|| डॉ. रोहिणी पटवर्धन

वृद्धकल्याणाची सुरुवात प्रथम स्वत: वृद्धापासून होते. वृद्धांची सध्याची स्थिती आणि मनोवृत्ती कशी आहे याचा विचार करताना अगदी सहज आणि ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट म्हणजे पिढय़ांमधला संवाद हरवत चालला आहे.

The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?
Gajkesari Rajyog In Three Rashi On 27th March 2024 Horoscope
२७ मार्चपासून अडीच दिवस ‘या’ ३ राशींची प्रगती कुणी अडवू शकत नाही; दुप्पट शक्तीचा गजकेसरी योग देईल लक्ष्मीकृपा

आपल्या वापरातल्या भाषेत बोलायचं झालं तर जनरेशन गॅप वाढत चालली आहे. लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ यांच्यात अंतर पडत चालले आहे. त्यातून नकारात्मक विचार आणि एकटेपणाची भावना निर्माण होत चालली आहे. ती का निर्माण होते आणि ती कमी कशी करता येईल याचा विचार प्राधान्यक्रमाने करण्याची वेळ येऊन ठेपली आहे हे निश्चित. वृद्धांशी संबंधित अशा २४ विषयांवर लेख असलेले ‘आनंदस्वर ज्येष्ठांसाठी’ हे माझे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्याच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये परिचर्चेसाठी मनोविश्लेषक डॉ. उल्हास लुकतुके यांना निमंत्रित केले होते. त्यावेळी

डॉ. लुकतुके यांनी हे अंतर का पडते त्याचे सुरेख स्पष्टीकरण केले. ‘‘जनरेट म्हणजे निर्माण करणे. जे निर्माण केले जाते, बोलले, वागले जाते ते इंटरेस्टिंग असेल अशी काळजी घ्यायला हवी. वयाच्या पलीकडे जाऊन शिकण्यासारखे खूप असते. प्रत्येकाचे स्वत:शी, कुटुंबाशी आणि समाजाशी असे तीन पातळ्यांवर नाते असते ते जपण्यासाठी काळाला धरून वागायला हवे. मूल्य कायम ठेवून काळानुरूप नवीन मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. नातवंडांशी संवाद साधण्यासाठी जुन्या गोष्टी, जुन्या शिस्तीच्या चांगल्या वाईट कल्पना बदलल्या पाहिजेत.’’

इथे नेमकी अडचण निर्माण होते ती वृद्धांच्या ‘इगो’ची. मी मोठा, मी कर्ता, मी का बदलायचे असा विचार केला जातो, तो अस्थानी आहे. कारण ‘मी’ – त्यावेळच्या ‘मी’ची तत्त्वे, विचार त्याकाळी बरोबर होते पण ते आता काळाशी सुसंगत नाहीत. तसेच पैसे खर्च करणे – अमाप कपडेलत्ते आणणे, वस्तू वाया घालवणे, लाइट, पंखा बंद न करणे, वस्तू जागच्याजागी न ठेवणे ही आजच्या पिढीची जीवनशैली आहे. त्यांना या गोष्टी लक्षात ठेवून ते नीट करण्यापेक्षा पैसे गेलेले चालतात. त्यांना ते सोयीचे वाटते अशा वेळी एखाद्या गुप्तहेरासारखे मुलांवर, नातवंडांवर लक्ष ठेवून त्यांचे चुकले की लगेच बोलायचे असे करून आपणच त्यांच्या मनात कटुता निर्माण करतो. त्याचा परिणाम आपल्याला टाळण्यात होतो किंवा चिडचिड करण्यात होतो. आपल्या आधीची पिढी जात्यावर पीठ दळत होती, पाटय़ावर वाटत होती, एका कंदिलावर जेवत होती आपण तसे केले का? मग आता त्यांना आपण उगीचच सल्ले सूचना देत बसू नये.

आणखी एक गोष्ट, मुले त्यांची आहेत ती त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वाढवू द्या. मुले सांगतात त्यापेक्षा वेगळे तुम्ही नातवंडांना सांगितले. तुम्ही सांगितले तर चूक असे ती त्यांच्या मुलांना म्हणू शकत नाहीत; पण मनातून त्यांनाही तुमचे विचार पटत नसतात.

अनेकदा तर नातवंडांची काळजी घेणे हे आपलेच काम असल्यासारखे ज्येष्ठ मुलांना ‘अगं तो पडेल’, ‘त्याला थंडी वाजेल’, ‘त्याला उडी मारू देऊ नकोस’, ‘नातवंडाला हे दे’, ‘ते देऊ नकोस’ असे सतत सांगत राहतात. इतके की शेवटी मुलेच चिडून ‘हो असू दे आम्ही बघतो’ असे म्हणतात. या गोष्टी टाळल्या पाहिजेत. नातवंडांना आपण म्हणजे शिपाई वाटता कामा नये. त्यासाठी त्यांच्या आवडीचा खेळ त्यांच्याबरोबर खेळणे, त्यांच्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरे देणे, शाळेबद्दल, त्यांच्या आवडी-निवडीबद्दल जाणून घेणे, त्यापैकी काही कौतुकाने आणून देणे, त्यांच्या मित्र-मैत्रिणींबाबत गप्पा मारणे (चौकशी नाही), त्यांना आवडणाऱ्या नवीन कार्टुन फिल्मबद्दल बोलणे अशा तऱ्हेने त्यांच्याशी भावनिकदृष्टय़ा जवळीक साधण्याचा प्रयत्न सतत राहिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक तर त्यांची पुस्तके, गेम, फिल्म पाहिल्या पाहिजेत. त्यांच्या छंदाच्या आवडीसाठी बरोबर त्यांना घेऊन जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. सध्याच्या दिवसात आई-वडील नोकरी करणारे असल्याने त्यांना न मिळणारा आश्वासक असा सहवास आपण देऊ शकतो. त्यासाठी रिंगमास्टरची भूमिका उपयोगाची नाही.

हे एवढे विस्ताराने लिहिण्याचे कारण म्हणजे थेट संवाद असेल, गोड गमतीचे त्यांचे विश्व समजून घेऊन त्यात सहभागी होणारे नाते असेल, तर मुलांवरचा ताण कमी होतो. त्यांना आपला आधार आणि विश्वास वाटतो. पर्यायाने आपल्याबद्दलही ओलावा वाटतो. कर्तव्याबरोबर असा ओलावा असेल तर जनरेशनमध्ये अंतर निर्माण होणारच नाही.

जुने नाते- तुम्ही कर्ता, ती मुले- हे नाते आता नाही ते लक्षात न ठेवता वागण्याने दोघांचीही फरपट होते. नात्यात मोकळेपणा, लवचीकपणा असू दे. नाते तुम्हाला महत्त्वाचे वाटू दे म्हणजे आपोआप जपले जाते. काळ, संदर्भ आणि कल्पना बदलत असतात. त्याची सजगपणे जाणीव घेऊन त्या त्या प्रसंगी अनुरूप योग्य असे वागायचा प्रयत्न करा. माझे काही अडत नाही, मी माझ्याच मनाप्रमाणे वागणार असा जर ज्येष्ठाचा दुसऱ्या व्यक्तीबद्दलचा दृष्टिकोन असेल तर ते नाते – मृत – अस्तित्व नसलेले असेच असेल. निभवायचे असेल तर ते योग्य दिशेने सुखावह होईल असे नेले पाहिजे.

ज्येष्ठांनी बदलण्याची गरज आणखी एका दृष्टीने आहे, मग नवीन जगात राहताना नवीन दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे तो तुम्हीच केला पाहिजे. नवीन पिढीला त्याची आवश्यकता नाही. कारण ती याच जगात वावरते आहे. या बदलण्याच्या विचाराला आणखी एक बाजू आहे. एकदा एका भाषणाच्या वेळी एका ज्येष्ठाने खूप मार्मिक पण खूप खरा प्रश्न विचारला होता, ‘सतत एकमेकांना पाहून दोघांनाही एकमेकांचा कंटाळा आला आहे, काय करावे?’ याचे उत्तरही न बदलणं हेच असते असं म्हणायला हवं. मी ‘नवरा’ माझी भूमिका ती माझी. बायको तिची भूमिका (किंवा याच्या उलट). हे इतकं पक्क मनात रुतलेलं असतं की पूर्वीची ‘बायको’ आता म्हातारी झाली आहे, ती काही गोष्टी पूर्वीप्रमाणे करू शकणार नाही किंवा करूच शकणार नाही किंवा नवरापण पूर्वीप्रमाणे भूमिका बजावू शकणार नाही हे लक्षात घेऊन नवरा-बायकोपेक्षा दोन परस्परावलंबी व्यक्ती या विचाराने राहिले पाहिजे. नव्याने नात्याची जुळणी करायला हवी. (कॅलिबरेशन) म्हणा ना! खरंच जर आनंदात राहायचं असेल तर भूमिकांची अदलाबदल करून टाकावी. सगळेच नवे वाटेल. शिकताना मजा येईल. अनेकदा मुलांनाच आई-वडिलांना समजावून सांगायचे प्रसंग येतात आणि त्याचे प्रमाण जर वाढत राहिलं तर मुलेच दुरावतात हे अगदी (अनुभवाने जाणलेले आहे) सत्य आहे.

सरते शेवटी विचार याही गोष्टींचा केला पाहिजे, मुलांसाठी आपण वीस वर्षे कष्ट घेतले म्हणून त्यांनी आता आपल्यासाठी घ्यावे ही अपेक्षा असते पण एक गोष्ट विसरून कशी चालेल? की कदाचित् त्यांना आपली २५-३० र्वष काळजी घ्यावी लागण्याची शक्यता आहे तीसुद्धा मुले स्वत: साठीच्या पुढची झाल्यानंतर मग खरी गरज कोणाला आहे? त्यांना की आपल्याला? आणि जास्त गरज आपल्याला असेल तर बदलायचे कोणी त्यांनी की आपण?

येथे पुढच्या पिढीनेही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे बदलाचा वेग प्रचंड आहे तो १०० टक्के गाठता येणं ज्येष्ठांना शक्य नाही त्यासाठी पुढच्या पिढीनेही त्यांना समजून घेऊन वागले पाहिजे. त्यांना दिवसाकाठी १०-१५ मिनिटे पूर्णपणे लक्ष देऊन वेळ दिला पाहिजे. त्यांच्या छोटय़ा छोटय़ा गरजा शक्य तितक्या वेळेवर पूर्ण केल्या पाहिजेत. वागण्यातून त्यांच्याशी बोलतानाच्या टोनमधून प्रतिक्रिया व्यक्त करतानाच्या पद्धतीमधून त्यांच्याबद्दल आदर प्रेम आणि काळजी व्यक्त करत राहिले पाहिजे. म्हणजेच बायको मुलांच्या मनातही त्या भावना रुजतील आणि आपोआपच घरामध्ये एक मोकळे वातावरण राहील.

rohinipatwardhan@gmail.com

chaturang@expressindia.com