१९९३ सालच्या ३० सप्टेंबरला पहाटे ३.५५ वा. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विनाशकारी भूकंप झाला. उस्मानाबाद जिल्ह्यतील उमरगा आणि लातूर जिल्ह्यतील औसा तालुक्यांना या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. या दोन तालुक्यांतील एकूण ५२ गावं उद्ध्वस्त झाली. या भूकंपात अंदाजे १०,००० लोक मृत्युमुखी पडले, तर सुमारे १६,००० लोक जायबंदी झाले. ५३,००० घरं पूर्णत: जमीनदोस्त झाली. आनंदवनात जेव्हा आम्ही या आपत्तीच्या बातम्या ऐकत होतो तेव्हाच एक विचार मनात घोटाळू लागला. हे भूकंपग्रस्त लोक आणि आनंदवनातील कुष्ठरोगी यांच्या परिस्थितीत खूप साम्य होतं. पहिले नैसर्गिक आपत्तीचे (Natural Catastrophe) भक्ष्य होते, तर दुसरे सामाजिक आपत्तीचे. मग विचार आला, की स्वत:ची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्टांच्या बळावर दैन्याच्या छाताडावर घाव घालणारा कुष्ठरोगी या आपत्तीग्रस्त, निष्पाप लोकांसाठी आपला मदतीचा हात देऊ शकेल का? त्यावेळी इंदू आणि बाबा नर्मदातीरी कसरावद येथे होते. मी लगेच तिकडे बाबांच्या भेटीसाठी गेलो आणि माझा विचार त्यांच्यासमोर मांडला. बाबा म्हणाले, ‘‘जेव्हा आपण आनंदवासी उघडय़ावर होतो तेव्हा समाजाने आपल्याला मदतीचा हात दिला. आज समाजाला आपल्या मदतीची गरज आहे, तर आपण गेलंच पाहिजे.’’ मग मी तिकडूनच थेट मुंबईला आणि पुण्याला गेलो. संस्थेशी जोडल्या गेलेल्या सुहृदांची भेट घेतली. या नवीन उपक्रमाची कल्पना त्यांच्यासमोर मांडली आणि पुण्याहून पु. ल. आणि सुनीताबाईंचे आशीर्वाद घेऊन किल्लारीच्या दिशेने निघालो. मराठवाडय़ातील काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन किल्लारी आणि आसपासच्या परिसराची पाहणी केली. परिस्थिती काळीज पिळवटून टाकणारी होती. माझी विचारचक्रं वेगाने फिरत होती. आनंदवनात परत आलो ते एक योजना डोक्यात आखूनच. सर्व कार्यकर्त्यांसमोर परिस्थिती मांडली. भूकंपग्रस्त भागात फिरल्यावर आमच्या लक्षात आलं होतं, की इथली मुख्य गरज आहे ती घरं बांधण्याची. आम्ही आनंदवनात स्वत:च्या विटा पाडून अर्धवर्तुळाकार छत असणारी- म्हणजेच न्युबियन व्हॉल्टची घरं बांधण्यात कधीच तरबेज झालो होतो. मराठवाडय़ात नव्याने घरं बांधताना या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल असं आम्हा सर्वाना वाटलं. चच्रेअंती सगळ्यांचं म्हणणं पडलं, की आपण किल्लारीत जाऊन तिथल्या लोकांना घरं बांधण्याचं प्रशिक्षण द्यावं. मग काय, आम्ही कामाला लागलो. कार्यकर्त्यांची व सामानाची जमवाजमव सुरू झाली.

पण या सगळ्यात एक मोठी अडचण होती. बाबा आणि इंदू कसरावदला होते आणि आता मी या कामासाठी भूकंपग्रस्त भागात जाऊन राहणार होतो; मग आनंदवनातील संस्थात्मक जबाबदारीचं काय करायचं? या विचारात बरीचशी कामं मी हातावेगळी करत होतो. आनंदवनाची पूर्ण जबाबदारी दिलीप हेल्रेकरने पुढाकार घेत स्वीकारली. या सगळ्या संस्थात्मक औपचारिक बाबी संपवायला मला दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागला. मी सोमनाथहून अरुण कदमला बोलावून घेतलं. माझ्यासह आमचे कार्यकत्रे रमेश कोठारे आणि शंभरेक कुष्ठमुक्त सहकारी यांचा ताफा आवश्यक सामानासह (सरपणापासून अन्नधान्यापर्यंत सर्व गोष्टी) जानेवारी महिन्यात किल्लारीत दाखल झाला. या ताफ्यात कोण नव्हतं! गवंडी, सुतार, न्हावी, शिंपी, चर्मकार, स्वयंपाकी, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फॅब्रिकेटर, दवाखान्याचे कंपाऊंडर आणि असे अनेक कार्यकत्रे.

Unseasonal rain in some parts of Nashik district
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट
Washim, Malnourished Children, 11 thousand, Identified, Action Plan, Eradicate, chief executive officer,
धक्कादायक! वाशिम जिल्ह्यात ११ हजार कुपोषित बालके आढळली ; कुपोषण मुक्तीसाठी…
Jagar of Chhatrapati shivaji maharaj in Satara district
सातारा जिल्ह्यात शिवछत्रपतींचा जागर
Resort at Panchgani Khingar
सातारा : पाचगणी खिंगर येथील टेन्ट हाऊस रिसॉर्टवर सातारा पोलिसांचा छापा, बारा बालांसह ४८ जणांवर कारवाई

जगभरातून प्रत्येक स्तरातून विविध प्रकारची मदत या भागात पोहोचत होती. आमचा भलामोठा ताफा पाहून स्थानिक लोक आणि सरकारी यंत्रणा चाटच पडल्या. हातापायाची बोटंही धड नसलेले हे महारोगी इथे काय मदत करणार, अशा नेहमीच्या उपहासात्मक प्रतिक्रियेनं आमचं स्वागत झालं! पण काही खूप चांगले लोकही भेटले. जगदीश पाटील, प्रवीण परदेशी ही भली मंडळी त्यावेळी लातूर जिल्ह्यचा कार्यभार सांभाळत होती. त्यांनी इतर संस्थांप्रमाणे आम्हालाही आमचा डेरा टाकण्यासाठी जागा आणि तंबूंची व्यवस्था केली. पण जिल्हा परिषदेच्या एका सरकारी अधिकाऱ्याने आणि काही ग्रामस्थांनी आक्षेप घेतलाच. भूकंपग्रस्तांसाठी आलेले तंबू महारोग्यांना का दिले? हे त्याचं प्रमुख कारण होतं. हे सगळं शांतपणे पचवत आम्ही कामाला लागलो. २० तंबूंत सारी विभागवार व्यवस्था लावली गेली. अल्पावधीत आमच्या लोकांनी तिथे ‘मिनी आनंदवन’ उभं केलं. आमचे सहकारी बांधव कुष्ठरुग्ण होते, त्यामुळे पिण्याचे पाणी मिळण्याची अडचण निर्माण झाली. लोकांनी हातपंपावर पाणी घेण्यास मज्जाव केला. त्यांचं म्हणणं होतं, की त्यांच्यातले जंतू हातपंपातून पाण्यात उतरतील आणि त्यामुळे आम्हालाही कुष्ठरोग होईल! पण हा प्रश्न सोडवला पुण्याच्या सुधाताई लोढा आणि औरंगाबादच्या संचेती परिवाराने. त्यांनी प्लास्टिकच्या टाक्या देऊ केल्या; ज्यामध्ये आम्ही दहा किलोमीटरवरून ट्रकने पाणी आणून साठवून ठेवू लागलो. या काळात अतुल देऊळगावकर, सदाविजय आर्य, ठकार, राम राठोड प्रभृतींनी आणि ‘मानवलोक’ (अंबाजोगाई) व ‘TISS’ (तुळजापूर) या संस्थांनीही आम्हाला मोलाचं सहकार्य केलं.

आता प्रत्यक्ष कामासाठी आम्ही सज्ज होतो. कमी खर्चात, कमी वेळेत आणि भूकंपाच्या हादऱ्याशी कठोर सामना करू शकेल अशा घरांच्या बांधणीचं आनंदवनात विकसित झालेलं तंत्र या परिसरातील लोकांना आणि सरकारी यंत्रणांना पटवून देणं हे आमच्यासमोरील सर्वात मोठं आणि कठीण आव्हान होतं. आमचे कार्यकत्रे आजूबाजूच्या परिसरात फिरून लोकांशी चर्चा करत होते, त्यांच्या गरजा जाणून घेत होते. भूकंपग्रस्तांना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा इथे सुळसुळाट झाला होता. कोणी घरं बांधून देतंय, कोणी कपडे पुरवतंय, कोणी अन्नपाण्याची सोय करतंय, तर कुणी आणखी काही. मदत आली हे चांगलंच होतं; पण त्या मदतीमुळे लोकांची काम करण्याची इच्छा मारली जात होती. लोक काहीतरी मिळण्याच्या आशेने आमच्या प्रकल्पाला भेट देत; पण कपाळावर आठय़ा घेऊन परत जात. आम्ही भूकंपग्रस्तांशी बोलू लागलो, त्यांना आमच्या घरांचं वैशिष्टय़ समजावून सांगू लागलो. खर्च कमी, मजबुती भक्कम, नैसर्गिक वातानुकूलन, देखभाल-दुरुस्ती जवळपास नाही. आणि मुख्य म्हणजे एक कुटुंब अल्पावधीत स्वत:च स्वत:चं घर बांधू शकेल इतकं सोपं वगरे पटवून देऊ लागलो. आम्ही सगळं प्रशिक्षण देण्याची तयारी दाखवली. सामाजिक भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेले कुष्ठरुग्ण खचून न जाता आनंदवनसारखं आत्मनिर्भर गाव वसवू शकतात, तर आपण सर्व मिळून हे काम सहजपणे करू शकतो, हे लोकांना फोटोग्राफ्सच्या माध्यमातून पटवून द्यायचा प्रयत्न करत होतो. पण काही परिणाम होत नव्हता. त्यावेळी तिथे ‘हुडको’ ही सरकारी यंत्रणासुद्धा कार्यरत होती. त्यांनी आम्हाला बरंच सहकार्य केलं. त्यांनी सुचवलं, की तुम्ही तुमच्या कामाचं एक मॉडेल उभं करा आणि लोकांना प्रशिक्षित करा. आम्ही गाव बांधणारी (Habitat Specialist) माणसं होतो. तीन जिल्ह्यंमध्ये २६ परिपूर्ण कम्युन्स बांधण्याचा अनुभव आमच्या गाठीशी होता. गावाची सभ्यता आणि संस्कृती यांचा अभ्यास करून नवीन वसाहत उभी करणं हा आमच्या अनुभवाचा भाग होता. एखाद्या गावातील घराच्या गरजा काय काय असतात हे आम्हाला खूप चांगलं माहीत होतं. एकदा मॉडेल उभं राहिलं आणि लोकांनी ते प्रत्यक्ष पाहिलं, की त्यांना आपल्या घराचं महत्त्व कळेल याची मला खात्री होती. त्यासाठी आधी बांधकामाकरिता लागणाऱ्या विटा बनवण्यास आम्ही सुरुवात केली. स्थानिक गढीची माती, उपलब्ध रेती आणि केवळ पाच टक्के सिमेंट यांच्या मिश्रणातून बनलेल्या आमच्या विटा इतर कुठल्याही विटांपेक्षा खरंच मजबूत आहेत का, हे (आपटून) बघण्यासाठी गावातील लोक आमच्या प्रकल्पावर येऊ लागले! हळूहळू आमच्या माणसांशी मोकळा संवाद साधू लागले. विटा तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष अर्धवर्तुळाकार छताच्या घराच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात झाली. बघता बघता अपंग-कुष्ठ बांधवांच्या कलाकृतीचा परिचय लोकांना होऊ लागला. आजपर्यंत अशा प्रकारची घरं न पाहिलेल्यांना ही नवी उभारणी चक्रावून टाकणारी होती. आमची घरं मजबूत तर होतीच, पण तिथल्या इतर घरांपेक्षा सुंदर अन् स्वस्तही होती. तसंच घराच्या आवारातच गोठा आणि बायोगॅस प्लँटसुद्धा बांधण्यात आला होता.

त्या जागेवर आम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधली. मधल्या काळात बाबा आणि इंदू कसरावदहून आठशे किलोमीटरचा प्रवास करून किल्लारीत दाखल झाले आणि तीन दिवस आमच्यासोबत राहिले. परिसरात फिरून त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. बाबा खूप हेलावून गेले. ज्या ठिकाणी भूकंपात मृत्यू पावलेल्या लोकांना दहन आणि दफन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी एक रात्र कोणालाही सोबतीला न घेता बाबांनी हट्टाने मुक्काम केला. त्या रात्री अचानक एका पडलेल्या घराच्या आतून बाबांना रडण्याचा आवाज ऐकू आला. म्हणून बाबा त्या घराच्या दिशेने गेले. घरात एक आजीबाई रडत बसली होती. तिला पाहताच बाबांनी ओळखलं, की ती कुष्ठरुग्ण होती. बाबांनी तिची विचारपूस केली तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला घराबाहेर ठेवायचे आणि सगळे घरात असायचे. आता सगळे घराबाहेर आहेत आणि मी एकटीच आत..’’ कुष्ठरुग्णांच्या व्यथा बाबांसाठी नवीन नव्हत्या. आधी रोगाने स्वतच्या माणसांपासून दूर केले आणि आता तर निसर्गानं सगळं कायमचंच संपवून टाकलं. प्रचंड वेदना मनामध्ये दाबून, आम्हाला जिद्द देऊन, आमची पाठ थोपटून बाबा-इंदू परत गेले.

इकडे आमच्या घरांबद्दल परिसरात चर्चा वाढू लागली. मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनीयर डॉ. सी. एम. पंडित आणि आणखी काही कार्यकत्रे किल्लारीत दाखल झाले. त्यांनी आमची घरं पाहिली. इतर तज्ज्ञांनी आमच्या घरांच्या प्रयोगाकडे दुर्लक्ष केलं होतं. पण पंडितकाका मात्र आवर्जून आमच्या साइटवर आले, त्यांनी आमची अर्धवर्तुळाकार छत असलेली घरं पाहिली आणि आमचं तोंडभरून कौतुक केलं. एवढंच नव्हे, तर परिषदेतर्फे पारधेवाडी इथे एक नमुना घर बांधून दाखवण्याचं कामही त्यांनी आम्हाला दिलं. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनाही ही घरं आवडली. त्यांनीही त्यांच्या ‘कोयलावाडी’ या प्रकल्पावर आम्हाला गावाच्या कमानीशेजारी अशी दोन छोटी घरं बांधून दाखवायला सांगितली. आम्ही ती बांधून दिली. आम्ही सगळेच बाबांच्या श्रमिक विद्यापीठातले ‘स्वयंशिक्षा आणि स्वयंप्रज्ञा’ या तत्त्वांनी शिकलेले एकलव्य होतो. करत असलेलं हे काम बघण्यासाठी त्यावेळी त्या भागात काम करत असलेली अनेक तज्ज्ञ मंडळीसुद्धा येत असत. आम्ही तंत्रज्ञान तर वापरत होतो, पण ते त्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगणं मात्र आम्हाला कठीण जात असे. आमची ही अडचण सोडवली माझा सिव्हिल इंजिनीअर असलेला नागपूरचा आत्येभाऊ अविनाश पटवर्धन, त्याचा मित्र अमोल शिंगारे आणि आमचा कार्यकर्ता सपन मुखर्जी यांनी. सगळ्या कामाला तांत्रिकदृष्टय़ा सक्षम बनवण्यासाठी या सगळ्यांनी मोलाचा हातभार लावला.

१९९४ सालची श्रमसंस्कार छावणीही किल्लारी येथे भरवण्यात आली.    देशाच्या विभिन्न भागांतून पाचशेवर युवक-युवतींनी त्यात सक्रिय सहभाग नोंदवला. आनंदवनाचे मित्र आणि स्थानिक आयोजक प्रा. सोमनाथ रोडे, माधव बावगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. पडलेल्या घरांचे ढिगारे आणि त्याखाली अजूनही दबलेली प्रेतं उपसण्याचं अतिशय अवघड आणि मानसिकदृष्टय़ा वेदनादायी काम या शिबिरार्थीनी अव्याहतपणे केलं. या छावणीसाठी ‘ऑक्सफॅम’च्या अनिल शिदोरे यांनी आम्हाला अन्नधान्य आणि इतर साधनसामुग्री घेण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली.

कुठल्याही पुनर्वसन कार्यात ज्या गोष्टी कायम दुर्लक्षिल्या जातात त्याच याही भागात पाहायला मिळाल्या. स्वतचं राहतं घर गमावून बसलेल्या कुटुंबांना तात्पुरत्या १७ बाय १० च्या शेड्स देण्यात आल्या होत्या. सहा महिने उलटून गेले तरी काही कुटुंबं तर अजूनही तंबूतच होती. त्यातच एकीकडे सरकार शेतीची अवजारं, गुरं आणि इतर साधनसामुग्रीचं वाटपही करत होतं. राहायला पुरेशी जागा नसताना हे सगळं ठेवायचं कुठे, हा खूप मोठा प्रश्न होता. त्यामुळे आनंदवनाची ही अतिशय कमी वेळात बांधून होणारी घरं बांधून देण्यात यावी, यासाठी किल्लारीच्या ग्रामसभेनेही आम्हाला आनंदवनाची घरं हवीत असा ठराव पास केला. किल्लारीच्या आसपासच्या ग्रामपंचायतींनीही तसेच ठराव पास केले. पण त्यात एक अडचण होती. किल्लारी भागात नव्याने बांधली जाणारी घरं प्रमाणित करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने आयआयटी, रूरकीला दिलेलं होतं. या संस्थेच्या संबंधित तज्ज्ञांनी आम्हाला कोणत्याही आयआयटीमध्ये ‘Shake Table’वर- म्हणजे एका मोठय़ा हलत्या प्लेटवर आमचं घर बांधून त्याची भूकंपरोधकता सिद्ध करण्याची अट घातली. आमची घरं भूकंपरोधक आहेत याबद्दल मी आश्वस्त होतो. पण आमच्या कुष्ठरुग्ण, अपंग बांधवांना आयआयटीमध्ये घेऊन जात हा सगळा घाट घालणं शक्य नव्हतं. आणि शिक्षणाने डॉक्टर असलेल्या माझा आयआयटीतील ‘तज्ज्ञ’ मंडळींच्या जत्थ्यासमोर टिकाव लागणंही महाकठीण होतं! इकडे किल्लारी परिसरातल्या गावकऱ्यांना आमचीच घरं हवी होती. गावकऱ्यांनी हा विषय खूप लावून धरला. पण या जाचक अटीमुळे आणि सरकारी यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ते काम पुढे नेणं शक्य झालं नाही. शिवाय काही दिवसांतच सरकारी यंत्रणांनी आम्ही बांधलेल्या मॉडेल घरांचं चक्क गोडाऊन करून टाकलं. अखेर काहीसे उदास होऊन आम्ही आनंदवनात परतलो.

परतल्यानंतर काही दिवसांनी मी एका वेगळ्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना भेटायला मुंबईला गेलो होतो. त्यांनी आपणहून किल्लारीतल्या आमच्या घरांचा विषय छेडला आणि ‘मी तीन कोटी रुपये मंजूर करतो, पण किल्लारीतली घरं तुम्हीच बांधा,’ असं ते मला म्हणाले! पण घरं बांधणं आमचं काम नव्हे, याबद्दल माझ्या विचारांत पुरेशी स्पष्टता होती. मी त्यांना म्हटलं, ‘‘आम्ही केवळ घरं बांधणारी नव्हे, तर गावं उभी करणारी माणसं आहोत. आम्ही लोकांना घर बांधण्याचं प्रशिक्षण द्यायला तयार आहोत. त्यांनी ते शिकावं आणि आपली गावं उभी करावीत अशी आमची इच्छा आहे.’’ नंतर माझ्या या प्रस्तावाचं काय झालं, कल्पना नाही. पण किल्लारी आणि परिसरातील गावकऱ्यांना ‘आनंदवन पॅटर्न’ची घरं बांधण्याचं प्रशिक्षण देण्याची संधी काही आम्हाला मिळाली नाही.

एकंदरीत किल्लारी हा आमच्यासाठी एक विलक्षण अनुभव होता. कुष्ठरुग्णांनी आनंदवनाच्या कक्षेबाहेर जाऊन भूकंपग्रस्त बांधवांच्या रास्त पुनर्वसनासाठी तन-मन-धन एकवटून जे प्रयत्न केले होते, त्याची साक्ष देणारी आमची मॉडेल घरं किल्लारी भागात आज २३ वर्षांनंतरही ताठपणे उभी आहेत!

– विकास आमटे

vikasamte@gmail.com