News Flash

स्त्रियांचे शोषण थांबणार कसे?

पितृसत्ताक व्यवस्था म्हणजे अशी सामाजिक व्यवस्था जिथे पुरुष स्त्रियांचे सर्व पद्धतींनी शोषण करतात.

पितृसत्ताक पद्धती अनेक समाजव्यवस्थांत आजही रुजलेली दिसते, त्यामुळे स्त्रियांच्या शोषणास सर्रास अधिमान्यता मिळते. समाजातील सर्व घटकांमध्ये पुरुषी वर्चस्व असल्याने हा भेद कधी संपतच नाही; त्याला आव्हान दिल्याशिवाय आता तरणोपाय नाही.

पितृसत्ताक व्यवस्था  म्हणजे अशी सामाजिक व्यवस्था जिथे पुरुष स्त्रियांचे सर्व पद्धतींनी शोषण करतात. त्यात त्यांना कमी दर्जाची वागणूक दिली जाते व सर्व निर्णय पुरुषांच्या हाती असतात आणि ही व्यवस्था संस्थात्मक असते. पुरुषप्रधानता व पुरुषांकडून नियंत्रण ही त्याची वैशिष्टय़े सांगता येतील.

आमच्या समाजातील मुख्य समाजव्यवस्थेचे विश्लेषण केले तर हे लक्षात येईल की, त्याच्या रचनेत पूर्णपणे पुरुषप्रधान मानसिकता असते. या व्यवस्थेच्या कडय़ा आपसात गुंतलेल्या आहेत. व्यवस्थेचा पाया इतका खोल रुजलेला आहे, की तो हलविणे अशक्य आहे. काही ठिकाणी प्रथा परंपरेने चालत आलेले, स्त्रियांवर लादलेले नियम व र्निबध अगदी अयोग्य वाटतात. आम्ही या समाज व्यवस्थेच्या वेगवेगळया रूपांना आव्हान देणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. आपण पितृसत्ताक समाजव्यवस्थेतील घटक समजून घेण्याचा प्रयत्न करू.

१)  कुटुंब  :  कुटुंब हे समाजाचे पायाभूत अंग आहे. कदाचित तीच सर्वात जास्त पुरुषप्रधान व्यवस्था आहे. पुरुष या संस्थेमध्ये प्रमुख आहे. कुटुंबाच्या आत तो स्त्रियांवर नियंत्रण ठेवतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाखी आहे, की कुटुंबप्रमुख कुटुंबातील लहान मुले व पुरुषांवरदेखील नियंत्रण किंवा सत्ता गाजवत असतो. आजची मुले उद्या कुटुंबप्रमुख होतील आणि स्त्रिया पदानुक्रमात पुरुषांच्या खालीच राहतील, याकरिता कुटुंब संस्थेत नियम कायदे बनविले जातात. यामध्ये पुरुष श्रेष्ठ व शोषक असतो. स्त्रिया खालच्या दर्जाच्या मानलेल्या असतात. पुढच्या पिढीला मूल्यशिक्षण देण्याचे काम ही कुटुंब संस्था करीत असते. यामध्ये आम्ही श्रेष्ठ-कनिष्ठ, पदानुक्रम आणि िलग आधारित भेदभावांचा धडा शिकत असतो. प्रत्येक वर्तन, भूमिकेतून मुलांना धाक जमविण्याची, मर्दानगीची शिकवण मिळत असते, तर स्त्रियांना दबून राहण्याची व भेदभाव स्वीकारण्याची. मुलांना आई-वडील किंवा नातेवाईक खेळायला बंदूक किंवा गाडी, तर मुलींना भांडी आणून देतात. जर एखाद्या मुलाचा आवाज बारीक असेल, तो भावुक असेल, रडत असेल किंवा घरातील कामात मदत करत असेल तर त्याच्यावरही, त्याने मर्दासारखे वागण्याचा दबाव असतो. मुलांनी मर्द बनावे, रडू नये; मुलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य व मुलींना अनेक बंधनं. त्याचप्रमाणे स्त्रियांनी अनेक भूमिका व नात्यांमधून जबाबदारी पार पाडावी, आदर्श व सुसंस्कारी व्हावे, याकरिता लहानपणापासूनच संस्कार कुटुंबात केले जातात. घरातील कामे स्त्रियांनीच करावी आणि म्हणून नोकरी करणाऱ्या स्त्रियांना घरी येऊन सर्व कामे करावी लागतात.  पुरुष मात्र काही करीत नाही. त्यातूनच स्त्रियांविषयीच्या भेदभावपूर्ण वागणुकीला मान्यता मिळते. या वर्तनातूनच तो आत्मविश्वासी, साहसी पुरुष निर्माण होतो तर मुली भित्र्या व सहनशील.

२)  धर्म  : बहुतेक आधुनिक धर्म पुरुषप्रधान आहेत, जो पुरुषांचे प्रभुत्व म्हणजे ती परमेश्वराची इच्छा आहे असे मानतो. प्राचीन काळातील स्त्रीचे देवी हे रूप हळूहळू संपुष्टात येऊन देवांनी त्याची जागा घेतली. बहुतेक धर्म उच्च वर्ग वा उच्च जातीच्या पुरुषांनी निर्माण केले, परिभाषित केले व तेच त्यांच्यावर नियंत्रणही ठेवतात. त्यांनी नीतिशास्त्र, व्यवहार आणि इतकेच काय, कायद्याची परिभाषा प्रस्थापित केली. स्त्रिया व पुरुषांना त्यांचे कर्तव्य व अधिकार सांगितले. दोघांमधील नाते निश्चित केले. याचा शासकीय धोरणावर परिणाम होताना दिसतो. उदा. लोकशाही देश असतानाही भारतात विवाह, घटस्फोट व उत्तराधिकाराच्या बाबतीत कुठल्याही व्यक्तीची कायदेशीर ओळख त्याच्या धर्मावर अवलंबून असते. मुस्लीम महिलांच्या तलाकसारख्या प्रश्नामध्ये आजही कायद्याने न्यायालयातून घटस्फोट होत नाही. तीन वेळा तलाक म्हणण्याला ला मान्यता दिसून येते.

कुठल्याही प्रकारचा धर्म असू द्या, तो स्त्रियांना अपवित्र, कनिष्ठ आणि पापी मानत असतो. धर्मानेच व्यवहार आणि नतिकतेचे दुहेरी मापदंड बनविले आहेत,  स्त्रियांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या िहसेला धार्मिक कायदा योग्य मानतो. कट्टरतावादी सिद्धांताच्या आधारे असमान संबंधांना स्वीकृती आणि कायदेशीर दर्जाही मिळतो आणि समलिंगी संबंधांना मिळत नाही. स्त्रियांनी पतिव्रता असण्यासाठीही नियम असतात व अशा स्त्रियांना धार्मिक व चांगल्या मानण्याची पद्धत आहे.

३)  कायदा व्यवस्था : अधिकांश देशांत कायदा व्यवस्था पुरुषप्रधान आहे. याचा अर्थ तो पुरुष आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम वर्गाच्या पक्षात आहे. कुटुंब विवाह आणि उत्तराधिकारीसंबंधी कायदे पुरुषसत्तात्मक संपत्ती नियंत्रणाशी जोडलेले आहेत. दक्षिण आशियाच्या सर्व कायदा व्यवस्थेत पुरुष कुटुंबाचे प्रमुख व स्त्रियाचे स्वाभाविक संरक्षक आणि संपत्तीचे मुख्य उत्तराधिकारी मानले जातात. विधिशास्त्र, कायदा, न्याय व्यवस्था यात न्यायाधीश आणि वकील सर्व जास्तकरून आपले दृष्टिकोन व व्यवस्थेत पुरुषप्रधान मानसिकता ठेवतात.

४)  आर्थिक व्यवस्था आणि संस्था : पितृसत्ताक व्यवस्थेच्या अंतर्गत आर्थिक संस्था, आर्थिक संपत्ती, आर्थिक व्यवहारांवर पुरुष नियंत्रण ठेवत असतात. स्त्रियांना उत्पादन कार्याचा ना मोबदला दिला जातो ना त्याला महत्त्व असते. स्त्रियांच्या मेहनतीतून जे अतिरिक्त  उत्पादन होत असते किंवा बचत केली जाते तिला महत्त्व नसते, कौटुंबिक कामाचे तर मूल्यांकनच नसते आणि विशेष म्हणजे मुलांच्या पालनपोषणातील स्त्रीच्या भूमिकेला आर्थिक योगदानाच्या रूपात पाहिले जात नाही.

५)  राजकीय व्यवस्था आणि संस्था : ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत सर्व स्तरांवर सर्व राजकीय संस्थेत पुरुषांचे वर्चस्व आहे. देशाचे भवितव्य निर्माण करणारे राजकीय पक्ष व संघटनांमध्ये फक्त मूठभर स्त्रिया आहेत. काही  स्त्रियांनी राजकीय सत्ता मिळविली आहे (इंदिरा गांधी, बेनझीर भुत्तो, रजिया सुलतान, झाशीची राणी इ.). तेव्हा कमीत कमी सुरुवातीला त्याचे कारण शक्तिशाली राजकीय पुरुष नेत्याशी तिचे संबंध असू शकतात; मग तो पिता किंवा पित्याच्या रूपात असू शकतो, त्या सत्तेवर होत्या परंतु खुर्ची सांभाळून पुरुषांद्वारे निर्धारित नियम व व्यवस्थेमध्ये काम करीत होत्या. आपण अनेक ठिकाणी पाहतो की सरपंचपदावर स्त्रिया असतात, परंतु नियंत्रण मात्र पुरुषाचे असते. संसदेत स्त्रियांचे प्रमाण काही देशांत सोडून जगात कुठेही दहा टक्क्यांपेक्षा जास्त नाही.

६) प्रसार माध्यमे : वर्ग आणि िलगाशी निगडित पितृसत्ताक व्यवस्थेची विचारधारा पसरविण्यासाठी उच्च वर्ग आणि उच्च जातीच्या पुरुषांच्या हातात प्रसारमाध्यमे हे एक मोठे शस्त्र आहे. सिनेमा, टीव्ही, पत्रिका, नियतकालिके, रेडिओ या सर्व ठिकाणी स्त्रियांची तीच जुनी प्रतिमा दर्शविली जाते. विशेषत: चित्रपटात स्त्रियांच्या विरोधातील  िहसेचे भडक चित्रण केले जाते. दुसऱ्या क्षेत्राप्रमाणे प्रसारमाध्यमातही व्यावसायिक रूपात स्त्रियांची संख्या कमी आहे. स्त्रियांना या माध्यमांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही.

७) शिक्षण संस्था आणि ज्ञान व्यवस्था : जेव्हापासून ज्ञान व शिक्षाप्राप्तीला औपचारिक व संस्थागत रूप मिळाले तेव्हापासून शिक्षणावर पुरुषांनी आपला ताबा जमविला आहे. अध्यात्म, धर्मशास्त्र, विधि, साहित्य, कला आणि विज्ञान अशी सगळी क्षेत्रे पुरुषी वर्चस्वाखाली आहेत. पुरुषांच्या या आधिपत्यामुळे स्त्रिया ज्ञान, अनुभव, योग्यता आणि शिक्षण यात मागे पडतात. अनेक संस्कृतीत स्त्रियांना प्राचीन धार्मिक साहित्याच्या अध्ययनापासून वंचित केले आहे. आजही काहीच स्त्रिया अशा आहेत ज्या धार्मिक साहित्य व संहितांची व्याख्या करीत आहेत. पुरुषांनी स्त्री शक्तीच्या प्रमुख प्रतीकांवर आपले अधिकार जमविले आणि त्याचे रूप बदलविले. स्त्रीच्या अस्तित्वाच्या संकुचित यौनिक रूपाला पुरुषांवर अवलंबित करून त्याच्या आधारे धर्मशास्त्राचे निर्माण केले गेले आहे.

याच आधारावर आम्ही समाजामध्ये पुरुषांची प्रतिमा संपूर्ण व शक्तिशाली मानतो व  स्त्रियांची अपूर्ण, अशक्त अबला. अशा काल्पनिक रूपकांना आधार मानून पुरुषांनी आपल्या नजरेने प्रत्येक गोष्ट समजविली आणि ते पूर्ण सृष्टीचे केंद्र बनले.

पुरुषप्रधान शिक्षण आणि ज्ञान पितृसत्ताक विचारधारेला खतपाणी घालून पोसतात. असे शिक्षण स्त्री व पुरुषांच्या विचार व आकलन शक्तीत भिन्नता निर्माण करते, ज्यामुळे स्त्री आणि पुरुष वेगवेगळ्या पद्धतीने व्यवहार करतात, विचार करतात आणि आकांक्षा बाळगतात, कारण त्यांना स्त्री-पुरुष भेदभावाची भाषा शिकवली जाते. स्त्रियांबाबत होणारी िहसा ही या व्यवस्थेच्या नियमानुसार योग्य असते; ही एक मानसिकता आहे आणि ती लादलेली असते.

गरज आहे ही मानसिकता बदलण्याची, परिवर्तनाची. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. याकरिता या व्यवस्थेला आव्हान दिले पाहिजे, तेव्हाच स्त्री-पुरुष भेदभाव मिटेल व स्त्रियांविरोधातील हिंसाचाराला आळा बसेल.

लेखिका मुस्लीम समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यां आहेत. त्यांचा मेल

rubinaptl@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 3:33 am

Web Title: when stop exploitation of women
Next Stories
1 पितृसत्तेमुळेच स्त्रियांवर अन्याय
2 स्त्रियांसाठी कट्टरतावाद घातक
3 मुलींना समान अधिकार द्या
Just Now!
X