News Flash

हास्याच्या नाना छटा :)

भावनेचे सामाजिक स्वरूप म्हणजे स्मित-हास्य व शेवटी सामूहिक हसण्याचा गलबलाट.

नितीन अरुण कुलकर्णी nitindrak@gmail.com

हसण्याचा संबंध मेंदूशी आहेच. हसणं ही वैयक्तिक कृती असली तरी, ती एक महत्त्वाची सामाजिक क्रिया आहे. संवादात उपयुक्त ठरणारी हीच क्रिया इंटरनेटद्वारे आपल्या मोबाइलवर, गप्पाटप्पांच्या संदेशांमध्ये ‘इमोजी’ म्हणून आली आणि स्थिरावली.. इमोजी हा जागतिक दृश्यवारशाचा भाग ठरला!

आपण एकांतात असतो, स्वत:शीच मनात बोलता बोलता, एखाद्या विचारावर खुदकन् हसतो, इथे काय घडते? आपल्या विचारात अथवा कल्पनेत असे काही तरी येते ज्यांत विस्मयपूर्ण असे काही तरी असते आणि हा विस्मय वेगवेगळ्या भावनांच्या छटांनी तयार झालेला असू शकतो. उदाहरणार्थ एखादी विसंगती, एखादे असामान्य वैशिष्टय़ (कुणी तरी मागे पावलं टाकत टाकत चालतो), आपल्याला आधीच जाणवलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष दाखला (माझं भाकीत खरं ठरलं- सोसायटीच्या सभेत ३२ नं.वाल्या बाई रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या प्रस्तावाला विरोध करणार!) आपल्या चेहऱ्यावरचं हे हसू आपल्या अनुभवातल्या प्रकाशशलाकेचं परावर्तन असतं. आनंद असं एरवी ज्याला म्हणतात त्याच्याशी याचा संबंध असेलच असं नाही. अनेक वेळा आपण सार्वजनिक ठिकाणी मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेली माणसं स्वत:शीच हसताना पाहिली आहेत, अर्थात आजकाल सोशल मीडियात किस्से-चुटक्यांचं प्रमाण जास्त असलं तरी आपल्या अनुभवाने आपल्याला माहीत आहे की हसायला आपल्याला केवळ व्यंगाचीच गरज असते असं नाही.

अशा स्मितहास्याने आपण जणू काही अनुभवातले वेचक ऐवज आपल्या मनाच्या फलकावर टाचून ठेवत असतो, जेणेकरून त्यांचा ‘पुन:प्रत्यय’ जगण्याचा समग्र अनुभव बनावा!

हसणे ही क्रिया आपण दिवसातून किती वेळा करत असू? आणि या क्रियेचे किती सूक्ष्म असे टप्पे आपल्या ध्यानात असतील? साधा विस्मय, याने झालेली मनातली हालचाल व त्याने ओठांच्या स्नायूंत झालेले बदल. ‘हं’ असा हुंकार देऊन केलेले हसू, दात दाखवून काढलेले विचकट नकली हसू, मोठमोठाल्या पोटाला गदगदवून केलेले हसू, ‘से चीज’ इत्यादी.

स्वत:साठी व इतरांना दाखवण्यासाठी आनंद व्यक्त करणे, हे मानवप्राण्याला किती महत्त्वाचे असते. साधारणपणे, नातेवाईकांचा गोतावळा जमला की एकमेकांबरोबर हशा पिकवून गप्पाटप्पा केल्याखेरीज दिवस जात नाही. आपण जर हसलो नाही तर समोरचा नाराज होऊ शकतो, त्यामुळे उपचार म्हणून हसण्याची पद्धत असते. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पाहुण्यांकडे हसून हसून तोंड दुखण्याची वेळ आलेली जोडपी असंख्य सापडतील. परदेशात तर असा अनुभव येतो की समोर आलेल्या अनोळखी माणसाशी जर नजरानजर झाली तर तो तुमच्याकडे पाहून स्मितहास्य केल्याखेरीज जात नाही. आपल्याकडे हसण्यासाठी समोरच्याची ओळख असावी लागते. आपण चुकून हसलोच तर आपल्याला वेडे ठरवले जाण्याचा अथवा दुर्लक्षिले जाण्याचा धोका असतो. प्रेमाच्या संवादाचे गमक पहिल्या स्मितहास्याच्या अनुमोदनातूनच सुरू झालेले असते. तुमच्या हसण्याचे अर्धवर्तुळ समोरच्याला त्याच्या अजून मोठय़ा अर्धवर्तुळाने झेलणे अथवा निर्वकिारी सरळ रेषेने धुडकावून लावणे आवश्यक असते. हसण्याची देवाणघेवाण जणू काही समाजाला (हवे/नको तसे) एकत्र ठेवण्यास वापरले जाणारे तंत्रच असते. (हास्य नाही म्हणजे सामंजस्य नाही असा संकेत समाजात रूढ असतो).

मानवी मेंदूतील सामाजिकतेच्या केंद्रातही भावनाव्यवहार महत्त्वाचा असतो. या ‘सामाजिक मेंदू’ची संकल्पना अशी आहे की, प्रागतिहासिक काळात मानवाने मेंदूचा वापर जगण्याच्या जटिल समस्या सोडवण्यास केला, जसे की साधने कशी वापरावी, प्रभावीपणे शिकार करणे आणि शिजविणे इत्यादी (येथे साहजिकच राकट कणखर भावना जास्त वापरल्या गेल्या असाव्यात.) कालांतराने तो जेव्हा टोळ्या करून राहू लागला तेव्हा वेगळ्या भावनांचा वापर समूहात टिकून राहणे यासाठी होऊ लागला. येथे संयत व मृदू भावना, उदा.- आनंद – वेगवेगळ्या छटांमधून व्यक्त करणे. ही प्रक्रिया जशी मानसिक तसेच ती तेवढीच शारीरिकही आहे.

उदाहरणार्थ ‘लाजणे’- यात भावनांचे व्यक्त होणे हृदयाकडून मेंदूला होणारा रक्तपुरवठा चेहऱ्यात वळवला गेल्याने चेहरा लज्जेने गुलाबी होतो व ही मृदू भावना व्यक्त होते. यापुढचे भावनेचे सामाजिक स्वरूप म्हणजे स्मित-हास्य व शेवटी सामूहिक हसण्याचा गलबलाट.

मेंदूचा विकास झाला आणि वैयक्तिकतेबरोबरच सामाजिकतेसाठीचे केंद्र तयार झाले. एकमेकांकडे पाहून (खरा आनंद नसला तरीही) हसण्यातून जवळीक तयार होते. त्यामुळे फायद्यासाठी समोरच्या माणसाकडून खोटे का होईना ओठांची टोके गाल व डोळ्यांकडे वळवली जातात आणि आपण चाणाक्ष असलो तर आपल्या हे लक्षातसुद्धा येते. खरेखुरे हास्य ज्याला ‘दुशॅन स्माईल’ असे संबोधले जाते (दुशॅन दे बुलॅनिया या फ्रेंच मेंदूतज्ज्ञाच्या शोधामुळे) त्याने इलेक्ट्रोफिजिऑलॉजी या तंत्राद्वारे असं शोधलं की खरं हसण्यासाठी चेहऱ्यातल्या दोन स्नायूंची गरज असते. ‘झायगॉमॅटिक मेजर’ (ओठांची टोके वर नेणारा) व ‘ऑब्रेक्युलेइस ऑक्युलाय’ (डोळ्यांच्या आजूबाजूचे) या दोन्ही स्नायूंच्या हालचालीची गरज असते. खोटे हसू केवळ ओठांची टोके वर नेणारे असते.

कधी असेही होते की, आपण रस्त्यावरून चालत आहोत व अचानक आपल्याला गटाराचे गोल झाकण दिसते आणि आपण हसतो, कारण आपल्याकडे पाहून ते झाकण हसले. 🙂 त्याच्या दोन कडय़ांचे गोल झाले डोळे व गोलाकार पट्टी, (आकडय़ांसाठीची) म्हणजे ऊध्र्वगामी रेषा हास्याची! हे होते ते ‘पॅरेडोलिया’ या तत्त्वामुळे ज्यात आपण प्रतिमेपलीकडे जातो व पाहिजे ते पाहतो, चेहरा आधी दिसतो कारण मेंदूत ‘फ्युझिफॉर्म फेसएरिया’ हा भाग चेहरा ओळखण्यासाठीच असतो व तो आपण बाल्यावस्थेत असल्यापासूनच कार्यरत होतो.

मॅनहोलच्या उदाहरणातून मोबाइलवरची ‘इमोजी’ (जपानी शब्द इ = चित्र, मोजी = वर्ण) अनेकांना आठवेल. आज आपण व्हॉट्सअ‍ॅपवर किती वेळा इमोजींची देवाणघेवाण केली? तसे करताना किती वेळा विचार केला की कुठली इमोजी वापरावी? कारण आपण पाहिले आहे की इमोजीचा वापर हलक्याफुलक्या संवादासाठी केला जातो त्यामुळे गंभीर प्रसंगी रडणारी इमोजी जरी वापरली तरी आक्षेपार्ह प्रतिक्रिया येऊ शकते. उदाहरणार्थ आप्तांच्या मृत्यूपश्चातला संदेश. याचा अर्थ असा होतो की कुठलीही भावना ही ‘हलक्या’ हास्याच्या स्वरूपातच मांडली जावी. इमोजीच्या रडण्यामागेही हसणेच आहे.

प्रथम इमोजी १९९९ मध्ये जपानी कलाकार शिगताका कुरिता यांनी तयार केली होती. (या आधी इमोटीकॉन्स होते ज्यात कीबोर्डवरचे विरामचिन्ह व अक्षरे वापरून भावना पोहोचवली जात असे, जसे विसर्ग व कंस वापरून केलेला आडवा हसणारा चेहरा) कुरिता यांनी ‘आय-मोड’ या इंटरनेट प्लॅटफॉर्मवर काम केले होते, जपानच्या मुख्य मोबाइल सव्‍‌र्हिस डॉकोमोसाठी. कुरिता यांनी साध्या, सोप्या पद्धतीने माहिती देण्यासाठी एक आकर्षक इंटरफेस डिझाइन केले, उदाहरणार्थ, ‘ढगाळ’ असे म्हणण्याकरिता ढगाचे एक चिन्हच दिले. यासाठी त्याने १२ बाय १२ पिक्सेलमध्ये प्रतिमांच्या सेटचे संकल्पन केले. आय-मोड इंटरफेसमध्ये कीबोर्डद्वारे ही चिन्हे वापरली गेली. कुरिताच्या मूळ १७६ इमोजीज आता न्यू यॉर्कच्या मॉडर्न आर्ट संग्रहालयातील कायमस्वरूपी संकलनाचा भाग आहेत. आता दिसणाऱ्या इमोजी ही खूप सुधारित आवृत्ती आहे.

इमोजी डिझाइन हे आता ग्राफिक डिझाइनमध्ये गणले जाते. पण डिजिटल युगातली कलाही आता कात टाकते आहे.

लॉस एंजलिसमध्ये २०१७ साली जॉन बाल्डेसरी या संकल्पनावादी कलाकाराचे प्रदर्शन हा याचा पुरावा. त्याने प्राण्यांच्या मोठय़ा इमोजीच्या प्रतिमा तयार केल्या व जोडीला चित्राखाली हॉलीवूडपटांतील संवाद वापरले. ते संवाद व प्राण्याचे चित्र यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही, त्यामुळे विसंगतीतली संगती; विचित्र व हास्यास्पद स्थिती तयार होते.

इथे दिलेले हे ‘घाबरणारे घुबड’ घाबरवण्याऐवजी स्वत:च घाबरले कसे? यातून हास्य तयार होते. आज आपण संवाद करतो तेव्हा त्याचे माध्यम हास्य असते ही एक लक्षणीय बाब आहे. चला तर एक हसू होऊन जाऊ दे!! 🙂

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 3:08 am

Web Title: author nitin arun kulkarni article on emoji
Next Stories
1 ‘एकांता’चे हितगुज..
2 तेरी दुनिया में जीने से..
3 विरोधांची एकात्मता
Just Now!
X