18 January 2019

News Flash

वय वाढतं म्हणजे काय?

वयोवर्धनाची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे

‘वृद्ध’ हा गट ‘समस्या’ या सदरात मोडण्यासारखा का झाला या मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधल्याशिवाय वृद्धसंख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे खरे आकलन होणार नाही. ही परिस्थिती निर्माण होण्यामागे अक्षरश: अनेक कारणं आहेत. लोकसंख्या शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर सहजपणे लक्षात येतं की, वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रचंड वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे बघता बघता वयोमर्यादा वाढली. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब यावर अत्यंत परिणामकारक औषधे आणि उपाययोजना असल्यामुळे एका प्रकारे मृत्यू येण्यासाठी कारण लागतं तेच मुळी सापडत नाही असं म्हणावं लागतं. नोकरीच्या कालावधीपेक्षा सेवानिवृत्तिवेतन घेण्याचा कालावधी कितीतरी जास्त होत चालला आहे.

औद्योगिकीकरणामुळे यंत्राने प्रचंड मोठय़ा प्रमाणावर निर्माण झालेल्या वस्तू खपवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या, आमिषे दाखवावी लागतात. त्याला बळी पडून अतोनात अस्थानी खर्च होतो मग वृद्धांवर खर्च करायला मागे पुढे पाहिलं जातं. उद्योगांची वाढ शहरांजवळ झाली त्यामुळे खेडी ओस पडायला लागली आणि मुक्त अर्थ व्यवस्थेमुळे नोकरीच्या प्रचंड संधी जगभरात निर्माण झाल्या. मोठय़ा संख्येने तरुण वर्ग असणाऱ्या भारतातल्या तरुणांना देश-विदेशात नोकरी मिळू लागली. नोकरीनिमित्ताने स्वकेंद्री पाश्चिमात्य संस्कृतीशी त्यांची ओळख झाली. त्याचा स्वीकार करणे सहज सोयीचे असल्याने फार झपाटय़ाने कुटुंब म्हणजे ‘हम दो हमारे दो किंवा एकच’ अशी व्याख्या तयार झाली. व्यक्तिस्वातंत्र्याला सर्वात जास्त महत्त्व देणारी संस्कृती सोयीस्कररीत्या हवी तेव्हा स्वीकारायची आणि हवी तेव्हा भारतीय संस्कृतीचे गोडवे गाऊन स्वत:च्या गरजा पूर्ण करून घ्यायच्या ही अगदी नवी मनोवृत्ती तयार झाली. त्यात ज्येष्ठांचा आदर होण्यापेक्षा वापर केला जाताना दिसतो. ही वस्तुस्थिती आहे. स्त्रियांची नोकरी करणारी पहिली पिढी १९६०-६५ नंतर निर्माण झाली पण ती पिढी एकत्र कुटुंब जपून नोकरी करत राहिली. त्यामुळे सध्याच्या ‘आज्या’ नातवंडे सांभाळायचेही कर्तव्य आपले आहे असे समजून कार्यरत राहिल्या आहेत. त्यात त्यांना आनंद वाटतो आहे. पण त्याचबरोबर घरातल्या अति वृद्धांची काळजी घेणे पण त्यांचेच काम असल्याने ओढाताणही होते आहे. त्यांची पुढची पिढी जवळ नसली तर त्यांची काळजी घ्यायला कोण असणार, हा प्रश्न आहेच. स्वत: वृद्ध या झपाटय़ापुढे तोकडे पडत आहेत त्यामुळे त्यांनाही परिस्थितीशी जुळवून घेणं शक्य होत नाही. त्यातून नक्की कसं वागावं ते स्पष्ट  होत नाही.

राज्यकर्त्यांनीही समाजवादी भूमिका सोडून खासगीकरणाच्या माध्यमातून ज्याने त्याने आपापले पाहावे ते बरे अशी काहीशी अलिप्तता धारण केलेली वृद्धांच्या बाबतीत तर निश्चितपणे दिसून येत आहे. नाहीतर इतक्या वर्षांमध्ये वृद्धांसाठी ठोस धोरण आणि त्याच्या अंमलबजावणीची प्रभावी यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना अस्तित्वात आल्या असत्या. वृद्धांच्या सद्य:स्थितीचा हा अगदी धावता आढावा घेतल्यावर एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घ्यावीच लागते आहे की, आपले मार्ग आपणच शोधायला सुरुवात केली पाहिजे.

त्यासाठी प्रथम वय वाढते म्हणजे नक्की काय होतं? हे समजून घ्यायला हवे. याचं उत्तर खरंच अवघड आहे कारण वाढत्या वयाची लक्षणं शारीरिक, मानसिक, सामाजिक सर्वच पातळ्यांवर दिसून येतात. वय वाढणे ही केवळ शारीरिक प्रक्रिया नसते. आपलं वागणं, बोलणं, चालणं, लक्षात राहणं किंवा विसरणं, समाजाशी नाळ बांधलं जाणं किंवा समाजापासून तुटणं, जगण्यात रस वाटणं किंवा न वाटणं या सर्वावर वयाचा परिणाम होत असतो. सामान्यत: या सर्वावर वयाचा परिणाम होऊ नये म्हणून आपण सतत प्रयत्न करत असतो. वार्धक्याचा अभ्यास करावासा वाटतो तो या विरोधाभासामुळे.

वयोवर्धनाची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे म्हणून ती आपल्यामध्ये कुतूहल जागृत करते तर कधी कधी दडपून जायला होते.

म्हातारपण येतं म्हणजे आपल्यामध्ये काळाशी निगडित असे ठळक दिसणारे गैरसोयीचे बदल होतात. या बदलामुळे शरीराची आणि मनाची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता कमी होते.

समाजातल्या प्रत्येकाचा खरं तर वृद्धांशी संबंध येतच असतो. आज आपण आजूबाजूच्या किंवा घरातल्या वृद्धांना पाहात असतो खरे, पण प्रत्येकाला कधी ना कधी म्हातारं व्हायचं आहेच त्यामुळे आपण सर्वानीच वृद्धत्वाविषयी जेवढं जास्त जाणून घेऊ तेवढं जास्त आपण समाजाला आणि स्वत:ला जाणून घेऊ.

गमतीचा भाग असा की म्हातारे होतो तर खरे, पण त्यामागे नक्की असं कारण सांगता येत नाही. विविध क्षेत्रांतले तज्ज्ञ शास्त्रज्ञ वेगवेगळी कारणं सांगतात. काही तज्ज्ञ म्हणतात, शरीर एक यंत्र असतं. यंत्र जसं खूप वापरल्याने किंवा देखभाल नीट न केल्याने निकामी होतं किंवा अजिबातच न वापरल्याने गंजून जाते तसं शरीरही निकामी होतं. निकस आहार, अपघात, आजार यांसारख्या कारणांमुळे शरीर थकते आणि थांबते. याला अपवाद फक्त मेंदूचा आहे. मेंदू जेवढा जास्त वापरू तेवढा कार्यक्षम राहतो आणि न वापरल्याने क्षमता कमी होते.

शास्त्रानुसार तिशीनंतर शरीरपेशींच्या निकृष्टीकरणाची सुरुवात होते. ज्या प्रमाणात पेशी नष्ट होतात त्या प्रमाणात नवीन पेशी तयार होत नाहीत. काही काळाने या उणिवेमुळे अवयव क्षीण होतात म्हणजे म्हातारपण येतं.

म्हातारपणात शरीराची प्रथिनं आणि रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्याची रसायनं तयार करण्याची शक्ती कमी होते म्हणजे जंतूंशी लढण्यासाठी शरीर असमर्थ ठरतं. म्हणजेच वार्धक्य येतं. तर आनुवंशिकता हे व्यक्तीची आयुमर्यादा ठरवत असते. अपघात अथवा गंभीर आजार न झाल्यास दीर्घायुषी मातापित्यांची मुले दीर्घायुषी असतात. कारण डीएनए पेशी आरएनए पेशींकरवी ही आनुवंशिकतेविषयी माहिती देत असतात. शरीराचे घटलेले तापमान, शरीरातले विशिष्ट अंत:स्राव, एन्झाईमच्या कार्यात बदल अशीसुद्धा म्हातारं होण्याची कारणं आहेत.

ही काही काटेकोर विभागणी नाही कारण प्रकृती आणि प्रवृत्ती दोन्हीचा विचार करावा लागतोच. वयाच्या संदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे जगभरातल्या त्या त्या देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीनुसार विचार वेगवेगळे असतात. ज्या त्या देशाला आपला स्वतंत्र विचार करावा लागतो. वेगवेगळ्या देशांच्या नॅशनल पॉलिसी फॉर ओल्डर पर्सन्सचा अभ्यास केल्यावर हे कळते.

देश वेष कोणताही असो पण आता एक गोष्ट मात्र नक्की आहे की, म्हातारपण हे ‘वर’चे बोलावणे येईपर्यंत थांबायचे स्टेशन आहे हे सर्वमान्य झाले आहे. त्यानुसार देशादेशात विविध साधने, निवासस्थाने, दवाखाने, प्रवाससाधने निर्माण होत आहेत. एक प्रचंड मोठी बाजारपेठ म्हणून ज्येष्ठ या घटकाकडे पाहिले जात आहे हे मात्र नक्की. वयोवर्धनाचा, म्हातारपणाचा विचार करताना ‘जे टाळता येत नाही त्याचा स्वीकार करणे’ हाच त्यावरचा उपाय असतो हे आपण लक्षात ठेवावे म्हणजे झालं.

डॉ. रोहिणी पटवर्धन

rohinipatwardhan@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on February 3, 2018 12:56 am

Web Title: articles in marathi on how to live a happy life after 60 years old part 2