News Flash

घडामोडींचे पन्नाशीचे दशक

‘टिन कॅन प्रोजेक्ट’च्या यशस्वी उभारणीनंतर उद्योगांची शृंखलाच आनंदवनात सुरू झाली.

पन्नाशीच्या दशकातल्या दुसऱ्या टप्प्याचा विचार केला तर आनंदवन आरोग्य क्षेत्रासोबतच शेती, पाणी, डेअरी, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन असे शेतीपूरक उद्योग, घरबांधणी अशा विविध आघाडय़ांवर वेगाने विस्तारू लागलं होतं. विजेविना चाललेला आनंदवनाचा कष्टमय, संघर्षमय प्रवास १९५७ च्या दरम्यान थोडा सुखकर झाला, कारण आनंदवनात वीज आली. (नेमकी त्याच दिवशी आम्हाला अजून एक बहीण मिळाली! म्हणून बाबा-इंदूने तिचं नाव ‘बिजली’ ठेवलं.) आनंदवनाच्या कामाबद्दल लोकांना जसजशी माहिती होऊ  लागली तसतशी येणाऱ्या कुष्ठरुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढू लागली. त्यामुळे अतिरिक्त जागेची निकड बाबा आमटेंना प्रकर्षांने जाणवू लागली. कारण राज्य शासनाकडून आधी मिळालेली शंभर एकर जमीन आता अपुरी पडत होती. बाबांनी शासनदरबारी जागेसाठी प्रयत्न सुरू केले. सुमारे दोन वर्षांच्या खटपटीनंतर महारोगी सेवा समितीला शासनाकडून आधी मिळालेल्या जागेच्याच लगत २५० एकर जागा मंजूर झाली आणि १९५९ च्या फेब्रुवारी महिन्यात या जागेचा प्रत्यक्ष ताबा बाबांना मिळाला. १९५५ ते ६० या काळात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ज्या देशी-विदेशी एजन्सीज्नी आनंदवनाला जमीन, पैसा आणि वस्तूरूपाने मोठी मदत केली त्यांत Swiss Aid Abroad, Switzerland (टीन कॅन प्रोजेक्ट), Committee on Relief and Gift Supplies (CORAGS), USA (गहू, मका, खाद्यतेल), Co-operative for Assistance and Relief Everywhere (CARE), USA (आनंदवनात निवासी कुष्ठरुग्ण व उपचार केंद्रांवरील बाह्य़रुग्णांसाठी मिल्क पावडर, तांदूळ), Central Social Welfare Board, New Delhi (Willys Jeep Truck – आनंदवनातले पहिले वाहन!), Ministry of Health, Govt. of India  (दवाखान्यासाठी वॉर्डस्), Ministry of Revenue, Govt. of Madhya Pradesh (आनंदवनासाठी २५० एकर अतिरिक्त जागा), Ministry of Public Health, Govt. of Madhya Pradesh (कुष्ठरुग्णांसाठी अनुदान), Public Welfare Foundation, USA (ट्रॅक्टर), Food For Peace, Australia (कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनाचा खर्च) यांचा समावेश होता. १९६० च्या अखेरीस आनंदवनातील निवासी कुष्ठरुग्णांची संख्या ४०० वर पोहोचली होती. आनंदवनात कुष्ठरुग्णांच्या आरोग्य आणि निवासविषयक गरजांसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात होत्या. यात नवे वॉर्डस्, रस्ते, निवासस्थानं इत्यादींचा समावेश होता. शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोडाऊन्स बांधली जात होती. नव्या इमारतीमुळे डेअरी विस्तारू लागली होती.

पन्नासच्या दशकाच्या अखेरीस ‘ट्रेस अँड ट्रीट कॅम्पेन’च्या माध्यमातून बाबांनी आनंदवनापासून पन्नास मैल परिघात वरोरा, भद्रावती, आनंदवन सल्फोन उपचार केंद्र, आनंदवन हिडनो-सल्फोन उपचार केंद्र, खडसंगी, चांदा, खांबाडा (जि. चांदा), वणी (जि. यवतमाळ), अशोकवन (जि. नागपूर), समुद्रपूर (जि. वर्धा) अशी दहा कुष्ठरोग निदान व उपचार केंद्रे सुरू केली. यामुळे राज्य सरकारमार्फत र. ए. ळ.(सव्‍‌र्हे, एज्युकेशन, ट्रीटमेंट) या कार्यपद्धतीने राबविल्या जाणाऱ्या कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमासही आनंदवनाची मोलाची मदत होत होती. कॅलेंडर वर्ष १९६० मध्ये ५३,४८९ रुग्णांना या उपचार केंद्रांच्या बाह्य़रुग्ण विभागातून उपचारांचा लाभ मिळाला. तर नंतरच्या दोन वर्षांत या केंद्रांमधून अनुक्रमे ५८,०७१ आणि ५४,६८३ रुग्णांवर उपचार करण्यात आले! ‘ट्रेस अँड ट्रीट कँपेन’ १९६५ पर्यंत अखंड सुरू होतं. पुढे जसं महाराष्ट्र राज्य शासनाकडून कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवणं सुरू झालं, त्यासाठी नव्या कर्मचारीवर्गाची नेमणूक झाली तसं बाबांनी इतर गावांमधली केंद्रं शासनाकडे हस्तांतरित केली.

‘टिन कॅन प्रोजेक्ट’च्या यशस्वी उभारणीनंतर उद्योगांची शृंखलाच आनंदवनात सुरू झाली. असं असलं तरी एक उद्योग असाही होता- ज्याची कहाणी जरा निराळी आणि ‘ज्वलंत’ आहे! ‘टिन कॅन प्रोजेक्ट’च्या थोडं आधी सुरू झालेला पन्नासच्या दशकातील एक महत्त्वाचा उद्योग म्हणजे ‘सूतकताई आणि अंबर चरखा.’ जे कुष्ठरुग्ण जखमांमुळे वा अन्य अपंगत्वामुळे शारीरिक श्रम करण्यास असमर्थ आहेत अशांसाठी हा उद्योग आनंदवनात सुरू झाला. १९५८ च्या सुरुवातीला १०-१५ अंबर चरख्यांपासून सुरू झालेला हा उद्योग पुढे शंभर चरख्यांपर्यंत विस्तारला. शिवाय आनंदवनात घरोघरी छोटे किसान चरखेही होते. फावल्या वेळात कुष्ठरुग्ण त्यावर सूत कातत असत- ज्याचं अधिकचं उत्पन्न त्यांना मिळत असे. सुरुवातीला सेवाग्राम आश्रमातून पेळू यायचे आणि त्याचं सूत कातून सुताच्या गुंडय़ांच्या रूपात ते परत पाठवलं जायचं. नंतर जसजसा आनंदवनात कापूस पिकू लागला तसं इथेच पेळू तयार करून सूत कातायला सुरुवात झाली. सूत जोडताना काही माणसं थोडी थुंकी लावत. त्यामुळे त्यावेळी सेवाग्राम आश्रमातल्या कुणीतरी खुसपट काढलं, ‘‘कुष्ठरोग्यांची लाळ लागलेल्या सुतामुळे रोग पसरू शकतो. त्यामुळे तुम्ही हे सूत र्निजतूक (Sterilize) करून पाठवा.’’ गांधीजी आणि विनोबाजींच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांचे कुष्ठरुग्णांबद्दलचे असे उद्गार ऐकून बाबांना प्रचंड धक्का बसला. ते म्हणाले, ‘‘मी आनंदवनाचं काम सुरू केलं ते कुष्ठरोग कमी करायला की पसरवायला?’’ त्यांनी उद्वेगाने आनंदवनातल्या सर्वच्या सर्व अंबर चरख्यांची चक्क होळीच करून टाकली! त्यानंतर ते काम बंद पडलं ते कायमचंच. यात अभिमानाची गोष्ट अशी की, आनंदवनात शेवटचं सूत कातलं गेलं तेव्हा आनंदवनातून सुताच्या तब्बल ३ लाख ३३ हजार ३३३ गुंडय़ा पाठवल्या गेल्या होत्या! ते साल असेल १९६५. एकूणच ‘मनाचा महारोग’ दुरूस्त करण्यासाठीचा संघर्ष किती मोठा आणि अवघड आहे याचा प्रत्यय बाबांना पदोपदी येत होता तो असा! असं असलं तरी तोपर्यंत इतर अनेक रोजगाराभिमुख उपक्रमांनी आनंदवनात बाळसं धरलेलं होतं.

सिस्टर लीलांनी विविध क्षेत्रांतील जी व्यक्तिमत्त्वं आनंदवनाशी जोडली त्यात स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्यां आणि पंडित नेहरूंच्या सहकारी फ्रेडा बेदी यांचाही समावेश होता. चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांच्या आई हीसुद्धा त्यांची अजून एक ओळख! १९५३ साली केंद्र सरकारने शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘सरकारी संसाधने आणि सामाजिक क्षेत्र यांमधील दुवा’ म्हणून Central Social Welfare Board ची स्थापना केली. या बोर्डामार्फत Social Welfare नावाचं मासिक प्रकाशित होत असे. फ्रेडा बेदी त्याच्या संपादक होत्या. त्यात त्यांनी आनंदवनावर लेख लिहिला होता. १९५८ सालच्या उन्हाळ्यात आनंदवनात जे प्रचंड वादळ झालं (त्याबद्दल मी आधी लिहिलं आहे!) त्यात वाळवीने पोखरल्यामुळे मोडकळीस आलेली आमची झोपडी कोलमडून पडली. त्यामुळे नव्याने झोपडी उभी करावी लागणार होती आणि या गोष्टीला किमान महिनाभर अवधी लागणार होता. हे कळताच फ्रेडा बेदी आणि काही सुहृदांनी ७०० रुपयांचा ‘Amte Family Holiday Fund’ तयार केला आणि बाबा-इंदू, इंदूची बहीण (आमची सुमा मावशी) आणि महादेवभाऊ , मी, प्रकाश, नारायण, रेणुका, बिजली अशा सर्व बच्चे कंपनीला हिमालय- दर्शनासाठी घेऊन गेले. हरिद्वार, हृषिकेशला गंगेच्या किनारी आम्ही धर्मशाळेत मुक्कामी राहिलो. भरपूर भटकलो. तिथून पुढे आम्हाला डेहराडूनचे ‘Doon School’’ दाखवण्यासाठी नेलं गेलं. गेटच्या बाहेर उभं राहून आम्ही ती शाळा पाहत होतो तेव्हा ती शाळा दाखवणाऱ्या अधिकारी महिलेने आम्हा दोघा भावांना सांगितलं की, आता तुम्हाला पुढे याच शाळेत शिकायचं आहे! लांबून संजय आणि राजीव गांधी तिथे खेळताना दिसल्याचं अजून माझ्या स्मरणात आहे. तर भारतातील अशा सगळ्या प्रथितयश लोकांची मुलं ज्या शाळेत शिकतात तिथे आपल्या मुलांना शिक्षण घेता येईल, या कल्पनेने क्षणभर बाबाही भारावून गेले; पण लगेचच सावरलेसुद्धा! त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, ‘‘माझी मुलं सर्वसामान्य मुलांसारखीच शिकतील आणि वाढतील.’’

‘Frozen Shoulder’चं जुनं दुखणं, लग्नापूर्वी झालेला खुनीहल्ला यांमुळे बाबांची दुखण्यांची परंपरा कायम होती. त्यात १९५५ साली भयंकर डोकेदुखीची भर पडली. मस्तकावर घणाचे घाव घातले जात आहेत असं त्यांना वाटायचं. कसलाच आवाज त्यांना सहन होत नसे. वैद्यकीय उपचार थकले तसं बाबांना उरळी कांचनला निसर्गोपचार केंद्रात दाखल करण्यात आलं. पण तिथे दोन महिने राहूनही उतार न पडल्याने ते आनंदवनात परत आले. दूरवर जंगलात अगदी एकांतात त्यांच्यासाठी झोपडी बांधली होती. डोक्याचे पूर्ण मुंडण केले होते. इंदू त्यांच्या डोक्याला गाईचे तूप चोळीत असे. अखेर काही दिवसांनंतर बाबांना नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. नॉशियामुळे त्यांची अन्नावरची वासना उडाली होती. त्यामुळे नऊ  दिवस नाकातून नळ्यांवाटे दूध, फळांचा रस असा आहार सुरू होता. उलटीची उबळ आली की नाकातल्या सगळा नळ्या खाली पडत. दहा दिवसांनंतर त्यांना जरा बरं वाटू लागलं. दोन आठवडय़ांचा नागपूर मेडिकल कॉलेजचा मुक्काम संपवून इंदू-बाबा आनंदवनात परतले. पण या डोकेदुखीने बाबांची साथ केली ती अखेपर्यंत. मला आठवतं, आम्हा मुलांना बाबा केसांना धरून लोंबकळायला लावत, एवढी प्रचंड डोकेदुखी त्यांना होती. यासोबतच दातखीळ बसणे, नाडी मंद होणे व त्यामुळे बेशुद्ध पडणे- अशी एक ना अनेक जीवघेणी दुखणी बाबांचा पिच्छा पुरवत होती. या प्रत्येक दुखण्यात बाबांवर उपचार करण्यासाठी धावून येणारी पहिली व्यक्ती म्हणजे डॉ. संतदास सैनानी. डॉ. सैनानी वरोऱ्याच्या सरकारी रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून बदलीवर आले, ते साल असेल १९५७-५८. आनंदवन, तसंच कुष्ठसेवेत कार्यरत इतर निवासी संस्थांमधील कुष्ठरुग्णांना होणाऱ्या इतर आजारांवर उपचार करण्यासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयातील मेडिकल ऑफिसरने आठवडय़ातून एकदा भेट द्यावी, असा शासन निर्णय जारी झाला होता. त्या अनुषंगाने डॉ. सैनानी आनंदवनात येत असत. हा प्रवास ते रेंगीने आणि पुढे सायकल रिक्षाने करत. शिवाय जेव्हा जेव्हा बाबांची प्रकृती खालावत असे तेव्हा तेव्हा डॉ. सैनानी अगदी रात्रीबेरात्री कधीही बैलगाडीने येऊन बाबांवर उपचार करत. नंतर ते वरोरा येथेच स्थायिक झाले आणि आमचे फॅमिली डॉक्टर झाले. महत्त्वाचं म्हणजे आनंदवनातले कुष्ठरुग्ण असोत, कार्यकर्ते असोत वा विद्यार्थी; डॉ. सैनानी यांनी या कुणाकडूनही उपचारांसाठी एक पैसाही कधी घेतला नाही! त्यांचं मैत्र आनंदवनाशी आजन्म राहिलं.

१९५० ते ६० चं हे दशक विविधांगी घटनांनी, प्रसंगांनी भरलेलं. आनंदवन आता दहा वर्षांचं झालं. नव्या वाटा, नवी वळणं, नवी आव्हानं घेऊन साठीच्या दशकाचा सूर्योदय झाला..

vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2017 2:10 am

Web Title: vikas amte article in lokrang
Next Stories
1 अशोकवनाची स्थापना
2 आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल..
3 सिस्टर लीला
Just Now!
X