05 August 2020

News Flash

बहुरूपी अस्तित्व

चेहऱ्यावरच्या केसांचे पुरुषांना वरदानच म्हणायचे, कारण यामुळेच रूपबदल चटकन करणे सोपे होते.

सिंडी शेरमनकृत स्वछायाचित्र

नितीन अरुण कुलकर्णी nitindrak@gmail.com

‘रूपवैविध्या’त एक प्रकारे स्वभाववैगुण्यांना लपवणे, गुणांना अधोरेखित करणे आणि नसलेल्या गुणांना दाखवणे हे होते. याउलट, ‘रूपांतरा’त माणसाची पूर्ण ओळखबदल होते. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचाच लोप होऊन नवीन व्यक्तिमत्त्व तयार होणे ओघानेच आले..

एखाद्या दिवशी भांग पाडताना कंगवा जरासा वेगळ्या पद्धतीने फिरवला गेला की आपल्या चेहऱ्याचे रूप बदलते; आपला चेहरा वेगळाच भासू लागतो. पण बऱ्याचदा स्वत:च्या रूपात बदल करायचे आपले धाडस होत नाही आणि आपण नेहमीसारखाच भांग पाडून टाकतो. चेहऱ्यावरच्या केसांचे पुरुषांना वरदानच म्हणायचे, कारण यामुळेच रूपबदल चटकन करणे सोपे होते. दाढी आणि/ किंवा मिशी वाढवणे, कोरणे वा कमी करणे अथवा पूर्ण सफाचट करण्यातून रूपबदलाचा आनंद मिळत असतो. स्त्रियांकडे चेहऱ्याचे रूप पालटायची बरीच साधने असतात; यात वेगवेगळ्या केशरचना, दागिन्यांचे प्रकार, मेक-अप आदींचा समावेश होतो. मेक-अपने चेहऱ्याचा आकार बदलल्याचा आभास तयार करता येतो, एखादे व्यंग झाकण्यासाठीही असा आभास तयार केला जातो. अर्थात, चेहरा पूर्ण बदलण्यापेक्षा आकर्षक करणे, त्यात रेखीवपणा आणणे यासाठी जुजबी मेक-अप केला जातो. डोळे आणि ओठ यांचा सहभाग यात जास्त असतो.

आमूलाग्र रूपपालट करणे कपडय़ांच्या सहभागाखेरीज अपूर्णच. नवीन कपडे घ्यायला गेल्यावर नेहमी ज्या रंगाचे कपडे आपण घालतो, त्यापेक्षा वेगळ्या रंगाचे कपडे घालून ट्रायल रूमच्या पुढे, मागे व आजूबाजूच्या प्रतिबिंबाकडे पाहून आपल्याला ‘रूपांतर’ झाल्याचे भासते. कारण आपल्याला स्वत:स असे बघण्याची सवय नसते. परंतु शक्यता अशी असते की, आपण आपल्या त्या वेळच्या रूढ झालेल्या रूपाचा विस्तार करणार असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि शरीराला हे ‘नवरूप’ का म्हणून साजणार आहे, हे एखादा फॅशनतज्ज्ञ सांगू शकतो. परंतु आपल्याला याची प्रक्रिया लक्षात येत नाही. फॅशनचे पूर्ण क्षेत्रच या नवरूपांच्या शक्यतांवर उभे असते. ‘शक्यता’ अशासाठी म्हटले, की याचे गणित ठोकताळ्याप्रमाणे नसते. कधी एखादा ‘लुक’ आपल्याला साजतो, तर कधी नाही. कोणाला तो रंग वा आकार चांगला दिसला म्हणून आपण घालायला गेलो, तर फसण्याची शक्यताच जास्त असते. आज फॅशनचा व्यवसाय हा आपल्यासाठी असलेल्या दिसण्याच्या उपलब्ध शक्यतांच्या पर्यायांच्या विविधतेवर अवलंबून आहे. हे पर्याय आपल्याला निवडायला भाग पाडण्यासाठी लोकप्रिय- कला व प्रसारमाध्यमांचा सहभाग असतो. ज्या कपडय़ांनी मढलेले आपले आरशातले दृश्यरूप आपल्याला दुकानातल्या ट्रायल रूममध्ये आवडते, तेच रूप प्रत्यक्ष लोकांत वावरताना आपले मन विचलित करू शकते. केवळ ‘दिसण्या’पेक्षा इथे ‘असणे’ही महत्त्वाचे असते. त्या कपडय़ाचा आपल्या शरीराला होणारा स्पर्श आणि वावरताना इतरांच्या अप्रत्यक्ष प्रतिक्रिया हे भाग महत्त्वाचे असतात. असे झाले नाही, तर ते कपडे तसेच पडून राहतात. असे होण्याचे कारण मानसिक व्यवहारात सापडू शकेल. काही स्त्रियांना विचारले की, तुम्हाला आवडणारा रूपबदल का व कसा करावासा वाटतो? साधारणपणे एकच उत्तर आले : ‘चांगल्या वस्त्रप्रावरणात आत्मविश्वास वाढतो.’ स्वत:त स्वत:विषयी चांगली भावना तयार होणे गरजेचे असते. त्यामुळे आपण हेसुद्धा पाहिले आहे, की रूढार्थाने चांगले दृश्यरूप नसलेल्या कपडय़ांमधले लोक लीलया वावरत असतात; कारण त्यांचा येथे आत्मविश्वास वाढलेला असतो.

माणसाचे ‘स्वरूप’, ‘स्वभाव’, ‘व्यक्तिमत्त्व’ आणि ‘धारण केलेले रूप’ हे एकाच जातकुळीतले घटक. यांत परस्पर संबंध प्रस्थापित झाला की आपला विश्वास जागतो. अर्थात, यावर नेहमी आच्छादन असते ते सामाजिक चौकटीचे. ही चौकट, मूळ वस्त्रपरंपरा व तिचे अवशेष (जी प्रांताच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीनुरूप बनलेली असते) आणि प्रसारमाध्यमे व समकालीन लोककलांनी बनलेली, संस्कारित केलेली असते. ‘फॅशन’ म्हणजे कपडे नव्हेत, तर मानवी रूपपालटाचे ते एक अलिखित विधान असते. जे वाचता येते. महत्त्वाचे म्हणजे, या विधानांमध्ये अनेक विधानांचे ‘रूपवैविध्य’ दडलेले असते. या विधानांत दृश्यचिन्हे दडलेली असतात, जी हुडकून काढावी लागतात. यासाठी एका शास्त्राचा वापर करतात, त्याला ‘सेमिऑटिक्स’ म्हणतात. वेगवेगळ्या चिन्हांच्या सरमिसळीच्या पदरांचा उलगडा या शास्त्राद्वारे होतो आणि रूपवैविध्याचा शोध-बोध होतो; त्यामुळे फॅशनच्या शिक्षणात याचा अंतर्भाव करतात.  कपडे व वस्तूंचे दृश्य; त्यातून बनणारे रूप आणि विविध रूपांमधला अल्पकाळातच होणारा बदल; यातून तयार होणारी व्यक्तिमत्त्वाची ओळख आणि त्या अनुषंगाने बनणारी समाजघटकाची सांस्कृतिक ओळख- अशी शृंखला जाणणे म्हणजे ‘फॅशन ट्रेंड्स’ हेरणे. यातूनच पुढे आपल्याला ‘फोरकास्टिंग’द्वारे नजीकच्या भविष्यातल्या ‘दृश्यरूपांचे कूळ’ अधोरेखित करता येते. फॅशन फोरकास्टर म्हणजे ‘सांस्कृतिक हेर व द्रष्टा’ असे दुहेरी व्यक्तिमत्त्व असते.

‘रूपवैविध्य’ व ‘रूपांतर’ यांत फरक आहे. रूपवैविध्यात रंजन व लुभावन आहे. हे एक प्रकारे स्वभाववैगुण्यांना लपवणे, गुणांना अधोरेखित करणे आणि नसलेल्या गुणांना दाखवणे आहे. याउलट, रूपांतरात माणसाची पूर्ण ओळखबदल आहे. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचाच लोप होणे आणि नवीन व्यक्तिमत्त्व तयार करणे आले. ‘बहुरूपी’ या लोककलेत अशा रूपांतराचा वापर होतो. ‘तो मी नव्हेच!’ हे आचार्य अत्रेंनी लिहिलेले व प्रभाकर पणशीकरांनी ‘लखोबा लोखंडे’च्या प्रमुख भूमिकेत साकारलेले नाटक. यात पणशीकरांनी एकूण पाच पात्रांच्या भूमिका बेमालूमपणे साकारल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे, हे नाटक एका खऱ्याखुऱ्या गुन्हेगारावर रचलेले होते, ज्याचे नाव माधव काझी होते. या काझीने १९५५ ते १९६० या काळात रूपांतर करून अनेकांना ठगवले होते. हे नाटक त्याबाबतच्या न्यायालयीन खटल्यावर आधारित आहे. ते मराठी रंगभूमीवर विश्वविक्रम प्रस्थापित करणारे ठरले, याचे कारण ‘नाटकाचे उत्तम रसायन’ याबरोबरच- ‘आपल्याला व्यक्तीच्या रूपांतरामध्ये असलेला रस’ हेही आहे. एक व्यक्तिमत्त्व झाकण्यातून नवीन व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याला कलाच मानले जाते. एकंदरीत आपल्याला लपणे व लपवणे आवडतच असते.

प्रत्यक्ष जीवनात गुन्हेगारीव्यतिरिक्त रूपांतराचा वापर सरकारी हेर करतात. ‘सीआयए’मध्ये कार्यरत असलेली एक हेर नावाजलेली आहे; तिचे नाव- जॉना मेंडेझ! अनेक महत्त्वाच्या प्रसंगी तिने केलेले रूपांतर महत्त्वाचे ठरले होते. शीतयुद्धातील यशावर तिने ‘स्पाय डस्ट’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. एकदा तिने राष्ट्राध्यक्ष बुश यांना रूपांतरित वेशात भेट दिली; मूळ रूपात आल्यावर चकित झालेल्या राष्ट्राध्यक्षांना तिने सांगितले की, ‘मी स्वतला तरुण आणि अत्यंत सुंदर बनवले आणि मला स्वतला नेहमी हवे असलेले केस दिले.’

हे झाले प्रत्यक्षात केलेल्या रूपवेशांतराचे दाखले-  इतर क्षेत्रांत वा जगण्यात कोणी असे केले नसावे असे वाटेल. परंतु सिंडी शेरमन या अमेरिकी छायाचित्रकर्तीचे काम पाहिल्यावर आपण चकित होऊ. सिंडीने आयुष्यभर स्वत:चीच वेगवेगळ्या रूपांतली छायाचित्रे काढली आहेत.

तिच्या यशस्वी छायाचित्र शृंखलेत ‘कम्प्लीट अनटायटल्ड् फिल्म स्टील्स’ ही गणली जाते. यात एकूण ७० छायाचित्रे आहेत- ज्यांत प्रसारमाध्यमातील वेगवेगळ्या काल्पनिक बायकांची रूपे तिने साकारली आहेत. जणू काही अशा स्त्रियांच्या भूमिका तिने साकारल्या होत्या असा आभास ती तयार करते. विशेषत: आर्टहाऊस चित्रपट आणि लोकप्रिय बी-ग्रेडचे चित्रपट तिने काल्पनिकरीत्या साकारले आहेत. सिंडीच्या कृष्णधवल छायाचित्रांची ही मालिका आहे १९८०च्या दशकातली. पुढे तिने रंगीत फिल्म व मोठे पिंट्र वापरले आणि वेशभूषा, प्रकाशयोजना व चेहऱ्यावरील अभिव्यक्ती यावर अधिक लक्ष केंद्रित केले. हे सर्व तीच करत असे. आपल्याला असे वाटेल की, ती स्वत:ची सिनेमात काम करण्याची इच्छा भागवून घेत असावी. परंतु हे खरे नाही. ती म्हणते : ‘मी स्वत: माझ्या कामात अज्ञात आहे असे मला वाटते. जेव्हा मी माझ्या छायाचित्रांकडे पाहते, तेव्हा मी स्वत:ला कधीही पाहत नाही. पोज करताना कधी कधी मी अदृश्य होते.’ रूपांतरणातून परकायाप्रवेशाचे हे अतिशय ठळक उदाहरण आपल्याला दिङ्मूढ करते.

रूपवैविध्याची संकल्पना जी आपण नित्य जीवनात नकळतपणे अंगीकारतो, काही क्षेत्रांत वास्तवात बदल घडवण्यास वापरली जाते. मुळात आपल्यात असलेली सहसंवेदनेची क्षमता आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचे अनुकरण करायला लावते. असे अनुकरण प्रत्यक्ष जीवनात वापरताना मात्र नैतिकतेचा प्रश्न उभा राहू शकतो.

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 12:59 am

Web Title: article on american artist cindy sherman self portrait zws 70
Next Stories
1 लपवलेले प्रकटीकरण
2 भक्षणाचे दृश्य-अदृश्य
3 नग्नाकृती आणि नग्नपणा
Just Now!
X