25 March 2019

News Flash

वृद्धकल्याणाचं शास्त्र

वय वाढणं म्हणजे नक्की काय होतं?

जत्रेतल्या उंच पाळण्यामध्ये बसून वर जाताना आजूबाजूचं सर्व छोटं छोटं होत जातं आणि क्षणात खाली येताना सर्व जवळ जवळ येतं आहे असं वाटतं. मग हे दूर जाणं खरं? की जवळ येणं खरं? दोन्ही गोष्टी खरं तर खोटय़ाच असतात. कारण जग जिथल्या तिथेच असतं! प्रश्न असतो तो जाणं आणि येणं यातली तात्कालिकता समजून घेण्याचा आणि मग सत्य जाणण्याचा! पण यासाठी एक ‘समज’ निर्माण होण्याची गरज असते. वृद्धत्वाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल.

वय वाढणं म्हणजे नक्की काय होतं? वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीरातली ताकद कमी होत जाते की होत नाही? हळूहळू मन हळवं बनतं की घट्ट बनतं? रोजच्या आयुष्यात पैशाचं महत्त्व कमी होतं की वाढतं? घरातल्यांना आपण सल्ला द्यावा की नाही?.. साठीनंतर असे अनेक प्रश्न मनात येऊ लागतात. काहीसं गोंधळल्यासारखं होतं. याचा अनुभव अनेक ज्येष्ठांना येतो. मात्र वाढत्या वयाबरोबर होणारे शारीरिक व मानसिक बदल, या वयात जाणवणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय/मार्गदर्शन या सर्व गोष्टींची माहिती आपल्याकडे उपलब्ध नसते, असं म्हणावं लागतं.

ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था-संघटनांमध्ये मी गेली २० वर्षे लेखन, व्याख्यानं, कार्यशाळा, प्रशिक्षण अशा विविध माध्यमांतून काम करते आहे. अशाच एका व्याख्यानानंतर सत्तर वर्षांच्या आजींनी मला प्रश्न विचारला, ‘या वाढलेल्या वयाचं, पुढच्या आयुष्याचं करायचं तरी काय?’ मला त्यांचा प्रश्न आवडला तो दोन कारणांमुळे. आज आयुष्यमान वाढलं आहे – अनपेक्षितपणे वाढलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं आणि पुढच्या आयुष्यात काय करावं हे त्यांना कळत नव्हतं हे त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं होतं. आपण इतकं जगू अशी कल्पना नसल्यामुळे त्यासाठी नियोजन करावं लागेल याचा विचार स्वत: ज्येष्ठांनी केलेला नसतो. यापूर्वी माणसं इतकी जगत नव्हती. त्यामुळे आधीच्या पिढीतल्या वयस्करांचा अनुभवही नसतो. राज्यकर्ते व समाजातील इतर घटकांच्या दृष्टीनेही ‘ज्येष्ठ’ महत्त्वाचे नसतात. इतकंच नव्हे, तर स्वत: ज्येष्ठांनाच या परिस्थितीचा गंभीरपणे विचार करावा, अशी इच्छा असल्याचं जाणवत नाही. त्यामुळे आजच्या घटकेला ज्येष्ठांसंबंधी फारसे मार्गदर्शन उपलब्ध नाही.

‘वृद्धाश्रमांचं व्यवस्थापन’ या विषयावर पीएच.डी.साठी संशोधन सुरू केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, भारतीय ज्येष्ठांसंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्या वेळी मनात विचार आला की, भारतातील ज्येष्ठांबद्दल माहिती उपलब्ध करून द्यावी. ज्येष्ठांच्या संस्थांच्या माध्यमातून अलीकडे थोडीफार माहिती उपलब्ध होते आहे, पण ती प्रामुख्याने आरोग्य आणि अर्थनियोजन या स्वरूपाची आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या प्रश्नावर थेट मुळापर्यंत जाऊन माहिती करून घेण्याची गरज आहे, असं प्रकर्षांने जाणवलं. बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे घरामध्ये, कुटुंबामध्ये ज्येष्ठांचा प्राधान्यक्रम शेवटचा होत चालला आहे. सरकार बालकल्याणाची जबाबदारी नीट पेलण्याचा प्रयत्न करत आहे, त्यात ते वृद्धकल्याणापर्यंत कधी पोहोचतील ते सांगता येत नाही. अशा वेळी ज्येष्ठांनीच आपापल्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, हे सत्य ज्येष्ठ जेवढय़ा लवकर जाणतील तेवढय़ा लवकर ज्येष्ठकल्याणाचा मार्ग त्यांना सापडेल. त्यासाठी त्यांनी मानसिकता बदलण्याची, स्वत: पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, हा एक प्रकारे बदल घडवणारा विचार मला या लेखाद्वारे पोहोचवायचा आहे. वृद्धांच्या समस्या सोडवण्याचा कोणताच मार्ग सध्या उपलब्ध नाही. नुसतं सरकारी धोरण जाहीर करून किंवा कायदे करून उपयोग होत नाही, त्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ज्येष्ठांना प्रशिक्षण देणं अत्यावश्यक आहे. असा सर्वस्वी नवा दृष्टिकोन म्हणजे ‘आपल्यासाठी आपणच’ या तत्त्वाचा स्वीकार करणं अगत्याचं आहे. हा नवा विचार रुजवणं हा लेखमाला लिहिण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

ही लेखमाला म्हणजे काय करा किंवा काय करू नका अशा प्रकारचा निव्वळ सल्ला देणारी नाही. वस्तुस्थिती जाणून आत्मपरीक्षणातून बदलांचा विचार करण्यासाठी प्रवृत्त करणं, त्यासाठी यंत्रणा निर्माण करणं आणि त्यानंतर त्यातून प्रत्यक्ष कार्य करायला ज्येष्ठांना तयार करणं असा ज्येष्ठकल्याणाचा मार्ग सुचवणारं हे सदर आहे. वृद्धांचे प्रश्न हे फक्त त्यांचे प्रश्न नाहीत, तर ते त्यांच्याशी निगडित असणाऱ्या प्रत्येक लहानथोर व्यक्तींचे असतात. शिवाय ते समाजाचे आणि धोरणकर्त्यांचेही असतात; पण प्रत्यक्षात मात्र स्वत: वृद्धांसकट कोणालाच ते त्यांचे प्रश्न वाटत नाहीत. विचार नाहीत, मार्गदर्शन नाही आणि म्हणूनच कृती नाही अशी एक प्रकारची ‘थंड’ स्थिती वृद्धांबाबत जाणवते.

जागतिक वृद्ध दिन, ज्येष्ठ नागरिक संघटना, कधीमधी (निवडणुकांच्या आगेमागे) वृद्धांचे मेळावे, त्यांची संमेलनं अशा उत्सवी स्वरूपात काहीशी हालचाल दिसायला लागली आहे; पण प्रश्नाच्या थेट मुळापर्यंत हे प्रयत्न जायला हवेत. त्यासाठी सर्वच घटकांमध्ये जागरूकता आणि कृतिशीलता निर्माण करण्याची गरज फार मोठी आहे. त्या दृष्टीने या सदरात लेखांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला जाईल.

वृद्धसंख्येच्या आव्हानाचे आवाज जवळ जवळ येत आहेत. कधी आदर्शाच्या जीवनगाथेतून, कधी विचारमंथनातून, कधी कधी अनुभवातून तर कधी अनुभूतीतून आपण या साऱ्या पैलूंचा अभ्यास करणार आहोत. प्रतिसाद आणि प्रतिक्रिया ही दोन चाके हा प्रवास पुढे नेणार आहेत.

‘चतुरंग’ने तयार केलेली ही सजग पिढी वेगळ्या विचारांची ही पालखी पुढे नेईल असा विश्वास वाटतो.

 

डॉ. रोहिणी पटवर्धन

rohinipatwardhan@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on January 6, 2018 5:15 am

Web Title: articles in marathi on geriatric care management