30 May 2020

News Flash

भग्नावशेषांतील सौंदर्यासक्ती

खरी गोष्ट सुरू होते ती इथून. कुष्ठकार्याच्या नव्या दिशेबद्दल बाबांनी नॉर्मा शिअररला पत्राद्वारे कळवलं.

कुष्ठकार्याच्या नव्या दिशेबद्दल बाबांनी नॉर्मा शिअररला पत्राद्वारे कळवलं.

तो १९५० चा नोव्हेंबर महिना होता. जवळपास सहा महिन्यांच्या प्रदीर्घ ताटातुटीनंतर बाबा, इंदू, मी आणि प्रकाश असे चौघं वरोऱ्याला मित्रवस्तीतील आमच्या घरात पुन्हा एकदा एकत्र आलो. बाबा आणि इंदूची तब्येत आता पूर्वपदावर येऊ  लागली होती. कलकत्त्याच्या ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’मध्ये कुष्ठरोगावरील उपचारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन सज्ज झालेल्या बाबांनी वरोऱ्याच्या सरकारी इस्पितळाच्या आवारात पुन्हा एकदा नव्या जोमाने कुष्ठरुग्णांची तपासणी आणि उपचार सुरू केले.

कुष्ठरोगी.. बहिष्काराचा आणि तिरस्काराचा शाप आजन्म सहन करणारी ही माणसं.. कुष्ठरोगाविषयीची घृणा समाजमनात किती खोलवर रुजलेली आहे! कुष्ठरोगास ‘Flagship of Mental- Physical- Social Injusticel का म्हणतात, याचा आणखी एकदा प्रत्यय बाबांना आला तो कुष्ठकार्यातील याच सुरुवातीच्या काळात.

याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला बाबांच्या कॉलेजजीवनातील दिवसांत  डोकवावं लागेल. तो काळ बाबांच्या आयुष्यातील वैचारिक शून्यावस्थेतला काळ होता.. आत्मशोधासाठी सुरू असलेल्या निकराच्या धडपडीचा. त्या दिवसांत बाबांचे वडील- बापूजी यांनी बाबांना अगदी विलासात ठेवलं होतं. त्यांनी बाबांना चक्क ‘डबल काब्र्यूरेटर सिंगर रेसर कार’ घेऊन दिली होती! त्याबद्दल बाबा सांगत, ‘‘माझ्याकडे कार तर होती; पण रेसर कार असल्याने तिला पेट्रोल खूप लागत असे. बापूजींकडे पेट्रोलसाठी पैसे मागायला मला कमीपणा वाटत असे. त्या काळात मी जे चित्रपट समीक्षण सुरू केलं ते माझ्या कारला लागणाऱ्या पेट्रोलचे पैसे स्वत:चे स्वत: कमवायचे म्हणून. कलेची प्रशंसा म्हणून मी समीक्षा लिहीत गेलो आणि माझ्या कारसाठीच्या पेट्रोलची गरज पुरी करता करता सौंदर्यासक्त झालो.’’

आवडलेला चित्रपट कधी कधी बाबा वीस वेळासुद्धा बघत! अगदी प्रत्येक दृश्य आणि संवाद त्यांना पाठ होत असे. चित्रपटगृहात बसलेले असताना एकदा त्यांचा पाय चुकून पुढील सीटवर बसलेल्या व्यक्तीस लागला आणि वादावादी झाली. त्या दिवसानंतर बाबा चित्रपटाची दोन तिकिटं काढत. एक.. बसण्यासाठी आणि दुसरं.. पुढच्या सीटवर पाय ठेवून निवांतपणे चित्रपटाचा आनंद उपभोगण्यासाठी! ‘पिक्चरगोअर’, ‘मुिव्हग पिक्चर मंथली’ या सिनेमास वाहिलेल्या नियतकालिकांत त्यांनी नियमितपणे परीक्षणं लिहिणं सुरू केलं. सिनेमासृष्टीतील तारे-तारकांना ते पत्रंसुद्धा लिहीत. यातून पुढे नॉर्मा शिअरर, ग्रेटा गाबरे, मार्लिन डीट्रिक, मॉरिस शव्हाल्ये, लीला चिटणीस इत्यादी सुप्रसिद्ध नट-नटय़ांशी त्यांची पत्रमैत्री जमली. पेशाने वकील झाल्यानंतर पुढे चित्रपट परीक्षणं लिहिणं सुटलं तरी बाबांची नॉर्मा शिअरर, ग्रेटा गाबरे यांच्याशी पत्रमैत्री कायम होती. त्या बाबांना ‘yours sisterly’ असं लिहीत असत.

खरी गोष्ट सुरू होते ती इथून. कुष्ठकार्याच्या नव्या दिशेबद्दल बाबांनी नॉर्मा शिअररला पत्राद्वारे कळवलं. ‘कुष्ठरोगाने जर्जर तुळशीरामचं आयुष्यात येणं, त्याने जीवनाला दिलेलं नवं आलंबन, पिढय़ान्पिढय़ा कुष्ठरुग्णांना दिली जाणारी अमानवी वागणूक’ याविषयी बाबांनी भरभरून लिहिलं. काळी शाल पांघरलेला, काळा झगा परिधान केलेला, गळ्यात घंटी बांधलेला एक कुष्ठरोगी आणि ‘‘You are dead to this world, but alive in the kingdom of God…’’ असं म्हणत त्याचं कब्रस्तानात धर्मगुरूकडून जिवंतपणी केलं जाणारं दफन, इत्यादी कुप्रथांचा उल्लेखही बाबांनी त्या पत्रात केला. मात्र, नॉर्मा शिअररचं आलेलं पत्रोत्तर वाचून बाबा मुळासकट हादरले. तिने बाबांना लिहिलं, ‘‘Dear Mr. Amte, why are you taking up such dirty work?’’ नॉर्मा शिअररचं- एका कलावंताचं कुष्ठकार्यास ‘Dirty Work’‘’ असं संबोधणं त्यांना झेपलं नाही. पण लगेचच स्वत:ला सावरत बाबांनी तिला लिहिलं, ‘‘Dear Norma, it is strange that men should see sublime inspiration in the ruins of an old church and see none in the ruins of a ‘Manl!’’ प्रसिद्ध ब्रिटिश तत्त्ववेत्ता गिल्बर्ट चेस्टरटॉन यांचं युद्धकैद्यांच्या बाबतचं हे वाक्य कुष्ठरुग्णांच्या परिप्रेक्ष्यात लिहिताना बाबांनी स्पष्ट केलं, ‘‘कुठलाही दोष नसताना तिरस्कृताचं जीणं नशिबी आलेल्या कुष्ठरोगीरूपी मानवीय खंडहरातील सौंदर्य शोधण्यासाठी मी हे काम सुरू केलं आहे.’’ बाबांचं पत्र वाचून नॉर्मा शिअररला स्वत:ची खूप शरम वाटली. ‘भग्न देवळांमध्ये, चर्चेसमध्ये सौंदर्य शोधणाऱ्यांना कुष्ठरोगामुळे भग्न झालेल्या जिवंत मानवी देहातील सौंदर्य का दिसू नये?’ बाबांच्या या प्रश्नाने तिचं मन उद्विग्न झालं. बाबांची मनापासून क्षमा मागणारं तिचं पत्र बाबांना आलं. पत्रासोबत सात्विक छबी असलेला स्वत:चा एक देखणा फोटो आणि एक धनादेशसुद्धा होता. ही ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ला मिळालेली पहिली परदेशी मदत होती! या मदतीचा उल्लेख करताना बाबा म्हणत- ‘‘ही केवळ ‘PENl Friendship नसून ‘PAINl Friendship आहे! ‘लेखण्यांची’ मैत्री ते ‘दुखण्यांशी’ मैत्री!’’

या घटनेच्या अनुषंगाने बाबा नेहमी म्हणत, ‘‘When Norma Shearer came to know that I had decided to take up leprosy work, her first reaction was because of the prejudice about leprosy lurks in the universal mind right from the beginning of time! कितीतरी लोक आज मनाच्या महारोगाने ग्रस्त आहेत! आजचा हा so-called निरोगी समाज पराकोटीचा अन्याय, दारिद्य्र पाहूनही निर्विकार, अलिप्त असतो. सगळ्या भावना, संवेदना गमावल्यासारखा. गेंडय़ाची निबर कातडी धारण केलेलं संवेदनाहीन हृदय म्हणजेच ‘मनाचा महारोग’! अजिंठा, वेरूळ, खजुराहोची भग्न शिल्पे पाहताना फुटलेली नाकं आणि तुटलेले हात तुम्ही त्यांचा सौंदर्यास्वाद घेत भरभरून पाहता ना? मग कुष्ठरोगाने ग्रस्त या जिवंत भग्नावशेषातलं मूळचं सौंदर्य तुम्हाला का दिसत नाही? Why there is eternal hatred & repulsion?”

एकूणच, मनाच्या महारोगाने ग्रस्त तथाकथित निरोगी समाजास बरं करण्याचं खडतर आव्हान पेलणं अत्यंत गरजेचं आहे याची जाणीव बाबांना झाली. तसंच शरीरास झालेला महारोग आधुनिक औषधोपचारांनी बरा होऊ  शकतो; पण कुष्ठरोग्यांच्या मनावर झालेले घाव पूर्णपणे भरून येण्यासाठी जगाच्या दृष्टीने निरुपयोगी, मोडक्यातोडक्या झालेल्या या बांधवांचा पुरुषार्थ जागृत केला पाहिजे, हेही बाबांनी अचूक ओळखलं. उद्ध्वस्त मानवातून पराक्रमी व्यक्तित्व निर्माण करण्याचा एक नवा प्रयोग बाबांच्या मनात आकाराला येऊ  लागला. ‘करुणेच्या पोटी जन्माला आलेली कृती ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असून चालत नाही, ती रोगाच्या विषारी मुळावर घाव घालणारी शस्त्रक्रियाच असायला हवी..’ ही तीव्र जाणीव या प्रयोगाच्या मुळाशी होती. नेमका काय होता हा प्रयोग..?

विकास आमटे vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2017 2:27 am

Web Title: baba amate norma shearer baba amate ashokwan ashrams dr vikas amte leprosy patients
Next Stories
1 बाबांचा अचाट प्रयोग
2 महारोगी सेवा समितीचे बीजारोपण
3 साक्षात्काराचा क्षण
Just Now!
X