News Flash

ज्येष्ठोत्सवाची भैरवी साठोत्तरीतली

वेगवेगवळ्या देशांतल्या ज्येष्ठकल्याण योजनांबाबत माहिती कळली.

डॉ. रोहिणी पटवर्धन

‘संहिता साठोत्तरी’मधल्या सर्व लेखांचे सार काय? वाचकांनी यातून आपल्याबरोबर, मनात वागण्या-बोलण्यात काय लक्षात ठेवावे असा विचार करताना मला साहजिकच माझ्या कॉमर्सच्या शिक्षणाची आठवण झाली. व्यवसायाचे सार हे बॅलन्सशीट किंवा ‘ताळेबंद’ यातून लक्षात येते. त्या धर्तीवर खरे तर प्रत्येकाचेच पण खास करून ज्येष्ठांचा विचार केला तर दैनंदिन दिवसापासून ते संपूर्ण आयुष्याचेसुद्धा सार काढायचे म्हटले तर या ताळेबंदाचा मार्गदर्शक म्हणून खूप उपयोग होऊ शकेल.

‘संहिता साठोत्तरी’ सदरातला हा शेवटचा लेख लिहिताना मन भरून आले आहे. दर पंधरा दिवसांनी लेख लिहायचा आहे या विचारात मधले सारे दिवस मनात नवनवीन विषय उगवायचे, त्याचा हळूहळू विकास व्हायचा, मनात खळबळ निर्माण व्हायची. ती आवर्तनं आता शांतावली आहेत. एकाच वेळी रिक्तता आणि परिपूर्ती अशा भावनांचा अनुभव येतो आहे. मी सुरुवात केल्यानंतर विचारांच्या अभिव्यक्तीमधून वाचकांच्या प्रतिक्रियांमधून त्या निमित्ताने केलेल्या वाचनातून अभ्यासातून मी समृद्ध होत गेले.

लिहिलेल्या लेखांच्या विषयांवरून नजर फिरवताना लिहायचे राहून गेलेले विषय मनाला काहीशी टोचणी लावत आहेत. देहदान, त्वचादान, इच्छापत्र, मायेच्या स्पर्शाची किमया, ज्येष्ठासाठी अत्यंत उपयुक्त अशी कलोपचार पद्धती, सहभागातून समृद्धी असे अनेक विषय लिहायचे राहून गेले.

वाचकांकडून आलेल्या प्रतिसादांमधून मी खूप काही शिकले. वेगवेगळ्या संस्था करत असलेल्या कार्याची माहिती झाली. वेगवेगवळ्या देशांतल्या ज्येष्ठकल्याण योजनांबाबत माहिती कळली. याचबरोबर एक आनंददायी गोष्ट म्हणजे जुने शिक्षक, जुन्या मैत्रिणींची गाठ पडली. सदर चालू झाल्यापासून कुठेही गेले तरी तुमचे लेख वाचतो, खूप आवडतात, पटतात असे सांगणारी दोन-चार मंडळी अवश्य भेटायची, त्यामुळे किंचित ‘स्टार’पणाचा अनुभव यायचा, मजा वाटायची.

सगळ्यात मोलाची गोष्ट अशी की ‘चतुरंग’ने घडविलेल्या सजग आणि परिपक्व वाचकांमुळे सदर लिहिताना नवीन विषय काहीशा आक्रमकपणे मांडता आला, कारण त्यामागची तळमळ समजून घेण्याची क्षमता वाचकांमध्ये निश्चितपणे आढळली. मलाही माझे विचार घासूनपुसून घेता आले. ‘चतुरंग’ने ‘संहिता साठोत्तरी’चे नवनवीन समर्पक अशा कलात्मक चित्रांनी ‘लाड’ केले त्यामुळे लेख अधिक थेटपणे वाचकांपर्यंत पोचले.

सदर लिहिताना मी माझ्यापुढे एक ध्येय ठेवले होते. लेखामधून फक्त विचार पोहोचवायचे नाहीत तर त्यातून काहीतरी ठोस निर्माण झालं पाहिजे हे मी मला दिलेले वचन होते म्हणा ना! आणि आत्ता हा लेख लिहिताना मला फार मोठे समाधान वाटते आहे की यातून काहीतरी घडते आहे, पहिले पाऊल पडले आहे. माझ्या डोळ्यापुढे एक परिपूर्ण असे वृद्धकल्याणाचे चित्र होते, आजही ते आहे. पंचेचाळिशीच्या पुढच्या कोणत्याही व्यक्तीला उत्तर आयुष्य समाधानाने व्यतीत करण्यासाठी किमान १० विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘प्रशिक्षण’ अभ्यासक्रम तयार केला आहे. हे प्रशिक्षण ३ दिवसांचे आहे, त्याची परीक्षा आहे. मगच प्रमाणपत्र दिले जाणार आहे आणि सर्वाच्या प्रतिसादामुळे याची पहिली बॅच १९-२० जानेवारी १९ ला पुण्याजवळ खानापूरला माझ्या ‘सनवल्र्ड फॉर सीनियर्स’ या वृद्धाश्रमामध्ये घेतली जाणार आहे, त्याची नोंदणी झाली आहे. पुढच्या बॅचची नोंदणी चालू आहे. असे प्रशिक्षण मुंबईमध्येही बहुतेक घ्यावे लागेल, कारण नेहमीप्रमाणे नव्या विचारांना मुंबईकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, पण एवढय़ावरच मला थांबायचे नाही. मी आणि माझे चार-दोन सहकारी प्रशिक्षणासाठी पुरे पडू शकणार नाही याची मला जाणीव आहे. आर्थिक बाजूसुद्धा महत्त्वाची आहेच, पण तरीही प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यामधूनच आवश्यक कौशल्ये आणि क्षमता असणाऱ्यांना असे प्रशिक्षण देण्यासाठी तयार करायचे आहे. त्यासाठी त्यांना वेगळा अधिक सखोल अभ्यास करावा लागेल. यासाठी यापूर्वीच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे ‘ट्रेन द ट्रेनर’ ही ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ हा अभ्यासक्रम तयार करते आहे. या पुढचा टप्पा म्हणजे वृद्धांसंबंधी त्यांच्या समस्यांविषयी, क्षमतांविषयी शास्त्रशुद्ध संशोधन प्रकल्प हाती घ्यायचे आहेत, कारण भारतीय वृद्धांच्या संदर्भात पुराव्यासह शास्त्रोक्त पद्धतीने कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सगळ्याच गोष्टी आणि निर्णय हे ‘असे असेल’ अशा अनुमानावर चालले आहेत ते फार धोक्याचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. थोडक्यात, ज्येष्ठ विद्यार्थी म्हणून ज्येष्ठ शिक्षक म्हणून आणि संशोधक म्हणूनही काम करू शकतात. त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची ही संस्था असेल. आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे तसे, माणसाने नेहमी मोठी स्वप्नं पाहावीत त्यामुळेही कदाचित असेल, पण ज्येष्ठांचा आदर आणि त्यांची कदर करण्याची मला तळमळ आहे, त्यामुळे मला हे सारे व्हावे असे वाटते हे निश्चित. ‘चांगल्या कामाला देव साहाय्य करतो अशी माझी श्रद्धा आहे.’ बघू पुढे कसे आणि काय होते, प्रवास तर सुरू झाला आहे. न मागता काही वाचकांनी उत्स्फूर्तपणे देणगीसुद्धा दिली आहे, हा मला शुभशकुन वाटतो. संपूर्ण भारताचा विचार करता कोणत्याही सामाजिक बदलाची सुरुवात महाराष्ट्रातूनच झालेली आढळते. स्त्री-शिक्षणापासून ते महारोगी पुनर्वसनापर्यंत आणि त्याच्याही नंतरचे वेश्यांच्या प्रश्नांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात पुढचे पाऊल महाराष्ट्रात पडते हा सामाजिक इतिहास आहे. वृद्धकल्याणाच्या बाबतीतही विविध संस्थांच्या माध्यमातून वृद्धांच्या प्रश्नांबाबत विचारमंथन होते आहे. त्यासाठी माझी ‘आपल्यासाठी आपणच’ आणि ‘आनंदस्वर ज्येष्ठांसाठी’ ही पुस्तके आधार म्हणून निश्चितपणे उपयुक्त आहेत. (‘आत्मप्रौढी’ वाटण्याची शक्यता आहे, पण तरीही मी म्हणते आहे कारण खरेच अशा प्रकारची पुस्तके नाहीत हे आपण समजून घ्यावे.) हे ज्ञान हा वेगळा दृष्टिकोन इतर राज्यातील लोकांपर्यंतही पोचावा अशी माझी इच्छा आहे. ‘आपल्यासाठी आपणच’ या पुस्तकाचा हिन्दी आणि कन्नड अनुवाद तयार आहेत. गुजराथीमध्येही अनुवाद तयार आहे.

‘संहिता साठोत्तरी’मधल्या सर्व लेखांचे सार काय? वाचकांनी यातून आपल्याबरोबर, मनात वागण्या-बोलण्यात काय लक्षात ठेवावे असा विचार करताना मला साहाजिकच माझ्या कॉमर्सच्या शिक्षणाची आठवण झाली. व्यवसायाचे सार हे बॅलन्सशीट किंवा ‘ताळेबंद’ यातून लक्षात येते. त्या धर्तीवर खरे तर प्रत्येकाचेच पण खास करून ज्येष्ठांचा विचार केला तर दैनंदिन दिवसापासून ते संपूर्ण आयुष्याचेसुद्धा सार काढायचे म्हटले तर या ताळेबंदाचा मार्गदर्शक म्हणून खूप उपयोग होऊ शकेल. आपणही काही मिळवण्यासाठी आपण काय दिले पाहिजे, केले पाहिजे ते यातून लक्षात येते.

या दोन्ही बाजू जितक्या समतोल असतील, तितके आपण उत्तम आयुष्य जगू शकतो. यापैकी कोणत्याही गोष्टीच्या अतिरेकामुळे सारा जगण्याचा तोल हरवून जातो.

अजून वेळ गेलेली नाही, प्रामाणिकपणे बॅलन्सशीटमधला गेलेला तोल सुधारू शकतो, हे अवश्य लक्षात ठेवावं.

खरं म्हणजे कोणत्याही गोष्टीचा निरोप, समाप्ती असं काही असतं असं मला वाटत नाही, कारण कोणतीच गोष्ट अशी संपणारी, थांबणारी नसते. प्रवाह-विचारांचा, कृतीचा, अनुभवाचा आणि अनुभूतीचा चालूच असतो. एका अर्थाने तो आपला भाग बनून गेलेला असतो. ‘संहिता साठोत्तरीची’ गोष्ट अशीच आहे ती तुमच्या माझ्या मनात आहे. वर्तुळ असतेच परीघ वाढत जातो. भैरवीच्या मनात उमटत राहणाऱ्या स्वर तरंगाप्रमाणे..

(सदर समाप्त)

rohinipatwardhan@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 2:25 am

Web Title: dr rohini patwardhan last article in senior citizen issues
Next Stories
1 काळजातली गोष्ट काळजी घेणाऱ्याची
2 ‘समाज’ हेच भांडवल
3 ज्येष्ठांची ‘श्वसनकेंद्रे’
Just Now!
X