16 February 2019

News Flash

वृद्ध निवासाचे पर्याय

वाढत्या आयुष्यातला एक एक दिवस हा नवनवीन समस्या घेऊन येणार आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. रोहिणी पटवर्धन

एका ठरावीक वयानंतर वृद्धांसमोर आपल्या जोडीदाराबरोबर किंवा आपण एकटे स्वतंत्र राहू शकत नाही तेव्हा कुठे राहायचे, हा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा काय करायचे? आपल्याला कोण मदत करू शकेल? आपल्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जातील का? प्रश्नांमागून प्रश्न निर्माण होत राहतात. त्यासाठी वृद्धाश्रमाव्यतिरिक्त वृद्धनिवासाचे इतर काही पर्याय..

दर पाच वर्षांनी आपले आयुष्य एक वर्षांने वाढते आहे. या वाढत्या आयुष्यातला एक एक दिवस हा नवनवीन समस्या घेऊन येणार आहे. कारण हा दिवस ७५ वर्षांच्या आयुष्यानंतरचा आहे. आत्ता जे ५० वर्षांचे आहेत त्यांनी किंवा खरं तर प्रत्येकाने जर आपल्या स्वत:ला एक प्रश्न विचारला की माझ्या ७० व्या वर्षी मी कुठे असेन? आणि कसा असेन? (खरंच आपण सर्वानी एक क्षणभर हा विचार करावा आणि त्याचे उत्तर कुठे तरी लिहून ठेवावे.) लिहून मला दिले तर उत्तमच! हा विचार केल्यानंतर मला नक्की माहिती आहे की आपण ठामपणे मी माझ्या घरीच असेन, असे सांगू शकणार नाही, कारण आपली काळजी नक्की कोण घेईल हे कसे सांगणार? अर्थात मनोमन आपली इच्छा अशीच असणार की मी माझ्या घरी, मुला-नातवंडांबरोबर असावे.

खरे तर जेव्हा आपल्या जोडीदाराबरोबर किंवा आपण एकटे स्वतंत्र राहू शकत नाही तेव्हा कुठे राहायचे, हा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा काय करायचे? आपल्याला कोण मदत करू शकेल? आपल्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जातील का? प्रश्नांमागून प्रश्न निर्माण होत राहतात. हे प्रश्न व्यक्तीच्या आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीशी निगडित असतात. तसेच ते स्थानसापेक्षही असतात. उदाहरणार्थ शहरात राहणाऱ्या वृद्धांचे प्रश्न खेडेगावात राहणाऱ्या वृद्धांच्या प्रश्नांपेक्षा वेगळे असतात.

वृद्धाश्रमाव्यतिरिक्त वृद्धनिवासाचे इतर काही पर्याय निर्माण करता येतील का याचा खूप विचार मी केला. ते पुढीलप्रमाणे –

गृहसंकुल

– वृद्धांच्या निवास, आहार, सुरक्षा आणि आरोग्याचा विचार करून स्वतंत्रपणे वृद्धांची गृहनिर्माण संस्था किंवा कॉलनी निर्माण केली जाते. या प्रकारच्या संस्था मोठय़ा शहरांमध्ये निर्माण झाल्या आहेत. त्या लोकप्रिय झाल्या आहेत. वृद्धांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे लहानमोठी सदनिका विकत घेऊन तेथे राहायचे. अशा गृहनिर्माण संस्थांमध्ये नोकरांची उपलब्धता, सुरक्षा व्यवस्था, गरजेप्रमाणे स्वतंत्र स्वयंपाक अथवा भोजनाची सोय उपलब्ध असणे, औषधांचे दुकान, डॉक्टर या सोयी असल्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण होतात. त्यामुळे किमान मानसिक शांतता मिळते. अथश्री, गोल्डन नेस्ट, आशियाना उत्सव ही याची उदाहरणे सांगता येतील.

वृद्धांची गटनिवास व्यवस्था

‘वृद्धत्व’ ही अचानक उद्भवणारी परिस्थिती नाही. वृद्धाश्रमाचा पर्याय कोणालाही सहजासहजी मनापासून स्वीकारावासा वाटत नाही. म्हणूनच याला पर्यायाचा शोध घ्यायला हवा. हा शोध वयाच्या ४५-५०व्या वर्षांपासून घ्यायला हवा. आपले नातलग, मित्रमैत्रिणी यांच्यातून आपल्या विचारांशी, जीवनशैलीशी मिळत्याजुळत्या व्यक्तीचा शोध घ्यायला हवा. अध्र्या रात्री हाक मारता येईल आणि हाक मारली तर येतील असे किमान दोन तरी ऋणानुबंध आपण निर्माण करायला हवेत व ते टिकवायला हवेत. यासाठी आपलीही अध्र्या रात्री दुसऱ्यासाठी जाण्याची तयारी हवी. आपल्या सेकंड इनिंग अर्थात म्हातारपणाबद्दल मोकळेपणाने चर्चा करायला हवी. त्यातून आपल्याला इतरांची मते कळू शकतात. त्यासाठी खोटा अभिनिवेश आणून माझी मुले कशी चांगली अशी चर्चा न करता सत्य परिस्थिती मान्य करून एकमेकांची सुखदु:खे जाणून घेतली पाहिजेत. मुलाचे, मुलीचे लग्न झाले की साधारण दोन-चार वर्षांत आपल्याला आपण त्यांच्याबरोबर राहू शकू किंवा नाही याचा अंदाज येऊ शकतो. तेव्हापासून आपण वृद्धापकाळाचे नियोजन करावे व समविचारी लोकांनी एकत्र येऊन राहावे. अशा चार-पाच लोकांनी एकत्र राहायचे ठरवले तर मग एकाच्या घरात राहून, दुसऱ्याचे घर भाडय़ाने देऊन त्या भाडय़ाच्या उत्पन्नातून व स्वत:च्या उत्पन्नातून सेवक ठेवता येतील व चांगले आयुष्य जगता येईल. अशा चार माणसांना एक दिवसभराचा सेवक, एक स्वयंपाकी आणि शक्य तर ड्रायव्हरसुद्धा परवडू शकतो. कारण वाढत्या वयात अन्नधान्य किंवा खाण्यापेक्षा औषधे आणि सेवा यांच्यावर खर्च अधिक होतो. त्यामुळे सेवकांना चांगला पगार देणे आवश्यक ठरते व शक्यही होते. चार-पाच जण एकत्र राहिल्याने सुरक्षिततेचा प्रश्नही सोपा होतो. अर्थात, यासाठी एकमेकांशी पटणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. सुप्रसिद्ध लेखिका सरोजिनीबाई वैद्य यांच्या मातोश्री व मामा-मामी यांनी असा या प्रकारचा प्रयोग केला होता व तो चांगला उपयोगाचा झाला, असे म्हणायला हरकत नाही. पाहिजे तर या प्रकारे प्रायोगिक तत्त्वावर राहून पाहावे व मग अंतिम निर्णय घ्यावा.

खेडय़ाकडे जाऊ या

ग्रामीण भागात राहण्याचे जे फायदे आहेत, त्यांचा उपयोग शहरातील वृद्ध लोकांना घेता आला तर वृद्धांचे आयुष्य खूप मोठय़ा प्रमाणात शांततेत व समाधानात जाऊ शकेल. मोठय़ा शहराजवळच्या तीस-चाळीस मैलांच्या परिघातल्या, जिथे एसटी किंवा बसची समाधानकारक सोय आहे, अशा गावाची निवड यासाठी करता येईल. ज्या वृद्ध जोडप्यांची प्रकृती चांगली आहे अशा वृद्धांनी शहरातली कमी जागा, वाहनांची गर्दी, प्रदूषण, नोकर न मिळणे यांसारख्या अडचणी सोसत राहून शहरांवरचा भार वाढविण्यापेक्षा अशा गावात भाडय़ाने जागा घेऊन अथवा एखाद्या गरजू कुटुंबाजवळ राहून आपल्या आयुष्यातील काही दिवस शुद्ध हवापाण्यात घालवले तर डॉक्टरांची गरजसुद्धा कमी होईल. शहरातील वृद्ध डॉक्टरांनी प्रॅक्टिस बंद केल्यावर अशा छोटय़ा गावात राहायचे ठरवले तर सोन्याहून पिवळे. अशा गावात राहून आपल्या शिक्षणाचा, अनुभवाचा लाभ जर स्थानिक लोकांना करून दिला तर शहराकडे येणाऱ्यांचा लोंढा थोडा कमी करता येईल.

गृहप्रकल्पामध्ये राखीव जागा

मोठमोठय़ा शहरांमध्ये सध्या १००-१५० सदनिकांचे गृहप्रकल्प बांधले जातात. तिथे क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक यांसारख्या सोयी करतात. पुण्याच्या आयुक्तांनी अलीकडे गृहनिर्माण नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये नोकरांसाठी काही खोल्या असणे आवश्यक ठरणार आहे. पण त्याहीपेक्षा मला असे वाटते की गृहसंकुलामध्ये खालच्या मजल्यावर मध्यवर्ती ठिकाणी २००-२५० चौरस फुटांचे छोटे घरकुल असावे त्यात एक खोली, स्वच्छतागृह आणि छोटासा ओटा इतक्या सोयी असाव्यात. या खोल्यांच्या किमतीही अर्थातच मर्यादेत असतील. या खोल्या ६० वर्षांवरील वृद्धांनाच विकत घेता येतील. तेथे वृद्ध व्यक्तींनाच राहता येईल असे बंधन असावे म्हणजे वृद्धांची चांगली सोय होईल. वृद्धांना सर्व वयाच्या लोकांबरोबर राहता येईल. सोसायटीतल्या मुलांनाही गोष्टी सांगायला आजी-आजोबा असतील. एका अर्थाने आदर्श आणि वास्तवात येण्यासारखी अशी ही वृद्ध निवासाची व्यवस्था होऊ शकते. परिस्थितीप्रमाणे सोसायटीमध्येच वृद्धांची मुले राहात असली तर पाहिजे तर जवळ, पाहिजे तर पुरेसे लांब अशी ही व्यवस्था होऊ शकेल. परावलंबी वृद्धांसाठी स्वतंत्र मदतनीसाची नेमणूक करायची म्हटली तरी सुना-मुलांना जाता-येता लक्ष ठेवता येईल. क्लब हाऊसची सोय देणाऱ्या गृहसंकुलात तीच एजन्सी वृद्धांची जेवणखाणाची सोय ही थोडय़ाफार गरजेच्या वेळी किंवा नियमितपणेसुद्धा करू शकेल.

टाऊपशिपमध्ये राखीव जागा

मोठय़ा शहरांच्या आजूबाजूला सेझ, टाऊनशिपचे पीक फार जोरात फोफावते आहे. त्यांनीही वृद्धांच्या गरजांचा विचार करून वृद्धनिवासाच्या सोयी उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होईल इतकेच नव्हे तर त्याला अनिवासी भारतीयांकडून खूप प्रतिसाद मिळेल, कारण त्यांना आपल्या आई-वडिलांची चांगली सोय व्हावी असे वाटत असते. पैसे ही अडचण नसते. या मोठय़ा बिल्डर्सना ‘वृद्ध’ या घटकापासून चांगला फायदा होऊ शकतो. फक्त इथेही ‘गुणवत्ता’ हाच मुख्य मुद्दा लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

एकूणच काय तर अडचणींचे आणि बदलत असलेल्या परिस्थितीचे रडगाणे गात बसण्यापेक्षा स्वत: स्वत:ला पटेल, असा मार्ग निवडला पाहिजे. त्यासाठी गरज आहे ती दृष्टिकोन बदलण्याची, सत्याला सामोरे जाण्याची.

rohinipatwardhan@gmail.com

First Published on July 7, 2018 1:01 am

Web Title: article about living option for senior citizen