नितीन अरुण कुलकर्णी nitindrak@gmail.com

नग्नाकृतीतून आपल्याला जे दिसते/ जाणवते आहे, त्याचे कारण त्या नग्नाकृतीच्या पलीकडे आहे हे एकदा आकळले की, हळूहळू जाणिवेचे पदर उलगडू लागतात..

sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Digital lock Godrej target of thousand crore turnover in home product category
डिजिटल कुलूप, वास्तू उत्पादन श्रेणीत हजार कोटींच्या उलाढालीचे ‘गोदरेज’चे लक्ष्य
Fraud of crores by selling replicas of famous painters including MF Hussain Mumbai
एम.एफ हुसैनसह प्रसिद्ध चित्रकारांच्या प्रतिकृती विकून कोट्यावधींची फसवणूक; हवाला नेटवर्कच्या माध्यमातून मनी लाँडरींग

आजच्या लेखाचे शीर्षक वाचताना आपल्या मनात हलचल झाली असेल. अजूनही आपल्या मनात नग्नतेविषयी दुजाभाव असतो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘नग्न’ या नैसर्गिक स्थितीशी अश्लीलता जोडलेली असते. प्रसारमाध्यमांत तर असे चित्र दिसते, की छायाचित्रे, रंगचित्रे व इलस्ट्रेशन्स यांना अर्धनग्नतेचा मुलामा चढवलेला आहे. नग्नता विकली जाते हे आपण उघडपणे पाहतो. निखळ नग्नतेपेक्षा लैंगिकतेचा मुलामा दिलेले प्रदर्शन सर्वानीच ग्राह्य़ मानलेले असते. प्रसारमाध्यमांनी नग्नता व लैंगिकता यांचा मेळ घातलेला असतो. खरे तर नग्नतेकडे स्वच्छ व सहजपणे बघता येऊ शकते.

दृश्यकलेत नग्नाकृती ही सहजपणे दाखवली व बघितली जाते. दृश्यकलेचे विद्यार्थी जेव्हा कला महाविद्यालयात जातात, तेव्हा पहिल्या वर्षांतच शरीररचनाशास्त्राच्या पुस्तकात नग्नाकृतींची रेखाचित्रे, छायाचित्रे तसेच हाडांची रचना व स्नायूंचा अभ्यास असतो. दुसऱ्यांनी काढलेल्या चित्र वा शिल्पांवरून केलेल्या अभ्यासातून सराईत होतो ना होतो, तोच एक दिवस उजाडतो- जेव्हा साक्षात नग्नाकृतीसमोर जाऊन बसायची व बेडर होऊन असे निष्कलंक बघायची वेळ येऊन ठाकते. पहिले काही दिवस चित्र काढणेदेखील कठीण असते, कारण निखळ प्रकाशात प्रत्यक्ष नग्न व्यक्ती पाहण्याची ही पहिलीच वेळ असते. आणखी एक संकोचाचा भाग म्हणजे इतर मित्र-मत्रिणींसमवेत असे बघणे, हा अनुभव म्हणजे एक ‘नग्न सत्य’च असते. (सत्याला नग्न का म्हणतात, याचा प्रथमच प्रत्यय येतो.) कालांतराने वरवरचे शोधक कटाक्ष वगैरे नाहीसे होऊन आपले मन प्रत्यक्ष दृश्य-अभ्यासाकडे वळते. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहू लागल्यास लक्षात येऊ लागते की, आपल्याला जे दिसते/ जाणवते आहे, याचे कारण त्या नग्नाकृतीच्या पलीकडे आहे. मग जाणिवेचे पदर उलगडू लागतात व लक्षात येते की, नग्नता आपण फक्त वस्त्रांनीच नव्हे, तर सभ्यतेच्या कल्पना, संकेत व रूढी, सौंदर्याच्या कल्पना व मानसिक प्रयोजन यांनीही झाकलेली आहे. असा हा पदरांचा गुंता आता आपल्याला सोडवता येऊ शकतो.

या ‘संकल्पना-विचाराची’ सुरुवात झाली ती, आधीच्या ‘शारीर अस्तित्वाची जाणीव’ या लेखातल्या मुद्दय़ांमुळे. शारीर जाणिवेत मोठे योगदान  स्पर्शज्ञानाचे. यात स्वत:च्या स्पर्शबरोबरच कपडे व शरीराची इतर आवरणे यांच्या स्पर्शातूनही आपल्याला स्वत:च्या शरीराची जाणीव होत असते. अशी शारीर जाणीव झाली की, मनोमन लाज व कुचंबणा हे आलेच. अशा वेळी आपण शरीर नीटनेटके करून घेतो! आपल्या शरीराची इतर वेळी न दिसणारी छबी इतरांना दिसली तर? या सहज वाटणाऱ्या भीतीच्या भावनेशी नग्नतेचा संबंध आहे. हे इतरांच्या नजरेचे आपणास असलेले अनावश्यक भान! त्यात आरशाचा सहभाग बराच असावा. आपल्याला जेव्हा आपले शरीर समोर प्रतििबबित झालेले दिसते; तेव्हा अचानकपणे मनात तरळून जाते, की जणू काही दुसरेच कोणी आपल्याला आत्ता बघत आहे. अशावेळी निखळ बघण्याऐवजी त्यातील वैगुण्याची जाणीवच जास्त असावी आणि या मन:प्रतिमांमधूनच आपला व्यवहार होत असावा.

दुसरा भाग म्हणजे इतरांच्या शरीराची प्रतिमा बघण्याचा. यात स्वत:चे शरीर बघण्याचा मानसिक अनुभव आपोआप जोडला जात असावा. त्यामुळे स्वत:च्या शरीराची घृणा व लज्जेची भावनात्मकता पाश्र्वभूमीत असावी. आणखी असे की, माध्यमांत दाखवली जाणारी प्रतिमा समाजाच्या सौंदर्याच्या कल्पनेबरहुकूम असल्याने स्व-प्रतिमेच्या तुलनेत उजवीच वाटते. स्वत: वा इतरांच्या नग्नतेबद्दल निकोप दृष्टिकोन तयार होण्याच्या शक्यता असू शकतात, यावर प्रथम विश्वास बसत नाही.

भारतीय विचारात कुठेही नग्नतेचा विचार समग्र जीवनापासून तोडून केलेला दिसत नाही. लैंगिकता म्हणजे सृजन असून या नैसर्गिक प्रेरणांचा नि:संशय स्वीकार आपल्याला वासनांच्या जंजाळापासून अलिप्त ठेवू शकतो. भारतीय शिल्पकलेतले सौंदर्यशास्त्र शारीर संवेदनांचा पुरस्कार करत असते, ओघाने नग्नाकृतीकडे स्वच्छ दृष्टीतून पाहणे आलेच. सिंधू संस्कृतीतील स्त्री-प्रतिमांपासून ते जैन धर्मातील नग्नतेचा अध्यात्म व जीवनाशी जोडलेला संबंध इथे धुंडाळायला हवा.

प्राचीन ग्रीसमध्ये नग्नता ही वीरांची गरिमा होती. ऑलिम्पिक स्पर्धामध्ये अ‍ॅथलीट्सना नग्नावस्थेतच खेळावे लागे. शिल्पकारांनीदेखील पुरुष देवांना नग्नावस्थेतच चित्रित केलेले आहे. शरीराचा अभ्यास करून मानवाकृतीचे तंतोतंत चित्रण ग्रीकांनीच पहिल्यांदा केले. मनाला जाणवलेल्या शरीराकृतीपेक्षा डोळ्यांना दिसलेल्या आकृतीचे चित्रण करण्याच्या हव्यासापोटीच पाश्चात्त्य कला विकसित झाली. भारतीय लघुचित्र शैलीत मानवाकृतीचा घाट हा लालित्यप्रधान असतो; जी विशिष्ट मानवाकृती चित्रात काढायची आहे, ती त्या चित्राच्या कथनाचा व भावनिक आशय व्यक्त करत असते. यातली नग्नता ही ‘नग्नता’ म्हणून पुढे न येता, पूर्ण आशयाच्या गाभ्याचा भाग बनते. शरीरावर कपडे असले तरी ते कपडे शरीराचे अस्तित्व ग्रहण करतात; हे वैशिष्टय़ पाश्चात्त्य प्रभावाखाली राहिल्यामुळे आपल्याला राखता आलेले नाही.

सोळाव्या शतकानंतर युरोपातल्या कलेचा ‘न्यूड’ हा एक स्वतंत्र कला प्रकार होता. यात केवळ मानवी शरीररचना दाखवणे असे नसून शरीराकडे सौंदर्यपूर्ण आकार म्हणून बघितले गेले. शरीराचे यथार्थ चित्रण कुठे थांबते व अभिव्यक्ती कुठे सुरू होते, हे आपल्याला सांगताच येत नाही. नग्नता ही एका नवीन वस्त्रासारखी समोर येते. केनिथ क्लार्क या अभ्यासकाचे विचार पुढे नेताना २० व्या शतकातील प्रसिद्ध अभ्यासक-लेखक जॉन बर्जर याने आपल्या ‘वेज् ऑफ सीइंग’ या पुस्तकात न्यूडवर एक पूर्ण प्रकरण लिहिले आहे. यात तो ‘न्यूड’ व ‘नेकेड’ या दोहोंमध्ये फरक करतो. चित्रकलेतल्या नग्नतेबद्दल तो म्हणतो की, ‘हा जगाला दाखवण्यासाठी केलेला एक प्रकारचा वेशच आहे. सामान्य नागवेपण हे वस्त्रहीनतेतून येते आणि इथे लाज, शरम असू शकते.’ असे म्हणताना त्याला मानवी सौंदर्याच्या कल्पनेच्या मुलाम्याकडे बोट दाखवायचे आहे. यापुढे जाऊन समाजाच्या पुरुषी लैंगिकतेच्या सुप्त भागावरही तो भाष्य करतो. स्त्री नग्न देहाकडे बघण्याचा परवानाच जणू ही चित्रकला देत होती.

‘जर इतर लोकांनी नग्न झाल्याच्या वस्तुस्थितीला आपण सामोरे जाऊ शकणार नसू, तर आपण आयुष्यात कुठेही पोहोचू शकणार नाही,’ असे जॉन लेनन या अमेरिकी गायकाने म्हटले होते. हा संदर्भ याचसाठी की, एकंदरीत आधुनिक कलेत केवळ प्रतिमा रंगवण्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष नग्न देह वापरून ‘परफॉर्मन्स आर्ट’मध्ये प्रयोग झाले; परंतु यातले प्रेक्षक बऱ्याच वेळा कलारसिक असत आणि त्या खेळांचा अर्थ सांकेतिक व चिन्हात्मक असे. सामान्य माणसाचा सहभाग इथे विरळाच.

प्रत्यक्ष नग्नता हाच विषय घेऊन काम केलेला व याचसाठी ओळखला जाणारा एक सध्याचा धाडसी कलाकार म्हणजे- स्पेन्सर टय़ुनिक! हा एक अमेरिकी छायाचित्रकार आहे, जो मोठय़ा प्रमाणात नग्न लोकांच्या समूहाचे चित्रीकरण आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. १९९४ पासून त्याने जगभरात ७५ हून अधिक मानवी समूहांच्या परफॉर्मन्सची छायाचित्रे काढली आहेत. या छायाचित्रांमध्ये तीन कलाप्रकारांचे मीलन दिसते : (१) कला छायाचित्रकला (२) परफॉर्मन्स आर्ट (यात नाटकाच्या प्रयोगासारखे, लोक शारीरिक हावभाव आणि हालचाली करतात. त्यात कधी कलाकार सामील असतात.) व (३) आर्ट न्यूड.

टय़ुनिकचे यामागचे तत्त्वज्ञान असे आहे की, ‘अनेक व्यक्ती कपडय़ांविना एकसंध होतात. त्यांच्या एकत्रित स्वरूपाचा कायापालट होतो. ही शरीरे नैसर्गिक परिसरांत विस्तारतात व एकजीव होतात. लैंगिकतेला अधोरेखित न करणारे हे लोकांचे समूह आपल्या विचारांना आव्हान देतात किंवा त्यांची पुनर्रचना करतात; हे विचार नग्नता आणि गोपनीयता यांच्या संबंधावर प्रकाश टाकतात.’

आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, मोठय़ा संख्येने हे लोक स्वत:च्या इच्छेने नग्न स्थितीत काम करायला तयार होतात. आता तर टय़ुनिकच्या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी करायची सोय आहे. इथे येणारे सर्वच लोक हे ‘न्यूडिस्ट’ नसतात. एकमेकांना नग्न बघून नग्नतेचा बाऊ नाहीसा होतो आणि एक प्रकारच्या स्वातंत्र्याची भावना जागृत होते. टय़ुनिकची छायाचित्रे पाहताना सुरुवात होते ती मानवी नग्नतेच्या महासागराने; पण नंतर आपण पोहोचतो एकतत्त्वाच्या नादात, जिथे स्वत:च्या निसर्गरूपात विलीन होण्यापलीकडे काहीच नसते!

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.