नितीन अरुण कुलकर्णी nitindrak@gmail.com

सगळ्यांनाच आरशात बघायला आवडते. याचे कारण असे असावे की समोर दिसणारे दृश्य स्वत:चे असते आणि ते खरे आहे याच्या खात्रीची भावना महत्त्वाची असते.

एका कथेतील हा प्रसंग- ‘नीद्र’ (प्रमुख पुरुष पात्र)आरशासमोर बसून स्वत:ला बघतो आहे, त्याचे स्वगत असे :

‘मी आरशासमोर बसलो की, आरसा लगेच मला बघतो; माझ्या डोळ्यात. मला लाज वाटते आणि क्षणार्धात माझी नजर आरशाच्या डोळ्यांवरून हटते. मी आता माझे केस बघतो, हात बघतो, पूर्ण शरीरावरून नजर फिरवतो. परत नजर आरशाच्या नजरेत जाते. आरशाची नजर म्हणजे मी माझ्याच उघडय़ा डोळ्यांच्या प्रतिबिंबात बघत असतो. आलटूनपालटून, डाव्या किंवा उजव्या डोळ्यात बघावे लागते. कारण माझी नजर एकाच वेळी, कुठल्याही एकाच डोळ्यावर लक्ष केंद्रित करू शकते. मी डोळे मिचकावतो, पण हे मिचकावणे मात्र मला दिसत नाही, फक्त जाणवते. मला माझ्या शरीराचा काही भाग आवडतो, तर काही अजिबात नाही. माझ्या मनात भावना तयार होते, आता मी माझ्या मनातल्या स्वत:च्याच चित्राकडे बघायला लागलेलो असतो. मनातले हे चित्र डोळ्यांनी दाखवलेल्या दृश्याने जागृत केलेले असते. आता मी, डोळ्यांनी दिसलेल्या दृश्यात मनाने तयार केलेले माझे चित्र बघायला लागलेलो असतो आणि मला वाटत असतं की मी खरं-खरं वास्तवातलं माझं चित्र बघतोय. आता हे चित्र मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना तयार करते, काही सुखद तर काही अवघड’.

आपल्याला सगळ्यांनाच आरशात बघायला आवडते. याचे कारण कदाचित असे असावे की समोर दिसणारे दृश्य आपले स्वत:चे असते आणि ते खरे आहे याच्या खात्रीची भावना महत्त्वाची असते. कुठेतरी हेदेखील असावे की आपण स्वत: या दृश्याचे दिग्दर्शक असतो. आपणच स्वत: मनातल्या मनात हालचालीची केलेली आज्ञा व त्यानुरूप झालेला बदल तत्क्षणी स्वत: बघू शकलेलो असतो. आपण सर्वानीच केव्हातरी चित्रविचित्र हावभाव करून स्वत:चा चेहरा आरशात न्याहाळला आहे आणि याची आपल्याला गंमत वाटली आहे.

जेव्हा आरसा नव्हता तेव्हा स्वप्रतिमेचा अनुभव कसा बरं येत असेल? निश्चल पाण्यातले प्रतिबिंब न्याहाळून?

तुम्हाला आठवतंय का, की कधी आपण असं स्वत:चं प्रतिबिंब पाहू शकलोय? खूप कमी शक्यता जाणवतेय नाही? परंतु एक प्रसिद्ध चित्र असं आहे, की जे पाहताना अशा अनुभवाचा पुन:प्रत्यय येऊ शकतो, हे चित्र तुम्ही पाहिलंसुद्धा (खाली दिलेलं) असेल. नार्सिसस हे काराव्हाजिओच्या बरोक या कालखंडातलं (युरोपातील १७वे शतक) या चित्रातलं गहिरेपण प्रामुख्याने तीन गोष्टींमुळे आहे. (१) ग्रीक मिथकातील, ओव्हिड (ख्रिस्तपूर्व ४३-१७) या कवीच्या मेटामॉर्फसिस या काव्यातील शापित पात्राच्या पाश्र्वभूमीमुळे; नार्ससिस हा एक शूर तरुण आहे ज्याला सौंदर्याची आस आहे.

(२) आरशात पाहणे या क्रियेतल्या गूढतेमुळे व

(३) चित्रकाराच्या हे दृश्य दर्शवण्याच्या ठोस व कल्पक शैलीमुळे (ज्यात गडद रंगछटांचा वापर छायाभेदासकट नाटय़पूर्णरीत्या केलेला असतो. या तंत्राला ‘टेनेब्रिझम’ असे म्हणतात.). नार्सिससला मिळालेल्या शापामुळे तो स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेला आहे, आता पेच असा आहे की अशी प्रतिमा फक्त निश्चल पाण्यातच पाहता येते, त्याला तहान लागली आहे आणि तो पाणी पिऊ शकत नाहीये. कारण पाणी पिण्यास जेव्हा तो आपले ओठ पाण्याच्या पृष्ठभागाला लावेल तत्क्षणी ती प्रतिमा तरंगांमध्ये विलीन होऊन जाईल, यातूनच पुढे त्याचा आत्मनाश ओढवला. असा शाप देणारी देवता त्याच्या प्रेमात पडली होती व प्रेमाचा अव्हेर झाल्याने तिने हा शाप त्याला दिलेला होता.

हे वास्तववादी शैलीतले चित्र पाहताना असा प्रश्न पडतो की, या दृश्यात असे काय विशेष आहे? ज्यामुळे हे चित्र इतर याच विषयावरच्या चित्रांच्या तुलनेत खूप उजवे ठरते.

हे चित्र नार्सिससच्या चेहऱ्याच्या प्रतिमेच्या प्रतिबिंबाची प्रतिमा असे आहे.

हे चित्र केवळ घटना न दाखवता या कथानायकाचे मनस्वी स्वरूप उलगडून दाखवते.

चित्रघटकांची केलेली सयुक्तिक रचना ज्यामुळे आपण या व्यक्तिरेखेच्या समीप ठाकतो. पूर्ण चित्र अंधाराच्या सावटात पण काही भागांच्या प्रकाशमान व त्यामुळे नाटय़पूर्ण अशा वातावरणात साकारते. चेहऱ्याच्या डाव्या बाजूचा आकार दिसतो व त्याचे अधिक गडद व दु:खद होत जाणारे प्रतिबिंब आपल्याला आपल्या मानसिकतेत घेऊन जाते. कथा माहीत असणाऱ्यांच्या मनात चिन्हात्मक आशय समजला! असा विजयी भाव येऊ शकतो. पण चित्र पुन्हा आपल्याला त्याच्या गहिऱ्या, स्थिर व वास्तव दृश्याकडे घेऊन येते.

नार्सिससच्या मिथकावर आधारित ‘नार्सिसिझम’ ही एक मानसशास्त्रातील संकल्पनादेखील आहे. सिग्मंड फ्रॉइड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने यांवर पुस्तक लिहिले आहे.

व्यक्तिमत्त्वाच्या विकाराचा हा एक प्रकार म्हणून ओळखला जातो. स्वार्थीपणासह, आत्म-केंद्रितपणा, हक्कांचा दुराग्रह, इतरांबद्दल सहानुभूतीची कमतरता आणि प्रशंसेची अवास्तव गरज ही त्याची वैशिष्टय़े आहेत. आजच्या समाजमाध्यमाच्या जगात ही वृत्ती सर्रास दिसते.

‘कुठलीही प्रतिमा म्हणजे मनात उमटलेल्या प्रत्यक्षाच्या प्रतिबिंबाचे वेगळे व विशिष्ट असे रूप’

कुठलीही श्रेष्ठ कलाकृती आपल्याला मनातून ठिकाणी, परत, म्हणजे प्रत्यक्षात घेऊन येत असते व त्या प्रत्यक्षाचा अनुभव नव्याने घ्यायला लावते. ‘मिरर ऑफ हॉलंड’ हा १९५० सालचा लघुपट असेच करायला लावतो. बर्टहान्स्ट्रा यांनी बनवलेला, अशा प्रकारचे फक्त पाश्र्वसंगीत असलेल्या (नऊ मिनिटे, यूटय़ूबवर उपलब्ध) मूक लघू चलचित्रपटांसाठी तो प्रसिद्ध आहे. या दृश्यपटात आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ पाण्यातले प्रतिबिंब दिसत राहते. हे वास्तव म्हणजे केवळ हॉलंडमधील सामान्य व दैनंदिन जनजीवन (हॉलंडची पाणीमय भूमी हा संदर्भ). हा नऊ मिनिटांत संपणारा दृश्यानुभव कुठल्याही प्रकारची गोष्ट सांगत नाही व मनालाही तयार करू देत नाही. साधारणपणे सिनेमाचा दिग्दर्शक प्रतिकांच्या अर्थाच्या माध्यमातून दर्शकाला स्वस्थ करीत असतो. काही कृतींमध्ये अर्थाचा उलगडा बराच काळ ताणलेला असतो. इथे मात्र अशी शक्यता अगदी कमीच असते (म्हणजे समीक्षकाने केलेले विवेचन हीदेखील एक शक्यता म्हणूनच बघावी लागेल). मूळ वास्तवापासून तुटलेले हे प्रतिबिंब फक्त ‘बिंब’ म्हणून उरते व परिवर्तनाची शक्यता आपल्यात सोडते.

‘श्रेष्ठ संकल्पना केवळ कल्पनांच्या शक्यता असतात; निर्विचाराकडे, निखळ बघण्याकडे घेऊन जाणाऱ्या’ या संकल्पनेचा पाठपुरावा करताना अशा अनेक कृती समोर आल्या, जसे की, ‘सिल्व्हिया प्लाथ या कवयित्रीची ‘मिरर’ ही कविता, अरुण कोलटकरांची ‘आरसे’ ही कविता, आंद्रेइ तारकोवस्कीचा ‘मिरर’ हा चित्रपट, यांखेरीज योहानस व्हरमीर या वास्तववादी शैलीतील कलाकाराचे आरसा व कॅमेरा ऑब्स्क्युरा वापरून केलेले काम, अशी अनेक चित्रे ज्यांमध्ये आरसा व त्याचे प्रतिबिंब वापरले आहे. उदाहरणार्थ दिएगो व्हेलाक्वेयाचे ‘व्हीनस’ हे चित्र ज्यात पाठमोरी नग्न व्हीनस दाखवली आहे व क्युपीडने धरलेल्या आरशात चित्राच्या प्रेक्षकांना व्हीनसचा चेहरा दिसत आहे. याला ‘व्हीनस इफेक्ट’ म्हणतात.

समकालीनतेत आरसे वापरून केलेली मांडणशिल्पे तसेच ‘डिजिटल आरसा असलेला जीम इन्स्ट्रक्टर’ -ज्या समोर उभे राहिले असता आपल्याला आपल्याच रूपात कसरत करायला सूचना मिळतात, असे काही भन्नाट प्रयोग आढळले. या सर्वामध्ये जाणवलेले संकल्पनेचे विचारप्रवाह बिंदू असे. (१) मानसिक प्रक्रियेचे अंग. (२) सांकेतिक व चिन्हांत्मक वापर. (३) प्रतिबिंबांचा चमत्कृतिजन्य व प्रत्यक्ष उपयोगितेसाठी केलेला वापर.

ही चर्चा पुढे सुरू ठेवू.. त्यात तुमचाही सहभाग अपेक्षित आहे!

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.