News Flash

शारीर अस्तित्वाची जाणीव

आपले शरीर जणू काही खासगी व सार्वजनिक या दोहोंच्या मधोमध अलिप्त राहणारा एक जीव असतो.

नितीन अरुण कुलकर्णी nitindrak@gmail.com

कलाकृती अभिजात ठरण्यासाठी त्यामागे अनुभव, संवेदना यांचा पुनर्शोध असावा लागतो.. शरीरासंदर्भात हा पुनर्शोध काही कलाकृती घेतात, त्यामागे कोणता विचार असू शकेल? ‘शारीर’ असूनही ‘अमंगळ’ नसणं, म्हणजे काय असतं?

एखाद्या दिवशी आपण अर्धवट झोपेत कूस बदलायचा प्रयत्न करतो, तर लक्षात येते की आपल्याला आपले शरीर हलवणे मुश्कील होऊन बसले आहे; जडत्व आले आहे. कसेबसे हलता आले तर एक मोठी कळ पाठीतून जाते आणि कळवळायला होते. असाच दुसरा अनुभव, पायाला मुंग्या येण्याचा. यात एकीकडे जणू काही पायावरून मुंग्या पळत आहेत अशी भासात्मक वेदना आणि दुसरीकडे पायाची नेहमीची गायब झालेली संवेदना. संवेदना नसण्यातून शरीराची जाणीव होणे तसेच दुखण्यातून शरीराची जाणीव होणे यात सृष्टीची काही तरी योजना असणार. एकीकडे वेदना व दुसरीकडे सुख यांच्यामध्ये असते शरीराची ‘शरीर म्हणून’ जाणीव.

‘शरीर म्हणून जाणीव’ हे म्हणताना असे अभिप्रेत आहे की शरीराचा व्यावहारिक उपयोग करतानाच्या जाणिवेव्यतिरिक्तची जाणीव. कामाला जाताना चालण्याची शारीरिक हालचाल करताना किंवा पाटावर बसून थोडेसे वाकून घास उचलत जेवताना, कृतीपेक्षा साध्याकडे जास्त लक्ष असण्याचा संभव असतो. सजगतेतून होणारी शरीराची जाणीव व त्यातून घडलेली कृती ही खरी शारीरतेची सुरुवात असते. उदाहरणार्थ आपले साधे उभे असणे! एखाद्या दिवशी असे उभे असणे आपल्याला आपल्या आतल्या शरीरभानातून समजत असते. जणू काही आपण जागेपणी झोपलेले असतो व स्वत:च्याच शरीराचे स्वप्न बघत असतो. यातूनच शरीराची एक स्थिती, हालचाल होते, म्हणजे मग कधीतरी आपण आपला हात हवेत फिरवून स्थिर करतो व त्याकडे बघतो; उलटे चालून गिरकी घेतो; पलंगाच्या एका कडेवरून गडबडा लोळतच दुसऱ्या कडेला पोहोचतो. परंतु हे सर्व आपण गुप्तपणे करतो, तोंडावरून हात फिरवताना पटकन जांभई देऊन टाकल्यासारखं!

शारीर जाणिवेत मोठे योगदान असते ते म्हणजे स्पर्शज्ञानाचे. (१) निसर्गातली हालचाल व इतर बदल (उदाहरणार्थ, वाऱ्याची झुळूक) हे आपल्याला जसे स्पर्शातूनच कळते तसेच आपले शरीरदेखील. (२) कपडे, बूट इत्यादी आपल्या शरीराची आवरणे आहेत, त्यांतून आपल्याला शरीराचीही जाणीव होत असते. (३) आपल्या शरीराच्या एका भागाचा दुसऱ्या भागाला झालेला वस्त्रविरहित स्पर्श दुहेरी असतो. स्पर्शचेतना शरीराच्या दोन्ही भागांमधून मेंदूकडे धाव घेत असते. नंतर येतो तो स्पर्श. (४) इतर माणसांचा, ऐच्छिक वा अनच्छिक स्पर्श. या दोन्ही (ऐच्छिक वा अनच्छिक) स्पर्शात आपल्याला उच्च पातळीतले शरीरभान येऊ शकते. स्पर्शातून लैंगिक भावना चाळवणे हा ठरतो केवळ एकच भाग. थोडक्यात, ‘आपले शरीर म्हणजे एक ‘आयुध’ आहे, जे वापरून आपल्याला आपल्या मानसिकतेत आत-आत तसेच आपल्या बाहेरच्या जगात बाहेर-बाहेर बघायचे आहे.’

‘स्व’चा ‘स्व’ला स्पर्श या आत्ममग्न अनुभवावर आधारित अरुण कोलटकरांच्या कवितेतील एक भाग असा आहे : ‘दोन मांडय़ा पीळ देतात परस्परांना; तळव्यापासून ताळवेपर्यंत दोन अंगानी फिरतो मी आतात; दोन कानशिलं वळसे घेऊन जातात भिवयांच्या मधून’  (‘अरुण कोलटकरच्या कविता’, प्रास प्रकाशन या संग्रहातल्या कवितेतलं एक कडवं) ही व अशा काही शरीरभानातून आलेल्या कविता या संग्रहात आहेत. आपणा सर्वाच्याच हॉस्पिटलच्या शारीर अनुभवात एक प्रकारची लज्जा व कुचंबणा दडलेली असते; याच भावनेला विनासंकोच व स्थितप्रज्ञपणे सामोरे जाण्याचे धाडस ही कविता करते.

हे जीवन जगत असताना आपण आनंद व सुखाचा पाठलाग करत असतो. या आपल्या प्रयासात आपण जसे, कसे आहोत याबद्दलची नाखुशी, कुचंबणा आणि अवहेलना यांचा निष्कलंकपणे स्वीकार करणे असा काहीसा हा मार्ग ठरतो. या स्थितीच्या पलीकडे पोहोचण्यातला शांततेचा मानसिक अनुभवही आनंददायक असू शकतो. आपले शरीर जणू काही खासगी व सार्वजनिक या दोहोंच्या मधोमध अलिप्त राहणारा एक जीव असतो. त्याला तसेच मुक्तराहू द्यावे; परंतु आपण मात्र त्याला सतत मानसिकतेतून व इतरांच्याच नजरेतून बघत राहतो.

गर्दीतून वाट काढताना, लोकांनी खचाखच भरलेल्या बसच्या आत आपल्या खासगी अस्तित्वाला अबाधित ठेवण्याचा आपला कसोशीने चालू राहणारा प्रयत्न आपल्या सगळ्यांनाच आठवतो. बाहेर बघणारी अथवा बघणे टाळणारी आपली नजर एकीकडे आपल्या शारीरिकतेचे निखळ स्वरूप आपल्या समोर ठेवत असते, पण त्याच वेळी सतत मनात डुबकी घेऊ पाहात असते. इतरांची आपल्याला न्याहाळणे टाळणारी नजर आपल्याला आपल्या व्यक्तिगततेत लोटून देत असते. यातूनच आपल्याला एक प्रकारचे आकुंचन येते आणि यात आपण प्रावीण्य मिळवतो. कधी तरी आपल्याला हे लक्षात येते की यातून आपण आपले स्वातंत्र्य कधीच गमावले आहे, तेही स्वत:हून. आता शक्यता असते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीच्या फसव्या वल्गना करण्याची. एक दिवस आपल्याकडे बघणाऱ्या माणसाच्या डोळ्यांत डोळे घालून बघाच; मग बघा तुमचं शरीर कसं स्मितहास्यातून आधी स्वत:ला व नंतर समोरच्याला जगण्याचं आश्वासन देईल!

शरीर आणि मन ही मानवी अस्तित्वाची दोन तत्त्वे. त्या दोन तत्त्वांचे वेगळेपण व साहचर्य याचा बराच ऊहापोह झाला आहे. शरीरापेक्षा आत्मा श्रेष्ठ अशी धारणा आपल्यात लहानपणापासून रुजवली जाते. मनाचे व्यवहार हे आत्म्याच्या जवळ जातात असा पूर्वग्रह. आध्यात्मिक म्हणजे मानसिक उन्नती, शरीर स्थिर ठेवण्यातून आत्मिक शांती मिळते अशी सोयीस्कर गृहीतकं बनतात. शारीरिक म्हणजे उच्छृंखल व मानसिक-वैचारिक म्हणजे आध्यात्मिक अशा धारणा नकळतपणे जोपासल्या जातात. शारीरिकतेचा संबंध ऐहिकतेशी लागतो. या पाश्र्वभूमीवर, ‘चार्वाकां’च्या तत्त्वज्ञानाचा शरीरासंदर्भात विचार करावा लागेल. ( डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’ या पुस्तकातून) प्रसिद्ध श्लोक असा – ‘यावज्जीवेत सुखं जीवेद्ॠणंकृत्वाधृतं पिबेत। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:॥’  म्हणजे ‘जोपर्यंत जगायचे आहे, तोपर्यंत सुखाने जगावे. कर्ज काढून (या अर्थाविषयी मतभेद आहेत) तूप प्यावे. भस्म बनलेल्या देहाचे पुनरागमन कुठून होणार बरे?’ यात दडला आहे तो प्रबळ विचार असा की- ‘चेतन देह हाच आत्मा’! ‘देहाहून वेगळ्या आत्म्याचे अस्तित्व अनुभवास येत नाही म्हटल्यावर त्यांनी अशा आत्म्याचे अस्तित्व नाकारले’ (म्हणजे शरीरापेक्षा वेगळे आत्म्याचे अस्तित्व नाकारले गेले), त्यातूनही आत्मा मानायचाच झाला तर चेतन देह हाच आत्मा, असा ‘देहात्मवाद’ त्यांनी स्वीकारला. प्रत्यक्ष असा देह असला की चतन्य आढळते, आणि देह नसला की चतन्य आढळत नाही. त्यामुळे चतन्य हादेखील देहाचाच धर्म होय, असे लौकायतिक (चार्वाकवादी) मानतात. याच न्यायाने ते पुनर्जन्मही मानत नव्हते. चार्वाकाची देहाची संकल्पना म्हणजे इंद्रियजन्य अनुभव असणारे म्हणून चतन्यमय व आनंद देणारे असे हे शरीर, स्थूल व सूक्ष्म या दोन्ही वृत्तींचा समन्वय ज्यात असतो असे होय.

पाश्चात्त्य संस्कृतीतल्या देहात्मवादाची मुळे आदिम काळ तसेच इजिप्त व मेसोपोटेमिया येथे सापडतात. ग्रीक संस्कृतींत मात्र याचा चांगलाच विस्तार दिसतो. मानवाला केंद्रस्थानी ठेवून समाज व संस्कृतीची घडण केलेली दिसते. मानवी (पुरुष) देहाचे हुबेहूब चित्रण असलेली कला प्रथमच एवढय़ा प्रगत रूपात दिसते. पुढे रेनेसाँ काळात याचे अतिप्रगत स्वरूप दिसते. एकंदर मानवाच्या प्रगतीमागे असा ऐहिकतावाद जगात सगळीकडेच अंगीकारला गेला आणि यात शारीरिकतेची जाणीव व प्रकटीकरण गरजेचे होते. आधुनिकतेत मानवी शरीराचा विचार धर्म व समाजकारणाऐवजी मानवी संवेदना व भावनांच्या अंगाने केला गेला. ऑगस्टस रोदँ या फ्रेंच शिल्पकाराचे काम यासंदर्भात महत्त्वाचे आहे. स्पर्शसंवेदनेचा एवढा संयत विचार अभावानेच केलेला दिसतो. इथे दिलेले केवळ दोन हातांच्या स्पर्शाचे शिल्प आपल्याला आपल्या व्यक्तिगत स्पर्शानुभव व तरल भावनांकडे घेऊन जाईल, असे वाटते.

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 2:15 am

Web Title: human creative skill and imagination painting human artistic creativity zws 70
Next Stories
1 (अ)हिंसा : साद आणि प्रतिसाद
2 भीतीपासून ‘कृती’कडे..
3 भावनांचे मानस-विश्व
Just Now!
X