23 March 2019

News Flash

वृद्धांचा जगव्यापी छळ

२००३ पासून राज्यात आणि देशात यावर परिषदा होत आहेत आणि वृद्धापमानाचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत.

डॉ. रोहिणी पटवर्धन

२००३ पासून राज्यात आणि देशात वृद्धांचा छळया विषयावर परिषदा होत आहेत आणि वृद्धापमानाचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. मुळात वयामुळे घरातली कमी होणारी किंमत हे सत्य वृद्ध स्वीकारतात पण त्याही पलीकडे जाऊन वृद्धांवर खेकसणे, दम देऊन बोलणे आणि हिणवणे याचे प्रमाण वाढते. त्यावरील उपाययोजनांची माहिती प्रत्येक ज्येष्ठाला असणे म्हणूनच अत्यंत आवश्यक आहे.

पुण्याला शिक्षणासाठी आलेली नात आजीच्या घरून काहीही न सांगता किंवा कुठे जाणार आहे हेही न कळवता निघून गेली. मुलाला विचारले तर तोही काही सांगत नाही. कुसुमताई एकदम गप्प गप्प झाल्या आहेत तेव्हापासून.* नावावर ब्लॉक असून मुलाने घराबाहेर काढले ते सुद्धा मध्यरात्री! आई पोलिसांच्या मदतीने आमच्याकडे आली. आल्यावर प्रथम सांगितले की कोणी चौकशी केली तर मी इथे आहे सांगू नका.* नवीन मोठा बंगला बांधायचा म्हणून कर्ज काढण्यासाठी प्लॉट मुलाच्या नावावर केला आणि आई-वडील भाडय़ाच्या घरात राहायला गेले ते तिथेच आहेत. नवीन बंगल्यात त्यांना प्रवेश नाही.

वृद्धांना कोणत्या कोणत्या प्रकारच्या छळाला, अपमानाला किंवा अवहेलनेला सामोरे जावे लागते आहे याचे प्रत्यक्ष त्या त्या व्यक्तीने केलेले ‘कथन’ ऐकताना मन सुन्न होऊन जाते आणि लक्षात येते वृद्धांचा छळ (एल्डर अब्युज) अगदी घराघरांत होतो आहे.

२००३ पासून राज्यात आणि देशात यावर परिषदा होत आहेत आणि वृद्धापमानाचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. मुळात वयामुळे घरातली कमी होणारी किंमत हे सत्य वृद्ध स्वीकारतात पण त्याही पलीकडे जाऊन  वृद्धांवर खेकसणे, दम देऊन बोलणे आणि हिणवणे याचे प्रमाण वाढते. त्यांना घरात सतत दडपणाखाली राहावे लागणे, ही पुढची पायरी आहे. त्यांना उपाशी ठेवणे, मारणे, घर सोडण्यास भाग पाडणे, त्यांचे पैसे काढून घेणे, जबरदस्तीने सहय़ा घेणे यांसारख्या घटनाही घडत आहेत. धोक्याची गोष्ट म्हणजे असा छळ केला जाण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे. त्यामुळे वृद्धांचा छळ म्हणजे काय त्याचे विविध मार्ग आणि उपाययोजना या सर्वाची माहिती प्रत्येक ज्येष्ठाला असणे अत्यंत आवश्यक आहे.

हा प्रश्न जागतिक आहे त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघालासुद्धा याची नोंद घेणे गरजेचे वाटले. संयुक्त राष्ट्र संघाने वृद्धांचा छळ म्हणजे काय याची व्याख्या केली आहे ती अशी – ‘अशा कोणत्याही संबंधात जेथे परस्पर विश्वास आणि वृद्धाची काळजी घेणे अपेक्षित असते तेथे वृद्धांना ताण सहन करावा लागेल किंवा इजा पोचेल असे एकदा किंवा वारंवार केलेले कोणतेही कृत्य अथवा आवश्यक ती उपाययोजना करण्याकडे केलेले दुर्लक्ष म्हणजे वृद्ध अवहेलना होय.’

वृद्धापमान वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.

मालमत्ता किंवा पैसे या संदर्भात केलेला छळ –

पैसे काढून घेणे किंवा उपजीविकेसाठी पैसे न पुरवणे, घरदार किंवा इतर मालमत्तेवरून बेदखल करणे यासारख्या गोष्टी वृद्धांना न कळविता किंवा त्यांच्यावर बळजबरी करून घेतल्या जातात.

सामाजिकदृष्टय़ा एकटे पाडणे, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवणे, समाजात मिसळू न देणे. मानसिक छळ – धमक्या देणे, असुरक्षितता निर्माण करणे, पाणउतारा करणे, त्यांचा आत्मविश्वास खच्ची करणे यासारख्या गोष्टींनी ज्येष्ठांना खूप मानसिक त्रास होतो.

वृद्धांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे, औषधोपचार न करणे, कपडेलत्ते न पुरवणे, त्यांच्या प्रकृतीला सोसवेल असे खाणे न देणे, चिडचिड करणे, ऑपरेशन टाळणे यांसारख्या गोष्टीही घडत असतात.

एक ना अनेक! आणखी खूप वेगवेगळ्या प्रकाराने ज्येष्ठांना त्रास होईल, अशी वर्तणूक त्यांच्या जवळच्या माणसांकडून होत असते. पण एक तर वय वाढलं की असं काही तरी होणारच हे सामान्यत: गृहीत धरले जाते. याशिवाय ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ तक्रार कोणाविरुद्ध कशी करणार या विचाराने छळ केला गेला तरी त्याबद्दल बोलले जात नाही. पण ‘हेल्पएज’सारखी संस्था जेव्हा गोपनीयतेची खात्री देऊन सव्‍‌र्हे करते तेव्हा वृद्ध अवहेलनेच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे हे सत्य उघड होते.

‘वृद्धांचा छळ’ ही समस्या तुलनेने अलीकडच्या काळात समाजापुढे आली म्हणायला हवी. १९७५मध्ये ब्रिटिश सायंटिफिक जर्नलमध्ये याचा उल्लेख झालेला आढळतो. आणि त्यानंतर अमेरिका आणि इतर प्रगत देशांमध्ये याचा विचार सुरू झाला. वृद्धांची वाढती संख्या हे यामागचे मुख्य कारण असल्याचे लक्षात येते.

भारतामध्ये २००२ मध्ये माला कपूर शंकरदास यांनी या संदर्भात एक लेख प्रसिद्ध केला आणि २००६ मध्ये पुण्यामध्ये ‘कास्प’ या संस्थेने रिझनल राउंड टेबल कॉन्फरन्स आयोजित केली होती. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा इत्यादी देशांचा सहभाग होता. वेगवेगळ्या देशातील वृद्धांच्या छळासंदर्भात त्यामध्ये ऊहापोह झाला त्यावरून हा प्रश्न जागतिक आहे हे स्पष्ट झाले.

वृद्धांचा छळ किंवा अपमान का होतो याची ढोबळमानाने कारणे सांगता येतील. जो केअरगिव्हर-काळजी घेणारा असतो त्याची स्वत:ची शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक स्थिती बिघडलेली असेल. त्याच्याकडे काळजी कशी घ्यावी याचे ज्ञान किंवा कौशल्य नसेल किंवा त्याला दीर्घकाळ काळजी घेत राहावी लागली असेल. अशा वेळी वृद्धांकडे नीट लक्ष दिले जात नाही. वृद्ध जर परावलंबी झाला असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाण्याचे प्रमाण वाढते. कुटुंबातील सर्व सदस्यांची जबाबदारी एकाच व्यक्तीवर असेल आणि त्या व्यक्तीला नोकरीमध्येही ताणतणाव असतील तर त्याला वृद्धाची कळजी घेण्याची जबाबदारी नीट पेलता येत नाही. वृद्धाने त्याच्या पूर्वायुष्यात मुलांना नीट वागवले नसेल, त्यांचा छळ केला असेल तर साहजिकच मुले ‘करावे तसे भरावे’ याचा वापर करताना आढळतात.

काळजी घेणाराच जर व्यसनी किंवा दुर्वर्तनी असेल, बेजबाबदार असेल तर तो वृद्धाची काय काळजी घेणार? काही व्यक्ती किंवा कुटुंबे ‘माणूसघाणी’ असतात. समाजाशी, मित्रांशी किंवा नातेवाईकांशी संबंध ठेवत नाहीत, त्या कुटुंबात छळ होण्याच्या घटना आढळून येतात. ही यादी आणखी किती तरी मोठी होण्याची शक्यता आहे पण परिस्थिती समजून घ्यायला वर दिलेली कारणे पुरेशी आहेत.

प्रश्न आहे तो असे होऊ नये म्हणून काय करता येईल. प्रथम स्वत: व्यक्तीने काय करावे ते पाहू. समाजाशी नाते जोडावे. मित्रमैत्रिणींचे वर्तुळ जाणीवपूर्वक वाढवावे. अगदी राहायची जागा बदलली तरी जुन्या ओळखी, मित्रांशी संबंध राखावेत. कुटुंबात परिस्थिती बदलत असेल तर मित्रांशी बोलावे. त्यांना घरी बोलवावे. समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हावे. (संहिता साठोत्तरीच्या पहिल्या लेखापासूनचे माझे सूत्र याच धर्तीवर आहे हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल.) तुमच्या भवितव्याचा विचार करून परावलंबित्व आले तर काय करता येईल याचा विचार करावा. तुमच्या इच्छापत्रातील तरतुदींचा ठरावीक काळानंतर पुनर्विचार करून आवश्यक वाटल्यास बदल करावा. तुमच्या विश्वासातील व्यक्तीला दाखवल्याशिवाय कोणत्याही दस्ताऐवजावर सही करू नका. पेन्शन शक्यतो स्वत: काढा. पासबुक तपासा.

कौटुंबिक स्तरावरसुद्धा काय करावे याचा विचार आवश्यक आहे. वृद्ध नातेवाईकांशी आणि मित्रांशी संबंध ठेवा. कदाचित त्यातून ‘मदतीचे हात’ उपलब्ध होऊ शकतील. वृद्धांच्या इच्छा-अपेक्षा जाणून घेऊन त्या किती आणि कशा पूर्ण करता येतील याचा अंदाज घेऊन त्यावर चर्चा करा. तुमच्या क्षमता ओळखा. न झेपेल अशा जबाबदाऱ्या घ्याव्या लागत असतील तर सुरुवातीपासून मदत घ्या. वृद्धाला जास्तीत जास्त स्वावलंबी राहू दे. अती काळजी करून त्याच्या हालचालींवर मर्यादा आणू नका.

वृद्धांचा छळ किंवा त्यांना त्रास होत असेल तर बहुतेक वेळा ते स्वत:हून काही सांगत नाहीत. एक तर त्यांना कुटुंब तोडायचे नसते, काही केले तर ते शेवटपर्यंत न्यायची क्षमता नसते. शिवाय मानहानी होईल ती नको वाटते. अगदी कडेलोट झाला तरच वृद्ध याविरुद्ध कृती करतात. नाही तर काही तरी भयानक घडते तेव्हाच इतरांना कळते. सामान्यत: ज्या व्यक्तीला त्रास होतो त्यांच्यामध्ये काही वेगळी लक्षणे आढळतात.

घराबाहेर आसरा शोधणे, घरी जाणे टाळणे, एखाद्या व्यक्तीचा संदर्भ आल्यास दचकणे किंवा अनपेक्षित प्रतिक्रिया व्यक्त करणे, शारीरिक इजा चेहऱ्यावर अथवा व्रण, जखमा आढळणे. वैवाहिक संबंधात अनाकलनीय बदल जाणवणे, परस्परविरोधी असंबद्ध स्पष्टीकरण देणे, औषधोपचार करण्यास नकार देणे, माणसे टाळणे, भूक कमी होणे ही लक्षणे वृद्ध अवहेलनेची शक्यता दर्शवितात.

या सर्व वृद्धांच्या छळासंदर्भात स्वत: वृद्धांनीही आपले वागणे तपासून पाहिले पाहिजे. माझे घर, माझा पैसा, माझी पोझिशन यापेक्षा ‘माझी माणसं’ याकडे जाणीवपूर्वक जास्त लक्ष देऊन त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन आपली भूमिका ठरवली पाहिजे.

एखाद्या वृद्धाला छळ सहन करावा लागत असेल तर त्यासाठी कायदेशीर तरतूद आहे, हेल्पलाइन असते.. पण येथे शब्दमर्यादेमुळे देता येत नाही. त्यासाठी स्वतंत्र लेख लिहायला हवा.

rohinipatwardhan@gmail.com 

chaturang@expressindia.com

First Published on May 26, 2018 7:15 am

Web Title: persecution of elder in world