07 March 2021

News Flash

सिस्टर लीला

सिस्टर लीला यांचा आनंदवनातील पहिला मुक्काम दीड- दोन महिन्यांचा होता.

लेप्रसीग्रस्त रुग्णांवर उपचार करताना सिस्टर लीला (डावीकडे) सिस्टर लीला

आनंदवनाच्या कार्यात मोलाचा वाटा उचलणारं आणखी एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व म्हणजे ग्रीसच्या.. सिस्टर लीला. त्यांचं खरं नाव- अ‍ॅव्हरिलिया पापायान्नी. पुढे ‘मदर गॅव्हरिलिया’ या नावानं त्या ओळखल्या जात. त्या ‘किरोपडिस्ट’ (Chiropodist) होत्या. ग्रीसमधलं फिजिओथेरपीचं पारंपरिक शास्त्र ‘Chiropody’ (the treatment of the feet and their ailments) त्या शिकलेल्या होत्या. अथेन्समधील वास्तव्यात भारतातील आध्यात्मिक विचारवंत शिवानंद यांचं पुस्तक सिस्टर लीलांच्या वाचनात आलं आणि त्या वैदिक धर्माकडे आकृष्ट झाल्या. त्या पुस्तकाने त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळालं. त्यांच्या ध्यानात आलं, की एकमेकांशी जोडून घेण्यासाठी भाषेची गरज असतेच असं नाही. त्यापेक्षा एकमेकांबद्दल वाटणारा जिव्हाळा अधिक प्रभावी असतो. इस्रायल, इराक, लेबनॉन, पाकिस्तान असे अनेक देश पार करीत त्या १४ मे १९५५ रोजी भारतात येऊन पोहोचल्या.

१९५४ च्या सुरुवातीला ज्या ‘सव्‍‌र्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’ (SCI) या युरोपस्थित आंतरराष्ट्रीय शांती संघटनेच्या देशोदेशीच्या स्वयंसेवकांचा गट आनंदवनात निवासी शिबिराकरिता दाखल झाला होता, त्या गटाचं नेतृत्व करणाऱ्या स्वित्र्झलडच्या पिअर ऑप्लिगर यांच्याशी सिस्टर लीलांची आधीपासूनच ओळख होती. ऑप्लिगर यांनी त्यांना मद्रासमध्ये आयोजित स्वयंसेवकाच्या मेळाव्यासाठी आमंत्रित केलं. त्या दोन आठवडय़ांच्या मेळाव्यात त्यांची ‘सव्‍‌र्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’च्याच निवासी शिबिराकरिता आनंदवनात आलेले जर्मनीचे आल्फ्रेड नॉस यांच्याशी ओळख झाली. नॉस हे पुढे आजन्म आनंदवनाशी जोडल्या गेलेल्या ‘सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’च्या स्वयंसेवकांपकी एक. आनंदवनाच्या पाठीशी उभं राहणं त्यांना आपली नतिक जबाबदारी वाटे आणि त्यांनी ती अखेपर्यंत पार पाडली.

आल्फ्रेड यांच्या माध्यमातून सिस्टर लीला ३ जानेवारी १९५६ रोजी आनंदवनात येऊन दाखल झाल्या. त्या दिवसाबद्दल त्या लिहितात, ‘ट्रेनने कित्येक तास प्रवास केल्यानंतर मी प्रचंड थकलेली होते. गाडी वरोरा रेल्वे स्टेशनवर पोहोचेस्तोवर रात्र झाली होती. रेल्वे स्टेशन ते आनंदवन हा प्रवास बलगाडीचा होता. बाहेर हाडं गोठवणारी थंडी होती आणि मी फक्त सुती उन्हाळी पोशाख केला होता. माझी थंडीने होणारी थरथर बलगाडी हाकणाऱ्याच्या लक्षात आली असणार. मी बलगाडीत बसले तशी त्याने काहीही न बोलता एक जाड उबदार रजई माझ्या पायांवर पांघरली! थंडीच्या दिवसांत त्याच्या बलगाडीतून प्रवास करणाऱ्या कुष्ठरुग्ण बांधवांसाठीही तो नेहमी हेच करीत असावा! प्रवास करून मी बाबा आमटे यांच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या झोपडीवजा घरात प्रवेश केला आणि माझा शिणवटा कुठल्या कुठे पळून गेला. त्या साध्यासुध्या, घरगुती, उबदार वातावरणात माझ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. तिथे कोणी पुढे होऊन नमस्कार केला नाही की पाश्चात्त्य देशांप्रमाणे हस्तांदोलन करून औपचारिक स्वागतही केलं नाही. मला पाहताच बाबा आमटे आणि सौ. आमटे उठून पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते प्रेमळ हास्य, ती आपुलकी माझ्या हृदयाला स्पर्शून गेली. दुसऱ्या कोणत्याही स्वागतापेक्षा ती भावना खूप काही बोलून गेली.’

आल्या क्षणापासून सिस्टर लीला आनंदवनाच्या झाल्या. आनंदवनातलं कुष्ठरोग्यांच्या ड्रेसिंगचं काम त्यांनी आपणहून अंगावर घेतलं. रोज पहाटे त्या बाबांबरोबर दवाखान्यात जाऊन रुग्णांच्या जखमांवर मलमपट्टी करायच्या. कुष्ठरुग्णांना अन् रात्रंदिवस काम करून थकलेल्या इंदू-बाबांनाही त्या मसाज करून द्यायच्या. त्यांच्या हातात विलक्षण जादू होती. त्या अशा काही मसाज करायच्या, की माणसाच्या साऱ्या वेदना गायब होत. सर्व पेशंटचं ड्रेसिंग संपलं की त्या इंदूला घरकामात मदत करत. घरातील सर्वाचे कपडे रोज धुण्याचं काम त्यांनी आपणहूनच स्वीकारलं. ढीगभर कपडे त्या रोज स्वच्छ धुऊन दुसऱ्या दिवशीच्या वापरासाठी तयार करून ठेवीत असत. मी, प्रकाश आणि नारायण- आम्हा तिघांना त्या ‘सॉक्रेटिस’, ‘प्लेटो’ आणि ‘अ‍ॅरिस्टॉटल’ या नावांनी संबोधत!

सिस्टर लीला यांनी आनंदवनात जे काम हाती घेतलं होतं त्याविषयीचा त्यांचा दृष्टिकोन इतर मिशनऱ्यांपेक्षा फारच वेगळा होता. त्यांनी या गोष्टीचं स्पष्टीकरण अशा पद्धतीनं दिलंय- ‘‘आपण जेव्हा म्हणतो, मी कुष्ठरोग्यांना मदत करणार आहे, तेव्हा आपण खरं तर स्वत:ची फसवणूक करीत असतो. उदाहरणार्थ, आपल्याकडे एक २२ वर्षांची मुलगी येते. तिचा हात रोगामुळे गँगरीनग्रस्त झालेला असतो. तो भाग जर तुम्हाला कापून काढावा लागला, तर कोणी कोणाला मदत केली? धडधडत्या हृदयानं, कापऱ्या हातानं ते काम करणाऱ्या मी त्या गरीब मुलीला मदत केली असं म्हणायचं, की ‘देवाची हीच इच्छा आहे, तेव्हा खुशाल हा भाग कापून काढा,’ असं मलाच धीर देत म्हणणाऱ्या त्या मुलीनं मला मदत केली? या क्षणी नक्की कोण कोणाच्या मदतीला धावून आलं?’’

सिस्टर लीला यांचा आनंदवनातील पहिला मुक्काम दीड- दोन महिन्यांचा होता. त्यांनी आपल्या घरी लिहिलेल्या पत्रांमधून आनंदवनातील सुरुवातीच्या खडतर काळाचं वर्णन केलं आहे..

‘मी इथे कुष्ठरुग्णांची भाषा बोलू शकत नाही, पण त्यांना त्याचं काही वाटत नसावं. त्याचं कारण असं की, कुष्ठरोगामुळे समाजात अस्पृश्य ठरलेल्या या लोकांना मी स्पर्श करते.. रात्रीच्या वेळी जेव्हा मी बायबल वाचीत असते तेव्हा साप, विंचू आणि उंदीर येतात. मग मला वाचन थांबवून त्यांना बाहेर घालवावं लागतं.. मी पहाटे पाचला उठते आणि बरोबर सहा वाजता माझ्या खोलीबाहेर पडते. उगवत्या सूर्याचं स्वागत करण्यासाठी.. मी लिंबूपाणी पिऊन एक केळं खाते.. त्यानंतर कुष्ठरोग्यांच्या जखमांची मलमपट्टी आणि त्यांना मसाज करणं.. त्यानंतर विहिरीवर जाऊन कपडे धुण्यासाठी पाणी शेंदावं लागतं.. दुपारी मी जेवते. मग तीन वाजेपर्यंत मनन, चिंतन, ध्यानधारणा. त्यानंतर त्या दोघा लहान मुलांना (मी आणि प्रकाश) इंग्रजी शिकवायचं (२४ तासांत फक्त याच वेळी मी बोलण्यासाठी तोंड उघडते).. मग दोन तास डेअरीमध्ये जाऊन शांतपणे काम करायचं.. सूर्यास्ताचा काळ ईश्वराच्या सान्निध्यात घालवायचा.. मग थोडय़ा वेळानं चंद्रोदय होतो. त्यानंतर स्वत:च्या खोलीत परत येते.. रात्रीचं हलकं जेवण आणि बायबलचं वाचन.. साडेआठ ते साडेनऊ परत ध्यान-चिंतन आणि मग झोप..’

सिस्टर लीला भारतात अनेक ठिकाणी फिरत असत. त्यांचा जनसंपर्क किती दांडगा होता, हे त्यांनी वेळोवेळी बाबांना लिहिलेल्या पत्रांतून दिसून येतं. प्रसिद्ध धर्मोपदेशक बिली ग्रॅहम, स्टॅन्ले जोन्स यांच्या संपर्कात त्या आल्या. त्यावेळी लोकप्रियतेच्या लाटेवर विराजमान झालेले पंतप्रधान पंडित नेहरू आणि त्यांच्या कन्या इंदिरा गांधींशी त्यांचा जवळून संबंध आला. आध्यात्मिक विचारवंत योगी अरिवद यांची पाँडेचरीत त्यांनी भेट घेतली. मद्रासस्थित जगप्रसिद्ध कुष्ठरोगतज्ज्ञ डॉ. पॉल ब्रॅण्ड यांच्याशी त्या संपर्कात असत. भारतात त्या विविध आश्रमांमध्ये, सामाजिक कामांच्या ठिकाणी सतत पाच र्वष फिरत होत्या. त्यांच्या दैनंदिनीमध्ये रोज घडलेल्या घटनांची आणि भेटलेल्या असंख्य लोकांची नोंद असे.

महत्त्वाचं म्हणजे त्या भारतात आणि जगभरात जिथे जिथे जात, तिथे तिथे भेटणाऱ्या प्रत्येकाला त्या आनंदवनाशी जोडून घेत असत. प्रत्येकाला आनंदवनाची सविस्तर माहिती सांगून आनंदवनासाठी जमेल ती मदत गोळा करायचा त्यांनी सपाटाच लावला होता. आनंदवनाचं काम पहिल्यांदा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचलं ते सिस्टर लीलांमुळेच! जगभरातील आपल्या संबंधितांशी संपर्क साधून त्यांनी आनंदवनातील कुष्ठरुग्ण बांधवांसाठी औषधं, बॅण्डेजेस आणि इतर जीवनावश्यक सामान मिळत राहील याची व्यवस्था केली.

एकदा सिस्टर लीला दिल्लीत होत्या. तेव्हा त्यांनी आग्रहाने बाबांना पत्र पाठवून इंदिराजींच्या भेटीसाठी बोलावून घेतलं. बाबा त्यांच्या नेहमीच्या वेशात दिल्लीला गेले. टायरच्या चपला, खादीचा कुर्ता-पायजमा, बोट-बोट वाढलेली दाढी असा त्यांचा शेतकऱ्यासारखा अवतार होता. भेटीसाठी जाण्याआधी सिस्टर लीलांनी बाबांसाठी एक सोळा रुपयांचा कोट खरेदी केला. मग एका न्हाव्याच्या दुकानात बाबांना बसवून त्यांची गुळगुळीत दाढी करवून घेतली. थोडेफार भेटण्यायोग्य बनवून मग त्यांनी बाबांना इंदिराजींकडे नेले! इंदिराजींनी अतिशय प्रेमाने बाबांची, आनंदवनाच्या कार्याची विचारपूस केली. भेट संपल्यावर बाबांना सोडायला त्या गाडीपर्यंत आल्या. मग सिस्टर लीलांनी इंदूला दिल्लीहून तार केली- ‘Baba has made the Conquest of Indiraji…!’

अनोखं व्यक्तिमत्त्व होतं सिस्टर लीला. त्या जेव्हा आनंदवनात दाखल झाल्या तेव्हा त्यांचं वय साठीच्या जवळ झुकलेलं होतं. इतरांना मदत करण्याच्या त्यांच्या कृतीत जो एक प्रकारचा सहजसुंदर ताजेपणा होता, तो विलोभनीय होता. परमेश्वर सर्वत्र आहे, परमेश्वराने आपल्याला आपापल्या कुवतीप्रमाणे आयुष्य बहाल केलं आहे, आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्याला शिक्षण दिलं आहे, आणि आपल्या संकटात तो आपल्याला योग्य ते मार्गदर्शनही करतो- यावर त्यांची गाढ श्रद्धा होती. त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक निरागस, मोहक हास्य विलसत असे. आपल्या याच अकृत्रिम हास्याने त्यांनी माणसामाणसांतील कृत्रिम बंधनं सहज नाहीशी केली आणि थेट हृदयाशी संबंध जोडला. ग्रीससारख्या लांबच्या देशातून आलेल्या या स्त्रीचं हृदय आनंदवनासारख्या दूरवरच्या ठिकाणी राहणाऱ्या कुष्ठरोग्यांसाठी एवढं का हेलावलं जात असेल याचा शोध अनेक जण घेत. त्यांना आढळून येई, की लीलांचं मनस्वीपण व अश्रू हे त्यांच्या हृदयात असलेली अपरंपार अनुकंपा इतरांपर्यंत पोहोचविण्याचं सर्वात प्रभावी साधन होतं. कारण शब्दांपेक्षाही सच्चे अश्रू बरंच काही व्यक्त करून जातात आणि शब्दांविना मनातलं सर्व काही व्यक्त करतात. रोग्यांची शुश्रूषा करताना स्मितहास्य आणि अश्रूंबरोबरच सिस्टर लीला स्पर्शाचा उपयोग करीत असत. कुष्ठरोगाने पीडित असलेल्यांना रक्तामांसाचे नातेवाईकसुद्धा निर्दयपणे घराबाहेर काढीत. एका स्पर्शासाठी- स्पर्शातील आपुलकीसाठी आसुसलेल्या त्या कुष्ठपीडितांसाठी सिस्टर लीलांनी आपले दोन्ही हात जणू बहाल केले होते. आणखी एक अत्यंत प्रभावी गोष्ट लीलांजवळ होती, ती म्हणजे प्रार्थना! कुष्ठरुग्णांच्या शय्येशेजारी बसून त्या रुग्ण बरा होण्यासाठी परमेश्वराची मनोभावे करुणा भाकत. त्यावेळी त्या आसपासचं भान हरपून परमेश्वराशी एकरूप होत असत. आपण केलेल्या मदतीबद्दल सिस्टर लीलांनी कधीही समोरच्या व्यक्तीकडून कृतज्ञतेची अपेक्षा धरली नाही. आपण आपलं कार्य करीत राहणं हाच खरा धर्म आहे आणि सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपणच कृतज्ञ असणं महत्त्वाचं आहे असं त्या मानत. सत्कार्य करण्याची एकही संधी त्यांनी दवडली नाही. आनंदवन परिवाराशी त्यांनी जे एक वेगळं मत्र जोडलं, जोपासलं, ते त्यांच्या मृत्यूनंतरही तितकंच जिवंत आहे!

विकास आमटे – vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 1:26 am

Web Title: sister leela from greece served leprosy patients with baba amte in anandwan
Next Stories
1 शेतकरी बाबा आमटे!
2 बालपणीच्या अंतरंगात..
3 सामाजिक बदलाची नांदी
Just Now!
X