News Flash

पगडंडी

स्वावलंबनाच्या ओढीने शकुंतला आनंदवनात आली आणि एका आगळ्यावेगळ्या अर्थाने ‘पद’सिद्ध कलाकार बनली!

‘पद’सिद्ध कलाकार शकुंतला आणि तिची कलाकारी.. 

या लेखमालेतील ‘थांबला न सूर्य कधी..’ या पहिल्या लेखात मी म्हटलं होतं, ‘आनंदवन ही एक ‘प्रवृत्ती’ आहे; आयुष्यातला प्रत्येक क्षण कारणी लागावा आणि केलेला निर्धार पूर्ण व्हावा, ही अस्वस्थता जपणारी प्रवृत्ती! बाबा आणि साधनाताईंना येऊन मिळालेले शेकडो-हजारो जिवाभावाचे कार्यकत्रे, आनंदवनाच्या कार्यात सद्भावनेच्या रूपाने सहभागी असलेले लक्षावधी ज्ञात-अज्ञात लोक या सर्वामध्ये ही प्रवृत्ती भिनली आणि एका सुगंधाप्रमाणे पसरत गेली.’ प्रवृत्तीला स्थल-कालाच्या मर्यादा नसतात; आणि भूत-वर्तमान-भविष्य अशी बंधनंही! त्यामुळे आनंदवन म्हटलं, की बाबा-इंदू आले, आनंदवनासकट महारोगी सेवा समितीचे सगळे प्रकल्प आणि तिथली सारी माणसं आली, इथल्या मातीत जन्मलेली विविध अभियानं, चळवळी आल्या, बाबांमुळे-आनंदवनामुळे प्रेरित होऊन देशभरात निर्माण झालेल्या संस्थांचं जाळं आलं; आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्रवृत्ती भिनलेली देशविदेशातील लाखो माणसं आली.

‘प्रगती’ हा शब्द उच्चारताच आधी डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या गगनचुंबी इमारती, मॉल्स, गुळगुळीत रस्ते, मोठमोठाले कारखाने, इत्यादी गोष्टी. पण ही प्रगती ज्याच्यासाठी- तो सामान्य माणूसच या प्रगतीच्या ओझ्याखाली दबून जातो. याच्या विपरित आनंदवन प्रवृत्तीच्या विकासाच्या टप्प्यांचा क्रम- आधी माणूस, मग समूह आणि शेवटी प्रदेश असा आहे. लोकसशक्तीकरणाच्या माध्यमातून नवनवी क्षितिजं लांघूनही आनंदवन आपले पाय मातीत घट्ट रोवून उभं आहे. याचं कारण ‘माणसातली गुंतवणूक’! बाबा आमटे म्हणतच, ‘आनंदवनाचा खरा पाया म्हणजे इथली माणसं. धान्याच्या राशी किंवा नव्या इमारती ही तर केवळ By-products!’ समाजाने नाकारलेल्या या माणसांनी आपल्या अपुऱ्या शारीरिक क्षमता ताणून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आनंदवनाचा ताणाबाणा समर्थपणे विणला. आनंदवनाने प्रस्थापित व्यवस्थेला नावं ठेवण्यात कधीच वेळ खर्ची घातला नाही, किंवा कधी तिच्याशी स्पर्धाही करू पाहिली नाही. स्वत:ची एक वेगळी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था आनंदवनाने निर्माण केली. सामाजिक न्यायासाठी घोषणा देण्यापेक्षा सर्वाना भावणारी ‘भुकेची भाषा’ आनंदवनाने आत्मसात केली आणि वापरात आणली. दु:खाला कूळ, जातपात, धर्म, पंथ असं काहीही नसतं, हा विचार रुजवत वेदनेच्या नात्याने माणसांना आपलंसं केलं. आंतरजातीय विवाहाप्रमाणे आंतरअपंगत्व विवाहाची संकल्पना आनंदवनाने मांडली आणि आचरलीही! ‘आनंदवनात बघण्यासारखं काय काय आहे?’ असा प्रश्न आनंदवनास प्रथम भेट देणारी बहुतेक मंडळी विचारतात. त्यांना मी हेच सांगतो, की आनंदवन ही ‘बघण्याची जागा’ नसून ‘अनुभवण्याची प्रवृत्ती’ आहे.

या आनंदवन प्रवृत्तीच्या सद्य:स्थितीवर आपण दृष्टीक्षेप टाकू या..

२००० साली आनंदवनाची सरकारदरबारी ‘रेव्हेन्यू व्हिलेज’ म्हणून नोंद झाली आणि आनंदवनाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. ‘स्वयंसेवी संस्था’पण तीच आणि ‘ग्रामपंचायत’ही तीच अशी ‘युनिक’ नोंद असलेलं आनंदवन हे आपल्या देशातलं एकमेव गाव आहे! ६३१ एकर जागेवर विस्तारलेल्या आनंदवनाची निवासी लोकसंख्या २५०० च्या घरात आहे. याशिवाय दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष शाळा, प्रशिक्षण केंद्र, ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेलं विज्ञान- कला- वाणिज्य महाविद्यालय, कृषी तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय यांतील विद्यार्थी-प्रशिक्षणार्थी, आनंदवनातील डेअरी- पोल्ट्री प्रॉडक्टस्, फळझाडं-फुलझाडांची रोपं, आनंदवन जनरल वर्कशॉपमध्ये तयार होणारे पलंग, कपाटं, ट्रायसिकल्स; शिवाय आनंदवन प्रदर्शनी व विक्री केंद्रातील टॉवेल्स, आसनं, सतरंज्या, शुभेच्छा करड इत्यादी खरेदीसाठी आणि बँक, पोस्ट ऑफिसातील कामासाठी बाहेरून येणारी माणसं, आठवडी बाजारात येणारे ग्रामस्थ, आनंदवनला भेट द्यायला देशविदेशातून आलेली पाहुणेमंडळी.. अशा चार-पाच हजार मंडळींचाही आनंदवनात रोजचा राबता असतो. आनंदवनात आलात तर तुम्हाला इथे पाच-दहा हजार लोकांची गजबज नक्कीच दिसेल!

यशाचं मोजमाप करण्याची आनंदवनाची परिमाणंच वेगळी आहेत. आनंदवन किती वंचित घटकांपर्यंत पोहोचलं, या संख्येपेक्षा त्यांच्या आयुष्यात गुणात्मक बदल किती झाला; शेती आणि इतर उद्योगांतून किती कोटींचं वार्षिक उत्पन्न मिळालं, यापेक्षा किती टन तांदूळ, भाजीपाला तयार झाला, किती टन मासे विकले गेले, किती लाख लिटर्स दूध निर्माण झालं, अशी ‘ताकद’ दाखवणारी; ‘तुमची दया नको, समान अवसर द्या’ असं छातीठोकपणे सांगणारी ही परिमाणं. आनंदवनाचं वेगळेपण म्हणजे हे यश कुटुंबाने, समाजाने आणि कायद्यानेही नाकारलेल्या माणसांचं आहे! ही माणसं भारताच्या ‘सकल राष्ट्रीय उत्पन्ना’मध्ये वर्षांनुर्वष भर घालत आहेत. हातापायांची झडलेली बोटं, शरीरावरील जखमा, मनावर मानहानीचे व्रण घेऊन ही माणसं शांतपणे काम करत आत्मनिर्भर तर बनलीच; शिवाय इतर वंचित घटकांच्या वेदनांशी समरस होत त्यांनाही त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं! सामान्य माणसांतील असामान्य शक्तीचे अनेक जिवंत आविष्कार आनंदवनात आजवर सतत घडत राहिले आणि आजही घडत आहेत. लहानपणी ‘कंजनायटल सेरेब्रल पाल्सी’ या दुर्धर रोगामुळे दोन्ही हातांमधली शक्ती कायमची गमावलेल्या शकुंतलेनं पायाच्या बोटांनी सुईत दोरा ओवत साकारलेली सुंदर धागा-शुभेच्छा कार्डे हा असाच एक आविष्कार! स्वावलंबनाच्या ओढीने शकुंतला आनंदवनात आली आणि एका आगळ्यावेगळ्या अर्थाने ‘पद’सिद्ध कलाकार बनली!

आनंदवन पहाटे तीन वाजताच जागं होतं. याची सुरुवात होते डेअरीतल्या गाई-म्हशींचं दूध काढण्याने. मग पहाटे चारपासून आनंदवनातील लेप्रसी हॉस्पिटलमध्ये कुष्ठरुग्णांच्या जखमांची मलमपट्टी सुरू होते. हे काम पहाटे सुरू होतं, कारण माश्या-चिलटांचा प्रादुर्भाव यावेळी नसतो. साडेचार-पाचकडे हळूहळू सगळं आनंदवन जागं होऊ लागतं. मेगा-किचनमध्ये आधी चहा तयार होतो आणि मग स्वयंपाकाची लगबग सुरू झालेली असते. फटफटू लागताच परिसर स्वच्छता, गवत काढणं, बगीचातली कामं सुरू होतात. त्यानंतर साडेसातपासून माणसं शेती आणि इतर उद्योगांच्या ठिकाणी कामाला पोहोचलेली असतात. अंध, कर्णबधिर शाळांच्या हॉस्टेल्समधील, गोकुळातील, संधी-निकेतनमधील आणि कम्यून्समधील मुलामुलींचा किलबिलाट सुरू झालेला असतो. साधारणत: आनंदवनाचं दैनंदिन गतीचक्र सुरू होतं ते असं. त्यानंतर दिवसभर माणसांच्या, जमिनीच्या, गाईगुरांच्या, उद्योगांच्या आणि पर्यावरणाच्या मशागतीचं काम अखंड सुरू असतं. आनंदवनातील शेती विविध प्रकारच्या पिकांनी बहरत असते, तर वनशेती वृक्षांनी आणि बागा फळाफुलांनी बहरत असतात. कुटिरोद्योगांमधून १४० प्रकारची उत्पादनं घेतली जातात. जोडीला विविध सेवाही निर्माण होत असतात. बायोगॅस, सोलर किचन, सांडपाण्यावर मत्स्यशेती, टायरचे बंधारे, प्लॅस्टिकचा पुनर्वापर असे पर्यावरण-स्नेही प्रयोग आनंदवनात सुरू असतात.

नुकताच पन्नाशी गाठलेला आमचा ‘सोमनाथ प्रकल्प’ही यात मागे नाही. गेल्या वर्षी ५५०० क्विंटल धान (तांदूळ) निर्माण करून सोमनाथने आपलाच विक्रम मोडीत काढला आणि ‘कृषीविकासाची पंढरी’ ही आपली ओळख त्याने सार्थ ठरवली! तांदूळ, तेलबिया, कडधान्यं आणि टनावारी भाजीपाला निर्माण करून सोमनाथ महारोगी सेवा समितीच्या सर्व प्रकल्पांची भूक तर भागवतंच; शिवाय अधिकचं शेतीउत्पन्न खुल्या मार्केटमध्ये विकून संस्थेच्या आर्थिक सक्षमीकरणात मोठा हातभारही लावतं. सोमनाथने जशी पन्नाशी गाठली तशी यंदाच्या मे महिन्यात ‘सोमनाथ श्रम-संस्कार छावणी’नेही गाठली! आत्मभानाचे अंकुर रुजवायला ‘स्व’ला प्रवृत्त करणाऱ्या या छावणीने पन्नास वर्षांत हजारो युवामनांतील अस्वस्थतेला रचनात्मक अभिव्यक्ती दिली. ‘देशातील शेती-पाण्याचे अर्थशास्त्र समजण्यासाठी श्रमिकांसोबत घाम गाळून, अंग दुखवून घ्यावंच लागतं’ हा संस्कार छावणीने त्यांच्यात रुजवला. ‘राष्ट्रीय सेवा योजना’ म्हणजे NSS च्या कल्पनेचा उगम छावणीतलाच! आज कालानुरूप छावणीचं रूप-स्वरूप-प्रारूप जरी बदलत असलं तरी श्रमदानात पहारीने दगड खोदताना हाताला पडणाऱ्या घट्टय़ांतून मिळणारा श्रमाचा संस्कार अजूनही कायम आहे.

गडचिरोली जिल्ह्य़ातील ‘लोक-बिरादरी प्रकल्पा’मध्ये आज आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असं नवं हॉस्पिटल माडिया गोंड आदिवासी बांधवांच्या आरोग्यसेवेत कार्यरत आहे. तिथे दर महिन्याला अडीच ते तीन हजार रुग्णांना मोफत उपचार प्रदान करण्यात येतात. अतिदुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचावी म्हणून आदिवासी मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातूनच ‘आरोग्यसेविका’ तयार केल्या जात आहेत. डेअरी, कुक्कुटपालन, बांबूकला यांचं प्रशिक्षण देऊन आदिवासी तरुणांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचं काम सुरू आहे. लोक-बिरादरी प्रकल्प आदिवासी शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी करत आहे. प्रकल्पातील निवासी शाळा-महाविद्यालयासोबतच नेलगुंडा या अतिदुर्गम भागात आदिवासी मुलांसाठी एक नवीन शाळा नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्य़ातल्या मूळगव्हाण गावाजवळील आमच्या ‘सामाजिक कृती आणि पर्यावरण संवर्धन केंद्रा’वर पुढील शैक्षणिक वर्षांपासून ‘कृषी-तंत्रनिकेतन’ (Agricultural Polytechnic) सुरू होत आहे. गेली ११ र्वष कोलाम आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्वागीण शेतीविकासाच्या आमच्या प्रयत्नांना आता आणखी एक नवा आयाम प्राप्त होतो आहे याचं समाधान आहे.

बाबांच्या प्रेरणेतून आजवर अनेक कामं उभी राहिली. त्यातलं एक प्रचंड मोठं काम म्हणजे मध्य प्रदेशातील निमाड प्रांतात कार्यरत असलेली ‘समाज प्रगती सहयोग’ ही स्वयंसेवी संस्था. ‘समाज प्रगती सहयोग’ या नावाचे जनकही बाबाच. भारताच्या योजना आयोगाचे माजी सदस्य डॉ. मिहीर शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९९५ साली ही संस्था सुरू केली. ‘समाज प्रगती सहयोग’ ही संस्था आज शेती, पाणी, रोजगार हमी आणि बचत गट क्षेत्रांत काम करणाऱ्या मोठय़ा संस्थांपकी एक म्हणून ओळखली जाते. ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा’ प्रत्यक्षात येण्यात समाज प्रगती सहयोग संस्थेचा मोलाचा वाटा आहे.

विचारवंतांना ‘टूलबॉक्स’सारखं वापरावं असं माझं मत आहे. जिथं जे हत्यार लागेल ते वापरायचं. आनंदवनात आम्ही तेच केलं. यामुळेच ‘महात्मा गांधींचं स्वयंपूर्ण खेडं’, ‘माओची सामूहिक शेती’, ‘टागोरांची वृक्षिदडी’ आणि ‘साने गुरुजींची आंतरभारती’ इथं एकत्र नांदतात. आनंदवनाची वाढ Organically झाली आहे. एका कामातून दुसरं नसर्गिकपणे जन्माला आलं. आनंदवनाच्या यशाचं गमक हे बाबा आमटेंच्या विज्ञाननिष्ठेतही आहे. मी नेहमी म्हणतो, ‘Baba Amte always insisted upon technology coming to the aid of the disabled so that they could be ‘Equal’ partners. He was not refractory to the use of Science & Technology. He was always ahead of the clock considering other contemporary Gandhian NGOs and other social service institutions. He advocated ‘Optimum’ use of technology, which is otherwise used to Conquer or Eliminate each other. To him, technology could be the best vehicle for the socially retarded groups to rise to Base level.’ मला सातत्याने वाटत असतं, की आनंदवनाची ही प्रयोगशील ओळख समाजापुढे यायला हवी आणि आनंदवनाची ‘स्टेन्सिल’ वापरून इतरत्र स्थानिक परिस्थितीनुसार, उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने प्रयोगांची आखणी व्हायला हवी.

आनंदवन प्रवृत्ती भिनलेली माणसं नेमकी किती? किंवा आजवर आनंदवनाने किती वंचितांच्या आयुष्याला स्पर्शलं? खरं तर याची मोजदाद आम्ही कधी केली नाही किंवा ती करावी असं कधी वाटलंही नाही. अगणितच असावीत. आणि ही प्रवृत्ती फक्त माणसांतच भिनली असं तरी का म्हणावं? या प्रवृत्तीच्या अवकाशाने माणसंच नाही, तर प्राणिमात्र आणि जल- जंगल- जमीन- पर्यावरणालाही व्यापलं! आता हे कसं आणि कुठल्या Social Impact Matrix मध्ये बसवावं? त्यामुळे या प्रवृत्तीची सद्य:स्थिती हीच, की हिचा दरवळ एखाद्या ‘Chain Reaction’ सारखा सर्वत्र पसरतोच आहे. यातनं जो ‘Sense of Contentment’ लाभतो that keeps us going असं मी म्हणेन!

‘ज्वाला आणि फुले’ या बाबांच्या मुक्तशैलीतील चिंतनाच्या प्रस्तावनेत आनंदवन प्रवृत्तीचं समर्पक विवेचन आढळतं. प्रस्तावनाकार ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर लिहितात, ‘बाबांची महाराष्ट्राला, महाराष्ट्राबाहेरच्या भारताला आणि परदेशातल्या मानवताप्रेमी जनतेला जी ओळख आहे, ती एक लोकविलक्षण कारखानदार म्हणून! बाबांच्या या कारखान्यात यंत्रे तयार होत नाहीत, तर काळीज असलेली माणसे निर्माण होतात. इथे नवनव्या औषधांचे उत्पादन आढळणार नाही; फक्त मृतप्राय झालेल्या मनांना संजीवनी देण्याची किमया आढळते. इथे शस्त्रक्रिया होते ती रुग्ण आत्म्यावर. इथे कापड विणले जाते ते माणसाच्या मुर्दाड नग्नतेला आपली लाज राखता येईल अशा प्रकारचे! एकेकाळी महारोगाने ग्रस्त झालेली माणसे धट्टय़ाकट्टय़ा माणसांपेक्षा केवढय़ा आत्मविश्वासाने कामे करतात, ही माणसे नवनव्या कामांचे डोंगर कसे उचलतात, हे सिद्ध करण्याचा हा कारखाना आहे. या कारखान्यात मनुष्याच्या अनुभूतीच्या आणि सहानुभूतीच्या कक्षा रुंदावण्याची प्रक्रिया केली जाते. कोसळणाऱ्या आकाशाचे आव्हान घेऊन क्षितिजावर चमचमणारी नक्षत्रे खुडण्यासाठी दौडत जाणारी तरुण सेना निर्माण व्हावी, हा या कारखान्याचा मुख्य उद्देश आहे. त्याचा पत्ता असतो आज आनंदवन, उद्या सोमनाथ, तर परवा आणखी काही!’

तर- या कारखान्याचे आजवरचे पत्ते आपण जाणून घेतले आहेतच. उद्याचे पत्ते काय असतील, त्याविषयी अंतिम लेखात..

vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2017 3:18 am

Web Title: vikas amte article story self employment to disabled youth story of foot artists shakuntala artist in anandwan
Next Stories
1 प्रभूचे हजारो हात
2 ‘सौभाग्यवती साधना..’
3 अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढय़ इंजिन
Just Now!
X