14 December 2019

News Flash

भीतीपासून ‘कृती’कडे..

आपण काय केले आहे किंवा काय करणार आहोत याच्याशी भयाचा संबंध असतो.

(संग्रहित छायाचित्र)

नितीन अरुण कुलकर्णी nitindrak@gmail.com

भीती ही एक नैसर्गिक भावना आहे आणि ‘भीतीचे भय’ हे विचार करणाऱ्या मानवाचे वैशिष्टय़ आहे. या भीतीविषयीच्या ‘निर्मित कृती’- मग ते एखादे चित्र असो, चित्रपटातील दृश्य- आणि त्याचे पाश्र्वसंगीत- असो, कादंबरीमालेतील पात्र असो, चिंतनपर लेखन असो किंवा एखाद्या नेत्याचे संस्मरणीय भाषण असो.. त्या साऱ्या कृतींतून भीती आणि भीतीचे भय या संकल्पना स्पष्ट होत जातात..

आज आपण ‘भीती’ या भावनेचा संकल्पना म्हणून विचार करणार आहोत. प्रथम आपल्याला हे स्पष्ट करायला हवे की, ‘विषय’ आणि ‘संकल्पना’ यात फरक असतो- हे मुद्दाम लिहिण्याचे कारण असे की, बऱ्याच वेळा आपण हे शब्द समानार्थी वापरलेले असू शकतात. विषय असे म्हणताना आपल्याला ढोबळपणे कशावर लक्ष केंद्रित करायचे आहे व त्या गोष्टीचे, सकृद्दर्शनी किती भाग दिसतात, याचे माहितीपर विवरण येते. त्याच गोष्टीचा ‘संकल्पना’ म्हणून विचार करताना त्या गोष्टींचे अंतस्थ, मानसिक भाग येतात, ज्यात इंद्रियजन्य संवेदना, व्यक्तिगत भावना, विचार, वैज्ञानिक व सामाजिक विश्लेषणात्मक मुद्देही येतात. यामुळेच संकल्पना ही विस्तृत आणि अधिक व्यापक असते. त्याचमुळे वेगवेगळ्या निर्मित कृतींमध्ये (त्या करताना किंवा अनुभवताना) विषय वेगवेगळे असूनही संकल्पनेची जातकुळी एकसारखी असू शकते. संकल्पना एखाद्या गुच्छासारखी असते. वेगवेगळे गुण असलेले घटक एकमेकांशी सलोखा ठेवून असतात आणि तरीही स्वतंत्र असतात. हा सर्व व्यवहार होतो, कारण ‘निर्मित कृती’ या वास्तवातल्या अनुभवाची प्रतिकृती असतात. कला, विज्ञान, तंत्रज्ञान व डिझाइन या क्षेत्रांमध्ये काम करताना याचा प्रत्यय येतो, कुठलेही ज्ञान हे प्रतिबिंबित केल्याखेरीज मूर्तरूप धारण करू शकत नाही.

कुठल्याही जाणिवेचे रूपांतर निर्मित कृतीत करायचे असेल तर त्या जाणिवेच्या मानसिक प्रतिमा, स्मृती, त्या विषयाची माहिती आणि विश्लेषण गरजेचे असते. यातून संकल्पनेचे घटक ठरतात व निर्मितीक्षम लोक या घटकांच्या साह्य़ाने संकल्पनेच्या जोरावर भीतीसारख्या ‘भावने’चे रूपांतर आपापल्या माध्यमांत करतात.

भय म्हणजे एखाद्या प्रसंगात उद्भवलेल्या धोक्यामुळे जाणवणारी भावना, ज्यामुळे आपल्या अंतर्गत अवयवांचे कार्य बदलते व वर्तनामध्ये बदल घडतो. उदाहरणार्थ- पळणे, लपणे किंवा अशासारखे वर्तन, जेणेकरून त्या धोकादायक घटनेपासून मुक्त होता येईल. भीतीचा उद्भव एखाद्या संवेदनेतून होतो आणि या संवेदनेचा उपयोग प्रत्यक्ष वा संभाव्य धोक्यातून बाहेर येण्यासाठी होतो. भयाबद्दलच्या अनेक जाणिवा आपल्या जन्मजातच आपल्याला ज्ञात असतात, जेणेकरून स्वत:चा जीव वाचवता यावा. आता हे झाले भीतीच्या जैविक भागाबद्दल जे अतिशय स्वाभाविक व गरजेचे आहे. खरा त्रासदायक भाग असतो तो मानसिक भीतीचा.

जे. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘‘भयाचा उद्भव फक्त दुसऱ्या कशाशी तरी असलेल्या संबंधातूनच होऊ शकतो; भय एकटे अस्तित्वात असू शकत नाही. भयाचे अमूर्त असे रूप नाही.’’ ‘‘भय नेहमी ‘ज्ञात’ किंवा ‘अज्ञाता’विषयीच असते;’’ आपण काय केले आहे किंवा काय करणार आहोत याच्याशी भयाचा संबंध असतो. भीती भूतकाळाची किंवा भविष्याची असते. ‘‘आपण काय आहोत व आपल्याला काय व्हायचे आहे यांच्या नात्यात भयाचे अस्तित्व आहे ’’ – कृष्णमूर्तीच्या या चिंतनाप्रमाणेच रोमन सम्राट आणि तत्त्वज्ञ मार्कस ऑरेलियस (इ. स.पूर्व १२१-१८०) याचे एक वचन महत्त्वाचे ठरते – ‘‘वेदना केवळ त्या प्रत्यक्ष गोष्टींमुळेच नव्हे तर आपल्या अनुमानानुसारही होते आणि आपल्याकडे कोणत्याही क्षणी त्या अनुमानापासून मागे फिरण्याची शक्ती असते.’’

म्हणजे खरे तर आपण ‘भीतीच्या-भीतीमुळे’ जास्त त्रस्त असतो. त्यामुळे एखाद्या प्रसंगातल्या संवेदनेमुळे (एखादा आवाज, दृश्य अथवा स्पर्श) आपल्या आत दडलेली ती भीती मनाच्या पृष्ठभागावर अवतीर्ण होते व आपण घाबरतो. ज्यांच्या घरात ‘हॅरी पॉटर’प्रेमी तरुण असतील त्यांना त्यातील ‘बॉगर्ट’ ही संकल्पना माहीत असेल, बॉगर्ट म्हणजे एक अमूर्त जीव आहे जो स्वत:चे आकार परिवर्तन करू शकतो. हा अमर्त्य आहे जो या कादंबरीमालेतील पात्रांच्या संपर्कात आल्या आल्या त्यांच्या सर्वात वाईट भीतीचे रूप घेतो. त्याच्यात आकार बदलण्याची क्षमता असल्यामुळे बोगार्ट कसा दिसतो हे कोणालाही ठाऊक नसते. या मालेतील एक कादंबरी सांगते- ‘‘म्हणून अंधारात एकटय़ा बसलेल्या बोगार्टने अद्याप एकही आकार धारण केलेला नाही. दरवाजाच्या पलीकडे असलेला माणूस कशाने घाबरेल हे त्याला कळत नाही. तो एकटा असताना बोगार्ट कसा दिसतो हे कुणालाच ठाऊक नाही, परंतु जेव्हा मी त्याला बाहेर सोडतो तेव्हा तो लगेच आपल्यापैकी प्रत्येकाच्या आत असलेल्या भीतीचा आकार घेईल.’’

मानसतज्ज्ञ व चेताशास्त्रज्ञांचे म्हणणे असे  की, आपल्या भीतीच्या अनुभवाची परिणामकारकता घटनेच्या संदर्भावर अवलंबून आहे. समजा, संदर्भ असा आहे की, आपण सिनेमागृहात अल्फ्रेड हिचकॉकचा ‘सायको’ (१९६०) हा चित्रपट बघतो आहोत; इथे आपण भीतीच्या भीतीची गोष्ट बघत आहोत, ऐकत आहोत.

भीतीच्या अनुभवात व संकटातून बाहेर निघण्यात मेंदूची तीन केंद्रे कार्यरत असतात. पहिले ‘अ‍ॅमिग्डिला’ जे भावनांचे केंद्र असते. भावना ओळखणे व ‘तणावाची संप्रेरके’ प्रवाहित करणे हे त्याचे काम. यामुळेच हृदयाची धडधड, घाम इत्यादी बदल शरीरात होऊ लागतात आणि असे बदलच आपल्याला धोक्यापासून दूर जायला मदत करणार असतात. अ‍ॅमिग्डिलालगतच असलेला दुसरा भाग म्हणजे ‘हिपोकॅम्पस’. तिसरा मेंदूच्या पुढचा ‘प्रीफ्रंटल कॉर्टेक्स’, या दोघांमुळे, उद्भवलेल्या प्रसंगातल्या धोक्याचा संदर्भ ओळखायला मदत होते व आपल्याला कळते की, धोका खरा आहे वा खोटा. मग आपल्या मेंदूचा भाग ‘विचार करणारा’ भाग आपल्या ‘भावनिक मेंदू’च्या भागाला संदेश देतो की धोका खोटा आहे! लगेच आपल्याला सुरक्षित वाटते. तेव्हा आपण त्या भीतीपासून अति उत्साहवर्धक स्थितीचा अनुभव घेतो व आपल्याला उत्तेजन किंवा उत्साह प्राप्त करतो.

भीतीच्या भीतीची गोष्ट परिणामकारक करण्यासाठी सिनेमाच्या तंत्राचा वापर केला जातो, ज्यात छायाचित्रणाबरोबरच पाश्र्वसंगीताचा मोठा सहभाग असतो. हिचकॉकच्या ‘सायको’ या चित्रपटातल्या  सगळ्यात प्रसिद्ध झालेल्या शॉवरबाथमधील खुनाच्या दृश्याचे (सीनचे) पाश्र्वसंगीत लोकांच्या कायमचे लक्षात राहते. ही धून आहे ‘द मर्डर’ या नावाची आणि रचनाकार आहे बर्नार्ड हरमान. या संगीताचे तीन भाग आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे, पहिला चाकूचे वार चालवण्याचा वेग व आवेग व्हायोलिनचे तसेच ओढलेले फटकारे आपल्या अ‍ॅमिग्डिलाला चेतवतात आणि आनंदी करतात.. धोका नाही, असाच अनुभव त्या सुरावटीतून आधी मिळत असतो. ‘भीतीच्या भीतीबद्दल जागरूक होणे’ हा भयपटांमधून खरा शिकण्याचा भाग!

विसाव्या शतकातल्या युरोपातल्या व पर्यायाने पूर्ण जगासमोर येणाऱ्या भीतीचे बनलेले प्रतीक म्हणजे ‘द स्क्रीम’ हे चित्र; ‘एक्स्प्रेशनिझम’ या कलाशैलीला चालना देणाऱ्या एडवर्ड मंक (१८६३-१९४४) या जर्मन चित्रकाराचे. एकदा चालत असताना त्याला अनामिक किंकाळी जाणवली; याबरोबरच पूर्ण आकाश व परिसर भयग्रस्त झाला. हा प्रसंग दाखवताना मंक मधोमध भूतसदृश कानावर हात ठेवलेला माणूस काढतो, ज्याचे डोके कवटीसारखे आहे.

त्याच्या डायरीमध्ये २२ जानेवारी १८९२ ला त्याने लिहिले- ‘‘दोन मित्रांसह सूर्यास्त होत असताना रस्त्यावर चालत होतो. मी रस्त्याच्या कडेला होतो. अचानक आकाशातून रक्त लाल झाले. मी थांबलो, थकल्यासारखं वाटलं आणि मी कठडय़ावर झुकलो. निळसर आकाशात शहराचे दृश्य होते.. वरच्या भागात रक्त आणि आगीसारख्या जिभा.. माझे मित्र चालू लागले आणि मी तिथे खंबीरपणे थरथरत उभा राहिलो – आणि मला निसर्गाला भेदून जाणारी एक किंकाळी जाणवली.’’..  ही किंकाळी जणू आजच्या मानवाच्या मानसिक अस्वास्थ्याची वाटते जी अस्थिरतेतून अस्थिरता तयार करत आहे.

‘नथिंग इज अ‍ॅज मच टु बी फीअर्ड अ‍ॅज फीअर’ हे अमेरिकन विचारवंत हेन्री डेव्हिड थोरो याचे वाक्य, पुढे फ्रँकलीन रूझवेल्ट यांनीही राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या भाषणात (१९३३) वापरले होते. त्या वेळच्या, पहिल्या महायुद्धाने पिचलेल्या नागरिकांना धीर देणारे हे वाक्य आज पूर्ण जगालाच हवामानबदल, आर्थिक मंदी व आंतरराष्ट्रीय दहशतवाद यांच्या पाश्र्वभूमीवर लागू पडते. वास्तवाला सामोरे जाणे व त्यातूनच मार्ग निघणे हेच खरे!

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

First Published on June 29, 2019 1:52 am

Web Title: fear in human beings psychology behind fear effects of fear zws 70
Just Now!
X