळवायचा की चारचौघात ‘भारी’ दिसण्याच्या गरजेतून त्या सुंदर भावनेचा बाजार मांडत आयुष्य काढायचं स्वत:चा आणि बायकोचा सन्मान संपवायचा, याची निवड तूच करायची आहेस, मित्रा.’’
मन्या हे म्हणाला खरा पण विकीसाठी तो दिवास्वप्नातून खडबडून जागं करणारा इशाराच ठरला..

मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family problems of couples
First published on: 14-05-2016 at 01:52 IST