29 May 2020

News Flash

आत्मसन्मानाचा लढा

दत्तपूर कुष्ठधामाचे संस्थापक मनोहरजी दिवाण यांच्याशी बाबा कायम संपर्कात असत.

कुष्ठरोगमुक्तांमधून निर्माण झालेली आरोग्यसेवकांची सशक्त फळी..

 

आनंदवनात कुष्ठरोगावर इलाज केला जातो आणि तेथील निवासी कुष्ठमुक्त बांधव मेहनत करून आत्मनिर्भर झाले आहेत याबद्दल हळूहळू आजूबाजूच्या खेडय़ांमध्ये माहिती होऊ लागली तशी तिथल्या कुष्ठरोग्यांची पावलं आनंदवनाकडे वळू लागली. दुसरीकडे बाबांचं एकहाती ‘ट्रेस अ‍ॅण्ड ट्रीट कॅम्पेन’ जोरात सुरू होतं. महारोगी सेवा समितीमार्फत चांदा जिल्ह्यत गावोगावी कुष्ठरोग उपचार केंद्रही उघडली जात होती. आठवडय़ातले पाच दिवस बाबा प्रत्येक उपचार केंद्राला आळीपाळीने भेट देत आणि रोगाचं निदान करून रुग्णांवर औषधोपचार करत. बाबा एकटेच प्रशिक्षित आरोग्यसेवक असल्यामुळे त्यांच्यावरचा कामाचा ताण वाढतच चालला होता. रोज १८-१८ तास बाबांचं काम सुरू असे. या ताणामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची तब्येत ढासळू लागली होती. जुनी दुखणी डोकं वर काढत होती. इंदू आणि बाबांचा मित्रपरिवार चिंतेत पडला होता. पण बाबांना अधिकारवाणीने सांगायची कुणाचीच छाती झाली नाही.

दत्तपूर कुष्ठधामाचे संस्थापक मनोहरजी दिवाण यांच्याशी बाबा कायम संपर्कात असत. आनंदवन-दत्तपूर असं रुग्णांचं येणं-जाणं सतत सुरूअसे. कुष्ठकार्यात मनोहरजींचं मोलाचं मार्गदर्शन बाबांना लाभत होतं. कार्यमग्न बाबा स्वतच्या प्रकृतीची हेळसांड करतात हे एव्हाना मनोहरजींच्याही कानावर गेलं होतं. बाबांपेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या मनोहरजींनी १४ मे १९५३ च्या एका पत्रात यावरून बाबांना चांगलंच फटकारलं- ‘‘गेल्या काही दिवसांपासून.. नव्हे, महिन्यांपासून तुमच्या प्रकृतीबाबत मी चिंतित होतो. व्यक्तिश: मला याआधीच तुम्हाला एक खरमरीत पत्र लिहिण्याची प्रेरणा झाली होती. तरी मी संयमपूर्वक मौन राखले. तुम्ही प्रकृतीची हेळसांड करून हे कार्य करावे हे कोणालाच योग्य वाटत नाही. तुम्ही Bravado किंवा Martyr  ची वृत्ती स्वीकारणे हे विवेकाला धरून नाही, हे मीच सांगायला हवे का? जो जितका त्याग करील तितका कमीच आहे असे मानणारा मी आहे. तरी विवेकयुक्त मर्यादेचाही त्याग करावा असे मी म्हणू शकत नाही! हा उपदेश करीत आहे असे भासण्याचा संभव आहे. पण यावेळी युक्तायुक्ततेचा विचार सोडून लिहिण्यावाचून राहवत नाही, म्हणून लिहीत आहे. गुरूची आज्ञा किंवा आईचे बोल यापेक्षा मित्राची कळकळीची सूचना प्रभावी असते, हे खरं असेल तर याचा उपयोग व्हायला पाहिजे. मी मानत होतो की साधनाताई तुम्हाला ताळ्यावर ठेवतील. पण त्यांची शक्ती अपुरी पडते असे दिसते. आत्तापर्यंतचा कामाचा ताणच तुमचा अंत पाहत आहे. यापुढे व्याप आणि जबाबदारीचा ताण अधिकच होणार आहे; कमी होण्याची शक्यता नाही. मग प्रकृतीही हातची गेली व कामही दुरावले याची वाट पाहणार का? हा पत्रप्रपंच यासाठीच, की मी तुमचे कुष्ठकार्य आणि प्रकृती दोन्ही आत्मीयतेने समजू शकतो.’’

कुष्ठरुग्णांवर उपचार करण्यासाठी आनंदवनात पूर्णवेळ डॉक्टर आणि परिचारिका असावी यासाठी बाबांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते, पण त्यात काही यश पदरी पडत नव्हतं. डॉ. सुब्बाराव नावाचे एक निवृत्त डॉक्टर होते. ते वरोरा गावात राहात आणि रोज सकाळ-संध्याकाळ सायकलने आनंदवनात ये-जा करत. त्यांचा सारा खाक्याच वेगळा. कुष्ठरुग्णांवर उपचार करून झाले की आधी ते चार-चारदा साबणाने हात धुवत. मग घरी परत गेल्यावर स्वत: अंघोळ करतच, पण सायकललाही लायसॉलमिश्रित पाण्याने अंघोळ घालत! आनंदवनाच्या वाटेवर दिवे नव्हते. संध्याकाळी परत जाताना अंधार होई म्हणून डॉ. सुब्बाराव येताना कंदील आणत. परतल्यावर त्या कंदिलालाही ते लायसॉलने पुसून काढत! या सर्व उपद्व्यापांत त्यांचा एक तास मोडत असे. पण कुष्ठरोगाचा संसर्ग होण्याची भीती मनात कायम. अर्थातच डॉ. सुब्बाराव फार काळ टिकले नाहीत. याच दरम्यान शंकरदादा जुमडे, गीताबाई नेमाडे, कौसल्याबाई ही काही कुष्ठमुक्त मंडळी मनोहरजींच्या दत्तपूर कुष्ठधामातून आनंदवनात दाखल झाली होती.

शंकरदादांना मी ‘शंकरभाऊ’ म्हणत असे. शंकरभाऊ ही आगळ्यावेगळ्या ताण्याबाण्याची व्यक्ती. ठेंगणा बांधा, शिसवी शरीर, काम करण्याची प्रचंड ताकद. संस्कृतचे प्रकांड पंडित परचुरे शास्त्रींना कुष्ठरोग झाला असता गांधीजींनी सेवाग्राम आश्रमात त्यांच्यावर स्वत: उपचार केले हे बऱ्याच जणांना ज्ञात आहे. पण परचुरे शास्त्रींना मालिश करणं, जखमा धुणं, मलमपट्टी करणं यांत समíपत भावनेने सहभागी असलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे शंकरभाऊ. पण याबद्दल कुणालाच माहिती नाही!

पूर्णवेळ डॉक्टर वा परिचारिका मिळत नसल्याने आनंदवनातील निवासी कुष्ठमुक्तबांधवांमधूनच आरोग्य कार्यकत्रे निर्माण करण्याचं आव्हान बाबांनी स्वीकारलं. गीताबाई काय किंवा कौसल्याबाई काय, सुरुवातीच्या काळात बहुतेक मंडळी फारशी शिक्षित नव्हती; पण बाबांच्या तालमीत या सर्वानी औषधांची मिक्श्चर्स तयार करून रुग्णांना ती वेळच्या वेळी देणं, जखमा धुणं, मलमपट्टी करणं, इंजेक्शन्स देणं हे सारं हळूहळू शिकून घेतलं. दवाखान्याच्या व्यवस्थेची जबाबदारीही ही मंडळी हाताळू लागली. पुढे आनंदवनाच्या आजूबाजूच्या खेडय़ांतील उपचार केंद्रांवर बाबांसोबत जाऊन कुष्ठरुग्णांना तपासणं, रोगाची अवस्था जाणून त्यानुसार औषधोपचार करणं हे सारं करता करता ही मंडळी कामात चांगलीच तरबेज झाली आणि कुष्ठरुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांची नवी फळी बऱ्या झालेल्या कुष्ठरुग्णांच्या माध्यमातूनच आनंदवनात तयार होऊ लागली. रुग्णांना तपासण्यापासून ते त्यांना अगदी बेडपॅन देईपर्यंत ज्या आत्मीयतेने आणि मनोभावे बाबा रुग्णांची सेवा करत, ते संस्कार या सर्वाच्या मनावर आपोआपच होत होते. बाबांवरचा आरोग्यसेवेतील कामाचा ताण आता हळूहळू कमी होऊ लागला होता.

आनंदवनाच्या आरोग्यसेवेचा परीघ विस्तारत चालला होता तरी आनंदवनाच्या स्थापनेमागील बाबा आणि इंदूचा मुख्य हेतू होता तो म्हणजे- कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून देऊन न्याय्य आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देण्याचा.. आणि याचबरोबर समाज व कुष्ठरुग्ण यांच्यातली दरी कमी करण्याचा. पण त्यांचं हे विशाल स्वप्न साकार होण्यासाठी बराच दूरचा पल्ला गाठावा लागणार होता. याचा प्रत्यय देणारी सुरुवातीच्या दिवसांतली एक घटना मला सांगावीशी वाटते.

पुण्य पदरी पडावं या हेतूने दरवर्षी चत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या उत्सवादरम्यान वरोरा गावातील व्यापारीवर्ग जत्रा मदानावर भिकारभोजनाचा कार्यक्रम आयोजित करत असे. वरोऱ्यातील एका व्यापारी गृहस्थाकडून बाबांना निरोप आला की आनंदवनच्या रहिवाशांना भिकारभोजनाला पाठवा. हा मानहानीकारक निरोप ऐकून कोपिष्ट स्वभावाच्या बाबांची तळपायाची आग मस्तकात गेली. अशा बेगडी दया-करुणेने कुष्ठरुग्णांची झोळी भरून बाबांना त्यांना लाचार करायचं नव्हतं. काही क्षणानंतर बाबांच्या डोक्यात अचानक काय आलं काय माहीत! त्या दिवशी विनोबाजींचे सहकारी देवेंद्रभाई गुप्ता आनंदवनात आलेले होते. बाबा देवेंद्रभाईंना म्हणाले, ‘‘शेठजींचं निमंत्रण आहे. त्याचा अव्हेर करणं योग्य नाही. आपण सगळेच जाऊ. ठीक आहे ना?’’ हे ऐकून देवेंद्रभाई बुचकळ्यात पडले. पण म्हणाले, ‘‘ठीकय् बाबा, जाऊ.’’ पायपीट करत बाबा, इंदू, देवेंद्रभाई, महादेवभाऊ, प्रकाश, मी आणि आनंदवनातले कुष्ठरुग्ण बांधव असे सगळे भोजनस्थळी पोहोचलो. जत्रा मदानाच्या धूळमाखल्या जागेत भिकाऱ्यांच्या पंगती बसल्या होत्या. त्यांच्या सोबतीने आम्ही सगळे पंगतीत ठाण मांडून बसलो. मग बाबा तेथील लोकांना उद्देशून म्हणाले, ‘‘आम्ही भिकारी आलो आहोत. आम्हाला भोजन वाढा.’’ आम्हा सगळ्यांना पाहून सारेच चमकले. गडबड, कुजबुज सुरू झाली. आत शेठजींना निरोप गेला. ते तसेच धावत आले. आम्हाला पंगतीत बसलेलं पाहून खजील होत म्हणाले, ‘‘बाबासाहब, आप इधर..?’’ बाबा उत्तरले, ‘‘शेठजी, या भिकारभोजनाला तुम्ही आनंदवनातल्या रहिवाशांना बोलावलं होतं, म्हणून आम्ही आलो आहोत.’’ शेठजींना इशारा पुरेसा होता. झाल्या प्रकाराची त्यांना आणि आयोजकांना विलक्षण लाज वाटली. शेठजींसकट त्यांच्या घरातले झाडून सारेजण तसंच व्यापारीवर्गाचे सर्वच उपस्थित आमच्यासोबत पंगतीला बसले. बाबांचा पारा खाली आला. खेळीमेळीच्या वातावरणात जेवणावळ आटोपली. आनंदवनात परतल्यानंतर बाबा देवेंद्रभाईंना म्हणाले, ‘‘महारोग्यांच्या प्रतिष्ठेसाठी लढा देण्याचा हा इथला पहिला प्रसंग अन् पहिला विजय.’’ देवेंद्रभाई म्हणाले, ‘‘आहात खरे तुम्ही एक वीर सत्याग्रही!’’

तर या अशा चित्रविचित्र अनुभवांची शिदोरी गाठीशी घेत आनंदवन आकार घेत होतं. आनंदवनाला शेती आणि इतर पायाभूत सुविधांसाठी अजून जमीन मिळावी यासाठी बाबांचे सरकारदरबारी प्रयत्न सुरू होते, त्यात यश आलं आणि १९५३ च्या मध्यात मध्य प्रदेश सरकारकडून आणखी ५० एकर जमीन आनंदवनाला उपलब्ध झाली. जमिनीचा हा तुकडासुद्धा खडकाळ, बरड आणि झुडपी जंगलाने व्यापलेला असला तरी यातली साडेसोळा एकर जमीन दगडांच्या उजाड खाणींनी व्याप्त होती- जिचा अर्थाअर्थी काही उपयोग नव्हता. शेवटी महत्प्रयासाने नऊ महिन्यांनंतर हा साडेसोळा एकरांचा तुकडा शासनाने परत घेतला आणि त्याऐवजी साडेसोळा एकरांचा नवा तुकडा उपलब्ध करून दिला.

आनंदवन आता एका टप्प्यावर उभं होतं. एकीकडे आनंदवनात येणाऱ्या रुग्णांसाठी झोपडय़ा उभारण्याचं काम सुरू होतं, तर दुसऱ्या बाजूला अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणली जाऊ लागली होती, विहिरी खणल्या जात होत्या. खडकाळ जमिनीवर अपार कष्ट घेत मुबलक पाणी खेळवण्याचं आणि ओलीत करण्याचं अशक्यप्राय आव्हान पेलण्याचा पुरेपूर प्रयत्न बाबा आणि त्यांचे सहकारी करत होते. आम्हाला समाजाची भीक नको, आम्ही स्वतच्या पायावर उभे राहू शकतो, हे दाखवून देण्याच्या ईष्य्रेने ते पेटलेले होते. ‘निरोगी शरीर’ आणि ‘रोगी मन’ असलेल्या समाजाने ‘रोगी शरीर’ आणि निर्मितीत गुंतलेल्या हातांमुळे ‘रोगमुक्त मन’ झालेल्या माणसांकडून काही शिकावे, ही बाबांची हाक होती. बाबा म्हणत, ”I see the ‘Most sound mind’ in an ‘Unsound body’ and ‘Unsound mind’ in a ‘Sound body’!” आत्मविश्वासाने भारलेलं आनंदवन स्वतच्या गतीने आणि व्यवस्थेने वाटचाल करू लागलं होतं.

विकास  आमटे vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2017 1:27 am

Web Title: anandwan village leprosy patient fight against stigma
Next Stories
1 परीघाचा विस्तार
2 संघर्षमय दिवस..
3 ‘इथे सेवेचे रामायण लिहिले जाईल!’
Just Now!
X