‘कुष्ठरोग म्हणजे पूर्वजन्मीच्या पापांचं प्रायश्चित्त’ नसून कुष्ठरोगाची बाधा ‘मायकोबॅक्टेरियम लेप्री’ या सूक्ष्म जिवाणूच्या संसर्गामुळे होते, हे डॉ. हॅन्सेन यांनी १८७३ साली सिद्ध केलं. कुष्ठरोगाबद्दलच्या भ्रामक संकल्पना नाहीशा होण्यात हा शोध एक मलाचा दगड ठरला. असं असलं तरी समाजात कुष्ठरुग्णांप्रति असणारा तिरस्कार यित्कचितही कमी झाला नव्हता. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे कुष्ठसंसर्गामुळे रुग्णांमध्ये निर्माण होणारी शारीरिक विकृती!

कुष्ठरोगाचे जिवाणू मुख्यत: माणसाच्या चेतातंतूंच्या बाह्यवरणावर (Nerve Sheath) हल्ला करतात. त्यामुळे नसांवर परिणाम होऊन त्या पॅरलाइज होऊ लागतात. परिणामी हाता-पायाची बोटं वाकडी होतात, पापण्यांचे स्नायू अर्धवट निकामी झाल्याने डोळे पूर्ण बंद होत नाहीत, नाकाचा पडदा खचल्याने नाकपुडय़ा चपटय़ा होतात, चेहरा विद्रूप दिसू लागतो. चेतातंतूंवर परिणाम झाल्याने रुग्णाच्या त्वचेतल्या ठिकठिकाणच्या छोटय़ा भागांमधल्या स्पर्शसंवेदनाच निघून जातात. या रोगाचा सर्वात गंभीर दुष्परिणाम म्हणजे हातापायाला होणाऱ्या जखमा. आपल्याला जशी जखम झालेली ‘जाणवते’, तशी कुष्ठरोग्यांना ती फक्त ‘दिसते’! कारण त्यांना हातापायांमध्ये स्पर्शसंवेदना जवळपास नसतेच. पायात काटा रुतला तर आपला पाय जसा आपसूकच झटका मारून मागे येतो (retraction), तसं कुष्ठरुग्णांमध्ये होतंच असं नाही. कुठली अणकुचीदार वस्तू रुतली वा अगदी उंदरांनी चावे घेतले तरी त्यांना कळत नाही. त्यांना जखम दिसेपर्यंत काही मिनिटं, काही तास वा बऱ्याच केसेसमध्ये काही दिवसही उलटून गेलेले असतात! तोपर्यंत त्या जखमेत इतर जिवाणूंचं अधिराज्य सुरू होतं. जखम थेट हाडांपर्यंत पोहोचते आणि मग तिथे मोठय़ा प्रमाणावर जंतुसंसर्ग होतो. पण जखम दुखत नसल्याने रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि हे दुर्लक्षच बहुतांशी जखमा वाढण्यास कारणीभूत ठरतं. तिथे रक्तपुरवठा नीट नसल्याने महिनोन् महिने या जखमा बऱ्या होत नाहीत. रुग्णाचं शरीर अशा प्रकारे उद्ध्वस्त होऊन येणाऱ्या शारीरिक विकृतीमुळे या रोगाला कदाचित ‘महारोग’ असं नाव पडलं असावं. खरं तर निदान लवकर झालं तर हा रोग विकृती न येताही पूर्णपणे दुरूस्त होऊ शकतो. पण अज्ञानामुळे हा रोग वाढत जातो आणि रुग्णाला आयुष्यातून उठवतो. ‘मायकोबॅक्टेरियम लेप्री’चा शोध लागल्यापासून डॉक्टर, संशोधक, शास्त्रज्ञ कुष्ठरोगाविषयी आणखी एका बाबीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते,

Agreli
जपानच्या चलनाचा कच्चा माल पुरवतो हिमालयाच्या कुशीतला ‘हा’ देश!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

की कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोगांपकी सगळ्यात कमी वेगानं पसरत जाणारा रोग आहे. पण कुष्ठरोगामुळे निर्माण होणारी शारीरिक विकृती समाजात रुजलेली कुष्ठरोगविषयक घृणा कायम ठेवण्यात यशस्वी ठरली.

१९५० च्या दशकातही संसर्गजन्य कुष्ठरुग्णांचं प्रमाण केवळ १० ते १५ टक्के होतं. पण कुष्ठरोगाचं नाव ऐकलं तरी माणसं लांब पळत. शरीराबरोबरच संसर्गित व्यक्तीच्या मनालाही विच्छिन्न करणारा हा आजार होता. परिवारात कुष्ठबाधित व्यक्ती आहे असं कळलं तर त्या परिवारासही समाजाकडून वाळीत टाकलं जात असे. त्या व्यक्तीच्या कुटुंबाशी कुठलेही नातेसंबंध जोडण्यास कुणीच तयार होत नसे. त्यामुळे कुष्ठबाधित व्यक्तीस एकतर कुटुंबातून त्वरित बहिष्कृत केलं जात असे अथवा उपचारांविना घरात वर्षांनुर्वष डांबून ठेवण्याचे प्रकारही घडत. कुष्ठरोगविषयक कायदेही कुष्ठरुग्णाला आयुष्यातून उठवणारे होते. सार्वजनिक करमणूक स्थळांना भेट देण्यास बंदी, सार्वजनिक पाणवठय़ावरून पाणी भरण्यास बंदी, अन्नपदार्थ बनवून विकण्यास बंदी, सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यास बंदी, कुष्ठरोगाच्या कारणास्तव घटस्फोट संमत होणे, आणि या वरताण म्हणजे कुष्ठबाधित व्यक्ती जर पती असेल तर त्याला पत्नीला पोटगी द्यावी लागणे! हे असले अमानवी, अन्यायकारक कायदे! खरं तर कायदा हा कुठलाही भेदाभेद न करता सर्वाना समान न्याय देणारा असतो. पण कुष्ठरोगाच्या बाबतीत मात्र हे गरलागू होतं. जिवंतपणी नरकयातना भोगणाऱ्या कुष्ठरोग्यांना मृत झाल्यानंतरही अंत्यसंस्कारांसाठी त्या, त्या धर्माची स्मशानभूमी लाभत नसे. मृत कुष्ठरोग्यांचे अंत्यसंस्कारही वेगळ्या स्मशानभूमीत होत असत. मानवाधिकार वगरे निव्वळ गप्पा होत्या. कारण प्रत्येक जाती-धर्म-पंथाने कुष्ठरोग्यांना जसं नाकारलं होतं, तसंच कायद्यानेही नाकारलं होतं.

या सर्व पाश्र्वभूमीवर कुष्ठरोगमुक्तीचा ध्यास घेतलेल्या बाबा आमटेंपुढे आव्हानं अनेक स्तरांवर होती. १९५१ साली तत्कालीन चांदा जिल्ह्यचा (महाराष्ट्रातील आजचे चंद्रपूर आणि गडचिरोली मिळून तेव्हाचा प्रचंड आकारमानाचा चांदा जिल्हा होता.) मध्य प्रदेश राज्य शासनाच्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात समावेश नव्हता. त्यामुळे जिल्ह्यतील कुष्ठरुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचं काम सरकारी पातळीवर सुरू झालेलं नव्हतं. या प्रतिकूल परिस्थितीत बाबांचं काम सुरू झालं होतं. सुरुवातीची चार-पाच र्वष बाबांचं मुख्य वाहन होतं ते म्हणजे त्यांचे पाय! (ज्यांना ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय विजय तेंडुलकर ‘विनोबा एक्सप्रेस’ असं म्हणत!) पुढे त्यात सायकल आणि छकडय़ाची भर पडली. वरोरा आणि आसपासच्या तालुक्यांतील गावखेडय़ांचं कुष्ठरोगाच्या दृष्टीने सर्वेक्षण करणं, रोगाचं निदान करून रुग्ण शोधून काढणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्याचबरोबर कुष्ठरोगाबद्दलचे कुष्ठरुग्णांचे, त्यांच्या नातेवाईकांचे आणि समाजातले गरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करणं, योग्य उपचारांनी कुष्ठरोग बरा होऊ शकतो याबाबत प्रबोधन करणं असा त्यांचा दिनक्रम असे. रोगाच्या पहिल्या टप्प्यातील रुग्णांच्या उपचारांची सोय त्यांच्या गावातच करणे व रोग दुरूस्त होण्याच्या प्रक्रियेचा पाठपुरावा करणे, जखमा झालेल्या, बोटं झडलेल्या अपंग रुग्णांना उपचारांसाठी आनंदवनात घेऊन येणे अशी त्यांच्या कामाची पद्धत होती.

या शोधमोहिमेदरम्यान बाबांच्या लक्षात आलं, की चांदा जिल्ह्यत कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात आहे. एकटय़ा बाबांना प्रत्येक गावात, खेडय़ात जाऊन प्रत्येक रुग्णावर उपचार करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं. पण हताश होतील ते बाबा कसले! त्यांनी यावर एक अनोखा उपाय आखला. एखाद्या गावी भरणाऱ्या आठवडी बाजारात त्या गावच्या आजूबाजूच्या खेडय़ांतील जनता बाजारहाट करण्यासाठी गोळा होत असे. बाजार सुरू होण्याआधीच बाबा आठवडी बाजारात पोहोचून एखाद्या झाडाखाली जाऊन बसत. ज्या कुष्ठबाधित व्यक्तींच्या रोगाबद्दल खेडय़ात कुणाला माहिती नाही असे कित्येक जण तिथे बाबांना येऊन भेटत आणि औषधोपचार घेऊन आपापल्या खेडय़ांत परत जात असत. पुढे कधी इतर कोणासमोर त्यांच्याशी भेट झाली तर बाबा त्यांना साधी ओळखही दाखवीत नसत. आपल्यामुळे या व्यक्तींना समाजाने बहिष्कृत करू नये, हीच यामागची प्रामाणिक भावना असे. रोगाचं निदान, कुष्ठरोगाचा प्रकार यासाठी बाबांनी एक नावीन्यपूर्ण पद्धत शोधून काढली होती. प्रत्येक खेडय़ाच्या कोतवालाकडे त्या- त्या खेडय़ाचा विस्तृत नकाशा उपलब्ध असे. बाबा पंचिंग मशिनने लाल आणि निळ्या रंगाच्या जाड पेपरच्या टिकल्या पाडत. गावात संसर्गजन्य प्रकारातला कुष्ठरुग्ण सापडला तर नकाशातील त्या व्यक्तीच्या घरावर लाल टिकली चिकटवीत आणि संसर्गजन्य नसलेला रुग्ण सापडला तर निळी टिकली! त्यांचं हे काम अतिशय पद्धतशीररीत्या आणि काटेकोरपणे चालत असे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच हऌड च्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाला अनुसरत बाबांनी या मोहिमेला नाव दिलं- ‘ट्रेस अ‍ॅण्ड ट्रीट कॅम्पेन’! काही वेळा बाबांसोबत त्यांचे कुष्ठरोगातून बरे झालेले सहकारीही असत. आनंदवनात पिकवलेला भाजीपाला ते आठवडी बाजारात विकत असत. स्वत:च्या मेहनतीतून निर्माण केलेला भाजीपाला विकणारे आत्मनिर्भर कुष्ठरुग्ण पाहून समाजाचं कुष्ठरोगाबद्दल मतपरिवर्तन होईल असा आशावाद त्यामागे होता. पण समाजात कुष्ठरोगाविषयी घृणा इतकी खोलवर रुजलेली होती, की बाबांच्या या प्रयत्नांना अपेक्षेनुरूप यश येत नसे. उलट, बहुतांश वेळा रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला बाबांकडे सोपवून निघून जात.

निवासासाठी झोपडय़ा बांधून झाल्यानंतर बाबांनी आनंदवनात दवाखान्यासाठीही एक झोपडी उभारली. ‘आनंदवन लेप्रसी हॉस्पिटल’ची सुरुवात झाली ती याच झोपडीतून! कुष्ठरुग्णांच्या सर्वागावर जखमा असत. पण रुग्ण कितीही वाईट अवस्थेत असला तरी त्याच्या जखमांमधील अळ्या काढून त्या साफ करणं आणि त्यावर ड्रेसिंग करणं, हे काम बाबा अजिबात विचलित न होता शांतचित्ताने आणि शास्त्रीय पद्धतीने करीत असत. जखमांचं ड्रेसिंग करता करता बाबा या बांधवांशी अगदी सहजपणे गप्पा मारत. बाबांच्या दृष्टीने हासुद्धा कुष्ठरोगावरील एक प्रभावी आणि अत्यंत गरजेचा उपचार होता. कुटुंबाने नाकारल्यामुळे जगण्याची उमेद गमावलेल्या या माणसांच्या मनावर खोलवर झालेले घाव भरून येणं तेवढंच आवश्यक होतं. बाबांचे शब्द त्यांच्या मनावर हळुवार फुंकर घालत असत. ‘माझी कुणीतरी प्रेमाने दखल घेतं आहे’ ही जाणीव कुष्ठपीडितांच्या मनात जागृत होणं हीच लोकसशक्तीकरणातील पहिली पायरी होती. लहानपणी फारसं कळत नसलं तरी आम्हा भावंडांच्या मनावर हे संस्कार आपोआपच होत होते.

बाबांच्या लेखी, कुष्ठपीडितांचे दु:ख पाहून सहवेदनेने व्याकूळ होणं आणि ते दूर करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून झगडणं ही करुणेची पर्याप्त कल्पना नव्हती. हा त्यांच्यासाठी आरंभाचा टप्पा होता. करुणा ही पांगळेपण सुरक्षित ठेवणारी न राहता करुणेनं पीडितांना स्वाभिमानी मन आणि नवे पंख दिले पाहिजेत, या निग्रहातून आनंदवनाच्या आरोग्यसेवेचा परीघ विस्तारू लागला होता.

विकास आमटे vikasamte@gmail.com