05 July 2020

News Flash

महारोगी सेवा समितीचे बीजारोपण

तिथे कदाचित खोलीचा एखादा कोपरा मिळू शकेल असं त्यांना वाटलं. बाबा लगेचच तिथे गेले.

बाबा आमटेंच्या मते, तुळशीराम ही केवळ कुष्ठरोगाने जर्जर, अंतिम घटका मोजत खितपत पडलेली व्यक्ती नव्हती; तर कुष्ठरोग्याचा आकार धारण केलेल्या वैश्विक स्तरावरील मानसिक-शारीरिक-सामाजिक अन्यायाचं (’Flagship of Mental-Physical-Social Injustice) ते सर्वोच्च प्रतीक होतं! शतकानुशतके कुष्ठरुग्णांना दिली जाणारी अमानवी वागणूक, कुष्ठरुग्णांना जिवंतपणी गाडून वा जाळून टाकणे अशा गोष्टींनी बाबा नखशिखांत हादरून गेले. फादर डेमियनप्रमाणे कुष्ठकार्यास आपले आयुष्य समर्पित केलेल्या व्यक्तींविषयी सविस्तर माहिती मिळवण्यास बाबांनी सुरुवात केली. या क्षेत्रात कार्यरत संस्थांबद्दल वाचन सुरू केलं. कुष्ठरुग्णांच्या आरोग्यसेवा कार्याचा सर्वागीण अनुभव आपण घ्यायला हवा, ही जाणीव बाबांना झाली. आचार्य विनोबा भावे यांच्या सल्ल्याने बाबांनी आदरणीय मनोहरजी दिवाण यांनी वध्र्याजवळ स्थापन केलेल्या दत्तपूर कुष्ठधामात प्रशिक्षणासाठी जायला सुरुवात केली. प्रखर आध्यात्मिक आचार आणि विचारांच्या मनोहरजी दिवाण यांचा महात्मा गांधींनी ‘पहिले भारतीय मिशनरी’ या शब्दांत गौरव केला होता. प्रशिक्षणाकरिता बाबा आठवडय़ातून दोन दिवस वरोरा ते वर्धा आणि वर्धा ते दत्तपूर असा प्रवास करत. या प्रशिक्षणादरम्यान बाबांनी वरोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात कुष्ठरुग्णांना तपासण्यासाठी एक क्लिनिक उघडलं. तिथे लवकरच मोठय़ा संख्येनं कुष्ठरोगी येऊ  लागले. आत्यंतिक शारीरिक आणि मानसिक वेदना सहन करत असलेल्या कुष्ठरुग्णांना बघून बाबा हेलावून जात.

या काळात क्षयरोगसदृश आजार झाल्याने काही महिन्यांची गरोदर असणाऱ्या इंदूची (आईची) प्रकृती खालावत चालली होती. १९४८ च्या डिसेंबर महिन्यात प्रकाशचा जन्म झाला आणि इंदूची प्रकृती अधिकच खालावली. मी जेमतेम सव्वा वर्षांचा   होतो. इंदूची काळजी घेता घेता जेवण बनवणं, भांडी घासणं, कपडे धुणं, माझी आणि प्रकाशची काळजी घेणं- या सगळ्या गोष्टीही बाबांच्या अंगावर पडल्या. बाबांची पुरती कोंडी झाली होती. त्यांनी वरोऱ्याचं क्लिनिक तात्पुरतं बंद केलं आणि आम्हा सर्वाना घेऊन सेवाग्राम येथे राहायचं असं ठरवलं. दत्तपूर कुष्ठधाम सेवाग्राम आश्रमापासून दहा मैल अंतरावरच असल्याने कुष्ठसेवेचं प्रशिक्षण नीट घेता येईल आणि आमची हेळसांडही होणार नाही असा बाबांचा उद्देश होता. मनोहरजींनी सेवाग्राम आश्रमात आमच्यासाठी एका छोटय़ा खोलीची व्यवस्था केली होती. दोन-तीन ट्रंका, वळकटय़ा, स्वयंपाकाची भांडीकुंडी असं सगळं घेऊन आमचं बिऱ्हाड सेवाग्राम आश्रमात दाखल झालं. इंदूची प्रकृती अगदी तोळामासा झाली होती. रात्री तिला खोकल्याची प्रचंड उबळ आली. सकाळी आश्रमाचे व्यवस्थापक बाबांना म्हणाले, ‘तुमच्या पत्नीच्या खोकल्याने, मुलांच्या रडण्याने शेजारच्या खोलीत राहणारे डिस्टर्ब झाले. पहाटेच ते विचारत होते की, शेजारी कोण राहतंय? तुम्ही दत्तपूरला ट्रेनिंगला आला आहात; कायम राहणार नाही, असं मी त्यांना सांगितलं. पण ते ऐकायला तयार नाहीत. म्हणाले, त्यांना ताबडतोब इथनं जायला सांगा.’ बाबा थक्क होत म्हणाले, ‘मनोहरजींनी आमची सोय केली म्हणून आम्ही इथं आलो. आजच्या आज मला दुसरी जागा कशी मिळणार? अन् हे एवढं सामान, आजारी पत्नी, तान्ही मुलं?’ यावर ते व्यवस्थापक म्हणाले, ‘तुमची अडचण मला समजते. पण हे बापूजींचे बडे शिष्य. त्यांना मी काय किंवा मनोहरभाई तरी काय- कोण बोलणार?’ इंदू हळूच पुटपुटली, ‘एकूण बापूंच्या माणुसकीचा स्पर्श त्यांना झालेला दिसत नाही!’ इंदू काय म्हणाली हे नीट ऐकू न आल्यानं व्यवस्थापक म्हणाले, ‘काय म्हणालात?’  इंदू म्हणाली, ‘काही नाही. त्यांना निर्धास्त व्हायला सांगा. आमची सोय आम्ही कुठेतरी करू, नाहीतर धर्मशाळेत राहू.’ व्यवस्थापक निघून जाताच बाबा काळजीने इंदूला म्हणाले, ‘आता काय करायचं? आजच्या राहण्याची सोय कुठे करायची?’ यावर इंदू चिडून उत्तरली, ‘कुठेही जाऊ, पण इथे नको. गांधीवादाचं देशातलं भवितव्य काय राहिलं, ते आज दिसलं.’

नागपूरच्या मातृसेवा संघाच्या संस्थापिका  कमलाताई होस्पेट यांच्या सूतिकागृहाची इमारत वध्र्याला बांधली जात होती हे बाबांना माहिती होतं. तिथे कदाचित खोलीचा एखादा कोपरा मिळू शकेल असं त्यांना वाटलं. बाबा लगेचच तिथे गेले. त्यांना दिसलं- की सूतिकागृहाचा खालचा मजला बराचसा बांधून झाला होता. जमीन सारखी नव्हती, भिंतींना प्लास्टर नव्हतं, पण डोक्यावर छत पडलं होतं. कमलाताईंना पुत्रासमान असलेल्या बाबांना तिथल्या काम करणाऱ्या लोकांनी ओळखलं. बाबांनी आपली अडचण सांगितली आणि राहायला बाहेरच्या खोलीचा एक कोपरा मागितला. बाबांची विनंती त्यांनी आनंदाने मान्य केली. राहायला जागा मिळताच बाबा सेवाग्राम आश्रमात परतले आणि सामान घेऊन आम्ही सर्व या नव्या मुक्कामी पोहोचलो. आम्ही पोहोचेस्तोवर मजुरांनी आजारी इंदू आणि आम्हा दोघांसाठी दोन खाटा घालून ठेवल्या होत्या! बाबांनी बाजारातून एक तंबू आणला आणि खोलीलगतच्या मोकळ्या जागेत उभा केला. खोलीचा तो कोपरा आणि तंबू यांत आमचं बस्तान बसलं. पुढचे दोन महिने वध्र्यावरून दत्तपूरला रोज पायी येणं-जाणं, आमची व स्वत:ची उस्तवारी, दोन्ही वेळचा स्वयंपाक, औषधपाणी.. बाबांच्या असीम श्रमांची ताकद आणि सहनशक्तीची सीमा इंदू पाहत होती. चूल फुंकताना बाबांच्या डोळ्यात पाणी येत होतं. आणि त्यांचे कष्ट पाहून इंदूच्या!

नॉर्वेच्या डॉ. गेर्हार्ड आरमॉर हॅन्सेन यांनी १८७३ साली कुष्ठरोगाला कारणीभूत असणाऱ्या ‘मायक्रोबॅक्टेरियम लेप्री’ या जीवाणूचा शोध लावला आणि या रोगावर औषधोपचार, लस वगैरे शोधण्यासाठी संशोधन सुरू झालं. हा शोध लागण्यापूर्वी कुष्ठरोगाची लागण झालेल्या व्यक्तीविषयी अशी ठाम जागतिक धारणा होती, की पूर्वजन्माचे पातक म्हणूनच याला कुष्ठरोग झाला आहे. आणि त्या पापाची फळं हा या जन्मात भोगतो आहे! कुष्ठरोगाला कारणीभूत जीवाणूचा शोध लागला तरी दुर्दैवाने समाजमनात कुष्ठरुग्णांबद्दल असलेली घृणा, त्यांची होणारी अवहेलना, उपेक्षा मात्र तशीच टिकून होती. त्यामुळे कुष्ठरोगासंबंधी वैद्यकीय दृष्टिकोन महत्त्वाचा होताच; पण मानसिक व सामाजिक दृष्टिकोनातून कुष्ठरोगाचा विचार करणं आणि कृती कार्यक्रम राबवणं हे जास्त आव्हानात्मक आणि अवघड काम आहे, हे बाबांना लक्षात आलं होतं. त्यांनी कुष्ठपीडितांसाठी एक स्वास्थ्य कार्यक्रम तयार केला आणि १९ ऑगस्ट १९४९ रोजी आपल्या काही मित्रांच्या मदतीने ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. कुष्ठपीडितांवर औषधोपचार आणि त्यांचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन हे नव्या संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट ठरलं.

दत्तपूरचं प्रशिक्षण संपल्यानंतरही बराच काळ इंदूच्या तब्येतीला आराम पडला नव्हता. क्षयाची भावना सतत डोकं  वर काढत होती. त्यामुळे छोटय़ा प्रकाशला घेऊन कधी वध्र्याचे कस्तुरबा हॉस्पिटल, कधी नागपूर मेडिकल कॉलेज, हवापालटासाठी कधी पन्हाळगड, तर कधी निसर्गोपचारासाठी पुण्याजवळचे उरळीकांचन अशी तिची फरफट सुरू होती. आणि अशा सगळ्या गोंधळात वरोऱ्याच्या घरी मला सांभाळत बाबांचं कुष्ठकार्य सुरू होतं. महात्मा गांधींचे सामाजिक वारसदार पूज्य अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांचं आम्हा सर्वावर निरलस प्रेम. त्यांनी इंदूच्या आजारपणाच्या काळात पन्हाळगड आणि उरळीकांचनला तिच्या आणि प्रकाशच्या राहण्या-जेवण्याची सोय तर केलीच; शिवाय आजारी प्रकाशचा आईच्या मायेने सांभाळ करत, इंदूच्या साडय़ा आणि प्रकाशचे कपडे धुवत इंदूचा ताण खूपच हलका केला. उरळीकांचनला यथावकाश इंदू आणि प्रकाशची प्रकृती सुधारली आणि ती दोघं वरोऱ्याला परतली.

दत्तपूरला प्रशिक्षण घेत असताना बाबांनी कुष्ठरोगतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. वारदेकर यांची सर्व पुस्तकं वाचून काढली होती. डॉ. वारदेकर नुकतंच परदेशातून या रोगाचं शिक्षण घेऊन आले होते. लवकरच बाबांची त्यांच्याशी चांगली ओळख झाली. दत्तपूरला बाबांची त्यांच्याशी भेट झाली तेव्हा डॉ. वारदेकर बाबांना म्हणाले, ‘दत्तपूरचे रोगी तुमच्यावर खूप खूश आहेत बाबा. तुमच्या स्पर्शात जादू आहे. त्याने त्यांची खचलेली मनं अर्धी बरी होतात.’ ‘याचा अर्थ कुष्ठसेवेसाठी आपल्याला विरळा माणूस मिळालाय!’ मनोहरजींनी मनापासून अभिप्राय दिला. डॉ. वारदेकरांचं मत पडलं, ‘दत्तपूरला जे शिकण्याजोगं होतं ते तुम्ही शिकून घेतलंय. पण केवळ दत्तपूरचा अनुभव पुरेसा नाही. कुष्ठरोगाविषयी सखोल अभ्यास करायचा असेल आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी कलकत्त्यातल्या ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’ या संस्थेत पदविका अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. पण थोडी अडचण आहे. तिथलं शिक्षण अर्थातच फक्त वैद्यकीय पदवीधरांसाठी आहे. आणि तुम्ही पडलात वकील! मग प्रवेश मिळणार तरी कसा?’ पण बाबा मागे हटणं शक्यच नव्हतं. ते उद्गारले, ‘पण माझ्याबाबतीत त्यांना अपवाद करता येईल. कोर्स केल्यावर मला त्याची पाटी थोडीच लावायची आहे?’ त्यावेळी प्रसिद्ध संशोधक आणि कुष्ठरोगतज्ज्ञ डॉ. धमेर्ंद्र या संस्थेचे अधिष्ठाता होते. बाबांच्या बोलण्यातलं तथ्य जरी सर्वाना पटलं असलं तरी ते डॉ. धर्मेद्रना पटवून देण्यासाठी खटपट करणं गरजेचं होतं. शेवटी विनोबाजींच्या विनंतीवरून देशाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसादजी, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर यांनी मध्यस्थी केली आणि बाबांना या संस्थेत प्रवेश मिळाला.

प्रशिक्षण १९५० च्या ऑगस्ट महिन्यात सुरू होणार होतं. अभ्यासक्रमाचा कालावधी दीड-दोन महिन्यांचा होता. इंदू आणि आम्हा दोघांची नागपूरला सोय लावत बाबा कलकत्त्याला स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये दाखल झाले. कुष्ठरोगाविरुद्धच्या र्सवकष लढय़ाची ही सुरुवात होती..

vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2017 1:01 am

Web Title: baba amte work for leprosy patient
Next Stories
1 साक्षात्काराचा क्षण
2 श्रमाश्रम
3 संन्याशाचे लग्न
Just Now!
X