News Flash

पितृसत्तेमुळेच स्त्रियांवर अन्याय

मुस्लीमच काय कुठल्याही समाजात या ना त्या पद्धतीने पितृसत्ताक पद्धतीचा प्रभाव असतोच.

मुस्लीमच काय कुठल्याही समाजात या ना त्या पद्धतीने पितृसत्ताक पद्धतीचा प्रभाव असतोच. त्यातून स्त्रियांचे न्याय्यहक्क डावलले जातात, त्यांना स्वातंत्र्य राहत नाही. प्रत्येक देश व समाजातील स्त्रियांची या अनुभवांची पातळी वेगळी आहे, पण स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होत आहेत हे सत्य नाकारता येत नाही.

सुरुवातीला  पितृसत्ता  शब्दाचा अर्थ  कुटुंबात पित्याची किंवा  पुरुषाची सत्ता असा होत होता. तसेच पुरुषप्रधान समाज हा शब्द प्रचलित होता; परंतु आजकाल याच पुरुषसत्तेचा वापर शक्ती संबंध दर्शविण्यासाठी केला जातो आहे. जिथे पुरुष स्त्रियांचे दमन करतात किंवा ती व्यवस्था, जिथे अनेक प्रकारे स्त्रियांना खालच्या दर्जाचे मानले जाते व पुरुषांच्या हाती वर्चस्व असते. पुरुषसत्तेमुळे असमानता असते. माणूस म्हणून स्त्रीला तिचा अधिकार नाकारला जातो.

कोणत्याही जात, धर्म, वर्गाची स्त्री असू दे, रोजच्या जीवनात अनेक माध्यमांतून स्त्रिया दुय्यम दर्जा अनुभवत असतात. कुटुंब, कामाचे ठिकाण आणि समाजामध्ये आमच्यावर होणारा भेदभाव, अपमान, नियंत्रण, शोषण, अन्याय आणि हिंसा अशी त्याची अनेक रूपे आहेत. पितृसत्तेचे छोटे-मोठे स्वरूप असू शकते. स्त्रीवादी चळवळीच्या माध्यमातून पितृसत्तेचा बारकाईने अभ्यास केला जात आहे आणि त्यातून त्याला आम्ही आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही मुस्लीम महिला मंचाद्वारे एक कार्यशाळा आयोजित केली. त्यात मुस्लीम स्त्री कार्यकर्त्यां महिला उपस्थित होत्या. आम्ही पितृसत्तेवर जेव्हा चर्चा करायला सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम त्यांना पितृसत्ता काय आहे याची थोडी कल्पना दिली.

कार्यशाळेच्या प्रसंगी जेव्हा मुस्लीम स्त्रियांना प्रश्न विचारले गेले की, पितृसत्ता आमच्या समोर कशा प्रकारे येत असते? आम्ही आपल्या जीवनात त्याला ओळखू शकतो का? यावर बसलेल्या स्त्रियांपकी अनेक स्त्रियांनी उत्तरे दिली. त्यातील प्रत्येक उदाहरणात एक प्रकारच्या भेदभावाचे पितृसत्ताक रूप मुस्लीम समाजात दिसून येते.

मी असे ऐकले आहे की, माझ्या जन्माच्या वेळी माझ्या कुटुंबातील लोक फार दु:खी होते. त्यांना मुलगा हवा होता. (वंशाचा दिवा म्हणून मुलाला महत्त्व) माझ्या भावांना खायला मागायचा अधिकार होता. त्यांना हवे ते हाताने घेता येत असे, परंतु आम्हाला म्हटले जात असे की, जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत वाट बघा. आम्ही बहिणी शिल्लक खरकटय़ावर काम चालवायचो. (अन्नाच्या वाटपामध्ये मुलीबरोबर भेदभाव) मला घराच्या कामामध्ये आईला मदत करावी लागते. भाऊ काही करीत नाही. (घरगुती कामाचे स्त्रिया व मुलींवर ओझे) शाळेत जायला संघर्ष करावा लागत होता. माझ्या आई-वडिलांना वाटायचे की, आम्हाला शिक्षणाची काही गरज नाही.  मी मत्रिणींना भेटायला किंवा खेळायला बाहेर जाऊ शकत नाही. (मुलींच्या स्वातंत्र्यावर अंकुश) मला बुरखा घालायचे बंधन आहे. परपुरुषांना चेहरा दिसणे पाप आहे, असे सांगितले जाते. धार्मिक दंगलीत आमच्यावर बलात्कार करण्यात येतो. मी सरकारी दवाखान्यात प्रसूतीकरिता गेले असताना ‘कितने बच्चे पदा करेंगी?’ अशी अपमानास्पद वागणूक दिली जाते. मी जेव्हा हिंसेला कंटाळून माहेरी आले तेव्हा समाजातील मंडळींनी, नातेवाईकांनी मला परत जावयास सांगितले. माझे भाऊ रात्री कितीही वाजता घरी येऊ शकतात, परंतु मला अंधार पडायच्या आधी घरी परत यावे लागते. (मुलींच्या स्वातंत्र्यावर, येण्या-जाण्यावर बंधन) माझे वडील माझ्या आईला अनेक वेळा मारायचे (कौटुंबिक हिंसा). माझ्या भावाचे तर वडिलांपेक्षाही वाईट विचार होते. त्यांना कुठल्याही मुलाशी मी बोललेले आवडत नसायचे. (मुलींवर, स्त्रियांवर पुरुषाचे नियंत्रण) मी माझ्या अधिकाऱ्याची मागणी पूर्ण करायला तयार नव्हते म्हणून नोकरीतून काढून टाकण्यात आले. (कामाच्या ठिकाणी लैंगिक हिंसा) माझ्या वडिलांच्या संपत्तीत माझा वाटा नाही. माझा पतीच्याही संपत्तीत माझा वाटा नाही. खरे तर असे कुठलेही घर नाही ज्याला मी आपले म्हणू. (स्त्रियांचा संपत्तीत अधिकाराचा अभाव) माझ्या पतीची जेव्हा लहर येईल तेव्हा माझे शरीर त्याला द्यावे लागत असे. नाही तर तो जबरदस्ती करायचा. माझ्या इच्छेला काही महत्त्व नाही. मला या संबंधाची भीती वाटते. मला जरादेखील आवडत नाही. (स्त्रियांचे शरीर व तिच्या लैंगिकतेवर पुरुष नियंत्रण) मला गर्भनिरोधकाचा वापर करावा असे वाटते, परंतु पतीने नाही म्हटले. मला ऑपरेशनचीदेखील परवानगी दिली नाही. (जननक्षमतेवर नियंत्रण किंवा प्रजनन अधिकाराचा अभाव) इस्लाम में बच्चे अल्लाह की देन है, असे सांगण्यात येते. संस्कृतीच्या नावाखाली आम्हाला ‘पावित्र्य’, ‘नापाक’ व पतिव्रता शौहर निम्मेखुदा शब्दांमध्ये गुंतवून ठेवले जाते. (पुरुषप्रधान संस्कृती)

मी पोलिसांत गेले, न्यायालयात केस टाकली, परंतु त्यांनी माझ्या पतीचीच बाजू घेतली. माझ्या पतीवर कुठलीही कारवाई झाली नाही. (पोलीस व न्यायाधीशांची पितृसत्ताक मानसिकता.)

जेव्हा आम्ही या वेगवेगळ्या तुकडय़ांमधून आलेल्या उदाहरणांतील अनुभवांवर गंभीरपणे विचार करतो तेव्हा एक चित्र डोळ्यासमोर येते. ते असे की, यातील प्रत्येकीला जीवनात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात भेदभावाचा सामना करावा लागला. मुले व पुरुषांच्या तुलनेत कनिष्ठ व निम्न दर्जाचा अनुभव आला. त्यातून या स्त्रियांचा आत्मविश्वास नष्ट झाला. आमच्या इच्छा, आकांक्षा व स्वप्नांच्या पंखांना पुरुषसत्ताक पद्धती कापून टाकते. आम्हाला पुरुषांच्या तुलनेत कमी लेखणाऱ्या प्रथा, रूढी व कायदे सर्व ठिकाणी दिसून येतात. उदा. आमचे कुटुंब, विवाह, सामाजिक संबंध, धर्म, कायदा, शाळा, पुस्तके, जनसंचार माध्यमे, राजकीय व्यवस्था, कारखाने, कामाचे ठिकाण इ. संस्थांमधून  पितृसत्ताक  मानसिकतेला बळकटी मिळते.

कार्यशाळेत स्त्रियांनी दिलेल्या उत्तरांतून जे अनुभव समोर आले ते ऐकल्यानंतर हे लक्षात येते की, स्त्रियांबरोबर होणारा हा भेदभाव हा तिच्या नशिबाचा भाग  नाही किंवा अपवादात्मक एक-दोन दुष्ट पुरुषांमुळे ही परिस्थिती नसून हे सगळे एका व्यवस्थेचा भाग म्हणून स्त्रियांविरोधात केले जाते. पुरुषप्रधानता आणि पुरुष नियंत्रणामुळे जिथे स्त्रियांचा सन्मान राहत नाही त्यांना अधिकार मिळत नाहीत.

पितृसत्ता आमच्या सभोवताली आम्हाला आढळून येते काय? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पितृसत्ता हा शब्दच आपल्या आतमध्ये तो अर्थ समाविष्ट करून घेतो. स्त्रीवादी याला धारणा म्हणून संबोधतात. या व्यवस्थेत ही मानसिकता जोडलेली आहे की, पुरुष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. स्त्रियांनी संपत्तीप्रमाणे पुरुषांच्या नियंत्रणात राहायला हवे. काही दक्षिण आशियाई भाषांमध्ये पतीकरिता वापरल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये स्वामी, शौहर, पती, मालिक, साहेब, हजबंड इ. आहे. हे शब्दच श्रेष्ठ-कनिष्ठ भेदभाव दर्शवितात. त्यांच्या परिभाषेमध्येच असमानता दिसून येते.

पितृसत्तेचे स्वरूप सर्व ठिकाणी एकसारखे असते का? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये असे म्हणता येईल की, नाही. सर्व ठिकाणी याचे स्वरूप एकसारखे नसते. इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडांत विभिन्न समाज किंवा त्या समाजातील विभिन्न वर्गात याचे रूप वेगवेगळे असेल, परंतु ढोबळमानाने  तीच राहत असते. पुरुषांचे नियंत्रण तर असतेच, मात्र पद्धती वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, आमच्या आज्यांचे आणि आमचे पितृसत्तेविषयी अनुभव एकसारखे नाहीत. आदिवासी स्त्रिया व उच्च जातीच्या स्त्रियांच्या अनुभवात फरक दिसून येतो. अमेरिकेत राहणाऱ्या स्त्रिया व भारतात राहणाऱ्या स्त्रियांच्या अनुभवात भिन्नता असते. मुस्लीम स्त्रिया व हिंदू स्त्रियांचे अनुभव वेगवेगळे असतील; परंतु परिणाम सारखाच असतो.

प्रत्येक सामाजिक व्यवस्थेत आणि ऐतिहासिक कालखंडात पितृसत्तेचे एक नवीन रूप समोर येत असते, ज्याअंतर्गत सामाजिक, सांस्कृतिक परंपरेत फरक दिसू शकतो; परंतु जसे वर उल्लेखिलेल्याप्रमाणे पितृसत्तेचे सिद्धांत तेच असतात- दमन, शोषण आणि नियंत्रणाचे.

पितृसत्ताक  व्यवस्थेचे कोणकोणत्या गोष्टींवर नियंत्रण असते? या प्रश्नाचे उत्तर असे की, स्त्रियांच्या जीवनातील उत्पादन किंवा श्रमशक्तीवर नियंत्रण, प्रजनन शक्तीवर नियंत्रण, स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण, गतिशीलतेवर नियंत्रण, संपत्ती व आíथक संसाधनावर नियंत्रण आणि हे नियंत्रण जवळपास सर्व आíथक, राजनतिक, धार्मिक व सामाजिक संस्थांवर प्रभाव टाकत असते. जागतिक स्तरावर स्त्रीवाद्यांनी पितृसत्ताक  व्यवस्थेला आव्हान देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणारे कार्यकर्ते, संस्था, संघटना, चळवळींना अधिक काम करणे आवश्यक आहे.

या कार्यशाळेत सुधारणावादी, परिवर्तनवादी विचार मांडण्यात आले. चच्रेतून कार्यकर्ते जागृत होत आहेत असे वाटले. वेगवेगळ्या संस्थांतर्गत उदा. कुटुंब, धर्म, राजकीय व्यवस्था यावर प्रभाव टाकणाऱ्या पितृसत्ताक

मानसिकतेला समजून घेणे आवश्यक आहे. स्त्रियांनी दमन, शोषण व हिंसेच्या विरोधात लढण्याची गरज आहे. काही स्वत:च्या घरातून, कुठे लिखाणाच्या माध्यमातून, कुठे आंदोलन करून, कुठे न्यायालयात तर कुठे प्रसारमाध्यमांतून  पितृसत्ताक  हिंसेचा विरोध करणे आवश्यक वाटते.

 

रुबिना पटेल

लेखिका मुस्लीम समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यां आहेत.

त्यांचा ई-मेल ; rubinaptl@gmail.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2016 3:50 am

Web Title: why men and women are so different in society
Next Stories
1 स्त्रियांसाठी कट्टरतावाद घातक
2 मुलींना समान अधिकार द्या
3 शरियत कायद्याची वास्तविकता
Just Now!
X