नितीन अरुण कुलकर्णी

अलंकरण व विरूपीकरण यांत फरक आहे, पण दोहोंमध्ये समान सूत्र सापडते ते म्हणजे अतिशयोक्तीचे.. ही अतिशयोक्ती करताना अर्क तसाच ठेवला जातो, त्यामुळे बोधनाची आणि रंजनाचीही प्रक्रिया नवीन वळणे घेते!  

समुद्रकिनाऱ्यावर ओलसर वाळूत चालत, पावले टाकताना आलटून पालटून पायाच्या अंगठय़ाच्या नखाने खरडवत वाळूचा तुकतुकीत पृष्ठभाग विद्रूप करणे आपल्याला आवडते. एस्.टी. बसच्या कंटाळवाण्या प्रवासात लोखंडाच्या पत्र्यावरच्या हिरव्या रंगाच्या इनॅमल पेंटच्या लेपाचे वाळवीच्या बिळासारखे रेषात्मक आकार आणखी खरडायला आपल्याला आवडलेले आहेच. त्यात जर आधीच कुणी एखादा ओळखीचा आकार रेघोटला असेल तर तो आपल्या नखाने विद्रूप करायचा आसुरी आनंद अनेकांनी  विनासायास घेतला असेल.

किंवा, प्रतिबिंब विरूप वा विद्रूप झाले की किती मजा येते पाहायला!! जत्रेत/ सर्कसमधले वेडेवाकडे प्रतिबिंब दाखवणारे आरसे आपल्याला आठवत असतील. या आरशांची घडणच अशी असायची की त्यामुळे कधी आपण लांब, कधी बुटके व जाडे तर कधी वेडेवाकडे दिसत असू. आज असे आभास तयार करणारे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आले आहे यात आपली छबी वेगवेगळ्या विचित्र रूपांमध्ये बदलता येते. मनोरंजनाचे एक माध्यम म्हणून हसण्यासाठी आजही आपण हे वापरतो. खरे तर गंभीर अशा या बाबीला आपण हसण्यावारी का बरे नेत असू? याचे एक कारण दिसते ते म्हणजे ‘विरूप’ व ‘मूळरूप’ यातली दृश्य तफावत व साम्य!

विरूपता (डिस्टॉर्शन) म्हणजे नेमके काय? विरूपाची संकल्पना नवनिर्मितीसाठी कशी बरे वापरली जाते; आणि या संकल्पनेचा विस्तार कसा होतो? हे एक विलक्षण कोडे समोर आव्हान देऊन उभे होते. कलेचे शिक्षण घेताना डिस्टॉर्शन हा शब्द अनेकदा शिक्षकांच्या तोंडून ऐकू येत असे. जास्तकरून आधुनिक कलेच्या संदर्भात हा शब्द वापरला जात असे. घनवाद (क्युबिझम) रंगभारवाद (फॉविझम) या कलाचळवळींच्या संदर्भात तो जास्त असे. घनवादाचे प्रणेते पाब्लो पिकासो व जॉर्जस ब्राक या कलाकारांनी समोर दिसणाऱ्या दृश्याचे चित्रात विघटन करणे सुरू केले. एखादी घन वस्तू एका कोनातून पाहताना तिची एकच बाजू (अपूर्ण वास्तव) दृष्टिपथात येत असते, समजा दृष्टीत नसलेल्या बाजू पाहायच्या झाल्या तर आपल्याला त्या वस्तूभोवती ३६० अंशात फिरावे लागते आणि असे करताना आधीची प्रत्येक बाजू पुन्हा झाकली जाते. आता मेंदूचे कौशल्य असे असते की केवळ एकच बाजू दिसत असली तरीही तो आपल्याला पूर्ण वस्तूची जाणीव करून देतो (म्हणजे खरे तर वास्तवाच्या अनुषंगाने आपल्याला दिसणारे दृश्य हेच विरूप व विसंगत असते.). क्युबिस्टांनी वस्तूच्या अदृश्य बाजू एकाच प्रतलावर आणून दाखवल्या. नकाशाच्या पुस्तकात पूर्ण पृथ्वी कापून उलगडवून दाखवलेली असते तसे; विरूपता यात ओघाने आलीच. वास्तववादाचा नवा अर्थ इथे तयार होतो.

रंगभारवादाची विरूपता दृश्यातल्या वस्तूचे विरुद्ध व असंगत रंग दर्शवण्यातून साधली गेली. हेन्री मातीस हा या कला प्रकाराचा प्रणेता. त्याने बायकोचे व्यक्तिचित्र काढले आहे ‘ग्रीन स्ट्रिप’ नावाचे. यात गडद पिवळा व गुलाबी अशा रंगात तिचा चेहरा रंगवलेला दिसतो आणि कपाळापासून हनुवटीपर्यंत मधोमध एक हिरवी रेघही. छायाभेदाचा परिणाम साधण्यास रंगांच्याच गडद-फिकेपणाचा वापर करण्याची पद्धत आधुनिक युरोपीय नवकलेत होतीच; त्याचाच हा पुढला टप्पा. विजोडपणा, असयुक्तिकता, विसंगती अशा विरूपाला अधिष्ठान मिळाले ते आधुनिक कलेच्या बहराच्या (१९२०-६०) काळात सामाजिक व राजकीय जीवनात वाढलेल्या विसंगतींमुळे. हे झाले मानवी आधुनिक जीवनातले विरूपाचे तात्कालिक आकर्षण व दर्शन; परंतु चेताशास्त्राच्या नवीन अभ्यासानुरूप सजीव प्राणिमात्रांमध्ये विरूपतेची आस उपजतच असते असे सिद्ध झाले आहे.

‘पीकशिफ्ट इफेक्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सूत्राची सुरुवात वैज्ञानिक निको टिनबग्रेन यांनी केलेल्या शोधावरून झाली ती हेिरगगल या पक्ष्यांच्या पिल्लांवरील एका प्रयोगात; जेव्हा त्यांना खायला हवे असते तेव्हा त्यांच्या आईच्या चोचीवरील लाल डाग बघून स्वत:च्या चोचीने त्यावर टॅप करतात; या प्रयोगात लाकडाच्या पट्टय़ांवर लाल टिकल्या लावून त्या पिल्लांना दाखवल्या असता त्यांनी, जास्त टिकल्या असलेल्या पट्टय़ांवर चोची मारायला सुरुवात केली. अतिशयोक्तीमुळे उत्तेजित होणाऱ्या संवेदनेच्या परिणामाचे आदिम सूत्र इथे दिसून आले.

कलेचा हेतू वास्तवाचे वर्णनात्मक कथन करणे नव्हे तर वास्तवाचे रूपांतर करून ते अधिक रंजक आणि अर्थपूर्ण बनविणे आहे आणि हे करण्याचा एक मार्ग म्हणजे अतिशयोक्ती आणि विरूपीकरण. कलाकुसरीतल्या सुशोभीकरणात देखील हेच सूत्र वापरले जाते. अर्थात अलंकरण व विरूपीकरण यांत फरक आहे, पण दोहोंमध्ये समान सूत्र सापडते ते म्हणजे अतिशयोक्तीचे.

जॉन हायमन यांच्या शोधनिबंधात चेता-सौंदर्यशास्त्र या वैज्ञानिक संशोधनाच्या नवीन क्षेत्राबद्दल चर्चा केलेली आहे, हा चेताशास्त्रज्ञांनी केलेला कलेचा अभ्यास आहे. या प्रयोगशील नवीन शास्त्रातील सर्वात प्रमुख शास्त्रज्ञ आहेत व्ही. एस. रामचंद्र आणि सेमीर झेकी. या दोघांनीही आपल्या कामाबद्दल महत्त्वाकांक्षी दावे केले आहेत. रामचंद्रन निक्षून सांगतात की, त्यांना ‘कला खरोखर काय आहे हे समजून घेण्याची गुरुकिल्ली सापडली आहे’; आणि ‘मेंदूच्या प्रतिमेच्या प्रयोगांद्वारे या सिद्धांताची चाचणी घेतली जाऊ शकते’.

मुळात ‘न्यूरो-अ‍ॅस्थेटिक्स’ या संज्ञेची रचना करणाऱ्या झेकी यांनी सौंदर्यानुभवाचा जैविक आधार समजून घेण्यासाठी कलेची ही न्यूरोबायोलॉजिकल व्याख्या १९९९ मध्ये तयार केली. रामचंद्रन यांचे ‘पीकशिफ्ट इफेक्ट’चे आवडते उदाहरण म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पकारांनी स्त्रीच्या आकृतीचे केलेले रेखन. बाराव्या शतकातील पार्वतीच्या एका शिल्पाचे ते उदाहरण घेऊन रामचंद्रन म्हणतात, या प्रकारचे शिल्प हे मूलत: ‘स्त्री रूपाचे व्यंगचित्र’ (कॅरिकेचर) आहे. दर्शक हे दृश्य बघण्यासाठी उत्तेजित होतात ते त्यात असलेल्या विरूपतेमुळेच. त्यांच्या मते मेंदूमध्ये असे न्यूरॉन्स असू शकतात जे स्त्रीच्या व पुरुषांच्या कामुक आकाराच्या अनुभवाला वेगवेगळा प्रतिसाद देत असतील.

रामचंद्रन कलेबद्दल एक सर्वसमावेशक शास्त्रीय व्याख्या प्रस्तावित करतात. त्यांच्या मते ‘कलेचा हेतू वास्तवाचा विस्तार करणे व त्यासाठी प्रसंगी वास्तविकतेचे विरूपिकरण ही करणे’ आणि ‘वास्तवाचे केवळ सार दाखवणे असे नसून तर त्या साराचा विस्तार करणे’ हा होय. त्यांच्या मते, ‘सर्व कला म्हणजे अर्कचित्र (कॅरिकेचर) आहे’ (कॅरिकेचरमध्ये जसे व्यक्तीचा विशेष दाखवण्यासाठी अतिशयोक्तीतून विरूप साधले जाते तसे).

साहित्यातदेखील विरूपता वापरली जाते, मॅजिकल रिअ‍ॅलिझम या प्रकाराचाच हा विस्तार असतो. जॉर्ज ऑरवेल यांनी लिहिलेले ‘अ‍ॅनिमल फार्म’ हे विरूपणाचे साहित्यातले उत्कृष्ट उदाहरण आहे. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आणि रूढीवाद दर्शविण्यासाठी प्राण्यांच्या बोलणाऱ्या व्यक्तिरेखांचा रूपक म्हणून उपयोग करून कथा सांगितली आहे. या कादंबरीच्या प्रतीकात्मकतेत बऱ्याचवेळा विरूपाचा वापर केला आहे. फान्झ काफ्काची ‘मेटामॉर्फसिस’ ही लघुकथा हे एक आणखी एक विलक्षण उदाहरण. या लघुकथेची सुरुवात अशी होते, ‘जेव्हा ग्रेगर सम्सा एका सकाळी अस्वस्थ करणाऱ्या स्वप्नांमधून उठला तेव्हा त्याने स्वत:ला त्याच्या पलंगावर एक राक्षसी किडय़ात रूपांतर झालेले अनुभवले.’

जेम्स एस्बरची चित्रे आणि शिल्पे, या विरूपाने भरलेल्या त्याच्या दृश्यकलेसाठी बघायलाच हवीत. तो म्हणतो की विरूपाबद्दलची त्यांची आवड निर्माण झाली ती ‘प्रतिमांच्या भौतिक लवचीकते’मध्ये (प्लॅस्टिसिटी) स्वारस्य असल्यामुळे. त्यांनी प्रतिमा विरूप करण्यासाठी लवचीक कापडावर रंगविलेल्या प्रतिमा कॅनव्हासवर ताणून बसवल्या व मुद्दाम त्यांना वाकडे तिकडे राहू दिले. साधलेला आकार मग पक्का करण्यासाठी चारी बाजूंनी शिवून टाकला. १९९०च्या दशकात प्लॅस्टिसीनच्या मातीचा वापर करून त्याने कलाकृती बनवल्या, याचे कारण हेच होते की ही माती लवकर सुकत नाही त्यामुळे विरूप आकार साधला जातो. एस्बरने एका प्रदर्शनात शोमधील प्लॅस्टिसीनच्या तुकडय़ांमधून पॉप गायक मायकेल जॅक्सन आणि अध्यक्ष निक्सन आणि लिंकन यांची विरूप व्यक्तिचित्रे बनवली आहेत.

जगातल्या विकृतीचे हे विरूप दर्शन म्हणून ही चित्रे पाहणे म्हणजे यथार्थतेचा कळस ठरेल, खरे तर आपल्याला (म्हणजे कोणाही प्रेक्षकाला) आपली स्वत:ची बोधनाची व रंजनाची प्रक्रिया समजावी व त्यातून हलकेफुलके रंजन व्हावे याच उद्देशाने ही विरूप चित्रे एस्बर घडवतो- घडू देतो!

लेखक दृश्यकला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात . nitindrak@gmail.com