News Flash

अशोकवनाची स्थापना

अशोकवनात शेतीयोग्य जमीन तयार केल्यानंतर कोरडवाहू पिकं घेण्यास सुरुवात झाली.

कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव देशातल्या ग्रामीण भागापुरताच मर्यादित होता असं नाही. शहरी भागांत आणि शहरांच्या आसपासही कुष्ठरुग्णांचं प्रमाण बरंच होतं. तसंही नागपूर परिसरात कुष्ठरुग्णांच्या उपचारासाठी एखादा प्रकल्प सुरू करण्याचं बाबा आमटेंच्या डोक्यात सुरुवातीपासूनच घाटत होतं. कारण नागपूर शहरापासून ३० मैलांच्या परिघात कुष्ठबाधितांवर उपचारासाठी एकही केंद्र नव्हतं. नागपूर रबर इंडस्ट्रीजचे मालक शंकरराव जोग यांनी १९५२ साली महारोगी सेवा समितीस दहा हजार रुपयांची उदार देणगी देऊन आनंदवनाच्या धर्तीवर नागपूरजवळ एखादं उपचार केंद्र महारोगी सेवा समितीतर्फे सुरू करण्यात यावं अशी इच्छा बाबांकडे व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने नागपूर शहरानजीक जमीन मिळवण्यासाठी बाबांचे सरकारदरबारी प्रयत्न सुरू होते. आनंदवनाचे विश्वस्त आणि मध्य प्रदेश शासनात योजना व विकास मंत्री असलेले रा. कृ. पाटील, बाबांचे मित्र तात्याजी वझलवार, ज्येष्ठ गांधीवादी नेते दादासाहेब बारलिंगे यांनीही आपलं वजन खर्ची घातलं. सर्वाच्या प्रयत्नांना यश आलं आणि महारोगी सेवा समितीला नागपूरजवळ ५० एकर जमीन दिली जात आहे, असं मध्य प्रदेश राज्य शासनाचं ८ फेब्रुवारी १९५५ चं पत्र बाबांना प्राप्त झालं. नागपूर शहरापासून दहा मैल अंतरावर, नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर स्थित गवसी मानापूर गावानजीक एका आडजागी काटेरी आणि दाट झुडुपी जंगल असलेली ही बरड, मुरमाड जमीन. Land allotment चं पत्र मिळालं तरी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळायला मात्र वर्ष लागलं. जमीन मिळाल्यापासून दोन वर्षांच्या आत उपचार केंद्र उभारलं जावं अशी शासनाची अट होती. त्यामुळे काम त्वरित सुरू होणं गरजेचं होतं. मिळालेली जमीन ओसाड तर होतीच, पण त्या जमिनीवर नागपुरातून पोलिसांनी तडीपार केलेले गुंड, नागपूर मध्यवर्ती कारागृहातले पूर्वकैदी यांचे दारू गाळणे, जुगार वगैरे अवैध धंदेही चालत असत. प्रसंगी खूनही पडत असत. आणि खून एखाद् दुसरा होत नसे, तर ‘लॉट’मध्ये- म्हणजे पाच-दहाच्या संख्येत होत. झाडांच्या ढोलीत मृतदेहांची विल्हेवाट लावली जाई. अशी ही जागा ‘लाल बरड’ किंवा ‘लाल माती’ म्हणून कुप्रसिद्ध होती. त्यामुळे पहिला संघर्ष या स्वघोषित जमीनमालकांशी होता. काहींनी बाबांना मारून टाकण्याची धमकीही दिली. पण बाबांनी या धमक्यांना भीक घातली नाही. जोगांच्या माणसांच्या मदतीने हळूहळू या गुंडांना त्या जागेवरून हटवण्यात बाबांना यश आलं आणि मग प्रत्यक्ष काम सुरू झालं.

बाबांचे आणि शंकररावांचे आधीपासूनचे घनिष्ठ संबंध होते. या प्रकल्पास शंकरराव जोगांचं अमूल्य सहकार्य अगदी पहिल्या दिवसापासून लाभलं. जोगांच्या कनिष्ठ चिरंजीवांचं नाव.. अशोक. त्यावरून बाबांनी या प्रकल्पाचं नामाभिधान ‘अशोकवन’ असं केलं. जागा मिळाल्यावर शंकररावांनी लगेच तिथे एक टीनाचं शेड बांधून दिलं; ज्यात महिला आणि पुरुषांसाठी निवासाची वेगवेगळी व्यवस्था होती. अशोकवनाचे प्रथम नागरिक म्हणजे १९५३ साली आनंदवनात कुष्ठरोगाच्या उपचारासाठी दाखल झालेले गवसी मानापूर गावचेच गोविंदा फुलझेले. त्यावेळी गोविंदा फुलझेलेंचं वय असेल जेमतेम अठरा. पण ते गवसी मानापूरचेच असल्याने बाबांनी अशोकवनाची धुरा त्यांच्या हाती सोपवली. त्यांच्या सोबतीला अजून दोन कुष्ठमुक्त माणसं आणि पाच महिला अशी टीम होती. गोविंदराव आणि सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत करून आधी झुडुपी जंगल साफ केलं आणि काही जागा शेतीयोग्य केली. पुढे संभाजी वर्भे, मारुती देवगडे, जनार्दन ठाकरे ही मंडळी अशोकवनात दवाखान्याच्या, शेतीच्या कामासाठी दाखल होत गेली. दोन वर्षांनंतर नागपूर जिल्हा प्रशासनाकडून अशोकवनात दवाखान्यासाठी पक्की इमारत, अशोकवन ते वर्धा-नागपूर मुख्य रस्ता अशी सडक, एक विहीर आणि कुक्कुटपालन केंद्र यासाठी अनुदान मिळालं आणि अशोकवनाच्या विकासपर्वाची सुरुवात झाली. अशोकवनात शेतीयोग्य जमीन तयार केल्यानंतर कोरडवाहू पिकं घेण्यास सुरुवात झाली. त्यावेळी मुद्दाम ज्वारीचं पीक घेतलं जायचं. ज्वारी लोकांच्या खाण्यासाठी आणि त्याचा कडबा जनावरांसाठी कामी येई. पुढे हळूहळू कापूससुद्धा पिकू लागला. जमीन मुरमाड असली तरी ती Virgin soil…म्हणजेच प्रथमत:च लागवडीखाली आलेली असल्याने शेतमालाचं उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होऊ लागलं. नागपूरच्या जवळ असूनही अशोकवनात विजेची सोय झाली नव्हती. कारण ही जमीन मुख्य रस्त्यापासून तशी बरीच आत होती. त्यामुळे विजेचं कनेक्शन आणण्यासाठी खूप मोठा खर्च येणार होता. तो करणं महारोगी सेवा समितीच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यामुळे सुरुवातीला बैलाची मोट आणि नंतर डिझेल इंजिन वापरून शेतीसंबंधित कामं पार पाडली जात. हाताला झालेल्या जखमांमुळे कुष्ठरुग्णांना विहिरीतून पाणी शेंदणं अवघड जायचं. म्हणून जवळच बाबांनी एक हँडपंप बसवून घेतला होता. तर अशी मजल-दरमजल करत पुढच्या चार-पाच वर्षांच्या काळात अशोकवनाची बरड जमीन आकार घेऊ  लागली.

अशोकवनाच्या सुरुवातीच्या काळात- म्हणजे किमान पहिली दोन र्वष दर शुक्रवारी बाबा जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याची बरणी, औषधांची पिशवी, चादर, कांबळं घेऊन आनंदवनातून बैलगाडीने निघत आणि पहाटे चार वाजता वरोरा स्टेशनवरून काझीपेठ-नागपूर पॅसेंजर पकडत. जेवणाचा डबा इंदू पहाटे साडेतीनलाच तयार ठेवत असे. नागपूरच्या अलीकडील गुमगाव या स्टेशनवर बाबा उतरत. अशोकवन गुमगाव स्टेशनपासून तीन मैलांवर आहे. बाबा पायीच अशोकवनात जात. अशोकवनाला लागून जोगांचीही वाहितीखालची शेतजमीन होती. तिथल्या एका मोठय़ा चिंचेखाली बाबा बस्तान ठोकत. तोच त्यांचा दवाखाना. दिवसभर रुग्णांवर उपचार करून बाबा चालत गुमगाव स्टेशनला जात आणि संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान तिथनं नागपूर-काझीपेठ पॅसेंजर पकडून रात्री उशिरा वरोऱ्याला परतत. जसजशी अशोकवनाची माहिती रुग्णांना होऊ  लागली तसतशी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली. अशोकवनाच्या परिसरात कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव एवढा जास्त होता, की बाबांना रुग्णांच्या तपासणी आणि उपचारांदरम्यान कधी कधी जेवायलाही वेळ होत नसे. बाबा तसेच जेवणाचा सकाळी भरलेला डबा घेऊन परतत. असं झालं की इंदूही जेवत नसे. ती सांगे, ‘‘असे हक्काचे, बिनहक्काचे,चोरटे अनेक उपवास मी केलेत.’’

अशोकवनात बाबांच्या मुक्कामाची सोय व्हावी यासाठी शंकररावांनी निवासी रुग्णांच्या मदतीने एक झोपडी उभी केली. बाबा अशोकवनात येण्याआधी ती झोपडी दरवेळी शेणाने सारवून ठेवलेली दिसे. बाबांना नंतर समजलं, की झोपडी शंकरराव स्वत:च्या हाताने सारवत असत. बाबांसाठी पिण्याचं पाणीही ते स्वत: आणून भरत असत. जोग कुटुंबाचा स्नेह इथेच संपत नाही. अशोकवनाला लागून जोगांची जी शेतजमीन होती, त्यातली २७ एकर जमीन शंकररावांनी स्वत:च्या हयातीत १९६३ साली विक्रीपत्राद्वारे रु. २४०/- प्रती एकर एवढय़ा नाममात्र दराने महारोगी सेवा समितीला सुपूर्द केली. आणि मृत्युपश्चातही त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या वाटय़ाची २० एकर जमीन, सोबत एक ट्रॅक्टर व ट्रॉली, शेतीची अवजारं, किर्लोस्कर ऑइल इंजिन, चारा कापणी यंत्र, बैलजोडी आणि बैलगाडी, पाइप्स, गुरांचं शेड असं सगळं साहित्य १९७४ साली जोग परिवाराने विक्रीपत्राद्वारे महारोगी सेवा समितीच्या हवाली केलं. अशा प्रकारे निधनानंतरही शंकररावांचं योगदान सुरूच राहिलं. महत्त्वाचं म्हणजे विक्रीची संपूर्ण रक्कम- एवढंच नव्हे तर या व्यवहारादरम्यान झालेल्या सर्व खर्चाचा भारही जोग परिवाराने महारोगी सेवा समितीवर पडू दिला नाही. यातला एकूण एक पैसा त्यांनी आर्थिक मदतीच्या रूपाने महारोगी सेवा समितीला दान दिला.

आजूबाजूच्या परिसरातून औषधोपचार घेण्यासाठी खूप मोठय़ा प्रमाणावर कुष्ठरुग्ण अशोकवनात येऊ  लागले तसं बाबांना पूर्वानुभवावरून लक्षात आलं, की रुग्णांचं बेघर होण्याचं प्रमाण या भागातही अधिक आहे. म्हणून बाबांनी आनंदवनासोबतच अशोकवनातही रुग्णांना पुनर्वसित करण्याच्या दृष्टीने घरबांधणी करण्याचं ठरवलं. त्यासाठी बाबांच्या हाताशी हक्काचं माणूस होतं; ते म्हणजे भाऊ नागेलवार. ‘भाऊ  मिस्त्री’ अशी त्यांची ओळख. भाऊ कुष्ठरुग्ण नव्हते. बांधकामासाठी पन्नाशीच्या दशकात ते आनंदवनात आले आणि आनंदवनाचेच झाले. भाऊ  अशिक्षित होते. पण त्यांचं बांधकाम कौशल्य वाखाणण्याजोगं होतं. आनंदवनातलं सुरुवातीचं सगळंच बांधकाम भाऊंच्या देखरेखीखाली झालं. kCarpentry-cum-Masonry Instructorl अशी दुहेरी भूमिका ते पार पाडत होते. त्यांच्या हाताखाली कितीतरी कुष्ठमुक्त बांधवांनीही बांधकामातलं कौशल्य प्राप्त केलं. बाबा भाऊंना आनंदवनाचा ‘स्थापत्य अभियंता’ म्हणायचे! तर असे आमचे भाऊ  मिस्त्री आणि त्यांच्या टीमने अशोकवनात जसा पैसा उभा राहील तसतशी घरं बांधायला सुरुवात केली. अशोकवनात निवासी कुष्ठरुग्णांची संख्या १९६० सालापर्यंत ४० च्या घरात जाऊन पोहोचली.

अशोकवनात घडलेला एक मजेदार किस्सा बाबा सांगत.. ‘‘एका रात्री अशोकवनात चोरी झाली. चोरटय़ांनी साखर, तांदूळ, अन्नधान्य, भांडीकुंडी चोरली. पहाट होण्यापूर्वी ते पसार झाले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं, की आपण कुष्ठरुग्णांच्या केंद्रावर दरोडा टाकला आहे. झालं! कुष्ठरोगाची लागण आपल्यालाही होणार.. या नुसत्या कल्पनेनेच त्यांची घाबरगुंडी उडाली. ते लगबगीने अशोकवनात परत आले आणि चोरलेला सगळाच्या सगळा माल परत केला. अगदी ताटल्या, वाटय़ा, भांडीसुद्धा!’’

पुढे साठीच्या दशकात ‘स्विस एड अ‍ॅब्रॉड’ने मोठय़ा प्रमाणावर मदतीचा हात देऊ  केला आणि अशोकवनाचं रूप पालटू लागलं. दवाखान्याचे वॉर्डस्, सामायिक स्वयंपाकगृह, भोजनगृह, कुष्ठमुक्तांसाठी निवासस्थानं, गोडाऊन्स, डेअरी, कुक्कुटपालन यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती अशोकवनात झाली. अशा प्रकारे ‘अशोकवन’ हा एक स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण प्रकल्प म्हणून उभा राहिला. शिवाय नागपूरजवळ असल्याने आनंदवनातील शेती, शेतीपूरक उद्योग व इतर प्रवृत्तींसाठी खरेदी केलेल्या मालाची तात्पुरती साठवणूक, आनंदवनात येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था इत्यादी बाबींसाठी अशोकवन प्रकल्पाचा खूपच उपयोग झाला. सर्वात महत्त्वाचं- आनंदवनापाठोपाठ आजवर कुष्ठरुग्णांचं रोगनिदान, उपचार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून सर्वात जास्त कुष्ठरुग्ण mobilize करणारा महारोगी सेवा समितीचा प्रकल्प म्हणजे अशोकवन!

vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2017 2:26 am

Web Title: anandwan baba amte leprosy issue
Next Stories
1 आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल..
2 सिस्टर लीला
3 शेतकरी बाबा आमटे!
Just Now!
X