News Flash

इतिहास रचणारे उद्योग!

माझ्यावर लेप्रसी हॉस्पिटलचा सगळा भार होता तरी माझ्यातला मूळ इंजिनीअर मला स्वस्थ बसू देत नव्हता.

सुधाकर कडू , ट्रायसिकलवर अब्दुल करीम

आनंदवनात दाखल होणाऱ्या कुष्ठरुग्ण बांधवांमधला समान धागा म्हणजे सामाजिक बहिष्कार आणि कौटुंबिक उपेक्षेचा बसलेला जबरदस्त धक्का. या जखमा त्यांच्या शारीरिक जखमांपेक्षा गहिऱ्या असत. शरीराने आणि मनाने ध्वस्त झालेल्या कुष्ठरुग्णांच्या सुप्त क्षमतांना जागृत करून त्यांना नवनिर्मितीचा ध्यास लावणे आणि त्यांना एका किमान मूलभूत पातळीपर्यंत आणणे, या उद्देशाने बाबा आमटेंनी आनंदवनात मेटल फॅब्रिकेशन, अंबर चरखा, मुद्रण, सुतारकाम, लोहारकाम, केनिंग, हातमाग, इलेक्ट्रिकल फिटिंग, प्लम्बिंग अशा विविध उद्योग आणि सेवांची पायाभरणी केली. आनंदवनात कुष्ठरुग्ण नव्हे तर शेतकरी, लोहार, सुतार, चर्मकार, विणकर राहतात, असं ते कायम म्हणत. आपल्याला कुष्ठरोग झाला होता हे कुष्ठरुग्णांनी विसरून जात Jack of All trades, Master of Some व्हावं, अशी त्यांची तळमळ होती. बाबांनी कुष्ठरुग्णांना ‘रुग्ण’ म्हणून कधीच संबोधलं नाही. यातून कुष्ठरुग्णांच्या भंगलेल्या मनांची पडीत जमीन नांगरली गेलीच; त्याचबरोबर आनंदवनाच्या वार्षिक उत्पन्नातही उद्योगांच्या माध्यमातून मोठी भर पडू लागली.

माझ्यावर लेप्रसी हॉस्पिटलचा सगळा भार होता तरी माझ्यातला मूळ इंजिनीअर मला स्वस्थ बसू देत नव्हता. शिवाय शेती, पाणी, उद्योग, यंत्रं, पर्यावरण, घरबांधणी या क्षेत्रांत रस असल्याने आनंदवनाच्या मोकळ्या आकाशात माझे प्रयोग सुरू झाले होते. सुरुवातीला हे सर्व बाबांच्या नजरेआड चालत असे. कारण ‘तू डॉक्टर आहेस तर तेवढंच काम कर. बाकी ठिकाणी कारभार करू नकोस..’ अशी स्पष्ट ताकीद ते मला वारंवार देत. बाबांचं गुप्तहेर खातंही एवढं भक्कम होतं, की मी केलेले उद्योग त्यांच्या कानावर पडतच आणि मग ओरडा खावा लागे. एकूणच काय, तर प्रयोगांसाठी भांडवलाची उपलब्धता शून्य! त्यामुळे अर्थातच मुंगी होऊन साखर खात, तुटपुंज्या साधनसामग्रीच्या आधारे माझे प्रयोग सुरू होते. हॉस्पिटलमधलं काम आटोपलं की माझा मुक्काम थेट मेटल फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये हलत असे. या विषयातली निरनिराळी पुस्तकं वाचून मी आणि आमचा चीफ मेकॅनिकल इंजिनीअर कुष्ठमुक्त गिरीधर राऊतचे प्रयोग सुरू असत. भंगारातल्या सामानातून फोल्डिंग ऑपरेशन टेबल, पलंग, सलाइन स्टँड, ड्रेसिंग ट्रॉली, व्हीलचेअर, स्ट्रेचर, आलमाऱ्या असं बरंच काही आम्ही बनवत असू. अशा कितीतरी नवनव्या वस्तू आम्ही तयार केल्या आणि त्यातली प्रत्येक आम्हाला अपार आनंदही देऊन गेली. तरी काही वस्तू अशाही होत्या- ज्यांनी आनंदवनाच्या परिप्रेक्ष्यात इतिहास रचला. अर्थात, जरी या वस्तू महत्त्वाच्या; तरी त्याहून अधिक महत्त्वाची- या वस्तूंना जन्माला घालणारी माणसं! त्यामुळे वस्तूच्या निर्मितीविषयी जाणून घेताना वस्तूच्या जन्मदात्या व्यक्तीबद्दल, तिच्या संघर्षांबद्दल जाणून घेणं गरजेचं ठरतं.

पहिली वस्तू म्हणजे अपंगांसाठीची तीन-चाकी सायकल वा ट्रायसिकल. त्याकाळी अपंगांचं प्रमुख वाहन व्हीलचेअर हेच होतं. पण Wheelchair is a second handicap! कारण त्यासाठी अपंग व्यक्तीस कुणावर तरी सतत अवलंबून राहावं लागत असे. शिवाय व्हीलचेअरचे Castors, Bearings  ग्रामीण भागात मिळत नसत. ट्रायसिकल्स नव्हत्या असं नाही, पण जी मॉडेल्स उपलब्ध होती त्यात त्रुटींची भरमार असे. शिवाय आकारही अवाढव्य आणि किंमतही. एकूणच अपंगांना अनुकूल तर त्या नव्हत्याच; हाताची बोटं झडलेल्या कुष्ठरुग्णांच्या अपंगत्वास तर त्या पूर्णत: गैरसोयीच्याच होत्या. मी अशीच एकदा भंगारातून एक ट्रायसिकल उचलून आणली आणि गिरीधरला विचारलं, ‘‘अशी ट्रायसिकल आपण बनवू शकू?’’ गिरीधर माझ्यावर वरताण! म्हणाला, ‘‘आपण या ट्रायसिकलपेक्षाही चांगली तयार करू शकतो भाऊ !’’ कुष्ठरुग्ण आणि अपंगांच्या अनुषंगाने या ट्रायसिकलच्या रचनेत मला ज्या काही त्रुटी जाणवत होत्या त्या मी गिरीधरला सांगितल्या. मग काही दिवसांनी त्याने कागदावर एक रेखाकृती काढून आणली. मी त्यात अजून काही बदल सुचवले. मग टीम गिरीधर प्रत्यक्ष कामाला लागली आणि अक्षरश: रात्रीचा दिवस करत ४८ तासांत नवी ट्रायसिकलच त्यांनी तयार केली! माझा हॉस्पिटलमधील अपंग कुष्ठमुक्त सहकारी अब्दुल करीमला मी ती ट्रायसिकल चालवायला दिली. संधीनिकेतनमधल्या एक-दोघा अपंग व्यक्तींनाही ती चालवायला देऊन सगळ्यांचं मत विचारात घेतलं. त्यांच्या सूचनांप्रमाणे रचनेत आणखी काही बदल केले आणि अपंग व्यक्तींची, कुष्ठरुग्णांची स्वावलंबी सवारी- म्हणजेच Local material, Local technique, Local Skill, Local end use  असलेली आमची ‘Made-in-Anandwan  ट्रायसिकल’ तयार झालीसुद्धा! ही पहिली Self-propelling ट्रायसिकल अब्दुल करीमला देण्यात आली. या ट्रायसिकलसाठी आर्थिक सहकार्य केलं ते आनंदवनाचे मुंबईस्थित स्नेही विठ्ठल सरनोबत यांनी. (सरनोबत कुटुंबाचं हे मैत्र विठ्ठल सरनोबत यांचे चिरंजीव मिलिंद सरनोबत यांच्या माध्यमातून आजही कायम आहे.) आणि मग काय, ‘ट्रायसिकल’च्या ‘ट्रायसिकल्स’ झाल्या. ट्रायसिकल्सवर आत्मविश्वासाने सर्वत्र फेरफटका मारणाऱ्या आनंदवनातील अपंग व्यक्ती आणि कुष्ठरुग्णांना बघून होणारा आनंद शब्दातीत होता. महाराष्ट्रातील अपंगांच्या क्षेत्रात आनंदवन-निर्मित ट्रायसिकलने इतिहास रचला असं आम्ही म्हणतो, याचं कारण गेल्या ४४ वर्षांत किमान ४०,००० ट्रायसिकल्स निर्माण करणारं आनंदवन अख्ख्या महाराष्ट्रात अपंगानुकूल ट्रायसिकल्स तयार करणारं एकमेव केंद्र आहे!

तर जशी आमची Made-in-Anandwan ट्रायसिकल’; तशीच दुसरी वस्तू म्हणजे ‘Made-in-Anandwan सतरंजी’.. आणि या सतरंजीचा जनक सुधाकर कडू नावाचा एक कुष्ठमुक्त तरुण. सुधाकरचं मूळ गाव वर्धा जिल्ह्यतलं पवनूर. आई-वडील आणि चार भावंडं असा परिवार. सुधाकर सगळ्यात धाकटा. एक वर्षांचा असताना आई वारली आणि तो आईच्या प्रेमाला अजाणत्या वयातच पारखा झाला. वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि सुधाकरसकट सगळ्या भावांना सावत्र आईचा जाच सुरू झाला. सकाळची शाळा झाली की घरच्या गाई-म्हशींचं दूध काढून विकणं, फुलझाडांची फुलं तोडून घरोघरी पोहोचवणं आणि बदल्यात मिळणारं धान्य घरी घेऊन येणं, वडिलांना शेतातला भाजीपाला विकण्यात सहकार्य करणं अशी सगळी कामं या भावंडांवर पडत. एवढं करूनही सावत्र आईकडून धड जेवण मिळत नसे. लवकरच मोठी भावंडं एकेक करत घर सोडून वेगळी राहू लागली आणि सुधाकर एकटा पडला. त्यात तो चवथीत असताना सावत्र आईला मुलगा झाला आणि मग तिने सुधाकरवर सूडच उगवणं सुरू केलं. वडिलांचं प्रेमही आटलं. अखेर वर्षभरात सुधाकरनेही घर सोडलं आणि पवनूरमध्येच मोठय़ा भावाच्या घरी राहू लागला.

त्याच सुमारास सुधाकरच्या शाळेत डॉक्टरांचं एक तपासणी पथक आलं होतं. तपासणीत त्यांना सुधाकरच्या पाठीवर पांढरे चट्टे आढळले. ते कुष्ठरोगाचे होते. डॉक्टरांनी शिक्षकांना कल्पना दिली. शिक्षक आपापसात कुजबुजू लागले. ती कुजबूज सुधाकरच्या काही वर्गमित्रांच्या कानी पडली आणि सुधाकर घरी पोहोचण्याआधीच त्याच्या वर्गमित्रांकडून ‘सुधाकरला महारोग झाला’ ही दवंडी गावभर पिटून झाली. सुधाकर घरी परतला तेव्हा सारं गाव घराभोवती जमा झालं होतं आणि जणू तो कुणी गुन्हेगार आहे अशा विक्षिप्त नजरांनी त्याच्याकडे बघत होतं. आधी त्याला काही कळेचना. पण जेव्हा त्याला आपल्याला झालेल्या कुष्ठरोगाबाबत कळलं तेव्हा हे तेरावं विघ्न कोसळलेला सुधाकर अक्षरश: सैरभैर झाला. कुष्ठरोगाचे निदान झाल्यानंतर घरच्यांची वागणूक नखशिखांत बदललीच; त्यात वर्गमित्र, नातलग, गावातली माणसं यांच्या तिरस्काराचीही भर पडली. हा ताण अस झाल्याने सुधाकरची मन:स्थिती बिघडली. त्या दिवसांत सुधाकरचा एक चुलतभाऊ  गावात आला होता. त्याने सुधाकरला वध्र्याच्या गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये कुष्ठरोगावर उपचार होतात अशी माहिती दिली. खचलेल्या सुधाकरने चार-पाच दिवसांतच भावाचं घर सोडलं, शाळा सोडली आणि गावही. तो २० किलोमीटर अंतर चालत वध्र्याला आला. हॉस्पिटलमध्ये आठवडाभरचं औषध तर मिळालं; पण राहण्या-जेवणाचा प्रश्न होता आणि खिशात दमडीही नव्हती. मग त्याने वर्तमानपत्रं विकली आणि एका हमालासोबत एका पडक्या खोलीत राहत कसेबसे दोन महिने काढले. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये त्याला जवळच्या दत्तपूर कुष्ठधामाबद्दल माहिती मिळाली आणि तो तिथे दाखल झाला. सुधाकरला शिक्षणाची आस होती. पण दत्तपूरला चौथीपर्यंतच शाळा असल्याने तिथनं सुधाकरला पुढल्या शिक्षणासाठी अमरावतीजवळील तपोवन कुष्ठधामात पाठवलं गेलं. तिथे उपचार घेता घेता सुधाकरने दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंच; सोबत सतरंजी बनवण्याचं अवघड कसबही प्राप्त केलं. दहावीला असताना त्याला आनंदवनाबद्दल माहिती मिळाली आणि आनंदवनात राहून पुढील शिक्षण घेण्याची आणि काम करण्याची आपली इच्छा त्याने पत्राद्वारे माझ्याकडे व्यक्त केली. माझे होकाराचे पत्र मिळताच तो दहावीच्या परीक्षेनंतर १९७४ च्या मार्च महिन्यात आनंदवनात दाखल झाला तो कायमचाच.

१९७५ च्या सुरुवातीला चालू उद्योगांचा विस्तार करण्याचं मी मनावर घेतलं आणि त्यादृष्टीने कार्यकर्त्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. तरुण सुधाकर मला म्हणाला, ‘‘भाऊ , मला सतरंजी करता येते. मला एक संधी द्या. कच्चा माल आणण्यापासून सतरंजी पूर्ण होईपर्यंत मी तपोवनला सगळं शिकलो आहे.’’ मी आनंदाने होकार दिला. अर्थात मी होकार दिला असला तरी तो तात्त्विक होता, कारण बाबांच्या कोर्टात अजून ही केस उभी राहिली नव्हती! सुधाकरकडे कौशल्य असलं तरी बाबांच्या दृष्टीने हा प्रयोगच असणार होता आणि त्यासाठी भांडवलही लागणार होतं. सुधाकरला घेऊन मी बाबांकडे गेलो आणि बाबांना त्याच्या कौशल्याबद्दल कल्पना दिली. बाबा तयार तर झाले, पण सुधाकरला कडक शब्दांत म्हणाले, ‘‘पैसे घेऊन जा सुधाकर, पण सतरंजी झाली पाहिजे. पहिली सतरंजी बघायला मी येईन.’’ सुधाकर सतरंजीला आवश्यक कच्च्या मालाच्या खरेदीसाठी नागपूरला गेला. पण सूत आणि इतर थोडं सामान वगळता सूत गुंडाळण्याच्या कांडय़ा आणि सूत ओढण्याचे पंजे काही त्याला नागपूरच्या बाजारात मिळाले नाहीत. शिवाय सूत मिळालं तेही रंगीत नव्हतं. सुधाकर आणि मी- दोघांचाही हिरमोड झाला. मला काही झोप लागेना. मग आनंदवनातच कांडय़ा आणि पंजे तयार करायचं मी ठरवलं. सुधाकरकडून एका कागदावर कांडी आणि पंज्याची चित्रे काढून घेतली आणि रात्रभर जागून मी लाकडाच्या कांडय़ा तयार केल्या. मग वर्कशॉपमध्ये सूत ओढण्याचे पंजेही तयार केले. सूत-रंगाईचं काम येणारी काही माणसं आनंदवनात होती. त्यांच्या मदतीने बरेच प्रयोग करून अखेर सूतही रंगवून झालं. आणि चार-पाच जणांच्या साथीने सुधाकरचा सतरंजी यज्ञ सुरू झाला. त्याकडे बाबांची करडी नजर होतीच. काही चुका झाल्या, पण त्या सुधारून एक छोटी सतरंजी तयार झाली. बाबांच्या परीक्षेत सुधाकर पास झाला. त्यानंतर सुधाकरने मागे वळून पाहिलं नाही. सतरंजी म्हणजे प्रचंड अंगमेहनतीचं काम आणि सोबतच अचूकपणाही तेवढाच महत्त्वाचा. सुधाकरने पहिली तीन-चार वर्ष स्वत:ला या कामात अक्षरश: गाडून घेत विविध आकारांच्या आणि डिझाइन्सच्या सतरंज्या, आसनं, लांब पट्टय़ा तयार केल्या आणि स्वत:सारखे दहा कारागीरही घडवले. आनंदवन आणि संस्थेच्या इतर प्रकल्पांतील घरं, सभागृहं, भोजनगृहं, शाळा, महाविद्यालयं अशा वास्तू तर या सतरंज्यांनी व्यापल्याच; बाहेरही आनंदवनातील सतरंज्या आणि इतर वस्तूंची मागणी कायम वाढतीच राहिली. (इतकी, की आजही किमान दोन वर्षांचा ऑर्डर बॅकलॉग असतो!) दिवसा सुधाकर केअरटेकर म्हणून आनंद अंध विद्यालयात काम करत असे, तर संध्याकाळी सतरंजी विभागात. अंध विद्यालयात काम करताना सुधाकर अंधांच्या विश्वाशी एवढा समरूप झाला, की सतरंजी विभाग उभा झाल्यानंतर त्याने मुंबईला जाऊन ‘व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड’ येथे वर्षभर प्रशिक्षण घेतलं आणि आनंद अंध विद्यालयात विशेष शिक्षक म्हणून तो रुजू झाला. पुढे सुधाकरने आनंद निकेतन महाविद्यालयात पदवीपर्यंतचं शिक्षणी externally ’’८ पूर्ण केलं आणि मुकुंदराव वैशंपायन अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्यावर सुधाकरने ती जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

सुधाकर कडू काय किंवा गिरीधर राऊत काय, एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगणारी ही माणसं! ‘यांनी किती कामं उभी केली’ हे शोधण्यापेक्षा ‘यांनी काय नाही केलं’ हे खरं तर शोधावं लागेल!

विकास आमटे  vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2017 1:01 am

Web Title: skill training to handicapped and leprosy patient in anandwan village
टॅग : Baba Amte
Next Stories
1 कुष्ठ-मैत्र!
2 संधीनिकेतन ते हिम्मतग्राम
3 पिचलेल्या जीवनाला नवा अर्थ
Just Now!
X