30 May 2020

News Flash

ध्यासपर्वाची सुरुवात

दुसऱ्या दिवशी जमिनीचा एक खोलगट भाग बाबांनी निवडला. इंदूने रानफुलांनी त्या जागेची पूजा केली,

कुष्ठरोगी बांधवांना उद्देशून बाबा म्हणाले, ‘‘हे रान साफ करून आपल्याला झोपडय़ा बांधायच्या आहेत.

कुष्ठपीडितांचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने बाबा आमटेंच्या मनात आकारत असलेल्या अभिनव प्रयोगाचा गाभा ‘लोकसशक्तीकरण आणि नवनिर्मिती’ हा होता. ‘Demonstrate your Strength; not Weaknessl, ‘Confidence must rest in your Wrist’ अशा जबरदस्त प्रेरणा त्यामागे होत्या. कारण बाबा कुस्तीगीर होते : शरीराने आणि मनानेही!

बाबांनी पूज्य रा. कृ. पाटील आणि इतर १४ समविचारी लोकांना सोबत घेत १९४९ साली ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून कुष्ठकार्यासाठी वरोरा गावाजवळ जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हं दिसू लागली. रा. कृ. पाटील त्यावेळी भारताचे अन्ननिर्मिती आयुक्त होते. त्यांनी तत्कालीन ‘मध्य प्रदेश प्रांतिक सरकार’कडे (चांदा म्हणजेच आजचा चंद्रपूर जिल्हा त्याकाळी मध्य प्रदेश राज्यात होता.) हा विषय लावून धरला. अखेरीस तो दिवस उजाडला. ६ फेब्रुवारी १९५१. ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ला कुष्ठकार्यासाठी वरोऱ्यापासून चार-पाच किलोमीटर दूर स्थित ५० एकर जंगलजमीन दिली जात आहे, असं पत्र (Deed of Grant) बाबांना चांदा जिल्ह्य़ाचे उपायुक्त श्री. मोघे यांच्याकडून प्राप्त झालं. महिन्याभरात जमिनीचे इतर सोपस्कार पार पडले.

दिवस होता २१ मार्च १९५१. बाबा, इंदू, मी, प्रकाश आणि दत्तपूर कुष्ठधामातून आलेले सहा रुग्ण असे आम्ही सगळे या जंगलजमिनीची पाहणी करायला आलो होतो. दूरवरचं फारसं दिसत नव्हतं. कारण तिथे झाडाझुडपांचं प्रचंड रान माजलं होतं. जवळची विहीरही दोन मलांवर होती. माती फारशी नव्हतीच. कारण बहुतेक सगळी जागा दगडधोंडय़ांनीच व्यापली होती. बाबांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘त्या जमिनीकडे मी एका अनामिक ऊर्मीने पाहिलं. दगडांच्या ओस पडलेल्या खाणीसारखी ती जागा पाहून मी काही क्षण विमनस्क झालो. त्या ठिकाणी दगडधोंडे, झाडांची मुळं आणि सरपटणाऱ्या प्राण्यांशिवाय काहीच नसावं, ही गोष्टसुद्धा कदाचित सूचकच होती. समाजाने वाळीत टाकलेल्या माणसांसाठी मिळालेली जमीनसुद्धा तशीच होती.. Outcast land for Outcast people!

‘‘मित्रांनो..’’ सोबतच्या कुष्ठरोगी बांधवांना उद्देशून बाबा म्हणाले, ‘‘हे रान साफ करून आपल्याला झोपडय़ा बांधायच्या आहेत. जमीन शेतीयोग्य करायची आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी सर्वप्रथम हवं ते पाणी. त्यामुळे आपण आधी विहीर खणू. आपण कोणापुढे मदतीसाठी हात पसरायचे नाही. भिकाऱ्याच्या हातात लोक दान टाकत नाहीत; फक्तअपमान, लाचारी टाकतात. दान माणसाला नादान बनवतं. काम माणसाला उभारतं. तुमची तयारी आहे नं? माझ्यासोबत कोण येणार?’’ पुढे वाढून ठेवलेल्या कामाच्या अक्राळविक्राळ स्वरूपाची नुसती कल्पना करूनच हातापायाची बोटं झडून गेलेले ते कुष्ठरोगी बांधव काही क्षण तसेच बसून राहिले. त्यांची आपापसात काहीतरी कुजबुज सुरू होती, पण खुलून कुणीच काही बोलेना. सर्वदूर माजलेली काटेरी झाडंझुडपं कुऱ्हाडीने साफ करायची, खडकाळ, बरड जमिनीतले मोठ्ठाले दगडधोंडे पहारीने खणून हातांनी ढकलत न्यायचे, हे काम धट्टय़ाकट्टय़ा लोकांसाठीसुद्धा जवळपास अशक्यकोटीतलं होतं. याउप्पर बाबा-इंदूकडील शिल्लक पुंजी ती काय? तर एक लंगडी गाय आणि १४ रुपये! पण बाबांच्या सोबत्यांची स्तब्धता काही क्षणच टिकली; कारण खरं संचित होतं ते दुर्दम्य आशावादाचं. त्यांच्यातला धोंडीबा उठला आणि म्हणाला, ‘‘बाबा, कधी सुरू करायचं काम?’’ त्याच्यामागून बाकीचेही उठले आणि एकसुरात म्हणाले, ‘‘आम्हीपण तयार आहोत बाबा.’’

लगेचच काम सुरूही झालं. कुणी कुऱ्हाड चालवत होतं, कुणी पहारीने दगड खणत होतं. माझ्याकडे आणि प्रकाशकडे वाळलेली काटेरी झुडुपं पेटवण्याचं काम होतं! आम्हा दोघांकडे लक्ष देत देत इंदूचं सर्वाना मदत करणं सुरू होतं. थोडय़ा वेळाने वरोऱ्यातून महादेवभाऊ आला. तो सोबत पाण्याच्या बरण्या घेऊन आला होता. (महादेव आंबेकर म्हणजे आमचा महादेवभाऊ वरोऱ्याचाच. तो नगर परिषदेच्या वाचनालयात काम करत असे. कुठल्याही कामाबद्दल कमीपणा न वाटणे, पडेल ते काम करायची तयारी हे त्याचे स्वभावविशेष बाबांनी वरोऱ्याचे उपनगराध्यक्ष असताना हेरले. श्रमाश्रमाच्या प्रयोगापासून तो बाबांच्या कामात सामील झाला. इंदूला महादेवभाऊचा खूप आधार वाटायचा. माझा आणि प्रकाशचा लहानपणीचा पहिला मित्र म्हणजे महादेवभाऊच.) पाणी पिऊन सर्वाना तरतरी आली. येताना इंदूने सोबत आणलेली केळी खाऊन सर्वजण परत कामाला लागले. अवजारं खाली ठेवली गेली ती थेट सूर्यास्तालाच. आपल्या सोबत्यांचे हात बाबांनी हातात घेतले. काहींना खरचटलं होतं, काहींना काटे रुतले होते, तर काहींच्या जखमांतून रक्त येत होतं. आम्ही सारे वरोऱ्याच्या घरी परतलो. बाबांनी साऱ्यांच्या जखमांना मलमपट्टी केली आणि म्हणाले, ‘‘उन्हाळा सुरू झाला आहे. उद्यापासून आपण सूर्योदयापूर्वीच कामाला लागू.’’ इंदूने भराभर स्वयंपाक करत साऱ्यांच्या दिवसभराच्या भुका शांत केल्या.

दुसऱ्या दिवशी जमिनीचा एक खोलगट भाग बाबांनी निवडला. इंदूने रानफुलांनी त्या जागेची पूजा केली, पहिली कुदळ मारली आणि विहिरीच्या खोदकामाला सुरुवात झाली. खोदकाम कसचं, ते तर पत्थराला पाझर फोडण्याचं काम होतं! माती नावालाच होती, बाकी सगळा काळा पाषाण. कुदळ मारा, पहार मारा.. नुसते अणकुचीदार टवके, छिलके टाणकन् उडत. काम सुरू असताना एकदा एकाएकी विठोबा ओरडला, ‘‘मेलो रे बाप..’’ हातातली कुदळ तशीच टाकत बाबा धावले. विठोबाच्या पायात दगडाचा एक टोकदार टवका घुसला होता. बाबांनी तो ओढून काढताच भळभळ रक्त वाहू लागलं. बाबा म्हणाले, ‘‘अरे, चपला होत्या नं पायात?’’ विठोबा वेदनेने तडफडत बोलून गेला, ‘‘होत्या नं जी. पण त्या जुन्या टायरच्या आहेत. चामडय़ाच्या थोडीच आहेत? आमच्या पायात काटे, दगड रुतायचेच.’’ एक जबर चपराक बसावी तसे ते शब्द बाबांना लागले. बाबांचे कपडे, जेवण, काम आणि एकूण सारी राहणी या बांधवांप्रमाणेच होती. फरक राहिला होता तो एवढाच, की बाबांच्या चपला चामडय़ाच्या होत्या आणि या बांधवांच्या चपला वाहनांच्या जुन्या टायरपासून बनवलेल्या होत्या. विठोबाच्या जखमेचं ड्रेसिंग केल्यानंतर त्याच संध्याकाळी बाबांनी चांभाराकडून स्वत:साठी जुन्या टायरच्या चपला बनवून घेतल्या आणि चामडय़ाच्या चपलांचा कायमचा त्याग करत उरलीसुरली असमानताही संपवली.

रोज पहाटे तीनला उठणे, न्याहारी करणे आणि उजाडण्यापूर्वी या जागी चालत पोहोचून काम सुरू करणे असा सर्वाचा दिनक्रम होता. जाण्या-येण्याचा रस्ता कच्चा होता. दुतर्फा दाट झाडी. रानडुक्करं, कोल्हे यांची भेट रोजच ठरलेली. त्यामुळे अंधारात एकटादुकटा माणूस या रस्त्याने जाण्यास धजावत नसे. हातात पाण्याची बरणी, खाण्याचे डबे आणि आम्हा दोघा भावांना खांद्यावर घेऊन महादेवभाऊ येत असे. त्या जागी असलेल्या एका मोठ्ठय़ा वडाच्या झाडाखाली झुडपं साफ करून आम्ही सर्वजण पळसाच्या पानांत शिदोरी खात असू. सर्वाचं स्वयंपाकपाणी बघता बघता इंदूचा तर प्रचंड कस लागत होता.

विहिरीचं खोदकाम सुरू होऊन सहा आठवडे होऊन गेले होते. बाबांचं खांद्याचं दुखणं सारखं उफाळून येत होतं. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत, हातापायांची बोटं झडलेल्या आपल्या सहा सोबत्यांसोबत बाबांचं काम अखंड सुरू होतं. जवळच वडारांची एक वस्ती होती. त्या वस्तीतल्या बोदूलाल आणि आप्पन्ना या वडारांनी बाबांना विहीर खोदताना भूसुरुंग वापरायला शिकवलं. अशा प्रकारे कुदळी, पहारी आणि भूसुरुंगाच्या मदतीने सुमारे ३०-३२ फूट खणून झालं होतं. तो मे महिना होता. सूर्य आग ओकत होता. पारा ४८ अंश सेल्सिअसला टेकला होता. खाली विहिरीत जीवघेण्या गर्मीने घाम अक्षरश: धारांनी वाहत होता. अचानक बाबांची कुदळ दगडावर न पडता सलसर जमिनीत जरा खोल गेली. बाबा आतून ओरडले, ‘‘अरे, फार खोल नाही आता पाणी!’’ तेवढय़ात एक मधमाशी आणि मागोमाग एक फुलपाखरू आत येऊन विसावलं. बहुतेक त्यांनाही ओलाव्याची चाहूल लागली असणार. दोन दिवसांनी बाबा विहिरीत उतरले तसं त्यांना दोन दगडांच्या फटीत बसलेला बेडूक दिसला. पाणी झिरपून तिथे एक छोटं डबकं साचलं होतं. पहारीने बाबांनी दगडांचा अडसर हटवला आणि पाण्याची धारच लागली! ‘‘पाणी आलं, पाणी आलं!’’ बाबा आणि बाजूला उभे त्यांचे सोबती अत्यानंदाने ओरडले. इंदूने रानफुलं वेचली आणि जलपूजन केलं. येताना सोबत आणलेल्या दुधाचा नवेद्य दाखवला. त्यानंतर दिवसभर आम्ही सर्वजण विहिरीच्या काठावर बसून तृप्त नजरांनी पाण्याकडे नुसतंच निरखून पाहत होतो.

लोकसशक्तीकरणाच्या प्रयोगाचं हे बीजारोपण होतं. एका ध्यासपर्वाची सुरुवात झाली होती. समाजाने बहिष्कृत केल्यामुळे वाडगे घेऊन भीक मागण्यास बाध्य झालेले हात आता समर्थपणे अवजारं पेलू लागले होते. समाजाने त्यागलेल्या भूमीवर, समाजाने त्यागलेल्या या भग्न माणसांकडून चमत्कार घडला होता. हेच सामथ्र्य बाबांच्या कवितेतील ओळींत प्रकट होतं-

‘शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही..

त्या तिथे वळणावरी पण वेगळा क्षण एक आला

एकटे एकत्र आले आणि हा जत्था निघाला

घोर रात्री श्वापदांच्या, माजलेले रान होते

पांगळ्यांना पत्थरांचे ते खडे आव्हान होते

टाकलेली माणसे अन् त्यक्त ती लाचार माती

त्यातुनी आले ऋतूंचे भाग्य या घायाळ हाती

पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले

आसवे अन् घाम यांचा आगळा शृंगार चाले

वेदनेच्या गर्द रानी गर्जली आनंद द्वाही

दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही..’

विकास आमटे vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2017 2:32 am

Web Title: baba amte innovative experiment for economic rehabilitation of leprosy affected person
Next Stories
1 भग्नावशेषांतील सौंदर्यासक्ती
2 बाबांचा अचाट प्रयोग
3 महारोगी सेवा समितीचे बीजारोपण
Just Now!
X