29 May 2020

News Flash

थांबला न सूर्य कधी..

महारोग वा कुष्ठरोग आणि घृणा हे अतूट समीकरण पूर्वापार चालत आलं आहे.

ज्या कुष्ठरुग्णांचं अस्तित्वच समाजाने नाकारलं अशा लोकांनी आपल्यासारख्याच इतरही वंचित घटकांना सोबत घेऊन जगाच्या नकाशावर स्वतंत्र अस्तित्व असलेलं स्वत:चं एक गाव.. ‘आनंदवन’ निर्माण केलं. आनंदवनाचा ६७ वर्षांचा विलक्षण प्रवास रेखाटणारे सदर..

आज बाबा आमटे असते तर त्यांनी वयाची शंभरी पार केली असती. आणि साधनाताई असत्या तर नव्वद वर्षांच्या असत्या. मात्र, ते आज ‘नाहीत’ हे म्हणणं आनंदवनाच्या परिप्रेक्ष्यात योग्य ठरतं का? ‘आनंदवन’ म्हणजे नेमकं काय? ते कसं चालतं? आणि का? असे प्रश्न मला नेहमी अंतर्मुख करतात.

मला असं कायमच वाटत आलं आहे की, बाबा आणि साधनाताई ही केवळ व्यक्तिनामं नाहीत; कारण त्यांचा जन्म म्हणजे केवळ एका ‘व्यक्ती’चा जन्म नसून एका ‘प्रवृत्ती’चा जन्म असतो.. ‘आनंदवन’ या प्रवृत्तीचा. आयुष्यातला प्रत्येक क्षण कारणी लागावा आणि केलेला निर्धार पूर्ण व्हावा, ही अस्वस्थता जपणारी प्रवृत्ती! बाबा आणि साधनाताईंना येऊन मिळालेले शेकडो-हजारो जिवाभावाचे कार्यकर्ते, आनंदवनाच्या कार्यात सद्भावनेच्या रूपाने सहभागी असलेले लक्षावधी ज्ञात-अज्ञात लोक या सर्वामध्ये ही प्रवृत्ती भिनली आणि एका सुगंधाप्रमाणे पसरत गेली.

आनंदवन प्रवृत्तीबद्दल विस्ताराने जाणून घेण्यासाठी बाबा-साधनाताईंच्या जन्मापासूनच्या घटनांचा आढावा घेणं क्रमप्राप्त ठरतं. बाबा आणि साधनाताई ही अगदी विभिन्न व्यक्तिमत्त्वं. मुरलीधर देविदास आमटे म्हणजेच बाबा आमटे हा सरंजामी घराण्यात जन्म घेतलेला, एक पैलवानी बेफिकीरपण वृत्तीत असलेला, जत्रेतील कुस्ती जिंकून मिळालेले पदक स्वत:च्या सदऱ्यावर नव्हे, तर चक्क छाताडावर टोचून घेणारा, राजगुरूंसारख्या क्रांतिकारकांना मदत करणारा, रेल्वेत भारतीय अबलेची छेड काढणाऱ्या सशस्त्र ब्रिटिश सोजिरांशी धीटपणे मुकाबला करून महात्मा गांधींकडून ‘अभयसाधक’ ही उपाधी प्राप्त करणारा, तत्त्वांसाठी वडिलोपार्जित वैभवावर पाणी सोडणारा, चंद्रपूर जिल्ह्यतील वरोडय़ाचे उपनगराध्यक्षपद भूषवीत असताना सफाई कामगारांच्या समस्या समजावून घेण्यासाठी स्वत:च्या डोक्यावरून वर्षभर मैला वाहण्याचे काम करणारा, अठरापगड जाती-धर्माच्या कुटुंबांना सोबत घेत ‘श्रमाश्रमा’चा अभिनव सामूहिक प्रयोग करणारा; आणि एवढे सगळे करत असतानाही जगावेगळे काही करत असल्याची जाणीव पुसून टाकणारा एक अष्टपैलू तरुण; तर साधनाताई (पूर्वाश्रमीच्या इंदू घुले) म्हणजे महामहोपाध्यायांच्या कर्मठ घराण्यात जन्माला आलेला वात्सल्याचा झरा. अतिशय बुद्धिमान, पण लाजऱ्याबुजऱ्या या मुलीने वडिलांच्या अकाली निधनानंतर आईच्या बरोबरीने घराची जबाबदारी धीटपणे उचलली. जाचक सामाजिक रूढी-परंपरांच्या चौकटीत राहूनही हरिजन वस्तीतील बायकांना नळाला हात लावायची परवानगी नाही म्हणून घराच्या विहिरीतील पाणी काढून देणाऱ्या या मुलीने लग्नानंतर हरिजन स्त्रियांना हळदीकुंकू लावून तीच चौकट अगदी सहजपणे मोडून टाकली.

आपले असामान्यत्व कोणालाही बोचू नये एवढं सामान्यत्व जपणारं, एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडालेलं हे ‘विजोड जोडपं’ एका ध्येयाने पेटून उठतं. एक जगावेगळी, खडतर वाट एकत्र चालू लागतं. सोबत असतात मरणापेक्षाही भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर आयुष्य असणारे कुष्ठरोगी बांधव.

महारोग वा कुष्ठरोग आणि घृणा हे अतूट समीकरण पूर्वापार चालत आलं आहे. पूर्वापार म्हणजे ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपासून ते थेट आजवर! कुष्ठरुग्ण म्हणजे समाजाच्या अमानवी वागणुकीचं सर्वोच्च प्रतीक. कुष्ठरुग्णांना निष्ठुरपणे नाकारताना कुठल्याही जातीने, धर्माने वा पंथाने कधीच कुठला भेद बाळगला नाही. असा हा समाजातील सर्वात शेवटचा घटक- ज्याचं अस्तित्वच नाकारलं गेलं. या सर्व पाश्र्वभूमीवर या घटकाचा प्रवास सुरू होतो. ‘एकटे एकत्र आले आणि हा जत्था निघाला’ या बाबांच्या कवितेतील ओळींना बोलकं करणारा प्रवास. स्वत:च्या वेदनांवर विजय मिळवून या कुष्ठरुग्णांनी अंध, अपंग, कर्णबधिर, अनाथ, बेरोजगार ग्रामीण युवा, अन्यायग्रस्त आदिवासी, अल्पभूधारक शेतकरी अशा इतर वंचित घटकांना सोबत घेऊन समर्थ वाटचाल केली आणि जगाच्या नकाशावर ‘आनंदवन’ नावाचं आपलं हक्काचं गावच निर्माण केलं.

डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये कुठलेही सामाजिक प्रश्न हाताळण्याच्या दोन पद्धती मी बघितल्या. पहिली असते- परंपरागत पद्धती; ज्यात एक माणूस खड्डय़ात पडला आहे आणि दुसरा माणूस वर जमिनीवर आहे. तो वरचा माणूस खड्डय़ातल्या माणसाला भूतदयेपोटी अन्न, पाणी पोहोचवून जगवू पाहतो आहे. तर दुसरी पद्धती असते- ज्यात जमिनीवर असलेला माणूस स्वत: त्या खड्डय़ात दोर टाकून उतरतो आणि खड्डय़ातल्या माणसाला स्वत:सोबत जमिनीवर घेऊन येतो. ही दुसरी पद्धती म्हणजे आनंदवनाच्या कामाची ‘बेसलाइन’ आहे. आनंदवनाच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायचं झालं तर हा खड्डय़ात पडलेला माणूस म्हणजे शतकानुशतके खितपत पडलेल्या समाजाचं प्रतीक होता; ज्याला बाबा आणि साधनाताईंनी समान पटलावर आणलं आणि त्याचं मानसिक, सामाजिक आणि आर्थिक या तिन्ही स्तरांवर पुनर्वसन करून न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी दिली. आज आनंदवन हे सुखी, नांदतं गाव तर आहेच; पण त्याहीपलीकडे गावखेडय़ांच्या र्सवकष विकासाचं जितंजागतं उदाहरणही आहे. गेल्या ६७ वर्षांत शेती, जलसंधारण, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती, घरबांधणी, इ. अनेक क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभं राहिलेलं आहे.

या पाश्र्वभूमीवर समाजातील वैफल्यग्रस्त सुदृढ लोक पाहिले की बाबांना नेहमी प्रश्न पडायचा, ‘‘हाताची सर्व बोटं झडून गेलेल्या या बांधवांनी स्वत:च्या मनगटाच्या जोरावर लोकसशक्तीकरणाचं इतकं मोठं उदाहरण समोर ठेवलेलं असताना सुदृढ लोकांवर रडायची वेळ का यावी?’’ यासंदर्भात पु. ल. देशपांडेंचा एक किस्सा मला आठवतो. पु. ल. आनंदवनात पहिल्यांदा आले तो पाकिस्तानी आक्रमणाचा काळ होता. आनंदवनाच्या परिसरात फिरत असताना त्यांना नाटकाचा रंगमंच दिसला. त्याबद्दल त्यांनी बाबांना विचारलं. बाबा म्हणाले, ‘‘काल रात्री आमच्या पेशंट्सनी नाटक करून देशाच्या डिफेन्स फंडाला अडीच हजार रुपये दिले.’’ पुलंनी आश्चर्यानं विचारलं, ‘‘कुष्ठरोग झालेल्यांनी?’’ त्यावर बाबा म्हणाले, ‘‘हो, त्यातून आता जे मुक्त झाले आहेत त्यांनी एक पौराणिक नाटक केलं. आणि काय सांगू भाई, आमच्या कृष्णाला सुदर्शनचक्र ठेवायला बोटच नव्हतं.. मग एक कागदी बोट करून लावलं आणि त्यात सुदर्शनचक्र  बसवलं..’’ पुढे एकदा पुलंनी या प्रसंगाचा उल्लेख करताना आपल्या एका लेखात म्हटलं होतं, ‘‘खरोखरच आनंदवनीच्या श्रीकृष्णाला बोट नव्हतं. बाबांनी त्याला बोट दिलं. अशा असंख्य कृष्णांना त्यांनी बोटं दिली आणि सुदर्शनचक्रंही दिली. आनंदवनात त्या सुदर्शनचक्राची विविध रूपं मी पाहत होतो. अशिवाचा, अभद्राचा नाश करणारी ही सुदर्शनचक्रं. ती मी तिथल्या बैलगाडीत पाहिली आणि ट्रॅक्टर्समध्येही पाहिली. सूत काढायच्या चात्यांत आणि पिठाच्या जात्यांतही मला ती दिसली. छापखान्यात होती, शिवणयंत्रात होती. ज्याच्या ज्याच्या हाती मी ही सुदर्शनचक्रं फिरताना पाहिली, तो कुष्ठरोगी असूनही त्याचे एकेकाळचे भयप्रद दर्शन ‘सु’दर्शन झाले आहे.’’

‘आनंदवनात पर्यटक म्हणून या आणि परिवर्तित होऊन जा..’ असं म्हणणारे पु. ल. असोत वा आनंदवनाशी जोडले गेलेले साहित्य, पत्रकारिता, कला, विज्ञान, उद्योग, सामाजिक, आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रांतील लोक असोत; त्यांनी समाजाला कुष्ठरोगाकडे आणि एकूणच आनंदवनाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली.

बाबा आणि साधनाताईंनंतरही आनंदवनाचं काम थांबलं नाही किंवा मंदावलंही नाही. आनंदवनाच्या पुढच्या पिढय़ा कामाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेत समर्थपणे वाटचाल करत आहेत. आनंदवनाचा हा विलक्षण प्रवास, त्यातील सहप्रवासी, प्रवासादरम्यान घडलेल्या विविध घटना आणि भेटलेल्या अद्भुत व्यक्ती हे आनंदवनाचं संचित आहे. या संचितातले एकेक कवडसे मी या लेखमालेच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपल्यासमोर उलगडत जाणार आहे.

विकास आमटे vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2017 1:19 am

Web Title: 67 year of anandwan village journey
Next Stories
1 वाचते होऊ..
2 ‘मनें चांगले मार्गास लावणें हें लोकांचे स्वाधीन’
3 ‘राजहंस माझा निजला..’
Just Now!
X