वाढती संख्या, बदलांचा वेग आणि वाढत्या समस्या या साऱ्यांचा एकत्रित परिणाम वृद्धांवर होतो आहे हे आपल्या सर्वानाच जाणवायला लागले आहे. आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसाचे आरोग्य, त्याची मानसिक स्थिती आणि त्याचे सामाजिक संबंध वेगवेगळे असतात. बाल, तरुण, मध्यमवय, वृद्ध, अतिवृद्ध अशा त्या त्या वयाचे वेगळेपण असते म्हणून त्यांचे प्रश्नही वेगळे असतात. त्यावरचे उपायही अर्थातच वेगळे असतात. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्राचा विचार केला तर लहान बाळांचे, स्त्रियांचे वेगळे डॉक्टर असतात; पण म्हाताऱ्यांचे वेगळे डॉक्टर आपल्याकडे तरी फारसे म्हणजे खरे तर आढळतच नाहीत. कोटय़वधी म्हातारी माणसे आहेत त्यांच्या समस्या वेगळ्या आहेतच, पण त्यात तज्ज्ञ असणारे डॉक्टर नाहीत. वैद्यकशास्त्राची वृद्धवैद्यकशास्त्र (Geriatrics) नावाची शाखा आहे याची गंधवार्तासुद्धा नाही.

सामान्य माणसालासुद्धा याची कल्पना नाही. वृद्धाच्या आरोग्याच्या समस्यांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. कारण डॉक्टरकडे जायचे ते बरं होण्याकरिता हा सरळ विचार असतो, तर वृद्ध व्यक्ती डॉक्टरकडे जाते त्या वेळी बरे होण्याची शक्यता मर्यादित असते. कारण शरीर थकलेले, झिजलेले असते. त्यामुळे बरे होण्यातला आजार नसेल तर त्यासह जगणे सुसह्य़ व्हावे अशा अपेक्षेने वृद्धवैद्यकशास्त्रात विचार केला जातो आणि हेच वृद्धवैद्यकशास्त्राचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे वृद्धवैद्यकशास्त्राला तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करावे लागते. वृद्धांना प्रथम आहे त्या मर्यादांचा स्वीकार करणे आवश्यक आहे हे पटवून द्यावे लागते. या बदलांची अपरिहार्यता – दात पडणार, ऐकू कमी येणार, केस पांढरे होणार, सुरकुत्या पडणार इत्यादी समजावून देणे आवश्यक असते. त्यासाठीचे उपाय करायला लावावे लागतात. अनेकदा ज्येष्ठ (तरुणांच्या बरोबरीचे समजून काठी घेऊन चालणे, चष्मा लावणे, कानाला यंत्र लावणे इत्यादी टाळतात आणि मोठय़ा परावलंबित्वाला आमंत्रण देतात.)

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?

दुसरी पातळी म्हणजे वयाबरोबर येणाऱ्या मर्यादा येऊ नयेत म्हणून काळजी घेण्याचा असतो. हाडे ठिसूळ होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याचा असतो. हाडे ठिसूळ होऊ नयेत म्हणून उपचार, मधुमेह-रक्तदाब आटोक्यात राहावे म्हणून आहारविहारात सुधारणा यासाठी वृद्धवैद्यकशास्त्राची मदत घेतली जाते. प्रत्येक देशाच्या आणि प्रदेशाच्या हवामानावर, जेवणखाणाच्या पद्धतीवर आणि सामाजिक संकल्पनेवर वेगवेगळे प्रतिबंधक उपाय करावे लागतात. यासाठी संशोधनाची गरज असते. प्रगत राष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात सखोल संशोधन केले जाते त्याप्रमाणे वृद्धवैद्यकशास्त्रातही संशोधन केले गेले आहे; पण आपली प्रवृत्ती मुळात पूर्वजनांच्या पुण्याईवर डोळे मिटून चालण्याची असल्याने मूलगामी तर जाऊ दे, पण वरवरचे संशोधनही भारतात केल्याचे आढळत नाही. त्यामुळे नेमकी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे ते तेवढे स्पष्ट होत नाही.

तिसरी पातळी ही योग्य काळजी न घेतल्याने किंवा काळजी घेऊनसुद्धा झालेल्या रोगासह जगण्याची तयारी करण्याच्या दृष्टीने केलेली उपाययोजना. म्हणजे झालेला रोग बरा नाही होणार, पण वाढ रोखता आली, किमान कमी करता आली तर त्यासाठी केलेले उपचार. उदाहरणार्थ पार्किन्सन , डिमेन्शिया वा विस्मरण यावर १०० टक्के उपाय नाहीत, पण त्याच्यासह जगणे सुसह्य़ व्हावे यासाठी केलेले औषधोपचार हे वृद्धवैद्यकशास्त्राच्या कक्षेत येते. मुळात संशोधनाचा अभाव आणि वर्षांनुवष्रे आपल्या प्रकृतीची नस न् नस ओळखणाऱ्या ‘फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेचा होणारा ऱ्हास यामुळे वृद्धांच्या समस्या अधिकच गंभीर झाल्या आहेत.

बदलत्या परिस्थितीचा वेग न झेपल्यामुळे आणि वाढलेल्या आयुष्याचा सजगपणे विचार न केल्यामुळे वृद्धांना मानसिक आजारांना मोठय़ा प्रमाणावर सामोरे जावे लागते आहे हे सत्य आहे त्यामुळे खरं तर वृद्धमानसशास्त्र तज्ज्ञांची आवश्यकता आहे आणि तसे शास्त्रही (Geropsychology) आहे. थोडक्यात एवढेच सांगते की, आपल्याकडे याचा विचार खूप कमी केला जातो. मानसिक आणि शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक, आर्थिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. याही सर्व क्षेत्रांत वृद्धांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. उदाहरणार्थ ४० वर्षांच्या माणसाला दिलेला आर्थिक

गुंतवणुकीबद्दलचा सल्ला सत्तरीच्या वृद्धाला कसा देणार? त्याची गरज आणि प्राधान्य वेगळे. याचेही एक वेगळे शास्त्र आहे. त्याला वृद्धकल्याणशास्त्र (Gerontology) असे म्हणतात. हे तुलनेने नवे शास्त्र आहे.

वृद्धावस्थेमध्ये व्यक्ती जास्तीत जास्त चांगली कशी राहील या दृष्टीने वृद्धकल्याणशास्त्रात विचार केला जातो. मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वृद्धसंख्याशास्त्र, शिक्षणशास्त्र यांसारख्या सर्व सामाजिक शास्त्रात जो जो भाग वृद्धाशी संबंधित असतो तो एकत्र करून वृद्धांचा सर्व दृष्टिकोनातून विचार या शास्त्राच्या माध्यमातून केला जातो. एका अर्थाने परावलंबी, पण दुसऱ्या अर्थाने नशीबवान असे हे वृद्धकल्याणशास्त्र आहे. कारण संशोधन त्या त्या शास्त्रात होत असते ते फक्त वापरायचे काम हे शास्त्र करते. त्यामुळे वृद्धकल्याणशास्त्र हे तुलनेने नवे असले तरी त्याची प्रगती झपाटय़ाने होताना दिसते. बदलत्या काळानुरूप बदलणारे हे एक गतिमान शास्त्र आहे. या शास्त्रात ज्या गोष्टींचा विचार केला जातो त्यावर फक्त नजर टाकली तर त्याची व्याप्ती लक्षात येते. सेवानिवृत्तीपूर्व व सेवानिवृत्तीपश्चात नियोजन, वृद्धसेवा संस्था स्थापन नियोजन, वृद्ध आणि प्रसिद्धी माध्यमे, वृद्धांची प्रतिमा, वृद्धांचा छळ, पिळवणूक, गुन्हेगारी, ग्रामीण वृद्धांसाठी योजना, वृद्ध स्त्रियांच्या समस्या, वृद्धाश्रम निर्माण, व्यवस्थापन, धर्म, धार्मिक, आध्यात्मिक भावना आणि वृद्ध, वृद्धसेवा, वृद्धत्वाचा स्वीकार, मृत्यूचा स्वीकार, वृद्धांच्या अंत्यसंस्कारसंबंधी विचार, वृद्धांसाठी अर्थार्जनाच्या संधी इत्यादी इत्यादी (यादी अजून मोठी आहे, पण आत्ता थांबते). थोडक्यात- वृद्धांना सन्मानाने जगण्यासाठी हे शास्त्र मार्गदर्शक ठरू शकते.

पण पुन्हा भारतात असणाऱ्या वृद्धांविषयीच्या अनास्थेमुळे या शास्त्रासंबंधी माहितीच कोणी करून घेत नाही तर वापरायची शक्यता कोठून येणार? एखादा समाज वृद्धांना कसं वागवतो यावर तो समाज प्रगत आहे अथवा नाही याचं मूल्यमापन केलं जातं. भारतीय समाजात वृद्धांची स्थिती कशी होती, कशी आहे आणि कशी होण्याची शक्यता आहे हे प्रश्न प्रत्येकानेच विचार करण्यासारखे आहेत.

खरं तर मुंबईला टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने एक पदविका अभ्यासक्रम (diploma in gerontolgy) सुरू केला होता. (मी पुण्याहून जाऊन येऊन केला). पण पूर्ण वर्षांचा आणि १६ विषयांचा असल्यामुळे तो फारसा लोकप्रिय झाला नाही; पण विषय थोडे कमी करून नोकरीसाठी नाही, पण वृद्धांना वृद्धत्वाला सामोरे जाण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग होऊ शकेल असे वाटते. सेवानिवृत्तीपूर्व प्रशिक्षणात वृद्धकल्याणशास्त्राचा समावेश प्राधान्याने करायला हवा. ‘सनवर्ल्ड फॉर सीनियर्स’च्या माध्यमातून वृद्धकल्याणशास्त्रातील एक किंवा दोन विषयांवर मी छोटय़ा कार्यशाळा घेते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. यावरून ज्येष्ठांना या अभ्यासाची आवश्यकता पटते आहे असे लक्षात येते, ही एक समाधानाची गोष्ट म्हणायला हवी. घेणाऱ्याच्या भूमिकेची मानसिकता असणाऱ्या वृद्धांमध्ये त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्य आणि क्षमतेचा वापर करून वृद्धत्व सन्मानाने आणि समाधानाने कसे व्यतीत करता येईल याचे मार्गदर्शन वृद्धकल्याणशास्त्र करू शकते. हे लक्षात आल्यावाचून राहात नाही.

अ‍ॅरिस्टॉटल एकदा म्हणाला होता की, ‘म्हातारी माणसं आशेवर जगण्याऐवजी स्मृतींवर जगतात.’ किती खरं आहे हे विधान! वयाबरोबर माणसाची इतर अनेक नाती आपली रूपं पालटतात. त्याप्रमाणे त्याचं काळाशी असलेलं नातंही बदलतं. भूतकाळ अधिकाधिक दीर्घ भरीव होत जातो. मग या भरीव भूतकाळाच्या आश्रयाने जगणं त्याला सोयीचे वाटते. त्यातल्या त्यात तारुण्याच्या रम्य स्मृती आणि बालपणातल्या आनंद स्मृतीत रमणं हे वार्धक्याचं एक ठळक लक्षण असतं.

पण स्मृती प्रिय असल्या तरी रोजच्या जगण्यासाठी समाज किंवा आजूबाजूचे लोक लागतातच. आजचा दिवस हा आजच जगावा लागतो. कालचा दिवस आज जगता येतच नाही हे वास्तव नाकारून कसं चालेल?

– डॉ. रोहिणी पटवर्धन

rohinipatwardhan@gmail.com

chaturang@expressindia.com