29 January 2020

News Flash

हालचाल, वेग आणि धुंदी..

अवकाश व काळ यांच्या सापेक्षतेमध्ये वेगाचा विचार कसकसा होत गेला, याचाही इतिहास आहे.

नितीन अरुण कुलकर्णी

वेग हवा, म्हणून मानवाने यंत्रे बनवली.. वेग आला, वाढला.. पण वेगाची ‘धुंदी’ येते कुठून? ती मानवी आहे की यंत्रामुळेच येते आहे?

चारचाकी चालवण्यातली धुंदी काही औरच असते. दुचाकीवरून जे जे चारचाकीवर आले त्यांनी हे पुरेपूर अनुभवले असेल! गाडी चालवण्याचा अनुभव सुरू होतो तो गाडी शिकण्यातून. डाव्या पायाने क्लच दाबून गिअर बदलणे, उजव्या पायाने अ‍ॅक्सिलरेटर दाबणे, मध्ये उगाचच ब्रेक दाबणे व वेग कमी झाल्यामुळे पुन्हा क्लच दाबून खालचा गिअर टाकणे, आणि महत्त्वाचे म्हणजे स्टिअरिंग व्हील फिरवून गाडी रस्त्यावर ठेवणे; या सर्व कृतींवरच आपले पूर्ण लक्ष असायचे, त्यामुळे गाडी जागची हलली व पुढेही जाऊ  लागली याचा गगनात न मावणारा आनंद पटकन छोटा होऊन जायचा. परंतु नंतर आपल्याला वेगात गाडी चालवण्याचं तंत्र अवगत होणार असतं.

यंत्र चालवणाऱ्या मानवी कृती हळूहळू अंगवळणी पडून त्यांच्या प्रतिक्षिप्त क्रिया कधी झाल्या हे कळलंच नाही. लर्निग लायसन्स जाऊन पर्मनंट आलं आणि याचा आनंद गाडीमध्ये बसून रपेट मारून येण्याच्या अनुभवापुढे कधी फिका पडला ते समजलंच नाही. गाडीच्या चालकाच्या ईर्षेचा अनुभव आपल्याला हायवेवर येत असतो. वेग हे या ईर्षेचे माध्यम असते. आपणास ओव्हरटेक करून गेलेल्या गाडीच्या पुढे आपल्याला जायचे असते. कितीही घातक असला तरीही वेग आपल्याला हवा असतो.

गाडी आणि वेग यांत एक घट्ट नाते आहे. (मध्ये असतो आपण स्वत:) आणि हे नाते आपल्या ‘मानसिक’ व्यवहारामुळे आहे.

‘आधुनिक जीवनात गाडी त्याच्या डिझाइनसाठी आणि ड्रायव्हिंग आणि गतीच्या अनुभवासाठी नेहमीच विलोभनीय वस्तू ठरली आहे’. ‘ऑटोमोटिव्ह प्रॉस्थेटिक : टेक्नॉलॉजिकल मेडिएशन अँड कार इन कन्सेप्चुअल आर्ट’ या नावाचे चॅरीसा तेरिनोव्हाचे पुस्तक आहे. त्यात आधुनिक व उत्तरआधुनिक कलावंतांनी चारचाकी गाडी वापरून (किंवा न वापरता, पण त्यामुळे प्रेरित होऊन) केलेल्या संकल्पनात्मक कलाकृतींचा परामर्श घेतलेला आहे. या पुस्तकामध्ये एक संदर्भ येतो तो, ‘स्टेप्स टु अ‍ॅन इकॉलॉजी ऑफ माइंड’ या ग्रेगरी बटेसन याच्या पुस्तकातल्या ‘सायबरनेटिक्स’ या प्रणालीचा.

सायबरनेटिक्स प्रणाली नवीन शक्यतांचा शोध घेणारी आहे, तो अनेक ज्ञानशाखा जोडणारा  (ट्रान्सडिसिप्लिनरी) दृष्टिकोन आहे. नॉर्बर्ट विनर यांनी १९४८ मध्ये सायबरनेटिक्सची व्याख्या ‘प्राणिमात्र व यंत्र यामध्ये नियंत्रण व संवादांचा वैज्ञानिक अभ्यास’ म्हणून केली. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर हा एक वैज्ञानिक अभ्यास आहे; ज्यात मानव, प्राणी आणि यंत्र एकमेकांवर कसे नियंत्रण ठेवतात व संवाद साधतात हे बघितले जाते.

गाडीचे वास्तव अनोखे असते. हे केवळ एक यंत्र नसते तर याला स्वत:चे एक व्यक्तिमत्त्व असते, अर्थात हे आपल्या व्यक्तित्वाचाच एक विस्तार असतो. हे असे उपकरण असते जे आपल्या शरीराला आच्छादून असते व आपले मन वेगाद्वारे त्याला लपेटून असते. आपल्या विचारांना या वेगामुळे एका वेगळ्याच प्रकारची झळाळी आलेली असते का? आपले व्यक्तित्व एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेले असते का? या अशा अनुभवांवर ‘मी’ बाजूला ठेवून आत्मपरीक्षणात्मक विचार करून बघायला हवा. आपण वापरत असलेली यंत्रे आपल्या ‘मनातल्या संघर्षां’ला प्रतिसाद देत असावीत? नक्की? की बरोब्बर उलटपक्षी – यंत्र व त्यांनी निर्माण केलेल्या वेगाशी मिळतेजुळते घेण्यातून, त्यावर आरूढ होण्यातून, यशासाठी वापर करण्यातून आपला हा मानसिक संघर्ष उद्भवलेला आहे? एक शक्यता या सर्वात जास्त जाणवते आणि ती अशी की आपल्या जन्मापासूनच सुरू झालेले हे यंत्रासह जगणे आपल्या बोधनप्रक्रियेतदेखील अजाणता आमूलाग्र बदल करत असावे! आणि याची जाणीव असण्याचे कारण मात्र आपल्या आत-आपल्यापाशी नाही. ‘वेग’ जणू काही आपल्या नाळेलाच बांधलेला! अशी वेगवानता आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाते आहे असा आभास तरी तयार झालेला आहे. हळूहळू मानवी योग्यता व कौशल्याच्या जास्तीत जास्त शक्यता आपण यंत्रांना बहाल करत आहोत, यंत्रांना मानवी करत चाललो आहोत. आता यंत्रे कविताही लिहू लागलीत, संगीतही बनवू लागलीत.. मनुष्याच्या कितीतरी वेगवान पटीत.

वेगात आपण स्वत:ला विलीन केले तर असीम स्थिरता आहे. पण स्वत:चे अस्तित्व शाबूत ठेवायला गेले तर प्रचंड कलह आहे. कारण विमानाचा वेग अतक्र्य आहे. विमानप्रवास करत असताना असा अनुभव येतो. मानवी तर्काच्या, आकलनाच्या कसोटीवर ‘विमानप्रवास’ ही क्रिया जाणण्याचा प्रयत्न केला तर प्रचंड मानसिक त्रास होणार, परंतु ‘प्रवासाला थोडा वेळ लागणार’ एवढेच जाणून एखादा सिनेमा बघितला, गाणे ऐकले किंवा झोपून गेले तर काळ सुकर होणार. वेगात रमणे किंवा वेगाला शरण जाणे श्रेयस्कर असते, ते या अर्थाने.

अवकाश व काळ यांच्या सापेक्षतेमध्ये वेगाचा विचार कसकसा होत गेला, याचाही इतिहास आहे. वेगाची मानवी जाणिव ही मर्यादित हालचालीच्या अवलोकनाची होती. एकोणिसाव्या शतकात जेव्हा सर्वप्रथम स्थळ-काळ आणि अवकाशाच्या या जाणिवेला धक्का बसला तेव्हा नवीन रंजन व कल्पनाविलास (रोमँटिसिझम) यांच्या आधारे वेगाचा सामना केला गेला. वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आली तेव्हा.

‘रेन, स्टीम अ‍ॅण्ड स्पीड : ग्रेट वेस्टर्न रेल्वे’ (१९४४) हे चित्र जे एम डब्ल्यू टर्नर या ब्रिटिश चित्रकाराच्या उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे. पावसाचे पाणी, जमीन, आकाश यांच्या बरोबरीने या चित्रात औद्य्ोगिकीकरणाची मानवनिर्मित प्रतीके घट्ट चौकटीत एकत्र आली आहेत. दाट धुक्यात, कोसळता पाऊस अंगावर घेत असलेली आगगाडी.. तीही दूर, पुलावर.. अशा या चित्रात नाटय़ हेच की, चित्रामधले सर्व घटक एकमेकांमध्ये विलीन होतात; पिवळ्या-निळ्या- राखाडी पाश्र्वभूमीत लोखंडी श्वापदासारखी उभ्या असलेल्या ट्रेनशिवाय. म्हणूनच चित्राचे शीर्षक इथे गरजेचे ठरते. अमूर्त चित्रभाषेनं कलेच्या क्षेत्रात आणलेला वेग इथे महत्त्वाचा ठरतो.

यंत्र-क्रांतीतून मानवाने साधलेला वेग हा मानवी अनुभवाचे व जीवनाचे विभाजन करणारा होताच.. पण काही केल्या, औद्योगिक प्रगतीखेरीज गत्यंतर नव्हते. वेग एकंदर जगाच्या प्रगतीचे प्रतीक होणार होते. ‘फ्युचरिझम’ (इटालियन) ही एक कलात्मक आणि सामाजिक चळवळ होती जी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस इटलीमध्ये उदय पावली. यात वेग, तंत्रज्ञान, तारुण्य, हिंसा आणि गाडी, विमान आणि आधुनिक शहर यासारख्या वस्तूंवर प्रतीके म्हणून जोर देण्यात आला. इटालियन्स फिलिपो टॉमॅसो मॅरिनेटि, उंबर्तो बोस्सिओनी, कालरे कारा, गिनो सेव्हेरिनी, ज्योकोमो बाला यांसारखे प्रमुख कलाकार, लेखक, कवी या चळवळीचे भाग होते. त्यांनी त्यांच्या कलेचा जाहीरनामा लिहिला व त्यात आधुनिकतेचा गौरव केला. यातून त्यांना इटलीला त्याच्या भूतकाळापासून मुक्त करायचे होते. वेगात पुढे जायचे होते. यात कलेचे विषयदेखील वेगवान वस्तू व त्यांचे विभाजित आकार असे असत. यंत्रांच्या आवाजाचा कोलाहल मुद्दाम निर्माण करून ‘ध्वनिसादरीकरण कलाकृती’ (साऊंड आर्ट पर्फॉर्मन्स) या फ्यूचरिस्टांनी बनवले. नवीन युगातले भुलणे असे काहीसे यात दिसते. अर्थात नवीन दृश्यभाषेची देन यातून जगाला मिळाली. औद्योगिकीकरणाचा पैस आज चौथ्या क्रांतीच्या डिजिटल युगातून वेगात वाढत जाताना दिसतो आहे. मात्र एकीकडे ‘फास्ट लाइफ’- वेगवान जीवन, हे अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी अत्यावश्यकच मानले जात असताना; दुसरीकडे मानसिक स्वास्थ्यासाठी ‘स्लोनेस’चा अंगीकारही समाज करताना दिसत आहे. पौर्वात्य विचार व संस्कृती यांचा सामना पुन्हा नव्याने होतो आहे.

पौर्वात्य तत्त्वज्ञान, पश्चिमात्य विचारापेक्षा वेगळे आहे. पौर्वात्य विचारवंतांनी वेळ-अवकाशाचे नाते इतर बौद्धिक संकल्पनांप्रमाणेच मानले; कारण अशा संकल्पना सापेक्ष, मर्यादित आणि आभासी असतात, बौद्ध विचारामध्ये असे संदर्भ सापडतात. आजच्या आपल्या दोलायमान स्थितीपाशी येऊन हा लेखांक संपवताना, जिद्दू कृष्णमूर्ती यांनी दिल्ली येथे १९७० साली दिलेल्या एका भाषणामधले हे अवतरण (आजही) महत्त्वाचे ठरावे :

‘‘जेव्हा असा अवकाश असतो, ज्यात मानसिक वेळ अजिबात अस्तित्वात असत नाही तेव्हा संघर्षांची स्थिती अस्तित्वात नसते. या स्थितीत आपण विरोध आणि अतीव इच्छेच्या कृतींशिवाय कार्य करू शकतो.’’

– असा अवकाश, आपल्याच चारचाकी गाडीत आपल्याला लाभेल का?

लेखक दृश्यकला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात . nitindrak@gmail.com

First Published on October 19, 2019 1:02 am

Web Title: craze of speed human speed experience speed and machines zws 70
Next Stories
1 विरूपाची विविध रूपे..
2 बहुरूपी अस्तित्व
3 लपवलेले प्रकटीकरण
Just Now!
X