|| डॉ. रोहिणी पटवर्धन

विदेशवारी आता नवलाईची गोष्ट राहिली नाहीये. मी (सुद्धा) मे महिन्यात अमेरिकेला म्हणजे सध्याच्या भाषेत ‘यूएस’ला गेले होते. अर्थात डोक्यात कायम वस्ती करून असलेला ‘ज्येष्ठ’ हा विषय बरोबर होताच. वेगवेगळ्या देशाच्या पाककृतींचा आस्वाद, मॉल्सना भेटी, प्रेक्षणीय स्थळे सारं काही यथासांग चालू होतं, पण मन मात्र ‘ज्येष्ठ’ टिपत होतं.

स्वाती आणि राजेश्वरी या तिथल्या मराठी मंडळाच्या सभासदांच्या प्रयत्नांमुळे तिथे साजऱ्या होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यामध्ये ‘एनजीओ’ म्हणून सामील होता आले. ज्येष्ठांच्या सोयी-सवलतींबाबत अमेरिकेमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की, ज्येष्ठांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणारी एक प्रकारे आदर्श म्हणावी अशी व्यवस्था तिथे आहे. तर आपल्या इथे या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत हेच मुळात स्पष्ट नाही. त्यामुळे बऱ्याच सोयी-सुविधांचा अभाव आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी जुजबी आणि गुणवत्तेचा अभाव असलेल्या आहेत. पण याही बाबतीत लक्षात आले की, सर्वच गोष्टी करणे केवळ सुबत्तेमुळेच शक्य होते आहे असे नाही तर खूप काही जाणीव निर्माण होण्यावर आणि नव्या दृष्टिकोनाचा स्वीकार करून कृतिशील होण्यावर अवलंबून आहेत.

अमेरिकेतल्या वानप्रस्थाश्रम – सिनीअर लिव्हिंग, आधारगृह, असिस्टेड लिव्हिंग, सुश्रूषागृहे, नर्सिग होम्स, विरंगुळा केंद्र, रिक्रिएशन सेंटर्स आणि पाळणागृहे, डे केअर सेंटर्स, या सर्वाची माहिती करून घेता आली, भेटी देता आल्या ही माझ्यासाठी फार मोलाची गोष्ट होती. व्यक्तीमध्ये प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या बदलानुसार सर्व गरजा पूर्ण करणाऱ्या सोयी त्या त्या प्रकारच्या निवास व्यवस्थेत असतातच. त्याचप्रमाणे ‘एिजग इन प्लेस’ म्हणजे आपल्याच घरी राहायचे असेल तरी घरी अन्न पोचविणे, किराणामाल आणून देणे, डॉक्टरांकडे, शॉिपगला बरोबर जाणे, औषधे आणणे आणि देणे, आंघोळ घालणे या सर्व सेवा उपलब्ध असतात आणि या सर्वाची व्यवस्था पाहण्यासाठी केअर मॅनेजरही असतात. तेथे उपलब्ध असणाऱ्या एकूण सेवांचा जर विचार केला तर ६०च्या वर सेवाक्षेत्रे उपलब्ध आहेत असे लक्षात येते. त्यामध्ये गरजा कमी झाल्या की छोटय़ा घरात जायचे असेल, कायदेविषयक मार्गदर्शन, नोकरीच्या संधी, वृद्धांचा छळ होत असल्यास मदत केंद्रे, घरगुती उपकरणे, घराची वयानुरूप दुरुस्ती किंवा फेररचना, निरंतर शिक्षण केंद्रे, केअर टेकरचा स्वमदत गट, रिव्हर्स मॉर्टगेज मार्गदर्शन, व्हॉलेंटीयरिंगच्या संधी (किती म्हणून सेवांची नावे घ्यावीत) यासारख्या सेवांचा समावेश आहे. एकूण काय; तर ज्येष्ठ हा समाजाचा भाग आहे त्याच्या म्हणून काही वेगळ्या गरजा आहेत याची जाणीव मोठय़ा प्रमाणात आढळते आणि या गरजांचा फायदा घेऊन अनेक उद्योग भरभराटीला आलेले आहेत. हेच प्रामुख्याने लक्षात येते.

अशा संस्थांची नुसती नावं पाहिली तरी ते पुरवत असलेल्या सेवा-सुविधांबद्दल खूप माहिती मिळते. केंडली इंडिपेंडंट सिंपथॅटिक हेल्प, कंफर्ट कीपर्स, मिनिट मेन, प्लेझर टू हेल्प यू या सर्वामध्ये मला संस्था विशेष वाटल्या. त्यातली एक ‘सहेली’ साऊथ आशियातल्या स्त्रिया आणि कुटुंबांसाठी काम करणारी ही संस्था आहे. त्या संस्थेला आम्ही भेट दिली. त्या भारतीय स्त्रियांना जो त्रास दिला जातो त्याच्याविरोधात मोलाचे काम ते करतात. वृद्ध स्त्रियांनाही मदत करतात.

मी ज्या प्रकारच्या स्वयंप्रेरित संस्था किंवा व्यक्ती ज्येष्ठांसाठी काम करू शकतात, असे पुन्हा पुन्हा प्रतिपादन करते तशी ‘नेबर ब्रिगेड’ तेथे आहे. ती संस्था गरज असलेल्यांना जेवण घरपोच करते, डॉक्टरांकडे घेऊन जाणे, घर आवरणे अगदी तुमच्या पाळीव प्राण्याला फिरवून आणण्यापर्यंत सर्व सेवा व्हॉलंटीयर्सच्या मदतीनेच करते. ‘अल्झायमर अ‍ॅसोसिएशन मेंटेन युवर ब्रेन’ या माध्यमातून काम करते.

हे सर्व आपल्या इथे सहज शक्य आहे. कारण आपल्याकडे धड धाकट, बुद्धिवान, कौशल्यवान आणि ज्ञानसमृद्ध सेवानिवृत्तांची संख्या प्रचंड मोठी आहे, पण करण्याच्या इच्छेचा अभाव आहे. (‘संघटना साखळी’ हा लेख वाचून वर्षां राजहंस यांनी चांगल्या सुशिक्षित पुण्याच्या सोसायटीमध्ये असा प्रयत्न केला, पण प्रतिसाद शून्य.)

या पार्श्वभूमीवर आपल्या भारतीय मुलांचे जे आई-वडील तेथे राहत आहेत त्यांची काय परिस्थिती आहे हे पाहणे गरजेचे होते. बोस्टन या अमेरिकेच्या पूर्वकिनाऱ्यावर असणाऱ्या ऐतिहासिक आणि अत्यंत सुंदर शहराच्या लेक्झिक्टन नावाच्या उपनगरामधल्या रिक्रिएशन सेंटरला आम्ही गेलो. अत्यंत प्रशस्त वाचनालयापासून क्रीडा, संगीत, कला अशा सर्व सुविधा तेथे उपलब्ध आहेत. त्यांचा सिनियर्ससाठी स्वतंत्र विभाग आहे. त्यासाठी उत्तम प्रशिक्षित व्यक्तींची नेमणूक केली आहे. इंडियन सिनीयर्ससाठी मंगळवारी १०-३० ते ११-३० असा वेळ राखून ठेवलेला आहे.

सुदिन कोचेटा नावाचे ज्येष्ठ त्यांचे अध्यक्ष आहेत.

साठीनंतरच्या आयुष्याच्या मांडणीबाबतचे विचार त्यांच्यासमोर मांडल्यानंतर आपोआपच खुली चर्चा झाली. त्या सर्वानाच हा विषय नवा वाटला, आवडला म्हणून दुसऱ्या दिवशी ‘बìलग्टन कौन्सिल ऑन एिजग’ या ठिकाणी लंचसाठी आमंत्रित केले. तिथल्या लोकांनाही विषय खूपच महत्त्वाचा वाटला म्हणून त्यांच्यातल्या एकांनी आम्हाला डे केअर सेंटरमध्ये आमंत्रित केले. म्हणजे एकूण चार वेगवेगळ्या गटांसमोर वृद्धकल्याणासंबंधी विचार मांडले. त्यांच्याशी मनमोकळ्या चर्चा झाल्या. त्या चारही संस्थांमधून व्याख्यान दिल्यानंतर लक्षात आले की तिथल्याही ज्येष्ठांनी आपल्या उत्तरायुष्याचा फार गंभीरपणे विचार केलेला नाही.

तेथे त्यांना जाणवणारी प्रमुख गोष्ट म्हणजे एकटेपणा. घरे लांब लांब. वाहन चालवता येत असले तर थोडे तरी बरे नाही तर पूर्णपणे परावलंबी झाल्याने खूपच एकटे वाटते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘िपजऱ्यात’ राहिल्यासारखे वाटते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आजारी पडलो तर काय? मुलांवर प्रचंड बोजा पडेल त्यामुळे धास्तावलेपण असते. तिसरी गोष्ट म्हणजे पुढच्या पिढीशी, नातवंडांशी ‘कनेक्ट’ होता येत नाही. त्यांना मातृभाषेत बोलायला येत नाही किंवा आवडत नाही. यांना त्यांच्यासारखं इंग्लिश बोलता येत नाही. त्यामुळे संवाद फारसा नाही. त्यामुळे नातवंडांबरोबर राहण्याचे सुख फक्त नेत्रसुख. जवळीक, मानसिक समाधान अभावानेच आढळते. या विषयावर बोलताना एका पदाधिकाऱ्याचे उद्गार फार बोलके होते. ते म्हणाले, ‘‘मी जणू घरातल्यासाठी ‘लिमोझिनी’ सíव्हस प्रोव्हाइड करतो.’’ इथून नेऊन तिथे सोडणे, बोलावले की हजर होणे. पालक एकटे  भारतात राहिले तर त्यांचे कोण करणार हा प्रश्न आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचा विचार असतो तो गरज पडली तर धावपळ करून भारतात जावे लागण्यापेक्षा इकडे आणलेले बरे. (निदान ते धडधाकट असेपर्यंत) असे एकटे पुरुष आणि स्त्रियाही खूपच एकटय़ा पडतात. नाइलाजाने त्यांना ते एकटेपण सहन करावे लागते.

ज्येष्ठाने कष्टाने काडी काडी जमवून बांधलेले घर किंवा इतर प्रॉपर्टीबाबतही कित्येकदा मुलांना काहीच वाटत नाही. ते म्हणतात तिकडे जाऊन त्याची देखरेख तर दूरच पण विकायच्यासाठी पण प्रयत्न करायची तयारी नसते. सणवार, खाण्या-जेवण्याच्या सवयी, मिळणाऱ्या वस्तू या साऱ्यावर मर्यादा असतातच.

पण अगदी अनपेक्षितपणे पुढे आलेला मुद्दा म्हणजे तेथे ‘स्मशान’ नाही. आपण मेल्यावर आपल्याला कुठे, कसे नेणार..

असो! दिसते मनोहर तरी.. सारे .. उदास असे म्हणावे.. की तरी बरं मुलांबरोबर राहता येतंय म्हणून सुख मानावं. प्रश्न ज्याचा त्याचाच म्हणायला हवा! पण माझ्यासारख्या ज्येष्ठ प्रेमीला जगण्याचा वेगळा आयाम लक्षात आला हे मात्र सत्य!

rohinipatwardhan@gmail.com