14 August 2020

News Flash

श्रमाश्रम

बाबा आमटेंनी जरी लग्नानंतर ‘इंदू’चं नाव बदलून ‘साधना’ ठेवलं तरी ते शेवटपर्यंत तिला इंदूच म्हणत असत.

बाबा आमटेंनी जरी लग्नानंतर ‘इंदू’चं नाव बदलून ‘साधना’ ठेवलं तरी ते शेवटपर्यंत तिला इंदूच म्हणत असत. त्यामुळे मी आणि प्रकाश पण त्याच नावाने हाक मारू लागलो. म्हणून इथून पुढेसुद्धा मी तिचा उल्लेख ‘इंदू’ असाच करेन.

तर मी आधी सांगितल्याप्रमाणे श्रमिकांच्या संघटना हे वर्गलढय़ाचं हत्यार म्हणून वापरण्याऐवजी, श्रमाचं म्हणून जे स्थान आहे ते श्रमिकाला मिळवून देणं बाबांना अभिप्रेत होतं. या दृष्टीने बाबांनी दोन महत्त्वपूर्ण पावलं उचलली. बाबांना त्या काळात ठामपणे असं वाटत होतं की धोरणात्मक पातळीवर जर काही ठोस बदल घडवून आणता आले तर श्रमिकांना सामाजिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर न्याय मिळवून देता येऊ  शकेल. त्यामुळे ते वरोरा नगर परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिले आणि उपाध्यक्षपदी निवडूनही आले. तर दुसऱ्या बाजूला बाबांच्या मनात ‘साम्यकुला’चा एक अभिनव प्रयोग आकार घेत होता. या काळात वकिली व्यवसायातून बाबांचं मन पूर्ण उडालं होतं. बाबांनी इंदूजवळ हा विचार बोलून दाखवला. हे ऐकून इंदूने जेव्हा अर्धपोटीसुद्धा राहण्याची तयारी दर्शवली त्या क्षणी बाबांनी त्यांची वकिलीची सनद चक्क फाडून टाकली! वडिलोपार्जित संपत्तीवरचा हक्कही बाबांनी त्याच काळात सोडला होता, त्यामुळे शेतावरून येणारं धान्यही नाकारलं. आता उपजीविकेचं एकच साधन उरलं होतं, गांधी विचारांची पुस्तकं, खादी ठिकठिकाणी जाऊन विकायची, त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमिशनवर कसंबसं भागवायचं, ज्या दिवशी विक्री होणार नाही त्या दिवशी उपाशी झोपायचं. इंदूच्या आणि येऊ  घातलेल्या बाळाच्या (माझ्या) उदरनिर्वाहाचा विचार बाबांना सतावत होताच, पण काहीतरी मार्ग मिळेल हा दृढ विश्वासही होता.

परिश्रमाच्या परिसात मातीचे सोने करण्याची शक्ती आहे यावर बाबांचा दृढ विश्वास होता. आणि म्हणूनच ‘श्रमाने आत्मशुद्धी होते’ ही श्रद्धा बाळगत गांधी-विनोबांच्या कल्पनेतले साम्यकुल साकारण्यासाठी बाबांनी ‘श्रमाश्रमा’ची स्थापना केली. हा एक लोकविलक्षण प्रयोग होता. अठरापगड मागास जातींचे, रोजंदारीवर काम करणारे, मध्यमवर्गीय, व्यावसायिक, हिंदू, मुसलमान, स्त्रिया, पुरुष, मुले अशा अनेक वर्गातल्या, अनेक व्यवसायांतल्या बत्तीस-पस्तीस जणांना सोबत घेत श्रमाधारित सामुदायिक जीवन जगण्याचा हा प्रयोग होता.

पूज्य रा. कृ. पाटील म्हणजे बाबांच्या या प्रयोगामध्ये खंबीरपणे साथ करणारी अजून एक व्यक्ती. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी, अतिशय प्रतिष्ठेचं समजलं जाणारं इंडिअन सिव्हिल सर्विसेस (ICS) मधलं आपलं पद अगदी सहजपणे त्यागणारे वरोऱ्याचे  रा. कृ. पाटील हे बाबांचे अगदी जिवलग मित्र. वरोरा गावाबाहेर एका विस्तीर्ण कबरस्तानाला लागून पाटलांचा जुना बंगला होता. तो बंगला आणि ७ एकर जमीन त्यांनी बाबांना या प्रयोगासाठी दिली. बाबांनी त्या बंगल्याच्या फाटकावर पाटी लावली- ‘श्रमाश्रम-मित्रवस्ती.’ सफाई कामगारापासून वकिलापर्यंत असे समाजाचे सर्व थर तेथे एकत्र आले होते. श्रमजीवी आणि बुद्धिजीवी यांचे ताणेबाणे एकत्र बांधून जीवनाचे वस्त्र तेथे विणले जात होते. प्रत्येकानं आपली सर्व कमाई, मग ती रोजची, आठवडय़ाची, महिन्याची असो, एकत्र करायची, सर्वानी एकत्र राहायचं आणि एकत्र अन्न शिजवायचं, तिथं कुठल्याच प्रकारची विषमता पाळायची नाही, अस्पृश्यतेला तिथं स्थान नाही असा दंडक होता आणि तसा व्यवहार होत होता. बाबांनी स्वत: लाकडं फोडणं, डोक्यावर भाजीची टोपली घेऊन बाजारात जाऊन भाजी विकणं, शेतकाम करणं, हिशेब ठेवणं इत्यादी पडतील ती सर्व कामं तत्त्वनिष्ठेने केली. इंदूची त्यात पूर्ण साथ होती. तिने स्वयंपाकाचं सर्व काम स्वत:कडे घेतलं. पडतील ती इतर कामंही होतीच. आजारी लोकांची शुश्रूषा, विहिरीतून कित्येक बादल्या पाणी काढणं, इत्यादी कामं.. शिवाय वेळी-अवेळी हा प्रयोग बघण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची रीघ असायची. हे सारं सांभाळावं लागे. यावेळी मी असेन तीन-चार महिन्यांचा. रोज सकाळी आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना होत असे. एकदा गांधीजींचे निकटतम सहकारी असलेले, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी.कुमारप्पा आणि संशोधक सतीशचंद्र दासगुप्ता ‘श्रमाश्रमा’त आले असताना प्रार्थनेच्या वेळी घडलेला एक प्रसंग बाबांनी सांगितला- ‘‘प्रार्थनेची वेळ झाली तेव्हा सर्व जण प्रार्थनेला बसले. ती आटोपल्यावर जे. सी. कुमारप्पा तेथे आले. त्यांना उद्देशून सतीशचंद्र दासगुप्ता म्हणाले, ‘‘जे. सी., प्रार्थनेत तुम्ही दिसला नाहीत?’’ यावर कुमारप्पा म्हणाले, ‘‘I had joined Mrs. Amte in her silent prayer in the kitchen .’’ लोक प्रार्थना करत असताना कुमारप्पांनी इंदूला स्वयंपाकात मदत म्हणून चक्क ढीगभर कणीक तिंबून दिली होती!

‘श्रमाश्रमा’त नियमित कमाई असणारे सदस्य तसे कमीच होते. त्यातही काही विकलांग, आजारी. ‘श्रमाश्रमा’च्या जमाखर्चाची तोंडमिळवणी करणं एकूणच अवघड होऊन बसलं होतं. शेतीतून थोडेफार उत्पन्न होई. बाबांनी वकिली व्यवसाय करत असताना केलेली बचतही तुटपुंजी होती. उघडय़ावर ठेवलेल्या कापरासारखी ती बघता बघता उडून गेली. आधार उरला होता तो कोल्हापूरच्या कोरगावकर ट्रस्टकडून मिळणाऱ्या महिना दीडशे रुपयांच्या मानधनाचा.

श्रमाश्रमासंबंधी बाबांनी एक अनुभव असा सांगितला आहे- ‘‘श्रमाश्रमातील मळ्यात पिकणारा भाजीपाला घेऊन मी बाजारात बसत असे- मंडईच्या मध्यभागी. भाव वगैरे काही नाही! लोकांनी दोन्ही बाजूंनी भाव पाहात यावे आणि हवे ते पैसे देऊन हवा तो आणि हवा तितका माल घ्यावा. अशा वेळी सुखवस्तू घरातील माणसं तिथे येत. मला भाव विचारीत. सांगितला नाही तर कोणी कोणी वाद घालत, ‘‘वा, वा! मग आम्हाला कमॉडिटीची व्हॅल्यू कशी कळणार?’’ त्यातला एक धनिक शेठजी कधीतरी चार-दोन पैसे देऊन टोपलीभर वांगी नोकराबरोबर थैलीत भरून न्यायचा! ‘कशी जिरवली पागल वकिलाची!’ म्हणून ही ही करत लफ्फेदार चालीने मिरवत जायचा. त्याचा तो नोकर थैली घट्ट धरून पुन्हा पुन्हा मागे वळून माझ्याकडे वासराला सोडून जाणारी गाय पाहते तसा पाहात जायचा आणि मग अंधारल्यावर पुन्हा परत यायचा. बारा आण्याला एक काकडी न्यायचा आणि संपूर्ण दिवसाची मजुरी तो त्या पागल वकिलापाशी न बोलता ठेवून जायचा. एक पोर्टर होता. एक रुपया देऊन मेथीच्या फक्त दोन जुडय़ा नेई. मी नको म्हणे तेव्हा भांडत असे. कधी रडत रडत म्हणायचा, ‘हे काय करून बसले जी तुम्ही!’ एके दिवशी दोन पैशाला टोपलीभर वांगी उचलायला चटावलेला तो शेठजी पुन्हा आला आणि माल उचलून दोन पैसे टेकवणार एवढय़ात माझ्या बाजूला बसलेले इतर विक्रेते त्या शेठजीला ‘मेहनतीचा माल हरामात खावाले सरम नाही वाटत मुर्दाडा!’ म्हणत मारायला धावले! हे तेच लोक होते जे सुरुवातीला ‘आपल्या पोटावर पाय देणारा’ म्हणून माझ्यावर खवळले होते. तेच आज श्रमाचे अपहरण पाहून खवळले! कुठून उठला त्यांच्या पोटात हा आवेग? काय जळत होतं त्यांच्या डोळ्यात? ते जे काही होते, त्यानेच मी पेटलो. सर्वच श्रीमंत आणि सर्वच गरीब एकाच माळेचे मणी नव्हते हे खरे, पण माणुसकीचा धर्मकाटा घेऊन त्या भाजीपाल्याच्या दुकानात मी बसलो होतो आणि श्रीमंतीतल्या माणुसकीपेक्षा गरिबीतल्या माणुसकीचे पारडे खूपच जड ठरले होते!’’ असे नित्यनवे अनुभव घेत घेत मित्रवस्तीचा प्रवास सुरू होता. या काळात मित्रवस्तीतील अनेकांना मलेरियाने आपला प्रसाद देऊन झाला होता. त्यातच इंदूची तब्येत खालावत चालली होती. सतत ताप येत होता. त्यात तिला पुन्हा एकदा दिवस राहिले होते. इंदूला टायफॉईडचे निदान झाले. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. इंदूची सगळी कामं बाबांच्या अंगावर येऊन पडली. सक्तीचा आराम करूनही ताप आटोक्यात येईना. बाबांचे परम मित्र आणि सहकारी अ‍ॅड. पावडे इंदूची तब्बेत बघायला येऊन गेले. गांभीर्य लक्षात आल्यावर त्यांनी त्या वेळचे आरोग्यमंत्री दादासाहेब बारलिंगे यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि नागपूर मेडिकल कॉलेजची रुग्णवाहिका मित्रवस्तीच्या दारात येऊन उभी राहिली. जेव्हा बाबांनी इंदूला हे सांगितलं तेव्हा इंदू म्हणाली, ‘‘गाडी परत पाठवा. त्यांना सांगा ही गाडी साधना आमटे यांच्याकरिता आली आहे. ज्या दिवशी ती गाडी सामान्य गरीब स्त्रियांसाठी येईल त्या दिवशी मी या गाडीने जाईन.’’ बाबांचे डोळे चमकले. इंदू तर काकणभर आपल्याही पुढे गेली याचं प्रचंड आत्मिक समाधान त्यांना लाभलं. पण त्यांना इंदूची अवस्था बघवेना. त्यात जोडीला माझीही तब्बेत बिघडली. सारखा येत असलेला बारीक ताप, खोकला आणि हगवण यामुळे मी पण खूप अशक्त झालो होतो. सारं उलटच घडत होतं. शेवटी बाबांना मनावर दगड ठेवून इंदूला माझ्यासह उपचारांसाठी नागपूरला धाडण्याचा निर्णय घ्यावा लागला. पुढे इंदू पुढचे तीन-चार महिने नागपूरलाच होती. तरीही प्रकृतीत सुधार होत नव्हता.

यादरम्यान मित्रवस्तीमधील काही मंडळी सोडून गेली. पैशाची ददात, मलेरियाची साथ, तर कुणाला आश्रमाची बंधनं नको होती. ज्यांच्याकडून इंदू सुंदर फडे बनवायला शिकली ती काही बुरुड माणसं, एक ख्रिस्ती कुटुंब होतं ते, असे एक एक करत या ना त्या कारणाने मंडळी निघून जात होती आणि मित्रवस्तीचा एक भक्कम खांब असलेल्या इंदूला सुद्धा जावं लागलं. बाबा खूपच अस्वस्थ झाले. ‘श्रमाश्रमा’चा हा प्रयोग दरम्यानच्या काळात खूप नावाजला गेला होता. अनेक लोक हा प्रयोग पाहून, त्याचं कौतुक करून गेले होते. श्रमाश्रमाचा प्रयोग वर्ष-दीड वर्ष चालला, परंतु आजार आणि अशाच काही मानवी नियंत्रणाबाहेरच्या कारणांनी तो अखेर तुटला.

बाबांना खूप दु:ख झालं. आश्रम कशाच्या बळावर चाललाय? पैसा कुठून येतो? पैशाच्या संकटाला कसं तोंड द्यावं? तुम्हाला काय मदत हवी? हे प्रश्न विचारायला कोणीही आलं नाही. हा प्रयोग यशस्वी झाला तर आर्थिक घडीसुद्धा नीट बसेल अशी अपेक्षा बाळगून बाबा पुढे निघाले होते. पण कोणीही मदतीचा हात दिला नाही की दिडकीचं दान दिलं नाही. बाबांच्या या प्रयोगाचं व त्यांच्या स्वप्नवेडेपणाचं शवच्छेदन तत्कालीन चिकित्सकांनी मोठय़ा निष्ठुरपणे केलं. उद्विग्न झालेले बाबा विनोबांच्या भेटीसाठी गेले. या प्रयोगाचा सगळा हालहवाल सांगताना बाबा त्यांना म्हणाले, ‘‘एकूण काय, माझा प्रयोग फसलाच म्हणायचा.’’ यावर विनोबा त्यांना म्हणाले, ‘‘तुमचे साथीदार सोडून गेले याचं दु:ख करायचं कारण नाही. एक आकडा कायम असला की शून्य अनेक मिळतात. बघता बघता एकाचे दहा आणि शंभर होऊ  शकतात. तुमची स्वत:ची भूमिका तर ठाम आहे ना? ती तशी असली तर एक आकडा कायम राहील तुमच्या रूपाने. सामाजिक कार्यात गरज असते ती पैशाची नव्हे, तर निष्ठावान कार्यकर्त्यांची! तुम्ही निष्ठेने कार्य करा, फळाची आशा धरू नका. आज तुम्ही चालताना अडखळून पडलात पण उद्या याच अनुभवाने तुम्ही धावू लागाल. तुमच्या हातून फार मोठं कार्य होईल.’’

‘श्रमाश्रमा’चा प्रयोग जरी तुटला तरी ‘श्रमातून निर्मिती होते’, ‘श्रमाने आत्मशुद्धी होते’, ही जीवनदृष्टी बाबांना या प्रयोगातून मिळाली. ‘‘अपयशातून दिशा निश्चित होत जाते आणि अपयश हे नेमक्या मार्गाकडे नेणारं वळणही ठरतं,’’ हा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला.

विकास आमटे  vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2017 1:22 am

Web Title: baba amte sadhanatai amte anandwan baba amte social work
Next Stories
1 संन्याशाचे लग्न
2 ‘संधी’साधू!
3 आत्मशोधाची वाटचाल
Just Now!
X