16 January 2019

News Flash

संघटना साखळी

दादा धर्माधिकारी यांच्या शब्दात सांगायचं तर त्यांचे कार्य त्यांच्या संस्था म्हणजे समाजाची ‘श्वसनकेंद्रे’ म्हणायला हवी.

डॉ. रोहिणी पटवर्धन

गेल्या साठोत्तरीच्या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: ज्येष्ठांनी पावले उचलल्याशिवाय तरणोपाय नाही हे अगदी स्पष्ट आहे. आपापल्या परिसरातील ज्येष्ठांनी सहभावनेतून एकत्र यावं आणि त्या संघटनांची साखळी निर्माण करून त्याद्वारे व्यापक हित साधावा. काय करता येईल नेमकं, एकत्र येऊन..

दुसऱ्याचे मन, अडचण, दु:ख किंवा गरज आपल्याला जाणवते तेव्हा मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनेसाठी ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांनी फार सुंदर शब्द वापरला आहे. या भावनेला ते ‘सहभावना’ असं मानतात. खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये समाजातल्या कोणत्या ना कोणत्या गटाबद्दल अशी ‘सहभावना’ असतेच. काहींच्या मनात ती उसळी मारून प्रकट होते आणि झपाटलेपणाने त्याचा पाठपुरावा केला जातो. त्यातूनच मोठी समाजकार्ये उभी राहातात.

दादा धर्माधिकारी यांच्या शब्दात सांगायचं तर त्यांचे कार्य त्यांच्या संस्था म्हणजे समाजाची ‘श्वसनकेंद्रे’ म्हणायला हवी. एकीकडे एवढी मूल्यहीनता असताना समाज ठीक राहतो तो अशा थोर व्यक्तिमत्त्वांमुळे! पण या मनाच्या ऊर्मीचे बाकीच्या लोकांचं काय होते. प्रश्न पडतो. कदाचित रोजच्या जगण्याच्या झटापटीत ही सहभावना दडपली जात असेल किंवा करावंसं वाटलं तरी नक्की काय, कुठे, केव्हा या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळत नसतील आणि मग तो विचार मागे पडत असेल.

पण गेल्या साठोत्तरीच्या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: ज्येष्ठांनी पावले उचलल्याशिवाय तरणोपाय नाही, हे अगदी स्पष्ट आहे. मग ज्येष्ठांनी पावले उचलायची म्हणजे नक्की काय करायचं ते मांडण्याचा प्रयत्न मी या लेखाद्वारे करत आहे. एक प्रकारे संघटन करणे, संघटनांची साखळी निर्माण करणे आणि त्याद्वारे व्यापक हित साधणे असा हा प्रवास आहे.

सर्वात प्रथम आपली सोसायटी, बंगल्यांची कॉलनी, आपली वस्ती. थोडक्यात, आपल्या निवासस्थानाच्या जवळ असणाऱ्या ज्येष्ठांनी एकत्र यायला हवे. आपण त्याला सोयीसाठी ‘सनवर्ल्ड’ गट म्हणू या. हे नाव मला सुचले त्यालाही कारण आहेच. सूर्य म्हणजे जीवन, प्रकाश, ऊबदारपणा! सूर्य म्हणजे नियमितपणा आणि सूर्य भेदभावविरहित सर्वाना समान प्रकाश देणारा. ही सारी वैशिष्टय़े या सनवर्ल्ड गटात यावीत अशी अपेक्षा आहे.

एका गटाची सभासद संख्या १० पेक्षा जास्त नको. सोसायटीमधील १ किंवा २ बिल्डिंगमधल्या वय वर्षे ५५ च्या पुढच्या व्यक्तींनी एकत्र यावे, तरुणाईपैकी १, २ व्यक्ती यामध्ये येऊ शकल्यास उत्तमच अन्यथा ज्येष्ठांनी तर यावेच यावे. यात प्रत्येकाला किमान मोबाइल -व्हॉट्सअप तरी वापरता आले पाहिजे. नसेल तर शिकण्याची तयारी असली पाहिजे. किमान ३५ स्त्री सदस्य असाव्यात. कारण या ‘सनवर्ल्ड’ गटाला जे काही काम करायचं आहे त्यासाठी स्त्री आवश्यक आहेत. या गटाला अध्यक्षांऐवजी गटप्रमुख असावा. तो दरवर्षी बदलला जाईल. प्रत्येकाला गटप्रमुखाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. हे स्पष्ट असावे.

या गटाचे कार्य कसे चालविले जाईल याची रूपरेषा साधारणपणे अशी असेल. प्रथम सामूहिकपणे आपल्या सोसायटी/विभागात राहाणाऱ्यांपैकी किती जण ५५ च्या पुढच्या व्यक्ती आहेत त्याची माहिती जमा करावी. त्यांची प्राथमिक सभा घ्यावी. त्यावेळी त्यांना ज्येष्ठ म्हणून कोणत्या अडचणी येतात याची माहिती प्रश्नावलीमार्फत जमा करावी. त्यामध्ये व्यक्तीला असणारे आजार, उपचार कोणते याची माहिती जरूर असावी. एकटे ज्येष्ठ असतील तर त्यांच्या मुलांचीही माहिती घ्यावी. त्यानंतर या प्रश्नावलीचा रीतसर अभ्यास करून किती लोकांना कोणत्या प्रकारच्या समस्या जाणवतात याचे विश्लेषण केले की आपल्यापुढे आपल्याला काय काय करावे लागेल याची कल्पना येईल. सर्वाच्या सोयीनुसार गटाने किमान आठवडय़ातून ३ वेळा फक्त अर्धा तास कोठे कधी भेटायचे ते ठरवायचे. महिन्यातून एकदा त्या सोसायटीतल्या अशा सर्व गटांची एक बैठक घ्यावी. गटाच्या उपस्थितीची काटेकोर नोंद ठेवावी. जे सभासद आले नसतील त्यांना दूरध्वनी करून कारण विचारावे. विनाकारण न येणारा सभासद सलग ५ सभांना अनुपस्थित राहिल्यास त्याचे सभासदत्व रद्द समजण्यात येईल. पर्यायाने त्याला होणारी मदत आता मिळणार नाही हे उघडच आहे. कारण ज्येष्ठ पण आपला शब्द पाळत नाहीत. त्याचा भार इतरांवर पडतो. या गटामार्फत करता येणारी कार्ये आणि त्यामुळे होणारी सोय किंवा फायदे थोडक्यात पुढे देत आहे. या गटाची प्रार्थना ही समाजहिताची प्रार्थना असते ती पुढीलप्रमाणे – (प्रार्थना लेखाच्या शेवटी दिली आहे.)

गटासाठी एकत्र येणे म्हणजे एक प्रकारे सच्चा साथी किंवा सच्चा मित्र असल्याची शपथ घ्यायची म्हणा ना! या गटाच्या सभासदांनी पण स्वत: आपल्याकडे दुसऱ्याच्या उपयोगी पडेल अशी कोणती गोष्ट आहे त्याची यादी करावी. उदाहरणार्थ, मी स्वत: गाडी चालवू शकतो. उत्तम स्वयंपाक, वाचनाची आवड, गाणे म्हणू शकतो. स्वतंत्रपणे पायी जाऊन खरेदी करू शकतो. मोबाइल इंटरनेटचा वापर उत्तम करू शकतो. मला वेळ आहे, प्रकृती उत्तम आहे, मी ज्येष्ठाबरोबर जाऊ-येऊ शकतो. ही यादी खूप मोठी होते. त्यासाठी  स्वत:मध्ये डोकावून पाहून आपल्यातल्या क्षमता ओळखायला हव्यात.

कोणत्या वेळी कोणी काय करायचे हे पण ठरवून घ्यायचे म्हणजे गरजेच्या वेळी गोंधळ उडत नाही. सर्वसामान्यत: येणाऱ्या अडचणीं बाबत मी पुण्यात २-३ सभा घेतल्या, त्यामधून जाणवलेल्या अडचणी किंवा गरजा अशा –

डॉक्टरकडे जाणे, पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाणे, औषधे आणणे, नाटक, सिनेमा, चित्रपट, सभा, कार्यक्रम इत्यादी ठिकाणी जाणे. अचानक बरे नाहीसे झाल्यावर रुग्णालयात नेणे, ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमधल्या वास्तव्यात मदत, बिले भरणे, बाहेरून जिन्नस, वस्तू, खाऊ इत्यादी आणून देणे. आजारी असल्यास पथ्याचे खाणे करणे. बाहेरगावाहून परत येण्यापूर्वी घर स्वच्छ करणे, पाणी, दूध इत्यादी आणून ठेवणे. दिसत नसणाऱ्या ज्येष्ठाला वाचून दाखविणे, एकटय़ा ज्येष्ठाची विचारपूस करणे, दीर्घकाळ सेवा करावी लागणाऱ्या व्यक्तीला थोडा विसावा देणे. आपले वाहन उपलब्ध करून देणे. ज्येष्ठांकडून व्यायाम करून घेणे, फिरायला बरोबर घेऊन जाणे, मोबाइल वापरायला शिकवणे आदी. व्यक्ती, वस्ती आणि आर्थिक स्थितीनुसार वेगवेगळ्या अडचणी असतात, पण गटातल्या गटात यापैकी कोणती कामे कोण करणार याचे स्पष्ट नियोजन हवे आणि त्यानुसार त्या ज्येष्ठाने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याच पाहिजेत. तुमच्या परिसरात तुम्ही असे गट तयार केलेत आणि कामाला सुरुवात झाली की आम्हाला नक्की कळवा, फोटोंसह. इतरांसाठी ते नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल.

वृद्धकल्याणाच्या प्रचंड मोठय़ा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहभावनेतून केलेल्या प्रयत्नमार्फत उत्तर शोधण्याचा हा उपाय क्रांतिकारी म्हणावा लागेल. याबरोबर सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपल्या गटाच्या बाहेरपण कामे करता येतात. उदाहरणार्थ, पुण्यात काही जेष्ठ डॉक्टर एकत्र येऊन गरीब वस्तीत फक्त २० रुपये इतक्या फीमध्ये औषधं देतात, सेवानिवृत्त ज्येष्ठांना मोफत वैद्यकीय सल्ला देतात. डोंबिवलीच्या ‘दधिची’ मंडळाने स्वयंसेवकांच्या मदतीने देहदानाबद्दल जागृती घडवून आणणे आणि प्रत्यक्ष देहदान करण्यासाठी मदत करण्याचे खूप मोठे काम उभे केले आहे. कोणी अंत्यसंस्कार/अंत्यविधीसाठी मनुष्यबळ नसेल तर मदत करतात. स्वतंत्रपणे काम करणे ज्यांना शक्य नसेल त्यांना रामकृष्ण मठ, विवेकानंद केंद्र यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून आपले ज्ञान, कौशल्य वापरून मोठे समाधान मिळवता येईल. तात्पर्य असे की ज्येष्ठ खूप मोठे काम करू शकतात फक्त त्यांच्या मनात ‘सहभावना’ निर्माण होणे गरजेचे आहे आणि तीच मोठी उणीव आहे. हे सत्य म्हणावे लागते.

आपल्या ज्या प्रार्थना आहेत त्यामध्ये समाजसेवेचीही प्रार्थना आहे. फार सुंदर आहे ती प्रार्थना. येथे ती मार्गदर्शक म्हणून ठरू शकेल. आपल्या हितासोबत लोकहिताची इच्छा बाळगून केलेली समाजसेवेची प्रार्थना अशी –

मनसा सततम् स्मरणीयम्।

वचसा सततम् वदनीयम्।

लोकहितम् मम करणीयम्।।

न जातू दु:खम् गणनीयम्।

नच नीज सौख्यम् मननीयम्।

कार्यक्षेत्रे त्वरणीयम्।

लोकहितम् मम करणीयम्।।

दु:ख सागरे तरणीयम्।

कष्ट पर्वते चरणीयम्।

विपत्ती विपिने भ्रमणीयम्।

लोकहितम् मम करणीयम्।।

rohinipatwardhan@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on April 28, 2018 12:40 am

Web Title: dr rohini patwardhan article in loksatta chaturang