12 November 2019

News Flash

माझा संघर्ष

माझ्या डोक्यात एकच विचार सुरू होता. पुढचं आयुष्य मला आता हिंसा सहन करत जगता येणार नाही.

‘मुस्लीम’ आणि ‘महिला कार्यकर्ती’ या लेबलांच्या पुढे जाणारे, आज सामाजिक संवादातच असलेल्या अडथळ्यांशी संघर्ष करणारे नवे पाक्षिक सदर..
माझ्या डोक्यात एकच विचार सुरू होता. पुढचं आयुष्य मला आता हिंसा सहन करत जगता येणार नाही. लग्नापूर्वीचं आयुष्य व लग्नानंतरच्या आयुष्यात काहीच फरक दिसत नव्हता. तो बाप म्हणून मारायचा, हा पती म्हणून मारतो..
मला ‘लोकसत्ता’मध्ये सदर लिहिण्यास सांगण्यात आले. सुरुवात मी अनुभवलेल्या समस्यांच्या कथनातून करावी असे वाटले. एका संस्थेची अध्यक्षा या नात्याने माझ्यासमोर अनेक पीडित महिलांचे हाताळलेले प्रश्न नजरेसमोर येतात.
माझा जन्म उमरेड तालुक्यात झाला. तेथील पटेल कुटुंब शैक्षणिक, सामाजिक व आíथक दृष्टीने संपन्न वा नावाजलेले होते, पण त्यात माझे वडील दारुडे असल्यामुळे आई, माझा लहान भाऊ व मी अपमान व अवहेलना सहन करून जगलो. वडील दारू पिऊन कुठे तरी पडलेले असायचे. अनेकदा रात्री घरी येऊन पूर्ण स्वयंपाक खाऊन टाकायचे व उरलेले फेकून द्यायचे किंवा गंजात पाणी टाकून द्यायचे, त्यामुळे अनेक वेळा उपाशी झोपावे लागायचे. रात्री झोपेतून केस पकडून, लाथा मारून उठवायचे, भांडण- मारहाण करायचे. बरेचदा पावसात, थंडीत घराच्या बाहेर हाकलून द्यायचे. राक्षस कुठे असेल तर यापेक्षा वाईट असू शकत नाही, असे नेहमी वाटायचे. आईला मजुरी करावी लागायची. दु:खात दिवस काढले.
त्यात एक गोष्ट होती जी जगण्यास प्रेरणा देणारी होती. शिक्षणाची आवड, जिज्ञासा. दोघं भावंडं हुशार होतो. अनेक वेळा असं मनात यायचं की, अशा बिकट परिस्थितीतील मुलांसाठी पुढच्या शिक्षणासाठी काही मदत सरकारने करायला नको का? किंवा कौशल्य विकासाचे काही ट्रेिनग मिळेल, जेणेकरून आम्ही आपला उदरनिर्वाह करू शकू; परंतु का सरकारी यंत्रणा अशांपर्यंत पोहोचत नाही? कितीही अडचण असली तरी मी मात्र संघर्ष करीन व शिकून मोठी होईन, हीच तळमळ. चिखलात कमळ उगवते अशी प्रतीकं दिली जायची, पण भांडण सोडवायला कुणी पुढे सरसावत नसायचे. असो. हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच की, आम्ही दु:खातून, दारिद्रय़ातून संघर्ष करून शिकत होतो. मुकाट कुटुंबाच्या इतर लोकांची कामं ऐकायचो, तरीही आम्हाला विशेषत: मला १२वीनंतर शिकू का दिलं नाही! का मोठय़ा मंडळींनी मी गरीब असल्यामुळे व वडिलांच्या दारुडेपणामुळे लवकर लग्न करून दिलं? का मला माझ्या इच्छेनुसार पुढे शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता? का लग्न हेच मुलीच्या जीवनाचं एकमेव लक्ष्य मानलं जातं? का मुस्लीम समाजात अनेक मुलींची लग्ने लवकर केली जातात? ही चीड मनामध्ये निर्माण व्हायची; परंतु मोठय़ांपुढे बोलण्याचा अधिकार नव्हता. आईलाही नाही. पुढे लग्नानंतर नवीन स्वप्ने बघायला सुरुवात केली. जी परिस्थिती आली त्याच्याशी समझोता केला; परंतु पती शिक्षक असूनही पितृसत्ताक मानसिकतेचा, स्त्रियांना बरोबरीचे स्थान नाकारणारा होता. त्याला वाटायचे की, स्त्रियांनी शौहरचे म्हणजे नवऱ्याचे ऐकावे, उलट उत्तर देऊ नये. त्याला असंही वाटायचं की, पत्नी त्याची संपत्ती आहे म्हणून उपभोगाची वस्तू आहे.
त्याच्या म्हणण्याला विरोध केला, तर तो मला काठीने, चपलेने खूप मारायचा. तो नेहमी इतरांना सांगायचा की, मी हिच्यावर खूप प्रेम करतो, पण मला ते जाणवत नव्हतं. मला ते कैदेमधले अर्थहीन जगणे वाटायचे. जरी मला चांगले कपडे, चांगले खायला मिळायचे, पण माझं स्वत:चं अस्तित्वच नव्हतं, माझं शरीरही माझं नव्हतं. अनेक प्रकारची पतीची िहसा सहन केली.
अशातच एक मुलगा झाला. पतीजवळ हट्ट करून बीए फर्स्टची परीक्षा पास झाले. माझ्या इच्छा, आकांक्षा आणखी वाढायला लागल्या. मला उंच आकाशात उडायचे होते. आपले स्वप्न पूर्ण करायचे होते. मुलगा ११ महिन्यांचा असताना एक दिवस सासरी भांडण झालं. त्याने इतकं मारलं की, त्यानंतर मला जागचं हलताही येत नव्हतं. घरातील इतर लोक यात बोलू शकत नव्हते, कारण तो एकमेव घरात शिकलेला होता. शरीरावर अनेक व्रण आले. डोळय़ांभोवती काळंनिळं झालं, फोड आले, संपूर्ण चेहरा खराब झाला. मी त्या संपूर्ण रात्री एक शब्द न बोलता डोळय़ांची पापणी न हलवता अचेत अवस्थेमध्ये निष्प्राण असल्यासारखी बसून राहिले. माझी अवस्था बघून तो थोडा घाबरला होता. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गावी म्हणजे ज्या ठिकाणी नोकरी होती तेथे आलो. त्याला वाटले सर्व ठीक आहे, परंतु माझ्या डोक्यात एकच विचार सुरू होता. पुढचं आयुष्य मला आता िहसा सहन करत जगता येणार नाही. लग्नापूर्वीचं आयुष्य व लग्नानंतरच्या आयुष्यात काहीच फरक दिसत नव्हता. तो बाप म्हणून अधिकार गाजवून मारायचा, हा पती म्हणून अधिकार गाजवून मारतो. तो देशी दारू प्यायचा, हा विदेशी पितो. तोही रात्री झोपेतून उठवायचा, हाही झोपेतून उठवतो. बस्स! आता नाही. मी निर्धार केला, आता आणखी सहन करणार नाही.
मी घर सोडून बाळाला घेऊन दूर निघून जाणार, पण कुठे जायचं? मला माहेर नव्हतं. नातेवाईक, समाज माझा हितचिंतक नव्हता आणि मला आत्महत्या तर करायचीच नव्हती. मी ठरवलं दूर बाबा आमटेंकडे जायचे. त्या वेळेस १९९४ साली ते बडवानीजवळ कसरावदला होते. त्यांच्याकडे जाऊन समाजकार्यात आपलं आयुष्य घालवायचं मी ठरवलं. पत्र लिहून ठेवलं व न सांगता बाळाला घेऊन निघाले. बाबा आमटेंकडे दोन दिवसांनी पोहोचले. बाबा व साधनाताईंनी मला सांत्वना दिली खरी, पण टेलिग्राम पाठवून माझ्या पतीला बोलावून घेतले.
त्याला रागावण्यात आले, पण त्यानं पुढे असं करणार नाही असं आश्वासन दिल्यामुळे मला परत पाठविण्यात आलं. कदाचित मला परत पतीसोबत जावं लागलं नसतं तर मी खूप चांगलं आनंदाने आयुष्य जगले असते आणि सामाजिक क्षेत्रात अनेक कामेही केली असती. खरं तर मी कामाला सुरुवात केली ती इतक्यात, ८-९ वर्षांपूर्वी स्वतंत्रपणे. माझी इतकी वर्षे रडण्यात व कोर्टात जाण्यात वाया गेली नसती.. जेव्हा मी पतीबरोबर परत आले, त्यालाही खात्री झाली की, हिचं माझ्याशिवाय कोणी नाही. मला त्याच्यासोबत राहावंच लागेल. कितीही अत्याचार केला तरी माझी वस्तू मला परत मिळेलच, हा आत्मविश्वास वाढला आणि तशी बंधनं, संशय, शारीरिक, मानसिक, लंगिक िहसा अधिक वाढली. माझ्या इच्छेनुसार मी काहीच करू शकत नव्हते. विचारणा केली किंवा उलट उत्तर दिलं तर वादळ यायचं. अशाही अवस्थेत मी शिक्षण सुरूच ठेवलं. अनेक वेळा माझी पुस्तकं फेकली जायची. पतीशिवाय पुस्तकाला कसं महत्त्व देते म्हणून शिव्या व मार. एक दिवस माझं लिहिलेलं सगळं साहित्य त्याला दिसल्यानंतर ते जाळलं गेलं. माझं फार मोठं नुकसान झालं होतं. मुलगी जन्माला आल्यानंतर पुढे मला आपणही आíथक मिळकत करावी असं वाटलं. कसंबसं करून अनेक शिव्या व भांडण सहन करत मी लोन घेऊन फोटो स्टुडियो सुरू केला. कामामध्ये व्यस्त राहू लागले. आतापर्यंत माझं बीए झालं होतं. मला पुढे एमएसडब्लू करायचं असल्यामुळे भांडण सुरू झालं. तो पुढे शिकायला नाही म्हणायचा. समाजकार्याची आवड होती, पण त्याला पतीचा विरोध होता. लोकांनी माझं केलेलं कौतुक त्याला आवडत नव्हतं. साधारणपणे पती समाजासमोर पुरोगामी विचाराचा म्हणूनच माझी पत्नी पुढे शिक्षण घेत आहे अशी प्रतिमा स्थापन करत होता. पुढे मी जेव्हा त्याला नकोशी वाटले तेव्हा तर त्याने हद्दच केली. दुसऱ्या लग्नासाठी त्याने मला माझी मर्जी नसताना तलाक दिला. मुफ्तीकडून तलाकचा फतवा बनविला व लग्नही केले. तलाकचे कुठलेही कागद माझ्या हाती मिळाले नाही. मला घरातून हाकलले. नंतर मुलाला ठेवून घेतले व मुलीला, जी त्याला जबाबदारीची वाटायची माझ्याजवळ राहू दिले. मेन्टेनन्स नाही, घर नाही, सामान (स्त्रीधन) नाही, स्टुडिओचं साहित्य नाही किंवा मेहेरही दिली गेली नाही. कित्येक महिने झाले तरी मुलाशी भेट झाली नव्हती म्हणून एक दिवस भेटायला गेले असताना गावकऱ्यांसमोर खूप मारहाण केली. केस पकडून विहिरीपर्यंत नेलं व म्हटलं, तू आत्ता मर, पण मी तुला ठेवणार नाही. मी विनवण्या करायला लागले. त्याचं मन विरघळलं नाही. शेवटी विहिरीत पडल्यानंतर मला वाचवण्याऐवजी तो पोलीस स्टेशनला गेला व माझ्याविरुद्ध ३०९चा फौजदारी गुन्हय़ाचा खटला पवनी कोर्टात सुरू झाला. त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या दिवशी मी ते अडवायला गेले. पोलिसांना सांगितले, मी कायदेशीर बायको आहे, लग्न थांबवा; परंतु पोलिसांनी मला मदत केली नाही. पूर्ण दिवस रडण्यात, पोलिसांशी भांडण्यात गेला. का मी मुस्लीम होती म्हणून माझ्यासोबत भेदभाव करण्यात आला? संविधानाने सर्वाना समान अधिकार व समान कायदे दिले आहेत. मला द्विभार्या प्रतिबंधक कायदय़ाअंतर्गत का संरक्षण मिळालं नाही? उलट तुमच्यावर गुन्हा दाखल करू, असे सांगण्यात आले. त्यामुळे खचून मी मुलीला घेऊन परत आले.
नागपूरला मुलीसोबत राहून जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. कायदय़ाचे ज्ञान नसल्यामुळे आणि सरकारी वकिलांच्या मेहेरबानीमुळे भंडारा कोर्टामध्ये ४९८ची केस मी हरले. तिथे मी प्रश्न विचारत होते, माझ्यावर झालेल्या अन्यायाकरिता आक्रोश करीत होते, तर न्यायाधीश मॅडमनी हिला अटक करा, असे म्हटले. असो. पण मी मात्र कायद्याचे बारकावे शिकले. त्यानंतर नागपूरला कौटुंबिक न्यायालयात १२५ खावटीची केस टाकली. भंडारा कोर्टामध्ये मुलाच्या कस्टडीची केस व एक परत पवनी कोर्टात माझ्याविरुद्ध फौजदारी केस. कोर्टाच्या आवारात मला शिव्या व धमक्या मिळायच्या. मी व्यक्तिगत केस लढले. कोर्टाला माझी आíथक परिस्थिती हलाखीची आहे, त्यामुळे मी वकील करू शकत नाही, असे सांगितले.
लेखिका मुस्लीम समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यां आहेत. त्यांचा ई-मेल

– रुबिना पटेल
rubinaptl@gmail.com

First Published on January 11, 2016 3:01 am

Web Title: muslim woman activists struggle