14 August 2020

News Flash

साक्षात्काराचा क्षण

या काळात वरोरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष असलेले बाबा सफाई कामगारांच्या युनियनचे अध्यक्षही होते.

श्रमाश्रमाच्या प्रयोगाचं मूल्यमापन करताना बाबा आमटे म्हणत, ‘‘साहसाशी यशापयशाचे समीकरण जोडणे हे व्यस्त गणित आहे. साहस करायचे म्हटल्यावर यशापयशाची तमा काय? काही पडतील, काही चढतील. हे पडलेले छोटे छोटे प्रयत्न म्हणजे मोठय़ा प्रयत्नांची प्रक्षेपके! प्रत्येक पराभूत परिस्थितीत विजयाचा गर्भ कोठेतरी असतो. असे अपयश म्हणजे सावजावर झडप घेण्यापूर्वी चित्त्याने घेतलेली बारा पावलांची माघारही ठरू शकते.’’

या काळात वरोरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष असलेले बाबा सफाई कामगारांच्या युनियनचे अध्यक्षही होते. एकदा या कामगारांनी आपल्या मागण्या पुढे ठेवत संप पुकारला. वरोरा गावची आबादी वाढली तशी संडासांची संख्या वाढली. काम वाढल्यामुळे वेतनवाढ व्हावी आणि संडास साफ करण्याच्या, मैला डोक्यावरून वाहून नेण्याच्या अत्यंत किळसवाण्या पद्धतीत बदल व्हावा, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. बाबांनी त्यांच्याशी बोलणी सुरू केली. चर्चेच्या ओघात संपकरी बाबांना म्हणाले, ‘‘तुम्हाला कसे कळणार आमचे प्रश्न? आम्हाला दररोज जे घाणेरडं, हीन दर्जाचं काम करावं लागतं, ते तुम्ही करू शकाल? पाऊस पडत असताना डोक्यावरून मैला वाहून नेल्यावरच तुम्हाला आमच्या यातना कळू शकतील.’’ पण मागे हटतील ते बाबा कसले! ते म्हणाले, ‘‘उद्यापासून मी तुमच्याबरोबर संडास सफाईला निघतो. दिवसभरात तुमच्या कामाच्या वेळात किती संडास स्वच्छ होतात हे मी पाहीन. तुमचं म्हणणं वाजवी असेल तर मग मीच तुमच्या बाजूने लढेन. पण तुमचं म्हणणं गैरवाजवी निघालं तर मी तुमच्या लढय़ात राहणार नाही. संप म्हणजे सत्याग्रह. आग्रह धरायचा तो सत्याचा. असत्य गोष्टीचा नव्हे. मी दिवसाचे चाळीस संडास साफ करून दाखवतो.’’ बाबांच्या या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत कामगारांनी आपला संप बिनशर्त मागे घेतला. पुढचे तब्बल नऊ  महिने बाबांनी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळात रोज चाळीस संडास साफ करत डोक्यावरून मैला वाहून नेण्याचं काम केलं आणि सफाई कामगारांना सुयोग्य वेतनवाढही मिळवून दिली.

असेच एके दिवशी मैला वाहून नेण्याच्या कामावरून बाबा घरी परतत होते. मुसळधार पाऊस सुरू होता. खूप अंधारून आलं होतं. रस्त्याच्या कडेला गटारात पडलेल्या एका कापडाच्या ढिगाकडे अचानक बाबांचं लक्ष वेधलं गेलं. त्यात थोडीशी हालचाल जाणवल्यानं बाबांनी जवळ जाऊन पाहिलं आणि ते प्रचंड हादरले! तो ढीग नव्हता; तो एक माणूस होता.. जिवंत! तो थंडीने आणि वेदनेनं थरथरत होता. या प्रसंगाबद्दल बाबा सांगतात, ‘ When I looked closer in the failing light, I saw that it was a man in the ultimate stages of  Leprosy.’ हातापायाची सर्व बोटं झडलेली.. नाकाच्या जागी नुसती भोकं..  कान गळून पडलेले.. अंगभर जखमांमधून अळ्या बाहेर पडत होत्या. तो माणूसच होता; पण माणसाचे अवयव शिल्लक नव्हते. तो गोळा होता हाडामांसाचा!’’ बाबा दचकले. झटकन् दूर झाले. त्यांना दरदरून घाम सुटला. काय करावं सुचेना. मग स्वत:च्या अंगावरचं तरट त्या मरणासन्न महारोग्यावर झाकून बाबा तिथून अक्षरश: पळून गेले.

बाबा घरी आले तरी त्यांचं अंग थरथरतच होतं. बाबांच्या मनात एक प्रचंड मोठं वादळ थैमान घालू लागलं.. ‘‘मन सारखं डिवचत होतं. डोक्यात प्रश्नांची झुंज चालू होती. डोक्यावर मैल्याची घमेली वाहताना घृणा वाटली नाही, ती महारोग्याला पाहून वाटली. का? स्वत:ला तो रोग होईल म्हणून? म्हणजे भीतीलाच भ्यालास तू! स्वत:ला मारे ‘अभयसाधक’ म्हणवून मिरवतोस! चाकू, सुरे, बंदुका, हिंस्र पशू, भुतंखेतं यांची भीती वाटली नाही कधी. तू त्यांच्याशी सामना केलास. एकादश व्रताच्या लंब्याचौडय़ा बाता मारतोस अन् गटारात खितपत पडलेल्या, घायाळ, निरुपद्रवी, देहाची लक्तरं झालेल्या एका रोग्याला तू भ्यालास? त्याला हात लावायचीही हिंमत झाली नाही तुला?’’ बाबांची अवस्था बघून इंदू त्यांच्याकडे  बावरलेल्या नजरेने पाहत होती. बाबा म्हणाले, ‘‘आज माझा पराभव झाला गं इंदू. माझं मन मला धिक्कारतं आहे. गांधींनी महारोग्यांची स्वत: सेवा केली. मी त्यांचा अनुयायी म्हणवतो! आणि ही कायरता? व्रतपालनाचं हे ढोंग! हे सारं पाखंड होतं? त्याच्या अंगावर तरट टाकणं हीसुद्धा माझी फसवी दया होती का?’’ यावर इंदू त्यांना म्हणाली, ‘‘उलट, मला वाटतं, तरट टाकलं त्या क्षणापासून तुमची ‘अभयसाधना’ सुरू झाली.’’

बाबा रात्रभर तळमळत होते. तो हाडामांसाचा गोळा आठवून सारखं दचकून उठत होते. सकाळी इंदू म्हणाली, ‘‘जा पाहून या- काय झालं त्याचं.’’ बाबा डॉक्टर नव्हते. त्यामुळे ज्ञात असलेली जखमांवरील उपचाराची साधनं, अन्न-पाणी आणि चटई घेऊन ते पुन्हा त्या ठिकाणी गेले. झाकलेलं तरट बाजूला करत त्यांनी त्या महारोग्याला उचलून चटईवर ठेवलं. त्याला खाऊ  घातलं. आणि त्याच्या जखमा साफ करण्याचा प्रयत्न केला. त्याचं नाव.. तुळशीराम. मात्र, रोगाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या तुळशीरामनं बाबांच्या हातांवर विसावत देह ठेवला.

तुळशीराम गेला; पण प्रश्नरूपाने तो कितीतरी दिवस बाबांचा पाठलाग करत मनात थैमान घालत राहिला. ‘‘समजा, माझ्या जीवलग इंदूला किंवा आमच्या मुलांना महारोग झाला तर मी भीतीने पळून जाईन का? किंवा मला महारोग झाला तर माझी इंदू मला सोडून जाईल का?’’ पुढे कित्येक दिवस, कित्येक महिने बाबा या यक्षप्रश्नाशी झुंजत होते. अनाकलनीय भीतीनं त्यांना ग्रासून टाकलं होतं. या भीतीवर विजय मिळवण्यासाठी बाबांनी इंदूच्या साक्षीनं स्वत:चं आयुष्य कुष्ठकार्याला वाहून घेण्याचा संकल्प सोडला. बाबा या प्रसंगाबद्दल एकदा म्हणाले होते, ‘‘आकाशात मळभ दाटून आलेलं असतं. ढग गडगडत असतात. प्रचंड विजा चमकत असतात. कधी विजेचा नुसताच कडकडाट ऐकू येतो, तर कधी एखादी वीज शांतपणे नुसतीच चमकून जाते. पण एखादी वीज अशी असते- जी एका क्षणासाठी स्वत:च्या अस्तित्वाने सारा आसमंत लख्ख उजळवून टाकते आणि कानठळ्या बसवणारा कडकडाट करून नाहीशी होते. माझ्या आयुष्यात तुळशीरामच्या रूपाने तो अत्युच्च पराभवाचा क्षण या क्षणिक विजेसारखाच आला. तो एक प्रकाशाचा क्षण पकडण्यासाठी मी माझं पाऊल पुढे टाकलं आणि माझं सारं आयुष्य ॠं’५ंल्ल्र९ी होऊन लख्ख उजळून निघालं. सारं मळभ दूर होऊन एक प्रकाशवाट दिसू लागली.’’

बाबांचं वाचन अफाट असलं तरी ‘कुष्ठरोग’ या विषयाशी त्यांचा दुरान्वयेही संपर्क आला नव्हता. आणि त्यासाठी आवश्यक कोणतं औपचारिक वैद्यकीय ज्ञानही बाबांजवळ नव्हतं. त्यामुळे बाबांनी कुष्ठरोगाविषयी, कुष्ठकार्य करणाऱ्या व्यक्तींविषयी जे जे मिळेल ते वाचायला सुरुवात केली. फादर डेमियनचं चरित्र ते घेऊन आले आणि ते वाचून बाबा झपाटून गेले.

मानवाधिकाराचे गोडवे गाणारे पाश्चिमात्य देश कुष्ठरोग्यांना शतकानुशतकं त्यांच्या समाजापासून, घरापासून, माणसांपासून तोडून, जहाजांमध्ये कोंबून मोलोकाई या निर्मनुष्य मध्य हवाई बेटावर नेऊन सोडून देत असत. अशा तऱ्हेने या देशांनी ‘कुष्ठरोगी’ही संपवला आणि ‘कुष्ठरोग’सुद्धा! हवाई द्वीपसमूहांवर धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी गेलेल्या फादर डेमियन यांच्या हे लक्षात आलं. तो अतिशय निष्ठुर आणि अमानवी प्रकार पाहून त्यांचं हृदय द्रवलं आणि मोलोकाई बेटावर तेथील कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी जाण्याचं त्यांनी मनाशी पक्कं केलं. तिरस्कृत आणि बहिष्कृत कुष्ठरोगी मरणाची वाट पाहत तिथे जीवन कंठत होते. आयुष्यात कसलीच आशा न उरलेले ते अभागी कुष्ठरोगी नैतिकदृष्टय़ा हीन पातळीवर पोहोचलेले होते. सतत नरकयातना भोगणाऱ्या त्या कुष्ठरोग्यांना असे वाटे की, एवीतेवी मरायचेच आहे, तर मग नैतिक बंधनं तरी का बाळगावी? त्यामुळे व्यसनाधीनता, अनीती, स्वैराचार यांना कसलंच बंधन उरलं नव्हतं. मोलोकाई बेटावरील ही माणसं जिवंतपणी नरकयातना भोगत आणि मेल्यावर त्यांची प्रेतं तशीच उघडय़ावर सडत पडलेली असत.

अशा ठिकाणी वयाच्या ३३ व्या वर्षी फादर डेमियन यांनी पाय ठेवला. तेथील कुष्ठरोग्यांच्या सर्वागीण विकासासाठी पावलं टाकायला सुरुवात केली. धीरोदात्तपणे आपलं कार्य चालू ठेवत त्यांनी कुष्ठरोग्यांच्या जीवनात आशा, प्रकाश, उत्साह आणि सामुदायिक जीवनाबद्दल कळकळ निर्माण केली. कुष्ठसेवा करत असताना त्यांना स्वत:ला कुष्ठरोगाची बाधा झाली. मात्र, हाही त्यांनी ईश्वरी प्रसाद मानला आणि आपले सेवाकार्य अधिक जोमानं सुरू ठेवलं. अखेरीस वयाच्या ४९ व्या वर्षी ते ख्रिस्तवासी झाले. नि:स्वार्थ आणि निरपेक्ष मानवसेवेचा आणि त्यातून ईशसेवेचा आदर्श त्यांनी निर्माण केला. कुष्ठरोग्यांकडे बघण्याची जुनी निष्ठुर, अमानवी दृष्टी बदलून त्यांनी कुष्ठकार्याला एक नवा आयाम प्राप्त करून दिला.

हे सारं वाचून बाबांच्या पोटात दडलेली भीतीची गाठ सैल झाली. त्यांना साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. मनातलं प्रश्नचिन्ह सुटलं, उत्तर सापडलं. नवी दिशा मिळाली. कुष्ठसेवेची..! तुळशीराम गेला, पण एक बोट दाखवून गेला. आजवरची ग्रामस्वच्छता, संघटना, हरिजन कार्य.. बाबांना सगळंच दुय्यम, अपुरं वाटू लागलं. तुळशीराम एक नवं आलंबन त्यांच्या जीवनाला देऊन गेला.

तुळशीरामला ज्या क्षणी बाबांनी कवेत घेतलं त्याक्षणी त्यांना जो केवळ मृत्युंजयालाच होतो तो साक्षात्कार झाला. आणि त्या सार्थ आत्मविश्वासातून त्यांचा कलाम उमटला..

‘वाहणाऱ्या प्रवाहात मी आपले बिंदूत्व

झोकून दिले आहे

कडय़ावरून कोसळताना

आता मला कापरे भरत नाही

कारण माझ्यातला सागर सतत

गर्जना करीतच असतो

भरती आणि ओहोटी यांनी तो विचलित होत नाही

कारण भरती ही जर माझी कृती आहे,

तर ओहोटी ही विकृती कशी म्हणता येईल?

भरतीच्या लाटांनी मी जीवनाला आलिंगन देतो

आणि ओहोटीच्या हातांनी त्याचा पदस्पर्श करतो

आणि निबिडातल्या एकांत साधनेत

पूर्ववत गढून जातो.’

विकास आमटे vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2017 3:00 am

Web Title: great social reformer and rural developer baba amte
Next Stories
1 श्रमाश्रम
2 संन्याशाचे लग्न
3 ‘संधी’साधू!
Just Now!
X