News Flash

माझे घर नक्की कोणते?

सासरी गेली तर तिला दुय्यमच स्थान दिले जाते.

चौकटीच्या बाहेर विचारही करू नये म्हणून पितृसत्ताक व्यवस्थेने आपल्याला अनुकूल असे नियम आणि कायदे बनविले आहेत. मुलीला लहानपणापासून नेहमी सांगितले जाते की तू परक्याचे धन आहेस.. सासरी गेली तर तिला दुय्यमच स्थान दिले जाते. म्हणूनच माझे घर नक्की कोणते, हा प्रश्न तिला पडतो.

माझ्या संस्थेमध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकारी शाहीना, शहेनाज, नगमा, समिना, फरहीन, गौसिया, निकहत, नसरीन, लीना, शबाना या सर्वानी मला सुचवलं की  या वेळच्या लेखामध्ये स्त्रीचं नेमकं घर कुठे आहे हा मुद्दा मांडावा. माझ्या मनात सध्या देशभरामध्ये तलाकविषयी चर्चा सुरू आहे.  वाहिन्यांवरील ताज्या  चर्चेमध्ये मी काय बोलले, काय मुद्दे चर्चेतून आले हे होते. मला दोन्ही विषयांची सांगड घालावीशी वाटते.

लग्नापूर्वी प्रत्येक मुलीला ‘तू तो परायी है’ सांगितले जाते. कडक शिस्तीमध्ये मुलीला वाढविले जाते. शाळेतून घरी परत यायला उशीर झाला की तिला मार खावा लागतो. दारातून बाहेर डोकावायला लागली किंवा मोबाइलवरून कोणाशी बोलताना दिसली की संशय घेतला जातो. मुलांशी मैत्री करू नये, पडदा करावा आणि मुकाट कुठलेही उलट उत्तर न देता जसे सांगितले गेले ते तसे करावे. मुलींनी आपल्या लग्नाविषयी स्वत: कुटुंबात चर्चा करू नये. तिला या घरात कुठलाच अधिकार नाही, जे करायचे असेल ते आपल्या सासरी करशील असेच वारंवार म्हटले जाते.

नोकरी करून  पैसे मिळवणारी जरी असेल तरी हे घर तुझे नाही, हे घर मुलांचे राहील, ती फक्त लग्नानंतर माहेरी पाहुणी म्हणून येईल असेच संस्कार, प्रथा, परंपरा एका व्यवस्थेअंतर्गत दिसून येतात. परंतु तिने या प्रश्नाचा कधीच विचार केलेला नसतो की, खरंच हे घर माझे का नाही? कारण तिला वाटत असते की, लग्नानंतर सासर हे माझे घर असणार आहे. लग्नानंतरच्या परिस्थितीमध्ये आमच्या घरात असे चालणार नाही. आमच्या घरात ज्या  चालीरीती, परंपरा आहेत त्या तुला मान्य कराव्या लागतील असे सुनेला नेहमी सांगितले जाते. इतकेच काय स्वयंपाकघरातदेखील सासू लुडबुड करून सुनेला तिच्या स्वेच्छेने काम करू न देता तुझ्या सासऱ्याला किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना हे पसंत नाही असे का सांगत असते? एक स्त्रीच स्त्रीची शत्रू कशी ठरते? बहुसंख्य स्त्रियांचे बालपण हरवले जाते आणि अगदी लहान वयात अनेक सदस्य असलेल्या मोठय़ा कुटुंबात तिला जावे लागते. तिच्या जन्माची गाठ कोणाशी बांधली आहे? त्याचे वय किती? काय काम करतो? हे सांगण्याची तसदी माहेरी घेतली गेलेली नसते. तेव्हा अचानक जीवनात झालेला बदल स्वीकारणे, तो अंगवळणी पाडणे आणि एवढी मोठी संसाराची जबाबदारी पेलवणे तिला निश्चितच अवघड जात नसेल काय? गरोदर अवस्थेमध्ये असतानाही तिच्याकडून संपूर्ण कामाची अपेक्षा केली जाते. कमी वयात एकामागून एक बाळंतपणामुळे तिच्या आरोग्याचा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो याचा विचार केला जातो का? नवरा जर बायकोला मदत करत असेल तर तो जोरू का गुलाम का होतो? आपला मुलगा आपल्याला सोडून पत्नीबरोबर राहील व आमच्याकडे दुर्लक्ष करेल ही असुरक्षिततेची भावना सासूच्या मनामध्ये का निर्माण होते? तिने जी हिंसा आपल्या जीवनात भोगलेली असते तीच परिस्थिती ती सुनेवर का लादू इच्छिते? सुनेशी भांडण झालं की, निघ बाहेर आमच्या घरातून असे का म्हटले जाते? पतीला राग आला की, तो पत्नीला घर सोडून जावयास आग्रह का करतो ?  तिला तलाक देऊन घराबाहेर काही क्षणात कसं काढतो? स्त्रीचं नेमकं घर कुठे आहे, हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

तिसऱ्या प्रकारात एकटय़ा स्त्रीचे प्रश्न आपण समजून घेणे आवश्यक आहे. पहिल्या विवाहात अनेक अत्याचार व हालअपेष्टा सहन करून तलाकपीडित एकटय़ा पडलेल्या स्त्रिया, विधवा, परित्यक्ता आणि प्रौढ कुमारिका यांच्याकडे पुरुषांची बघण्याची दृष्टी फार विकृत असते. यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नांचा कुणी विचारच करीत नाही. माहेरच्या मंडळींचाही तिला पाठिंबा मिळत नाही. प्रौढ कुमारिकांना ज्या वातावरणात वागविले जाते त्यामुळे तिला चार माणसांत साधे बोलताना भीती वाटते. अनेक प्रकारच्या बंधनांमुळे, हिंसेमुळे ती आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकत नाही. आपली थट्टा उडविली जाईल या भीतीने तिला नेहमी स्वत:मध्ये कमीपणा वाटत असतो. तिच्या लग्नाचा कुटुंबात कुणी विचारच केलेला नसतो आणि तिचे स्वत:चे आपल्या लग्नाविषयी, पुढच्या भविष्याच्या विषयावर कुठलेच मत विचारात घेतले जात नाही किंवा अशा मुलींना संपत्तीमध्ये वाटा देणारे फार कमी दिसून येतात.

अनेक वेळा विधवा, परित्यक्ता, तलाकपीडित स्त्रियांच्या पुनर्विवाहासाठी आग्रह केला जातो. ते स्थळ तिच्या योग्य असते का? तिच्यापेक्षा वयाने फार मोठय़ा असलेल्या, मुलं (मोठी)- नाती असणाऱ्या व्यक्तीला तिला स्वीकारणे तिच्यावर अन्याय करणारे नाही का? तिला पुनर्विवाह करायची इच्छा नसताना माहेरच्या घराचा तिला आसरा का मिळत नाही? ते घर तिचे नाही का? माझ्या पाहण्यात एक स्त्री लग्न न करता एका पुरुषाबरोबर नातेसंबंधामध्ये काही वर्षांपासून राहत आहे. तिलादेखील एका वेगळ्या प्रकारच्या तिच्या पार्टनरकडून केल्या जाणाऱ्या हिंसेचा सामना करावा लागत आहे. ज्या घरात ती राहते तो तिच्यासाठी एक पिंजरा आहे, असे ती सांगते. सगळ्या सुखसोयी तिच्याकरिता करण्यात आल्या आहेत, पण ती आपल्या इच्छेने घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, नातेवाईकांबरोबर नातेसंबंध ठेवू शकत नाही. तिच्या प्रत्येक हालचालीवर तो नियंत्रण ठेवत असतो. तिने जर हे संबंध तोडायचा प्रयत्न केला तर तिला धमकी दिली जाते. एक प्रकारच्या दहशतीत तिला जीवन जगावे लागत आहे. तिच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, मी जरी या घरात राहत असली तरी हे घर मला माझे घर का वाटत नाही? मुळात हे सर्व स्त्रियांवरील भेदभाव व अन्याय एका व्यवस्थेअंतर्गत होत असते म्हणून हा प्रश्न कायम आहे की, स्त्रीचे नेमके घर कोणते? बालपणातल्या स्त्रीने ‘तू परायी है’ हे ऐकलेले असते. लग्नानंतर आमच्या घरात असं चालत नाही आणि मनात आलं तेव्हा तलाक दिला जातो. निघ बाहेर म्हटले जाते आणि एकटय़ा महिलांना आपल्या भावना व्यक्त करायला जागा नसते. लग्न न करता नातेसंबंधांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना दहशतीत जीवन जगावे लागते? या सर्वाना हक्काच्या घराविषयीचा भेडसावणारा प्रश्न सारखाच आहे.

कारण या सर्व परिस्थितीत पुरुषी मानसिकतेचा पगडा जेथे स्त्रियांना समानतेची वागणूक आणि तिचा अधिकार डावलला जातो. ज्यामुळे तिची घुसमट होते, कोंडी होते. स्त्रीला ही कोंडी फोडता येणार नाही. चौकटीच्या बाहेर विचारही करावयाचा नाही म्हणून या पितृसत्ताक व्यवस्थेने कुटुंब, विवाह, धर्म, प्रथा, परंपरा इ. संस्थेअंतर्गत नीती, नियम आणि कायदे बनविले आहेत. एका स्त्रीला स्त्रीच्या विरोधामध्ये तयार केले आहे म्हणून आखिर मेरा घर है कहाँ, हा प्रश्न उरतो.

सनातनी, कट्टरपंथी धर्मगुरू व उलेमांनी मुस्लीम समाजामध्ये धर्माची पकड घट्ट केली असून त्याद्वारे त्यांच्यावर ‘एमपीएल’ कायद्याच्या स्वरूपात नियंत्रण केले जाते. शरियत ही अपरिवर्तनीय म्हणून तलाकच्या प्रथेला समर्थन करणाऱ्या ऑल इंडिया मुस्लीम पसर्नल लॉ बोर्ड व अशा धार्मिक संघटनांनी मुस्लीम स्त्रियाच तलाकचे समर्थन कसे करतील याविषयी व्यवस्थेअंतर्गत पूर्ण तरतूद केली व ती मानसिकता तयार केली गेली आहे.

स्त्रियांविषयीचा भेदभाव, त्यांचा मागासलेपणा अल्पसंख्याकांतील अल्पसंख्याक, असुरक्षितता, आत्मनिर्भर नसणे आणि धर्मातील बंधनांमुळे मुस्लीम स्त्री असहाय आहे आणि म्हणून तलाकविषयी धार्मिक कायदा वापरून तिला वाऱ्यावर सोडून दिले जाते. याचा विरोध करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात तोंडी तलाकला आव्हान देणारी जनहित याचिका शायरा बानोच्या याचिकेसोबते केलेली आहे. कोर्टात का जावे लागले? या वाहिनीवरील एका प्रश्नाच्या उत्तरावर मुस्लीम स्त्रियांची व्यक्तिगत (शरियत) कायद्यामुळे घुसमट होते, तिच्यावर अन्याय होतो आणि शरियत कायदा हा धार्मिक कायदा असून लिखित स्वरूपात नसल्याने त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मी सांगितले. याकरिता शासन हस्तक्षेप करणार आहे. लॉ कमिशनने सोळा प्रश्नांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून प्रतिक्रिया मागविल्या आहेत. ते प्रश्न व समान नागरी कायद्याविषयी भाजपची भूमिका काय आहे? मुस्लीम महिलांना सामाजिक न्याय व त्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकार किती संवेदनशील आहे? मुस्लीम स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून खरंच कुठलेही राजकीय पक्ष गंभीर आहेत काय? की त्यांना परत मतांचे राजकारण करावयाचे आहे. शेवटी मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न हे त्यांचेच प्रश्न नाहीत, तो एक सामाजिक मुद्दा आहे आणि तो सर्व स्त्री जातीचा प्रश्न म्हणून समजून घेतला जाणार आहे की नाही? की हा देशदेखील त्यांचा नाही? ती या देशाची नागरिक म्हणून पूर्ण सांविधानिक अधिकार व कर्तव्य तिला प्राप्त होतात. पण अशी परिस्थिती का निर्माण केली जाते की तिला आपल्याच देशात परकेपणा वाटतो? स्वत:च्या हक्काचं घर त्यांना नाही तेव्हा देश तरी त्यांचा आहे का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो आणि म्हणूनच माझ्या सहकाऱ्यांनी ‘आखिर मेरा घर है कहाँ?’ लिहायला सांगितले.

 

रुबिना पटेल

rubinaptl@gmail.com

लेखिका मुस्लीम महिलांच्या पुनरुत्थानासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां आहेत

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2016 2:22 am

Web Title: issues of concern for muslim women 2
Next Stories
1 बलात्कार हा सामाजिक गुन्हा
2 स्त्रियांचे शोषण थांबणार कसे?
3 पितृसत्तेमुळेच स्त्रियांवर अन्याय
Just Now!
X