09 December 2019

News Flash

समन्वयाची भूमिका

भिन्न प्रवाहांमध्ये समन्वयाची भूमिका घेऊन व सुवर्णमध्य साधून स्त्रीचा सन्मान कसा होईल

मुस्लीम स्त्रियांचा प्रश्न समुदायापुरता न राहता सामाजिक प्रश्न का होऊ शकत नाही.. 

भिन्न प्रवाहांमध्ये समन्वयाची भूमिका घेऊन व सुवर्णमध्य साधून स्त्रीचा सन्मान कसा होईल या अंगाने मुस्लीम स्त्रीवादी चळवळ पुढे नेणे गरजेचे आहे. धर्म नाकारून पुढे जाणारे लोक बदनाम केले जातात, पण कोंडी फोडून रूढीवादी बंधनांना तोडणे आवश्यकही आहे..
मुस्लीम महिलांचे प्रश्न हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे तो पेटून उठेल, याप्रमाणे असून धर्मवादी सनातनी लोकांनी स्त्रियांच्या विरोधात निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या विरोधात पुढे येऊन याला आव्हान देणे व बंड करणे आवश्यक वाटते. स्त्रियांच्या प्रश्नाविषयी तीन प्रवाह दिसून येतात.
पहिला प्रवाह पारंपरिक चौकटीच मोडायची नाही व ज्यांना सोनेरी पिंजरा हवा आहे, अशा महिलांचा आहे. पारंपरिकता, कर्मकांड, धर्मसंस्कृतीत जीवन जगणे हेच स्त्रीच्या जीवनाचं लक्ष्य आहे, त्याशिवाय तिचं अस्तित्व नाही. सनातनी लोकांनी घालून दिलेल्या व्यवस्थेमध्ये नीतिनियमांना कठोरपणे पाळणे हेच धर्मकर्तव्य आहे, अशा महिला दिसून येतात. आजही बुरख्याचे समर्थन करणाऱ्या महिला, स्त्री-स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्या महिला घराच्या आतच स्त्रीचं जीवन आहे असं मानतात आणि जे काही जीवन आपण जगतो ती गुलामी आहे असे त्यांना वाटत नाही . अशा स्त्रियाच स्वत:वर अनेक बंधनं लादून घेतात. पुरुषी मानसिकतेतून बुरखा किंवा इतर बंधनं ही योग्य कशी आहेत आणि धार्मिक कर्मकांडाचे पालन करण्यातच आमची धन्यता कशी आहे हे सांगत असतात. त्यातूनच स्त्रीच स्त्रीची शत्रू होण्याची प्रक्रिया सुरू होते. वास्तविक या स्त्रियांची पुरुषप्रधान मानसिकता तयार होत जाते व त्या पितृसत्तात्मक व्यवस्थेचे समर्थन करून स्त्रीच्याच विरोधामध्ये वागणूक करताना दिसून येतात. या महिला त्यांच्याच स्त्री-स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत हे त्यांना कळतच नाही. मी जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या विरोधात बोलते उदा. अमुक एक स्त्री पतीचे म्हणणे ऐकत नाही किंवा बुरखा घालत नाही म्हणून ती नैतिक नाही, वाईट आहे, असे जे बोलते तेव्हा मी माझ्याच विरोधामध्ये कशी बोलत आहे किंवा वागत आहे याची जाणीव करून दिली जात नाही. उलट अशा स्त्रियांना आपली ओळख जपणाऱ्या ‘नेक’ औरत म्हटले जाते. अशा महिलांमुळे पुरुषी व्यवस्थेला बळकटीच मिळते आणि पतीने ‘तलाक’ शब्द उच्चारल्यानंतर तो तलाक धार्मिक दृष्टीने ग्राहय़ धरला जाईल असा अट्टहास करणाऱ्या महिला एका पुरुषाला (मुस्लीम) चार बायका शरियतनुसार करता येतात हे मान्य करणाऱ्या महिलादेखील दिसून येतात व याविषयीचा विश्वास त्यांच्यामध्ये असतो. म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे त्या अंध अनुकरण करीत असतात. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याप्रमाणेच मुस्लीम महिलाही अनेक प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडताना दिसून येतात. यामुळेच मुस्लीम महिलांचा प्रश्न हा समुदायापुरताच मर्यादित राहतो, त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करण्यास पुढेमागे पाहतो. शहाबानोच्या प्रकरणातही तेच घडले. ‘इस्लाम खतरे में है’ म्हणून मुस्लीम पुरुषांनी सरकारच्या विरोधात मोर्चे काढले.. आणि सरकारलाही त्यामध्ये स्त्रियांच्या बाजूने हस्तक्षेप करता आला नाही. उलट मुस्लीम स्त्रियांचे नुकसानच करण्यात आले. तात्पर्य मुस्लीम स्त्रियांचा प्रश्न समुदायापुरता न राहता सामाजिक प्रश्न का होऊ शकत नाही?
दुसरा एक प्रवाह असा आहे की, इस्लामने सर्व हक्क महिलांना दिलेले आहेत, परंतु पुरुषप्रधान मानसिकतेने ते नाकारले. म्हणून महिलांना ते हक्क मिळविण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे अशा विचारांचा आहे. काही लोकांना पुरुषप्रधान मानसिकता नको आहे म्हणून लढतात, पण धर्माच्या चौकटीत राहून .. पैगंबरांनी इस्लाममध्ये स्त्रियांना बरोबरीचे अधिकार दिलेले आहेत. उदा. पैगंबरांनी मशिदीमध्ये स्त्रियांना नमाज पढण्याविषयी म्हटले होते. लग्नाच्या वेळी ‘कुबूल है?’ विचारणे, मेहेर (स्त्रियांच्या संरक्षणासाठी) तरतूद इत्यादीचे उदाहरण देऊन काही महिला आंदोलनेही पुढे येत आहेत. काही ठिकाणी शरियत अदालतींची स्थापना झालेली दिसते. हाजी अली दग्र्यामध्ये महिलांना प्रवेश मिळावा म्हणूनही महिला पुढे येताना दिसतात. या विचारांमध्ये महिलांच्या अस्मिता जाग्या झालेल्या दिसतात आणि त्या थोडय़ा डोळसपणे वागतात. याच विचाराच्या शाहिस्ता अंबर या ऑल इंडिया मुस्लीम महिला पर्सनल लॉ बोर्डाची स्थापना धर्माच्या चौकटीत राहून अल्लाहने आम्हाला सर्व अधिकार दिले आहेत, पण पुरुषांनी हिरावून घेतले म्हणून धर्माने दिलेले मुस्लीम महिलांचे अधिकारच हवे आहे, अशी भूमिका मांडतात.
तिसरा प्रवाह धर्मात काय आहे यापेक्षा विवेक जागरूक करणारे विचार जे स्त्रीवादी चळवळीच्या माध्यमातून दिसून येतात. हा गट असे मानतो की, धर्माचा संस्थापक पुरुष आहे, पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि धर्माचे पालन केल्यानेच स्त्रीचे जीवन सार्थक होणार आहे हे खोटे आहे. धर्माने स्त्रियांना दुय्यमच स्थान दिले आहे. इस्लाम इतर धर्मापेक्षा थोडा पुढे गेला असला तरी पुरुषी वर्चस्व आहेच. उदा. तलाकचा अधिकार पुरुषांनाच दिलेला आहे. जरी काही ठिकाणी ‘खुला’ स्वत:हून स्त्रीतर्फे घेण्यात आला असेल, पण तरीही ती विनंतीच असते. तलाक स्त्रियांना म्हणता येत नाही. एका पुरुषाला चार लग्नांचा अधिकार इत्यादी. स्त्रियांनी नवऱ्याची आज्ञा मानली नाही तर तिला हलक्या पद्धतीने शिक्षा करावी हे धर्मात सांगितले आहे. त्याचप्रमाणे एका पुरुषाची साक्ष बरोबर दोन स्त्रियांची साक्ष, अशा अंगभूत पद्धती स्त्रियांप्रति भेदभाव दर्शवितात व स्त्री-पुरुष समानतेला विरोध करतात. म्हणून विवाहसंस्था, धर्मसंस्था नाकारणारे विचार ज्यामध्ये आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह न करता नातेसंबंधांमध्ये राहणाऱ्या, विवाह न करणाऱ्या, समलिंगी अशा पुरोगामी स्त्रीवादी चळवळीतून पुरोगामी विचार पुढे मांडण्यात येत आहेत.
हमीद दलवाई म्हणायचे की, एखाद्या स्त्रीला विवाह न करता मुलाला जन्म देण्याचा अधिकार समाज जोपर्यंत मान्य करत नाही, तोपर्यंत खरी स्त्रीमुक्ती नाही. स्त्री-पुरुष समता प्रगत समाजामध्ये आवश्यक आहे. अलीकडे नूर जहीर अलीने एक पुस्तक लिहिले आहे. त्यात ती म्हणते, स्त्री हाच माझा ईश्वर आहे आणि बाकी ईश्वर पुरुषार्थी आहेत. सगळ्या धर्मात तो ईश्वर किंवा तो अल्ला, ती ईश्वर नाही. हीच व्यवस्था नाकारणारी आणखी एक स्त्री तस्लिमा नसरीन हिने टोकाची भूमिका घेऊन शोषण करणारी व्यवस्था आहे, असे बंडखोर विचार मांडले.
परंतु एक कार्यकर्ता या नात्याने या भिन्न प्रवाहांमध्ये समन्वयाची भूमिका घेऊन सुवर्णमध्य साधून स्त्रीचा सन्मान कसा होईल या अंगाने स्त्रीवादी चळवळ पुढे नेणे गरजेचे आहे. धर्म नाकारून पुढे जाणारे लोक बदनाम केले जातात, पण कोंडी फोडून रूढीवादी बंधनांना तोडणे आवश्यक आहे. पारंपरिकतेच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या प्रबोधनाला अडथळा करणाऱ्या महिलांना माहीत नसते की, त्या स्वत:च्या नव्हे तर एकूणच स्त्री-स्वातंत्र्याला नाकारतात . तेव्हा व्यवस्थेने लादलेली गुलामगिरीची जाणीव त्यांना करून देणे महत्त्वाचे आहे. स्त्री-स्वातंत्र्याची आस बाळगणे याकरिता मुस्लीम समाजाला पुढे येणे हे आंदोलनाचा टप्पा ठरणार आहे.

रुबिना पटेल
लेखिका मुस्लीम समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यां आहेत. त्यांचा ई-मेल
rubinaptl@gmail.com

First Published on March 21, 2016 3:47 am

Web Title: islamic traditions and the feminist movement
Just Now!
X