हिंदू किंवा मुस्लीम धर्मातील कट्टरतावाद स्त्रियांच्या विकासाला मारक आहे. त्यातून समाजाच्या प्रगतीलाही खीळ बसत आहे. म्हणून सामाजिक पातळीवर यात बदल घडणे ही काळाची गरज आहे.

जगात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे माझा परदेश दौरा शासनाने पुढे ढकलला आहे. संपूर्ण जगात कट्टरतावादी मानसिकतेमुळे हत्या करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच झालेली अमजद साबरी या गजल गायकाची हत्या. तत्पूर्वी अफगाणिस्तानात झालेले हल्ले किंवा मलालावरील हल्ला.. या उदाहरणांतून हेच सिद्ध होते की, सर्वत्र कट्टरतावाद बोकाळत आहे. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कर्नाटकात कलबुर्गी यांच्या हत्येमधून असे दिसून येते की, कुठलाही कट्टरवाद उदा. इस्लामिक कट्टरतावाद (फंडामेंटालिझम) किंवा हिंदू कट्टरतावाद हा पुरोगामी विचारांना छेद देणारा आहे. आम्ही करतो तो जेहाद आहे या विचाराने ग्रासलेले लोक किंवा एखादी संघटना जीव घेण्याचे प्रकार करीत असतील तर ते माणुसकीचा खून करतात असे मी मानते. धर्माची शिकवण दहशत पसरवून हल्ले करणे होऊच शकत नाही. परंतु जर कुणी स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलत असतील, धर्मचिकित्सा करीत असतील, शोषण, कट्टरतावाद, जातिप्रथा, भांडवलवादी, साम्राज्यवादी व्यवस्था, पितृसत्ताक व्यवस्था, महिला हिंसा, दलित हिंसा या सगळ्याच्या विरोधात आपल्या अधिकारासाठी संघर्ष करीत असतील, पुरोगामी धर्मनिरपेक्ष विचारांचे असतील तर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विविध प्रकारे केला जातो. मी स्त्रियांविषयीच्या कट्टरतावादी मानसिकतेविषयी सांगणार आहे.

स्त्रियांविषयीची कट्टरतावादी मानसिकता धर्माधतेचा पुरस्कार करणारी व त्यांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करणारी, गदा आणणारी आहे. प्रथा, परंपरा, संस्कृतीच्या नावावर स्त्रियांवर बंधने टाकून पितृसत्ताक व्यवस्था टिकवून ठेवणारी आहे. या विरोधात स्त्रियांना सुरुवातीला मतदानाच्या अधिकारासाठी आंदोलन करावे लागले. त्यानंतर कामगार महिलांना वेतन वाढवणे, कामाचे तास कमी करणे व प्रसूती रजा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. शिक्षणाच्या अधिकारासाठी भांडावे लागले. आमच्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यघटनेमध्येच मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि जेव्हा हिंदू कोड बिलानुसार स्त्रियांसाठी पोटगी, घटस्फोट, संपत्ती अधिकार या स्त्रियांच्या अधिकारासाठी तरतूद केली तेव्हा त्यांना खूप विरोध झाला. आताही ही कट्टरतावादी मानसिकता स्त्री-पुरुष समानतेला, स्त्रियांच्या स्वातंत्र्याला विरोध करताना दिसून येते. हीच मानसिकता सूड घेण्याच्या विचाराने प्रेरित होऊन दुसऱ्या धर्माच्या स्त्रियांवर बलात्कार करते. अनेक बलात्काराच्या घटनेत स्त्रिया सामील असतात व आपल्या धर्मातील पुरुषांना दुसऱ्या धर्मातील स्त्रियांवर बलात्कार करण्यासाठी प्रेरित करतात. अनेक धार्मिक दंगलींमध्ये आम्ही हे अनुभव घेतलेले आहेत. बाबरी मशीद पाडण्यामध्ये मुस्लीम धर्माच्या विरोधात हिंदुत्वाच्या नावावर लोकांना भडकवण्यात आले.

राजस्थान येथील रुपकुँवर नावाच्या विधवेस सती जाण्यास भाग पाडले जाणे व तिच्यासारख्या विधवा झालेल्या स्त्रियांना झोपेच्या गोळ्या देऊन सतीच्या अनिष्ट प्रथेसाठी आजही जिवंत जाळणे ही माणुसकीला काळिमा फासणारी कृती आहे. जेव्हा महिला संघटनांनी याचा विरोध केला, आवाज उठविला तेव्हा स्त्रियांना पुढे करून आपल्या इच्छेने सती जाण्याचा अधिकार आम्हाला मिळावा ही धार्मिक कट्टरतावादाची पितृसत्ताक व्यवस्थेला बळकटी देणारी मागणी केली गेली. गुजरातच्या दंगलीमध्ये मुस्लिमांच्या विरोधात जाळणे, हत्या करणे, बलात्काराचे प्रकार केले गेले व यामध्येही हिंदू स्त्रियांचा वापर केला गेला. धार्मिक कट्टरतावादाचे आणखी एक उदाहरण खैरलांजीच्या घटनेमध्ये दिसून येते. ज्या भोतमांगे कुटुंबाने जातीयवादी परंपरेच्या विरोधात, शोषणाच्या विरोधात आवाज उढविला, उच्च जातीच्या पुरुषांनी स्त्रियांना पुढे करून बलात्कार केला, हत्या केली. तिस्ता सेटलवाड गुजरातच्या दंग्याविरोधात बोलते, अ‍ॅड. सॅलियान मालेगाव स्फोटावर, अ‍ॅड. इंदिरा जयसिंग स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेच्या विरोधात बोलतात तर त्यांना धमक्या दिल्या जातात. अनेक मुस्लीम स्त्रियांना दहशतवादाच्या नावावर मुस्लीम पुरुषासारखे लक्ष्य केले जात आहे, परंतु मुस्लीम मूलतत्त्ववाद वाढत असल्याचे आम्ही विसरू शकत नाही. ज्याचा परिणाम म्हणून मुस्लीम स्त्रियांमध्ये बुरखा घालण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसू येत आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावरील लादल्या जाणाऱ्या बंधनांची पकड आणखी घट्ट होत आहे. त्यातच आपल्या धार्मिक अधिकारासाठी लढणाऱ्या महिला पुढे येत आहेत. तृप्ती देसाई स्त्रियांना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून संघर्ष करीत आहे. तिला कट्टरतावाद्यांनी अनेक प्रकारे विरोध केला आहे. त्याचप्रमाणे हाजीअली दग्र्यात प्रवेश मिळावा म्हणून मुस्लीम स्त्रियाही लढत आहेत.

गंमत अशी की या दरगाह किंवा मंदिराच्या दोन्ही घटनेच्या बाबतीत पितृसत्ताक विचारांचा पुरस्कार करणाऱ्या महिलाच, स्त्रिया अपवित्र असतात म्हणून त्यांना प्रवेश मिळू नये असे बोलतात. काही मुस्लीम स्त्रिया ‘महिला काझी’ होण्यासाठी लढत आहेत. आपल्या धार्मिक अधिकारासाठी आपली शक्ती एकवटून स्त्रिया कितपत स्वातंत्र्य मिळविणार आहेत हा चर्चेचा प्रश्न आहे.

बांगलादेशात इस्लामिक कट्टरतावाद तस्लिमा नसरीनला ठार मारण्याचा फतवा काढतो. खालिदा झियाची हुकूमशाही राजवट फक्त मुजिबूर रहमानची हत्या करीत नाही तर त्याला समर्थन देणाऱ्या १० हजार मुस्लीम स्त्रियांवर बलात्कार तसेच हल्ले करतात. त्याचप्रमाणे ज्या देशांत ही मानसिकता अस्तित्वात आहे ती परंपरावादी विचारांना समर्थन देऊन स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने टाकण्याचे काम करते, प्रसंगी हल्लेही करते.

घराण्याच्या प्रतिष्ठेच्या नावावर मुलगी जर दुसऱ्या जातीच्या मुलाबरोबर जाऊन लग्न करीत असेल, त्यात जर मुलगा खालच्या जातीचा असला तर तो मोठा अपराध मानला जातो आणि प्रतिष्ठेच्या नावावर दोघांची हत्या केली जाते. अनेक जात पंचायतीमध्ये होणारे निर्णय याबाबतीत स्त्रियांवर अन्याय करणारे दिसतात. ‘सैराट’ या चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे यांनी ऑनर किलिंगचा मुद्दा मांडलेला आहे. जोडीदाराची निवड करण्याचे स्वातंत्र्य मुलींना का असू नये? अनेक वेळा मुली घरच्या बंदिस्त भेदभावपूर्ण वातावरणामुळे घर सोडून पळून जातात, कारण जिथे कैद असते तिथे त्यांना बाहेरच्या व्यक्तीने केलेले प्रेम जास्त जवळचे वाटते. परंतु त्यांनी केलेली निवड समाजाला मान्य नाही. काही मुली इतक्या कंटाळलेल्या असतात की त्यांना फक्त घर सोडायचे असते. त्यामुळे घरातील वातावरण मैत्रीपूर्ण व तिच्या इच्छा आकांक्षा समजून घेणारे असावे. मुलाला पूर्ण स्वातंत्र्य पण मुलींना मात्र प्रथा, परंपरा, संस्कृतीच्या नावावर कोंडी. चूल आणि मूल हेच स्त्रीचं जीवन असे मानून मुकाटय़ाने तिने घरातली सर्व कामे करावी. तिने किती शिकावे, कोणते कपडे नेसावेत, काय उपासना करावी, कुठले निर्णय घ्यावेत, नोकरी करावी की नाही, धर्माचा अभ्यास करावा की नाही, संपत्तीचा अधिकार असावा की नाही यासाठीचे नियम पुरुषांनी तयार केले आहेत. या छळाच्या, शोषणाच्या विरोधात तिला बोलायचा अधिकार नसतो. मैत्री करण्याचा अधिकार नसतो. प्रेम करायचे स्वातंत्र्य नसते आणि ही सहन करण्याची परंपरा आई आपल्यानंतर मुलींना देते. पितृसत्तेला टिकवून ठेवण्याचे विचार स्त्री एका पिढीतून दुसऱ्या पिढीला देते. काही सरकारी योजनांमधूनही स्त्रियांविषयीचा संकुचित दृष्टिकोन दिसून येतो.

बलात्कारासारख्या हिंसेमध्ये स्त्रीच दोषी आहे. तिची अब्रू गेलेली असल्याने तिला जगण्याचा काहीच अधिकार नाही असे भासविले जाते. गुन्हेगार पुरुषांना मात्र आरोपीच्या नजरेतून पाहिले जात नाही. तिची अब्रू फक्त तिच्या लैंगिकतेशीच सामावलेली असते? तिचा जगण्याचा अधिकारच हिरावण्यात येतो. या बाबतीत मुली कपडे कमी का नेसतात, जिन्स का घालतात, मित्रांबरोबर का जातात अशी उलटीच भूमिका घेतली जाते.

हीच मानसिकता ज्या स्त्रिया खंबीरपणे पुढे जात असतील, अधिकारासाठी लढत असतील, चौकटीला तोडत असतील तर ती त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकाराने हल्ले करते. कधी त्या चारित्र्यहीन होतात, कधी निर्लज्ज ठरवल्या जातात. त्यांची बदनामी केली जाते. घराण्याची बदनामी होईल या भीतीने अनेक वेळा पोलीस स्टेशन किंवा न्यायालयात दाद मागण्यासाठी जाऊ दिले जात नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसेच्या आकडेवारी संदर्भात अभ्यास केला तर असे दिसून येते की, अनेक महिला विरोधी िहसेच्या घटना पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे त्या नोंदीत नसतात. अन्यथा बलात्कार, विनयभंग, हत्या, कौटुंबिक हिंसा, धार्मिक हिसा, सामाजिक हिंसा, कामाच्या ठिकाणची हिंसा याचे भयानक वास्तव समोर येईल.

आणखी एक प्रथा समाजात रूढ आहे की, घराचा कर्ता हा फक्त पुरुषच असू शकतो. अर्थार्जन करणारी महिला पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा सांभाळ करणारी स्त्री असू शकत नाही. आईचे नावही मुलांच्या नावापुढे लावता येऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. माझ्या मुलीच्या नावापुढे वडिलांच्या नावाऐवजी माझे नाव अनेक वर्षांपासून आहे. तिच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या वेळेस वडिलांचे नाव का नाही म्हणून खूप वाद झाला. स्त्रियांचे नाव मुलांच्या नावाच्या पुढे लावलेले कट्टरतावादी विचाराला नको आहे. आता माझ्या मुलानेदेखील माझे नाव आपल्या नावापुढे लावलेले आहे. एकटय़ा राहणाऱ्या, लग्न न करणाऱ्या, समलिंगी, धर्मनिरपेक्ष, घटस्फोटित, परित्यक्ता, तृतीयपंथी आदींना अधिकार देण्याविषयी प्रोत्साहन देणे, पाठिंबा देणे समाजाला आवडत नाही.

यावरून मला इतकेच सांगावेसे वाटते की, स्त्रियांच्या बाबतीत हा कट्टरतावाद अतिशय घातक आहे. त्यांच्या विकासाला हिसकावून घेणारा, पुरोगामी विचारांना विरोध करणारा आहे. याकरिता स्त्रियांनी संघर्ष करणे आवश्यक आहे.

 

रुबिना पटेल
लेखिका मुस्लीम समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यां आहेत
त्यांचा ई-मेल : rubinaptl@gmail.com