16 January 2019

News Flash

स्वयंप्रेरणा

वाढत्या वृद्धसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा विविध दृष्टिकोनातून विचारविनिमय केला.

दोन ज्येष्ठ लॅबमध्ये भेटतात. अरे तुम्हीपण का?’ असं एकमेकांकडे बघून म्हणतात. एक साठ वर्षांचा ज्येष्ठ स्वत: गाडीतून येतो पण त्याला माहीत नसते की आपल्याच बिल्डिंगमधल्या ८० वर्षांच्या ज्येष्ठालापण इकडेच यायचे होते. हॉस्पिटलमध्ये थांबणे, इतर कार्यक्रमांना घेऊन जाणे, आणणे सहज शक्य असते पण त्यासाठी एकमेकांशी संपर्क पाहिजे. ज्येष्ठ खूप काही एकमेकांसाठी करू  शकतात, मात्र त्यासाठी स्वयंप्रेरित कार्य, स्वयंप्रेरणा महत्त्वाची.

ज्येष्ठांच्या वाढलेल्या आयुष्यामुळे निर्माण झालेले प्रश्न ‘तंदुरुस्त आणि उत्साही तरुण’ ज्येष्ठांच्या सहभागानेच मोठय़ा प्रमाणात सुटू शकतील. ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होत असलेल्या गंभीर प्रश्नांवर हे सत्य एक चांगले उत्तर ठरू शकेल. हा मोठा आशेचा किरण म्हणायला हरकत नाही. हा निष्कर्ष काढला आहे सीएसआयएस (सेंटर फॉर स्ट्रॅटिजिक अ‍ॅंड इंटरनॅशनल स्टडीज)या वॉशिंग्टनच्या संस्थेने!

जगभरातल्या ८५ तज्ज्ञांनी एकमताने हा उपाय सुचविला आहे. त्यामध्ये राजकारणी, सरकार, व्यावसायिक, शिक्षणक्षेत्रातले तज्ज्ञ आणि समाजकार्य करणाऱ्या संस्थांचे प्रमुख अशा विविध क्षेत्रातल्या प्रचंड अभ्यासू आणि तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश होता. हे निष्कर्ष काढण्यासाठी जागतिक ग्लोबल कमिशन नेमले होते. त्यांनी वाढत्या वृद्धसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा विविध दृष्टिकोनातून विचारविनिमय केला. त्यातून अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे आले. त्यातून हा महत्त्वाचा निष्कर्ष काढला. जागतिक पातळीवर वृद्धसमस्यांचे स्वरूप खूप वेगळेवेगळे असते. त्या त्या देशाच्या सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीनुसार ते बदलते. पण इथे प्रामुख्याने दोन गोष्टींचा उल्लेख करणे महत्त्वाचे वाटते ते म्हणजे प्रगत देश हे प्रगत झाल्यानंतर त्यांच्याकडे वृद्धांच्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे त्यांना या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आर्थिक बळ आणि वेळ मिळाला. पण भारतासारख्या विकासाची वाटचाल सुरू असलेल्या, लोकसंख्येच्या विस्फोटाला सामोरे जात असलेल्या देशामध्ये ज्येष्ठांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे आणि देशाचा विकासपण साधायचा आहे. या प्रश्नाचे गांभीर्य प्रत्येकानेच-तरुण, मध्यमवयीन सर्वानीच जाणून घेतले पाहिजे आणि स्वत: ज्येष्ठांनी तर खूप म्हणजे खूपच गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे. कुटुंबाला काय, राज्याला काय आणि देशाला काय उपलब्ध साधनसामग्रीतून लहान मुलांची काळजी घ्यायची आहे, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायासाठी तरतूद करायची आहे, तरुणांना संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. अशा परिस्थितीत ज्येष्ठांच्या गरजांचा क्रम कुठे कसा लावायचा हा मोठा अवघड प्रश्न आहे. यातून मार्ग काढताना ज्येष्ठांचा क्रम कितवा लावायचा हा निर्णय ज्येष्ठांनीच घ्यायचा आहे.

२००२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टचा विचार गेली सोळा वर्षे मी सतत करते आहे. त्यातूनच मला ‘आपल्यासाठी आपणच’ या तत्त्वाची गरज लक्षात आली. सर्वच समस्या ज्येष्ठ स्वत: सोडवू शकतील असं नाही पण निदान आपले दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी ते निश्चितच मोठे काम करू शकतील अशी माझी खात्री आहे.

असे काम आपल्याकडे होण्यासाठी खरी गरज कोणती आहे ती सहअनुभूतीची. माझ्या कुटुंबातील, सोसायटीतील, आजूबाजूच्या परिसरातील ज्येष्ठांना कोणत्या अडचणी येतात याचा अगदी बारकाईने मनापासून विचार करायचा. त्यावर कोणते उपाय आवश्यक आहेत, त्यापैकी माझ्याकडे जे ज्ञान, कौशल्य, शारीरिक, आर्थिक क्षमता आहे त्याचा मी वापर करू शकतो का? असा विचार करायचा. अनेकदा अगदी सहज विनासायास आणि विनापैशानेसुद्धा आपण दुसऱ्या ज्येष्ठाला मदत करू शकतो.

‘वसुधैव कुटुंबकम्’ या आपल्या संस्कृतीचे फक्त गोडवे गात बसणारे आपले ज्येष्ठ स्वत: अतिशय स्वयंकेंद्रित झाले आहेत. परस्पर संवाद जवळजवळ संपुष्टात आला आहे. करमणुकीची भरमसाट साधने त्यातल्या त्यात टी.व्ही.मुळे तर प्रत्येक ज्येष्ठ स्वतंत्र बेट झाला आहे. आता तर व्हॉट्सअ‍ॅपमुळे माणसाला खरी माणसं आणि एकमेकांचे मन जाणून घेण्याची इच्छाच नाही आणि फुरसतही नाही.

अगदी साधी वाटणारी गोष्टसुद्धा अडचण कशी बनते आणि ती दुसरा ज्येष्ठ कशी सोडवू शकतो याचे उदाहरण म्हणजे सामान्यत: ज्येष्ठांना डॉक्टरकडे किंवा पॅथॉलॉजी लॅबमध्ये जावेच लागते. दोन ज्येष्ठ लॅबमध्ये भेटतात. ‘अरे तुम्हीपण का?’ असं एकमेकांकडे बघून म्हणतात. त्या ज्येष्ठाला मुलांना सुट्टी घेऊन थांबवावे लागत असते किंवा कोणी नसेल तर रिक्षा मिळेल का याचे टेन्शन असते. साठ वर्षांचा ज्येष्ठ स्वत: गाडीतून येतो पण त्याला माहीत नसते की आपल्याच बिल्डिंगमधल्या ८० वर्षांच्या ज्येष्ठालाही इकडेच यायचे होते. हॉस्पिटलमध्ये थांबणे, इतर कार्यक्रमांना घेऊन जाणे, आणणे सहज शक्य असते पण त्यासाठी एकमेकांशी संपर्क पाहिजे. ज्येष्ठ खूप काही एकमेकांसाठी करू शकतात. हे असं का केलं जात नसावं? खूप विचार केला. तेव्हा लक्षात आलं दुसऱ्यासाठी काही करणं हे फारसं दिसून येत नाही आपल्याकडे.

पाश्चिमात्य देशांमध्ये तरुणपणापासूनच शिक्षणाचा एक भाग म्हणून व्हॉलंटियिरग अर्थातच स्वयंप्रेरित कार्याला खूप महत्त्व दिलं जातं. अगदी प्रत्येक जण स्वयंप्रेरणेने असे कार्य करतो. एका अनुभवानुसार या प्रकारे केलेल्या कामाचे पैशांत मूल्य मोजले तर एकूण देशाच्या आर्थिक उलाढालीच्या २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त होते हे प्रख्यात व्यवस्थापनतज्ज्ञ पीटर ड्रंकर यांनी म्हटले आहे. पण आपल्याकडे व्हालंटियरिंग वा स्वयंप्रेरित कार्य म्हणजे नेमकं काय याचा विचार केलेला दिसून येत नाही. समाजकार्याच्या नावाखाली राजकारणी लोकांशी हातमिळवणी करून समाजाला लुटणाऱ्या संस्थांचे पेव फुटलेले असल्यामुळे समाजकार्य ही संज्ञाच बदनाम झाली आहे. या कार्यामध्ये समाजासाठी काही करणे, तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ही भावना आहे.

ज्येष्ठांनी जर स्वयंप्रेरित कार्य म्हणजे काय हे समजून घेतले तर नक्कीच खूप मोठे कार्य होऊ शकेल, म्हणून इथे थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे मांडते आहे.

ज्याला कोणाला मदतीची गरज आहे त्याला आपणहून मदत करण्याची इच्छा निर्माण होऊन केलेली मदत म्हणजे स्वयंप्रेरित कार्य.

अशा मदतीची गरज असते का? ती कोणाला असते? ती कशी करायची, असे प्रश्न मनात येतात. त्यासाठी ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या मूळ जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर एखादी कृती/कार्य करणं म्हणजे स्वयंप्रेरित कार्य. पण ही कृती करण्याचं किंवा ती कृती न करण्याचं स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असतं. जबाबदारी न घेण्याचं स्वातंत्र्य असूनही केवळ स्वेच्छेने, स्वयंप्रेरणेने केलेलं कोणतंही कार्य म्हणजे व्हॉलंटियरिंग म्हणता येतं. यासारख्या कार्याची काही वैशिष्टय़ं आहेत-

स्वयंप्रेरित कार्य ही निवड आहे. यात स्वत: व्यक्तीने आपणहून ही जबाबदारी घेतलेली असते. त्या व्यक्तीला सामाजिक भान असतं. दुसऱ्यांच्या गरजांची-अडचणींची जाण असते. दुसऱ्यांसाठी काम करतो हे खरं असलं तरी त्यातून स्वत:ला काहीतरी किमान समाधान मिळण्यासाठी केलेलं काम असतं. ज्यामुळे स्वत:मध्येही चांगला बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ, आपली कोणाला तरी गरज आहे, आपली वाट पाहणारे आहेत या भावनेने मन उल्हसित होतं. आनंद वाटतो व वेळ छान जातो. इतरांना आपण वेगळे आहोत हे दाखवता येतं.

स्वयंप्रेरित कार्यात स्वत:मध्ये काही ना काही कौशल्य असावं लागतं. मग ते व्यवसायाशी निगडित असं कायद्याचं, शिक्षणाविषयी, वैद्यकीय ज्ञान असो किंवा गायन, वादन, नृत्य अथवा पेंटिंग, शिवणकाम अशा कला असोत. पण दुसऱ्याला देण्यासारखं स्वत:जवळ काहीतरी हवं. कौशल्य नसलं तर ते मिळवण्यासाठी शिकण्याची इच्छा हवी.

या गोष्टी करायला काही किमान शारीरिक, मानसिक क्षमता हवी. मुख्य म्हणजे आर्थिक मोबदल्याची अपेक्षा ठेवून काम केलं तर त्याला स्वयंप्रेरित कार्य म्हणता येणार नाही. अर्थात त्यामध्ये त्या व्यक्तीने स्वत: खर्च करावा अशी अपेक्षा नसते. जो काही जाण्यायेण्याचा अथवा सामानाचा खर्च येत असेल तो घेणं यात काहीच गैर नाही. सगळ्यात महत्त्वाचं आणि ज्याचं अत्यंत काटेकोरपणे पालन होणं आवश्यक असतं ते म्हणजे स्वत:ची मूळ कर्तव्यं पूर्ण करून केलेलं म्हणजे शुक्रवारच्या कहाणीमधल्या ‘खुलभर’ दुधासारखं असावं.

एकदा का स्वयंस्फूर्तीने केलेले समाजकार्य म्हणजे व्हॉलंटियिरग याचा नीट अभ्यास केला, छोटेसे प्रशिक्षण घेतले, आजूबाजूला डोळसपणे दयाळू नजरेने पाहिले तर कितीतरी ज्येष्ठांना आपण आधार देऊ शकतो. त्याचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येकाला सापडू शकतील. ते कोणते ते पुन्हा कधीतरी संहिता साठोत्तरीतून मांडता येतील तोपर्यंत ‘आपल्यासाठी आपणच’ जय हो असे म्हणू या.

rohinipatwardhan@gmail.com   

chaturang@expressindia.com

First Published on April 14, 2018 12:20 am

Web Title: dr rohini patwardhan article in loksatta