सर्वाच्या इच्छेविरुद्ध, रूप, गुण, समृद्धीने युक्त चालत आलेली स्थळे नाकारून बाबा आमटेंसारख्या विरागी वृत्तीच्या व्यक्तीशी विवाहबद्ध होण्याचं इंदूने का ठरवलं? हा प्रश्न घुले परिवारातील सगळ्यांनाच पडला होता. त्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर पुनर्विचार करण्यासाठी दडपण आणू लागला. कोणीही इंदूच्या निर्णयाचं स्वागत केलं नाही. उलट सगळ्या बाजूने होणाऱ्या विरोधामुळे इंदू अगदी वैतागून गेली आणि त्या मन:स्थितीत तिने बाबांना लिहून टाकलं की, ‘कोणाचीही आपल्या लग्नाला संमती नाही, त्यामुळे तुम्ही आता मोकळे आहात; पुढे जे होईल ते आता आपलं नशीब.’ रुढी आणि परंपरांचा इतका जबरदस्त पगडा इंदूच्या मनावर होता की बंडखोरीचा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. वैतागून लिहिलेल्या या पत्राचा बाबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. इंदूची चलबिचल त्यांना जाणवली आणि ते तडक नागपूरला घुल्यांच्या घरी दाखल झाले आणि इंदूच्या आई- दुर्गाताईंना म्हणाले, ‘‘आयुष्यात मी लग्नाचा विचार अनेक कारणांमुळे केला नव्हता. पण इंदूला पाहिल्यानंतर माझा विचार बदलला व गृहस्थाश्रमात आपण काही तरी चांगले कसब दाखवू असा माझ्या मनाचा निश्चय झाला. ज्या क्षणी मी इंदूबद्दल पत्नी म्हणून विचार आणला त्याच क्षणी मी तिच्याशी मनाने विवाहबद्ध झालो. आता मला इतर स्त्रिया माता-भगिनींसमान आहेत. जरी आमचं लग्न झालं नाही तरी मी तिच्या स्मृतीत आजन्म राहीन व माझ्या जीवनाची दिशापण बदलेन.’’ इंदू दाराआडून सर्व ऐकत होती. बाबा परत जायला निघाले तेव्हा सद्गदित होऊन पुन्हा म्हणाले, ‘‘बघा हं, मी इंदूत जीव अडकवून जात आहे. माझा पाय इथून निघत नाही! पण मला अशा जड अंत:करणाने, मनाविरुद्ध दिलेल्या निर्णयाच्या खुंटय़ाला तुम्हाला जखडून ठेवायचं नाही. आपण इतरत्र सर्वगुणयुक्त स्थळ इंदूकरता पाहण्यास मोकळे आहात. आतापर्यंत झालेल्या पत्रव्यवहाराचा मी दुरुपयोग करणार नाही. तुमची सर्व पत्रं मी परत करीन.’’ असं बोलून त्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. हे सगळं ऐकून इंदूला खूप दु:ख झालं. स्वत:च्या दुर्बल मनाची चीड आली. तिला वाटलं हा ‘हो’-‘नाही’चा खेळ बास झाला. मी दुसऱ्या कुणालाच वरणार नाही असा तिने निर्णय घेऊन टाकला आणि घरातल्या सर्वाना म्हणाली, ‘‘बाबांना मीही मनाने वरलं आहे; पुष्कळ आधीपासून.. तुम्हा कोणाला पसंत नसेल तर विरोध करा. पण मी मात्र बाबांसारखीच आजन्म अविवाहित राहीन.’’ इंदूचा तो अनपेक्षित अवतार पाहून दुर्गाताई स्तंभित झाल्या आणि नरमल्यासुद्धा. आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सर्व घुले मंडळी आमटय़ांच्या घरी येऊन थडकली. तो दिवस होता ९ ऑगस्ट १९४६. घुले मंडळी परतली ती लग्नाचा मुहूर्त काढूनच!

लग्नाचा मुहूर्त १८ डिसेंबरचा होता. लग्न एका आठवडय़ावर येऊन ठेपलं होतं. पण यादरम्यान एक भयंकर घटना घडली. लग्नाच्या खरेदीसाठी बाबा घुले मंडळींसोबत गेले होते. घरी परत येईपर्यंत अंधार झाला. सर्वानी बाबांना मुक्काम करण्याचा आग्रह केला म्हणून ते घुल्यांच्या घरी मुक्कामी थांबले. बाबा माडीवरच्या खोलीत झोपले होते. नेहमीच्या सवयीने पहाटे तीन वाजता ते उठले तर त्यांना चाकूसुरे घेतलेल्या दोन काळ्या आकृत्या गच्चीमधून घरात शिरताना दिसल्या. लग्न घरात काहीतरी घबाड नक्की सापडेल या मिषाने ते दोन चोर घरात शिरले होते. घराच्या खालच्या भागात सर्व महिला आणि मुलं झोपली होती. चोर खाली जायला नकोत म्हणून चोरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याकरिता बाबांनी मुद्दाम ‘आई गं’ असा आवाज केला. त्यासरशी एक सुराधारी त्यांच्या पलंगाजवळ येत त्यांच्या डोक्याजवळ सुरा रोखून उभा झाला व दुसरा चोरी करण्याकरिता खाली जाणाऱ्या जिन्याकडे वळला. बाबांनी काही क्षण वाट पहिली आणि त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या चोराच्या कंबरेभोवती, त्याच्या गाफील क्षणी दोन्ही पायांचा विळखा घालून त्याला पलंगावरच ओढलं! ‘पेटी कसणे’ हा कुस्तीतला प्रकार बाबांना माहीत होता व बाबा पैलवान होतेच. त्या चोराने पायांच्या विळख्यातून सुटण्याची धडपड जीवाच्या आकांताने केली, पण सुटका न होण्याचं लक्षण दिसू लागताच त्याने बाबांच्या नेमक्या आदल्या रात्री दुखावलेल्याच पायाच्या अंगठय़ाचा असा जोरदार चावा घेतला की, बाबांची पकड ढिली झाली आणि बाबांचे व त्याचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले. नि:शस्त्र बाबा त्याच्या सुऱ्याचे वार चुकवून त्याला लाथेने घायाळ करत होते. त्याचा सुरा बाबांनी आपल्या हातात घट्ट पकडून ठेवला. या दोघांच्या लढाईचा आवाज ऐकून दुसरा चोर खाली न जाता बाबांवर चालून आला आणि त्याने बाबांवर सुऱ्याने वार करणं सुरू केलं. बाबांनी मोठय़ा शौर्याने दोघांचेही वार चुकवत एका चोराच्या पोटात अशी जोराने लाथ घातली की, तो गच्चीवरून खाली येऊन बाहेरच्या अंगणाचा दरवाजा उघडून पळाला. मात्र पळून जाण्याआधी त्याने सर्व शक्ती एकवटून बाबांच्या डोक्यावर जोरदार वार केला होता. तरीपण आरडाओरड न करता बाबांची दुसऱ्या चोराशी झुंज सुरूच होती. सुरा हातात पकडल्यामुळे बाबांची सर्व बोटं चिरली गेली होती. दुसऱ्या चोराने बाबांना रेटतरेटत गॅलरीत नेलं आणि १५-२० फूट उंच असलेल्या गॅलरीतून खाली बोळात उडी मारली. जबर मार बसल्याने तो तिथे विव्हळला आणि कसाबसा निसटला. एव्हाना वर काय प्रकार घडला याची कुणालाच कल्पना नव्हती. आरडाओरडीमुळे खाली सगळे जागे झाले आणि वरच्या मजल्याकडे धाव घेतली. बाबांना आपादमस्तक रक्तस्नान घडलं होतं. भिंतीवरदेखील रक्ताच्या चिळकांडय़ा होत्या. हे काय विपरीत झालं म्हणून सर्वानी एकच हंबरडा फोडला. इंदूला तर भोवळच आली!

clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
( Accident near Ambajogai Waghala Pati in Beed )
अपघातात नियोजित नवरदेवासह बहीण, भाची ठार; मृत रेणापूरजवळचे, अंबाजोगाईनजीकची दुर्घटना
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य

सुऱ्यांनी झालेल्या वारांमुळे बाबांना सात-आठ ठिकाणी गंभीर जखमा झाल्या होत्या. डोक्यावरचा वार जोरदार होता. उजव्या खांद्याजवळचा वार तर आरपार काखेतून बाहेर आला होता. डोळा जेमतेम वाचला होता. बाबांना ताबडतोब इस्पितळात भरती करण्यात आलं. ‘‘डोक्याच्या जखमा खूप खोल आणि गंभीर आहेत. रोगी जगेल असं वाटत नाही.’’ हे डॉक्टरांचे शब्द ऐकून इंदूच्या तोंडचं पाणीच पळालं. हे ऐकून इंदूच्या घरची मंडळी सल्ला देऊ  लागली, ‘‘इंदू, अजूनही वेळ गेलेली नाही. नीट विचार कर. बाबांचं काही बरवाईट झालं तर? मोडावं का हे लग्न?’’ पण इंदू निग्रहाने म्हणाली, ‘‘आमचं लग्न मनोमन केव्हाच झालंय. अन् आता तर चोरांशी सामना करून त्यांनी पतीचा आदर्श सिद्धच केलाय. त्या पराक्रमाने ते तर मला जास्तच प्रिय झालेत.’’ घरचे सर्व गप्पच झाले. जखमा जरी बसल्या नाहीत तरी लग्नाची तारीख बदलायची नाही म्हणून बाबांनी निक्षून सांगितलं. अखेर, १८ डिसेंबर हा दिवस उजळ माथ्याने उगवला आणि हे आगळंवेगळं लग्न पार पडलं.

साधारणत: नवपरिणीत जोडप्यांना ‘लक्ष्मी नारायणाचा’ जोडा म्हणण्याची प्रथा आहे. या जोडप्याला मात्र स्मशानातील ‘शंकर-पार्वती’ हे संबोधन मिळालं! या लग्नप्रसंगाविषयी पुलं लिहितात, ‘‘हातभर दाढी वाढवून उघडय़ाबंब देहाने वावरणाऱ्या या पहाडाएवढय़ा भणंगाशी लग्न करताना आपण हातात हिरव्या चुडय़ाच्या जोडीला दारिद्य्राचा वसा घेत आहोत, हे इंदूताई जाणत होत्या. एका झंझावाताशी संसार करायला चंदनी गाभाऱ्यात जपलेली ज्योत निघाली होती. अशीतशी असती, तर केव्हाच विझली असती. अनेक वर्षांपूर्वी अशीच एक विदर्भकन्या कृष्ण नावाच्या गवळ्याबरोबर राजमंदिर सोडून पळाली होती!’’

साधारण एक-दीड महिना नागपूरला आमटे परिवारासोबत राहून हे जोडपं वरोऱ्याला येऊन पोहोचलं. बाबांच्या जीवनात हा अचानक झालेला बदल गावकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय बनला होता. त्यामुळे भेट घेण्यासाठी अनेक लोक जमा झाले. वरोऱ्याला आल्यावर तिसऱ्या दिवशी हरिजन लोकांनी नवीन जोडीच्या स्वागतासाठी मेजवानी ठेवली होती. कारण बाबा त्यांचे पुढारी होते. या सर्व गरीब लोकांनी अंत:करणातून त्यांचे स्वागत केले आणि या जोडप्यानेसुद्धा त्यातील वयोवृद्ध लोकांना पदस्पर्श करून भरभरून आशीर्वाद घेतले. आयुष्यात कधीही तथाकथित उच्चवर्णीयांशिवाय इतर कुणाच्या हातचे पाणीही न प्यायलेली इंदू हरिजन स्त्रियांच्या मधोमध गेली आणि सगळ्यांना हळदीकुंकू लावून थेट त्यांच्या हृदयात जाऊन वसली. हरिजनांसोबत घेतलेल्या या मेजवानीमुळे या दोघांसाठी सासर-माहेरचे दरवाजे मात्र बंद झाले.

तर असं हे अनोखं सहजीवन सुरूझालं. प्रत्येक काम दोघांनी मिळून करण्याची सुरुवात बहुधा इथूनच झाली असावी. या काळात दोघांचं बहुतेक वास्तव्य गोरजा गावीच असे. समाजाचे सर्व प्रतिष्ठित संकेत बाजूला सारून या पाटील-पाटलीणीचा मुक्तछंद सुरू झाला. बैलगाडी काढायची, जुजबी स्वयंपाकाचं सामान, भांडी आणि शिधा सोबत घ्यायचा की निघाली जोडी भटकंतीसाठी. याविषयी पुलंनी लिहिलंय, ‘‘लोक मधुचंद्राला हिल स्टेशन्सवर जातात. हॉटेलमधल्या खोल्यांतून थोडीशी हिल, थोडी सृष्टिशोभा पाहतात. बाबा आणि इंदूताई सगळीकडे पायी हिंडत होते. रस्त्याच्या काठी, पिंपळाच्या पारावर, कुठल्यातरी वडातळी ‘पाय टाकुनी जळी’ रात्र गुजरत होते. चांदण्या मोजीत होते. दगडांच्या चुली मांडून काय मिळेल ते शिजवून खात होते. असल्या प्रेमाचा अलख जागवायला उमर खय्यामची उपनिषदे वाचलेली, नव्हे पचलेली असावी लागतात. जीवनातली क्षणभंगुरता समजली तरच माणूस हाती गवसलेला एकेक क्षण अशा उत्कटतेने जगतो.’’

इंदूला आजवर बाबांची नुसती ओळख होती, त्यांच्या कार्याबद्दल थोडंफार ऐकलेलं होतं. पण आता बाबांचा स्वभाव, त्यांच्या तत्त्वांप्रमाणे चालण्याचा त्यांचा व्यवहार, त्यांचा लोकसंग्रह, गरिबांबद्दलची कणव, असंघटित, पददलित जनसमूहांना संघटित करून त्यांना न्याय मिळवण्यास, हक्क मिळविण्यास सबल करणं, वगैरे गोष्टी इंदू प्रत्यक्ष अनुभवत होती. आपलं पुढील आयुष्य कसं जाणार आहे, त्यात दमछाकीचे प्रसंग अनेकवार येणार आहेत याची पुरेपूर कल्पना तिला आता आली होती. तिही कमी निग्रही नव्हती. तिने पुढे येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाण्याचा, कोसळतील ती संकटं न डगमगता झेलण्याचा, अपार कष्ट उपसण्याचा, स्तुतीप्रमाणे निंदाही अलिप्तपणे ऐकण्याचा आणि बाबांच्या सर्व उपक्रमांत नुसतंच त्यांच्या पाठीशी नव्हे तर त्यांच्या बरोबर उभं राहण्याचा मनोमन निश्चयच केला होता.

पुढील आयुष्याचं स्वप्न रंगवणारं हे जोडपं छोटय़ाछोटय़ा गोष्टीतून दिलखुलास आनंद घेत आपली त्या काळात जगावेगळी वाटणारी वाट चालत निघालं होतं. नेमकं कोणतं काम करायचं याची कल्पना अजून आली नव्हती, पण काहीतरी वेगळंच बाबांच्या मनात आकार घेत होतं हे नक्की! बाबांच्या मते, सारं जीवन हीच एक साधना होती म्हणून त्यांनी इंदूचं नाव बदलून ‘साधना’ ठेवलं आणि या प्रेममय साधनेच्या संगतीत बाबांच्या जीवनातला रखरखाट संपला.

विकास आमटे   vikasamte@gmail.com