19 February 2020

News Flash

एकलव्य विद्यापीठ

‘आनंदवन हॉस्पिटल’च्या परिसरात एक विहीर आहे.

शुभेच्छा करड तयार करताना रमेश अमृ..

‘आनंदवन हॉस्पिटल’च्या परिसरात एक विहीर आहे. ही तीच विहीर- जिच्यात सुरुवातीच्या काळात दोन-तीन कुष्ठरुग्णांनी वेदना अस झाल्याने उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची मनं वळवण्याची संधीसुद्धा बाबांना मिळाली नव्हती. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी डॉक्टर होऊन काम सुरू केल्यानंतर एक शक्कल लढवली. आनंदवनातील विहिरीच्या कठडय़ांची उंची दोन फुटांनी वाढवली व कठडय़ांवर आणि विहिरीच्या कडेनं फुलझाडं लावली. हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यानंतर आजपर्यंत विहिरीत उडी टाकून कुणी जीव दिला नाही. बाबा म्हणत, ‘फुलं हे मानवाच्या आत्म्याचं अन्न आहे!’ किंबहुना, आपल्या आयुष्याला पूर्णविराम देण्याचे कुष्ठरुग्णांचे निर्णय या बहरलेल्या फुलांमुळेच टळले असतील. मग आनंदवनातील फुलांची लागवड विहिरीपुरती मर्यादित न राहता ठिकठिकाणी सुंदर बगिच्यांच्या रूपाने होऊ लागली. हातापायाची बोटं झडलेले माझे कुष्ठमुक्त सहकारी अब्दुल करीम, महम्मद अरब, पंढरी बिरादार यांनी पुढे एवढी फळा-फुलांची झाडं लावली, जपली आणि जगवली, की आनंदवनात बगिचेच नव्हे, तर परिसंस्था निर्माण झाल्या. महम्मदला बाबा ‘ग्रीन थम्ब’ म्हणत. या बगिच्यांच्या माध्यमातून ओबडधोबड स्वरूपातील आनंदवनाला एक सुंदर रूप तर मिळालंच; शिवाय आनंदवनाला आणि बाहेरच्या जगाला जोडू शकणारा एक धागाही निर्माण झाला. आनंदवनातील बगिच्यातील ‘बिनकाटय़ाच्या गुलाबा’ची कहाणीही अशीच. आनंद अंध विद्यालयातील विद्यार्थी गुलाबाच्या बगिच्याचे वर्णन ऐकून हर्षोल्हसित होत. कुतूहलापोटी एकदा एका विद्यार्थ्यांने बगिच्यात जाऊन गुलाबाच्या झाडाला स्पर्श केला. पण दृष्टीअभावी त्याच्या बोटांना काटे बोचून रक्त आलं. या घटनेनं बाबा खूप अस्वस्थ झाले आणि त्यांनी युद्धपातळीवर बिनकाटय़ाच्या गुलाबाच्या झाडाचा शोध सुरू केला. हे पु. ल. देशपांडेंना कळताच त्यांचं संवेदनशील मनही करुणेनं भरून गेलं व आनंद अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ते ‘बिनकाटय़ाचा गुलाब’ धुंडाळू लागले. अखेर कलकत्त्याच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये ते रोप त्यांना मिळालं. लगोलग ते त्यांनी आनंदवनात पोचतं केलं आणि आनंदवनातील गुलाबांच्या बागेत बिनकाटय़ाचा गुलाब फुलला. अंध मुलांना गुलाबाचे काटे बोचू नयेत, गुलाबाचे सौंदर्य व कोमलता त्यांना हाताच्या स्पर्शातून कळावी, या जाणिवेतून पुलंनी वेदनेशी नातं जपलं ते असं!

पाषाणशिल्प आणि काष्ठशिल्प हे माझे आवडते छंद. त्याबाबतीत माझे स्वत:चे एक तत्त्वज्ञान आहे. माझ्या मते, दगडांवर किंवा लाकडांवर आपल्या मानवी मनातील देवदेवता, देखावे असे चित्रविचित्र आकार लादू नयेत. दगडांना, लाकडांना असलेला निसर्गदत्त आकार हेच त्यांचे खरे सौंदर्य आणि त्यांची खरी ओळखही. तिला ‘नावं’ ठेवण्याची गरज नाही. दगडांचे, लाकडांचे सौंदर्य खुलवणे, त्यास अभिव्यक्ती देणे, एवढेच काय ते कलावंताने अलगदपणे करायचे काम. (माझे हे छंद, या आवडी कदाचित बाबांचीच देणगी असणार. बाबांना पुरातत्त्व विभागात रुची होती. तरुणपणी त्यांनी ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स, लंडन’ आणि ‘पॅरिस म्युझियम अ‍ॅण्ड हिस्टॉरिकल सोसायटी, पॅरिस’ येथे मध्य भारतात सापडणारे शंखमिश्रित दगड आणि त्यासंबंधी काही लेख लिहून पाठवले होते. दोन्ही सोसायटय़ांनी त्याची दखल घेत बाबांना ‘मानद सदस्यत्व’ प्रदान केलं होतं.) या छंदांमधून मला पुढे अनपेक्षितपणे आनंदवन आणि सभोवतीच्या परिसरात आदिमानवाची वेगवेगळी दगडी टूल्स, दागिने आणि डायनोसोरचे फॉसिल्सही गवसले. आम्ही याचं छान म्युझियम केलं होतं. पण पुरातत्त्व विभागाच्या आशीर्वादाने आज या गोष्टी बंद पेटय़ांमध्ये वास करत आहेत. तसंच आनंदवनातल्या काष्ठशिल्प विभागाची सुरुवात झाली तीही लाकडातले निरनिराळे नैसर्गिक आकार शोधून गोळा करण्याच्या माझ्या छंदातून. आनंदवन, सोमनाथ, लोकबिरादरीच्या परिसरात आणि भोवतालच्या जंगलात सापडणारी अशी चित्रविचित्र आकाराची लाकडं आणि बांबूचे आकार Driftwood मी गोळा करून ठेवायचो. आमच्या सुतारकाम विभागात ओरिसातून कुष्ठरोगाच्या उपचारासाठी आलेले चंद्रमणी महाराणा नावाचे कारागीर होते. त्यांचा उजवा हात कोपराच्याही वरपासून तुटला होता. पण खचून न जाता त्यांनी स्वत:साठी लाकडाचा एक हातच तयार केला. तो हात लावून त्यांची कामं चालायची. विलक्षण सौंदर्यदृष्टी असलेल्या चंद्रमणींनी मी गोळा केलेल्या लाकडाच्या आकारांचं रूपांतर काष्ठशिल्पांत केलं आणि सुंदर सुंदर दिवे, समया, टेबलं.. असं बरंच काय काय तयार केलं. पुढे गोविंदा खोडपे या कुष्ठमुक्त व्यक्तीला त्यांनी हे काम शिकवलं आणि त्याने हे कसब अंगी बाणवत चंद्रमणींची कला जिद्दीने आणि कौशल्याने पुढे नेली. याआधी सुतारकामाचं अंगही नसलेल्या गोविंदाने एकाच लाकडात कोरलेल्या मोठमोठाल्या समया, काचेच्या बाटलीतील विविध कलाकृती, लाकडाचे आकार जोडून तयार केलेल्या वस्तू आज आनंदवनातील कलादालनात दिमाखाने उभ्या आहेत.

विविध शैलींची हस्ताक्षरं काढणे म्हणजेच कॅलिग्राफी हासुद्धा माझा एक अतिशय आवडता छंद. यामुळे आनंदवनात येणारे पुष्कळसे देशी-विदेशी पाहुणे येताना माझ्यासाठी आठवणीने वेगवेगळ्या आकारा-प्रकारांची पेनं आणत. आनंदवनाच्या पत्रव्यवहाराची जबाबदारी माझ्यावरच होती. बाबांचा जनसंपर्क खूपच दांडगा असल्याने देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही आनंदवनात भरपूर पत्रं आणि सुंदर शुभेच्छा करडही यायची. यातली हँडमेड करड मी जपून ठेवायचो. दवाखान्यातील दिवसभराची कामं झाल्यानंतर मी मध्यरात्रीपर्यंत पत्रलिखाणाचं काम करायचो आणि वेगवेगळ्या हस्ताक्षरांत आनंदवनात घडणाऱ्या गोष्टी हितचिंतकांपर्यंत पोचवायचो. एकदा एक गमतीशीर अनुभव आला. एका गृहस्थाने माझ्या हस्ताक्षरातलं पत्र वाचून मला खडसावून सांगितलं, की आम्हाला अशी छापील पत्र नकोत! मग, हे पत्र छापील नसून माझ्या हस्ताक्षरातलं आहे, हे त्यांना पटवून देता देता माझ्या नाकी नऊ आले. पुढे मला सहजच वाटलं, की आपल्याला जशी शुभेच्छा करड येतात तशी आपणही अशी शुभेच्छा करड पत्रासोबत पाठवायला काय हरकत आहे? मग मी आणि माझा सहकारी जयंत पाटील (आनंदवनात काही काळ स्वयंसेवक म्हणून आलेला जळगावचा आर्टिस्ट) याने Wood shaving करून फुलांच्या पाकळ्या, गवत वापरून काही शुभेच्छा करड तयार केली आणि पत्रांसोबत पाठवून दिली. ती करड बघून ही मंडळी एवढी खूश झाली, की आम्हाला दिवाळीसाठी, नववर्षांसाठी आनंदवनात तयार झालेली करडच विकत हवीत अशी मागणी पुढे आली.

मी पेचातच पडलो. कारण पाच-पंचवीस करड बनवणं वेगळं आणि हजार-पाचशे कार्डाची ऑर्डर पूर्ण करणं वेगळं! कामाच्या पसाऱ्यात मला तर हे शक्य नव्हतंच, आणि करड तयार करू शकेल असं कुणी माणूसही हाताशी नव्हतं. तेवढय़ात माझी नजर तरुण रमेश अमृवर पडली. तो काही महिन्यांपूर्वी कुष्ठरोगाच्या उपचारांसाठी आनंदवनात दाखल झाला होता. हाताची सगळी बोटं वाकडी झालेला रमेश बगिच्यात राखणदारीचं काम करत असे. त्याला मी बोलावलं आणि माझ्याकडे असलेली शुभेच्छा करड दाखवत विचारलं की, ‘तुला अशी करड बनवता येतील का?’ रमेश काहीसा विस्मयानेच माझ्याकडे पाहत म्हणाला की, ‘भाऊ, मला हस्तकला-चित्रकला वगैरे काहीच येत नाही.’ पण मी म्हणालो की, ‘करून तर बघ, पुढचं पुढे बघू.’ मग माझ्या आग्रहास्तव नाइलाजानेच त्याने हे काम अंगावर घेतलं. त्याला मी तयार केलेली, पोस्टाने आलेली शुभेच्छा करड दाखवायचो, नवी डिझाइन्स सुचवायचो. कधी त्याला जमायचं, तर कधी चुका व्हायच्या. मग स्वत:वरच नाराज होत तो म्हणायचा, की मला हे जमणार नाही. पण हे म्हणत म्हणतच जयंताच्या मार्गदर्शनाखाली रमेश शुभेच्छा करड करत गेला. आणि नंतर त्याचा एवढा जम बसला, की तो कधी ‘एक्स्पर्ट’ झाला, ते कळलंच नाही.

माझी शुभेच्छा करड तयार करण्याची सुरुवात केळीच्या सालीसारख्या टाकाऊ गोष्टीमधून झाली होती. रमेशने हे बॅटन हाती घेतल्यानंतर आम्ही दोघांनी आनंदवनातल्या वेगवेगळ्या विभागांत काम करणाऱ्या मंडळींना तिथल्या जाहिराती, पॅम्पलेटस्च्या रूपातील ‘कचरा’ ग्रीटिंग्ज खात्यात आणून द्यायला सांगितलं. काहींना हे नवं खूळ वाटलं. पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला होता? मग सुतारकाम विभागातून Wood shaving शेतीतून केळीच्या साली, धानाचं तणीस, मुद्रणालयातून रंगीत कागदांचे तुकडे, दवाखान्यातून एक्स-रे फिल्म्स, शिलाई विभागातून चिंध्या, शिवाय ऑफिसमधून रद्दीतल्या मासिकांची रंगीत कव्हर्स असं सगळं जमा होऊ लागलं. हे सगळं कापून वापरत निरनिराळ्या डिझाइन्सची सुंदर करड तयार होऊ लागली. पुढे तर रमेशने सुईमध्ये दोरा ओवत धाग्यांची रंगीबेरंगी ग्रीटिंग्ज बनवणंही सुरू केलं. आनंदवनाच्या रमेशरूपी एकखांबी ग्रीटिंग्ज कार्ड डिपार्टमेंटचा Reduce- Reuse- Recyclel या तत्त्वानुसार Wasteland to Wonderland हा प्रवास १९८४ पासून सुरू झाला तो असा! ‘We utilize all sorts of Waste except Waste of Time’ ही बाबांची उक्ती इथे शब्दश: लागू पडली. आनंदवनाच्या देणगीदारांना, मित्रमंडळींना आम्ही ही शुभेच्छा करड पाठवू लागलो. आनंदवनात तयार होणाऱ्या इतर वस्तूंसोबत विक्रीकेंद्रामध्ये करड विकायला ठेवू लागलो. कालौघात हळूहळू शुभेच्छा कार्डाची मागणी वाढू लागली. रमेशलाही हात मिळाले. आज रमेशचं डिपार्टमेंट चाळीसेक खांबांचं आहे. कुणाची बोटं वाकडी, तर कुणाला एकही नाही. कुणाला पाय नाहीत, कुणाला कमी दिसतं, तर कुणी कर्णबधिर. रमेशसारखीच ही सगळी मंडळी. पण स्वत:च्या अपंगत्वावर मात करत त्यांनी निर्मिलेली शुभेच्छा करड बघून लोक चाटच पडतात. थोडीथोडकी नव्हे, चांगल्या लाखभर हँडमेड शुभेच्छा कार्डाची विक्री दरवर्षी आनंदवनातून होते.

रमेशचं डिपार्टमेंट सुरू झाल्यानंतर चार-पाच वर्षांनी आम्हाला कळलं, की कुणीतरी आनंदवनाच्या शुभेच्छा कार्डामध्ये चिकटवलेला आनंदवनाच्या नावाचा कागद फाडून स्वत:च्या नावाने ही करड दामदुपटीने विकत आहे. मग यावर उपाय म्हणून आम्ही कार्डावर आनंदवनाचं नाव आणि लोगो असं स्क्रीन प्रिंट करायचं ठरवलं. पण नुसतं ठरवून होणार नव्हतं, त्याचं प्रशिक्षण आवश्यक होतं. मग मी रमेशलाच नागपूरला स्क्रीन प्रिंटिंग शिकायला पाठवलं. पण कुष्ठमुक्त रमेशला तिथल्या प्रशिक्षकाने प्रशिक्षण देणं तर सोडाच, कुठल्या उपकरणालाही हात लावू द्यायला मनाई केली. वैतागलेला रमेश निरीक्षणाने जेवढं शिकता येईल तेवढं शिकून, स्क्रीन प्रिंटिंगविषयीची पुस्तकं आणि आवश्यक सर्व यंत्रसामुग्री खरेदी करून आनंदवनात परत आला. दोन महिने लढून मी आणि रमेशने स्क्रीन प्रिंटिंगचं कसबही आपलं आपणच आत्मसात केलं. मग स्क्रीन प्रिंट केलेली शुभेच्छा करडच नव्हे, तर लग्नपत्रिका, व्हिजिटिंग कार्डस्, लेटरहेड्स अशा कित्येक गोष्टी तयार होऊ लागल्या.

रमेशच्या ग्रीटिंग्ज कार्ड डिपार्टमेंटमध्ये तयार झालेली शुभेच्छा करड ‘आनंदवनाचे राजदूत’ म्हणून देशात-परदेशांत पोहोचली. यातनं किती देणगीदार, किती मित्रमंडळी जोडली गेली याची गिनतीच नाही. शिवाय रमेशचं डिपार्टमेंट आनंदवनाच्या उत्पन्नाचं एक प्रमुख साधनही झालं.

मी नेहमी म्हणतो, की आनंदवन हे ‘एकलव्य विद्यापीठ’ आहे. कौरव आणि पांडव हे कॉन्व्हेंटचे विद्यार्थी होते. त्यांना शिकवायला द्रोणाचार्यासारखे एकसे बढकर एक गुरुजन होते. पण एकलव्य एकटा होता. एकलव्याचं तत्त्व होतं- ‘स्वयंशिक्षा’ आणि ‘स्वयंप्रज्ञा’! त्याच तत्त्वाने आनंदवनातही आजवर अनेक एकलव्य तयार झाले. पण नियतीने त्यांचा अंगठाच नव्हे, तर सगळी बोटं कलम करूनही बोटं नसलेल्या या हातांनी खूप मोठी करामत करून दाखवली. अब्दुल करीम, महम्मद, पंढरी, चंद्रमणी, गोविंदा, रमेश यांचं म्हणाल तर हे सर्व ‘Uncut Diamonds’; मी फक्त पैलू पाडण्याचं काम तेवढं केलं!

विकास आमटे

vikasamte@gmail.com

 

First Published on September 24, 2017 1:29 am

Web Title: articles in marathi on flowers planting anandwan
Next Stories
1 अश्रूंच्या नात्याचं करुणोपनिषद
2 मुक्काम : लोक-बिरादरी
3 इतिहास रचणारे उद्योग!
Just Now!
X