|| नितीन अरुण कुलकर्णी

भक्षणातले मानसिक सुख घेणारा पृथ्वीतलावरचा एकच प्राणी म्हणजे माणूस! पण एकंदर ‘खाद्य संस्कृती’चा संकल्पनात्मक विचार आपण करू शकतो का?

रात्रीचे नऊ वाजून गेले आहेत आणि आपण जेवायला बसलो आहोत. समोरच्या टीव्ही मालिकेचा आस्वाद घेतो आहोत. (आजकाल बऱ्याच घरांमध्ये असे दृश्य पाहायला मिळते.) पहिला घास घेतानाच वीज गेली. आता वीज वितरण कंपनीवर वैतागतानाच समोर मेणबत्ती येते, आणि हॉटेलासारखी मौज नसली तरी ‘कँडल लाइट डिनर’ चालू होते. पूर्ण वातावरण शांत झालेले असते, आपले पूर्ण ध्यान मेणबत्तीच्या ज्योतीवर केंद्रित झालेले असते, प्रत्यक्ष डोळे न मिटता दृश्य किलकिले झाल्यासारखे दिसत असते. आता हळूहळू आपले लक्ष आपल्या जेवण्यावर केंद्रित होते, एकेक घास लक्षपूर्वक घेऊन चावत, संथगतीने पदार्थाचा स्वाद चाखत हे जेवण पूर्णतेकडे जाते. खाणे या क्रियेतून असलेला खरा आनंद आज मिळालेला असतो. नंतर वीज परत आली तरी आता कशाला लवकर आली असेही वाटू शकते. नेहमीच्या जेवण्यात- प्रकाश असतानादेखील- असा अनुभव येऊ शकतो; पण अशा वेळी आपले लक्ष इतर गोष्टींमुळे विचलित झालेले असते, त्यामुळे जेवण कधी संपले हेही कळलेले नसते. आज लक्षात येते की माझे आजोबा जमिनीवर उकिडवे बसून डोळे मिटून एकेक घास संथपणे घेऊन का खात असत!

अन्न, जल किंवा जलयुक्त पेय ग्रहण करणे ही क्रिया आपण दिवसातून कितीतरी वेळा करतो, पण प्रत्येक वेळेस आपल्याला त्या कृतीचे अवधान असते का, हा प्रश्न आहे. आजकाल बऱ्याचदा उघडय़ा फ्रिजजवळ उभे राहून बाटली तोंडाला लावून घटाघटा पाणी पिण्याची पद्धत आहे. एखाद्या दिवशी खुर्चीवर शांतपणे बसून ग्लासात पाणी ओतून, ग्लासाची कड ओठाला लावून एकेक घोट घशाच्या खाली निवळत, गिळत पाणी पिऊन पाहावेच.

खाणे अथवा पिणे या क्रियेचा संकल्पना म्हणून विचार करायचा झाला तर याप्रमाणे बघावे लागेल. पृथ्वीवर अनेक वनस्पती, फळे, भाज्या, धान्य उगवते व आपल्यापकी काही जण काही प्राण्यांचे मांसदेखील खातात. वनस्पतीजन्य सजीवांची वाढ ही सूर्यापासून मिळालेली प्रकाशऊर्जा व जमिनीपासून मिळालेली खनिज ऊर्जा यांच्या मिलाफाची उपज असते. आपण हे पदार्थ कमीअधिक प्रमाणात अग्निऊर्जेचा वापर करून प्राशनयोग्य बनवतो व ग्रहण करतो. पंचेंद्रियांची संवेदना भोजनाची आसक्ती तयार करते व रुचीच्या साहाय्याने लाळेच्या मिश्रणातून जठरापर्यंत भोजन पोहोचते करते. शरीरातील पाचकरस व ऊर्जा यांच्याद्वारे आपल्याला आवश्यक असलेली शक्ती प्राप्त होते. म्हणूनच अन्नग्रहणाला यज्ञकर्म संबोधलेले आहे.

अन्न जगात भरपूर प्रमाणात असूनही आपण समाधानी नसतो, आपल्याला रुचीचा अनुभव लागतो त्याखेरीज अन्नप्राशन सुखद होऊ शकत नाही. या तुलनेत वनस्पतींच्या अन्नग्रहणाची प्रक्रिया किती संयत असते! मुळांच्याद्वारे त्यांना माती खावी लागत नाही तर ते केवळ मातीतील पोषणमूल्य शोषून घेतात व पुढे सूर्यप्रकाशाच्या संयोगाने वाढतात. मुळ्यांचा संबंध मातीशी व पानांचा संबंध हवा व सूर्यप्रकाशाशी; या दोहोंना जोडणारे व झाड म्हणून उभे करणारे ते खोड.

झाडाचे खाणे किती सूक्ष्म असते, कालांतराने आपल्याला फक्त परिणाम म्हणजे ‘वाढ’ फक्त दिसते. कधी कधी काही छायाचित्रकारांनी वाढणाऱ्या रोपटय़ाची केलेली ‘स्टॉपमोशन फिल्म’ पाहताना मात्र अद्भुततेचा अनुभव येतो.

कीटकाचे खाणे थोडे मोठे असते, त्याला खाताना पाहणे कर्मकठीण! परिणाम मात्र आपण पाहिलेला असतो; फळाला असलेले छोटे भोक आणि आत पोकळ वाट व जागा. ‘मिनिस्क्यल’ नावाची एलेन गिरॉ व थॉमस स्झ्ॉबो या फ्रेंच द्वयीने ‘थ्रीडी अ‍ॅनिमेशन’मध्ये निर्माण केलेली सचेतपटमालिका आहे. यात कीटकांचे जीवन कीटकांच्याच नजरेतून दाखवलेले आहे. एका भागांत दोन अळ्यांचे विभक्त होणे, सफरचंदाला खाऊन भोक पाडून त्यात जागा करून या दोघांनी राहणे, अशी दृश्ये यापैकी एका भागात आहेत. हा सचेतपट पाहताना आपल्याला कीटकांच्या खाण्याची अजिबात घृणा वाटत नाही, उलट सहानुभूती वाटते. होकुसाय या जपानी चित्रकारानेदेखील कीटकांची बरीच चित्रे काढली आहेत. यापैकी एक चित्र, ‘आलुबुखारसारख्या फळावर बसलेला नाकतोडा’. यात जाणवते की हा कीटक फक्त बसलेला नाही तर कुरतडण्याचे काम करत आहे.

प्राण्यांच्या खाण्याची क्रिया मात्र दिसू शकते, खाद्य मिळवणे व खाणे, ते देखील पोटापुरते- अवाजवी नाही- हे महत्त्वाचे. खाण्याची शारीरिक गरज फक्त भागवणे एवढेच असते. मांसभक्षक प्राण्यांमध्ये एवढय़ापुरता जो हिंस्रपणा आवश्यक, तेवढा असणारच. जॉर्ज स्टब्ज या घोडय़ांच्या चित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटिश चित्रकाराचे १७६९ सालचे ‘घोडय़ावरचा सिंहाचा हल्ला’ हे चित्र नावाजलेले आहे. यात सिंह घोडय़ाचा चावा घेत आहे, असे दाखवले आहे. पुढे आपण ‘नॅशनल जिऑग्राफिक’सारख्या चित्रवाणी वाहिन्यांवर बघितले आहे की खाद्याने पोट भरले की प्राणी त्याकडे बघतही नाहीत.

भक्षणातले मानसिक सुख घेणारा एकच प्राणी आणि तो म्हणजे माणूसप्राणी!  अशा मानसिकतेतूनच खाण्याचे वेगवेगळे प्रकार, त्याच्याशी निगडित उत्सव आणि वेगळी अशी ‘खाद्य संस्कृती’ तयार होते.

आजचे आपले खाणे जरा जास्तच मानसिक व अतिव इच्छेशी निगडित झाले आहे. पदार्थाच्या आंतरिक स्वादापेक्षा त्याची जिभेला भावणारी चव जास्त महत्त्वाची बनली आहे. ‘आपण जगतो ते खाण्यासाठीच की’ हे जे पालुपद आपण  बोलताना अनेकदा वापरतो त्यातून ही स्थिती प्रतीत होते. अ‍ॅप्समुळे ‘फास्टफूड’ जरा जास्तच ‘जलद’ झाले आहे. पाहिजे तेव्हा काहीही बसल्याजागी मागवता येते, यातून उपभोग घेण्याची वृत्ती बोकाळली आहे का? की हीच आजची गरज आहे? या प्रश्नांची उत्तरे जगण्यातच विरून जातात. अमेरिकेत ही फास्टफूडची क्रांती १९६०च्या दशकात झाली; एकंदरीतच ‘पॉप’ (जनप्रिय) संस्कृतींत संगीत, सेलेब्रिटीज, फॅशन, घरगुती वस्तू व त्यांच्या जाहिराती, यांची जीवनात रेलचेल झाली. उद्योगधंद्यांसाठी हे फायद्याचेच होते त्यामुळे ही वृत्ती हेतुपुरस्सर बळावली गेली.

‘पॉप आर्ट’मध्ये या सर्व उपभोगाचेच प्रदर्शन केले गेले, ते उपहासातून; पण हीसुद्धा नंतर एक शैलीच बनली. या कलाकारांचा अध्वर्यू होता तो अँडी वॉरहॉल. त्याचे कलेतले काम एखाद्या इंडस्ट्रीसारखे होते; त्याने त्याच्या स्टुडिओचे नावही ‘फॅक्टरी’ असे दिले होते. त्याच्या अनेक चित्रांमध्ये पॅकबंद खाद्यपदार्थ व पेये यांच्या दृश्यरूपाचा समावेश असे.

‘६६ सीन्स ऑफ अमेरिका’ (अमेरिकेतले जीवन दर्शवणारी ६६ दृश्ये) हा चित्रपट डॅनिश फिल्ममेकर जॉर्जन लेथने १९८६ साली तयार केला. लेथ अँडी वॉरहॉलला ओळखत नव्हता, परंतु त्याला चित्रपटात त्याचा सहभाग नक्कीच हवा होता. मित्रांनी लेथला सांगितले की त्याने त्याबद्दल विसरून जावे कारण वॉरहोल हा सेलिब्रिटी आहे, तो तुला जवळ करणार नाही. परंतु आश्चर्य म्हणजे जॉर्जन जेव्हा ‘फॅक्टरी’त पोहोचला तेव्हा अँडीने त्याला होकार दिला. ‘६६ सीन्स’ मधला तो काही मिनिटांचा सीन शूट करायचा होता, ज्यात अँडी खुर्चीवर बसलेला आहे, समोर टेबलावर बर्गरचे पॅकेट व केचपची बाटली आहे. तो हॅम्बर्गवरचा कागद काढतो व बाटलीतून केचप कागदावर काढतो व हॅम्बर्गर खातो, पावाचा छोटा तुकडा टाकून देतो. पूर्ण खाऊन झाल्यावर एक वाक्य बोलतो की ‘मी अँडी वॉरहॉल आहे व मी आत्ता हॅम्बर्गर खाल्ला.’ इथे आपल्याला दिसते ‘कंझम्शनचे कंझम्शन’ आणि आपण हे पाहण्यातून देखील उपभोग घेत असतो, मला तरी या फिल्मचा हा तुकडा पाहून बर्गर खावासा वाटला; तुम्हालाही?

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

nitindrak@gmail.com