31 March 2020

News Flash

विध्वंस!

सर्वमान्य असलेले विध्वंसाचे स्वरूप बघितले, तर या शब्दाशी निगडित आपले पूर्वग्रह धुतले जातील.

एल. एन. तल्लूर यांचे २०११ सालातील ‘युनिकोड’ हे शिल्प.

नितीन अरुण कुलकर्णी

विध्वंसाचा रूढ अर्थ सांगतो की, हा एक वाईट व जीवनास हानी पोहोचवणारा भाग आहे आणि यापासून दूर राहायला हवे. समाजात विध्वंस समाजकंटकांशी जोडला जातो. पण विध्वंसाच्या प्रेरणेचा खरा अर्थ काय? विध्वंस उपकारक असू शकतो? विविध क्षेत्रांतले संकल्पना-विचार काय सांगतात?

विध्वंस आपल्या आजूबाजूस, मनात व कृतीत रोजच किती तरी दिसत असतो; आपण काणाडोळा केला, तर तो आपले अस्तित्व निडरपणे दाखवून देतो. आपण म्हणू, विध्वंस म्हणजे हिंसा आणि हिंसा म्हणजे विरूपीकरण- ज्याबद्दल आपण मागील लेखांकात पाहिले! आपण लगेच हेही म्हणू की, यामागे राग-द्वेष व सर्व निंदनीय मानवी भावनाच कार्यरत आहेत. वरवर बघता हे खरे भासेलही; पण जरा बारकाईने पाहिले तर असे लक्षात येईल की, विरूपीकरण, हिंसा व विध्वंस या कृती, क्रिया व परिणाम यांच्या अनुषंगाने एकमेकांवर आच्छादित असल्या तरीही विभिन्न आहेत. मानव आणि निसर्ग या दोहोंच्या बाजूने विध्वंसाचा विचार करता येईल. (म्हणजे विध्वंसाची कळ कधी मानव, तर कधी निसर्गाद्वारे कार्यरत होते.) असा आढावा घेतल्यावर संकल्पनेचे असंस्कारित, शुद्ध स्वरूप लक्षात येईल.

संकल्पना निर्लेप असते. पण मानवी व्यवहार व विचार तिला झाकोळून टाकतात. ‘संकल्पना-विचार’ नेहमी आपल्याला स्वत:चे संस्कारित मन व त्यातली वैचारिक गडबड दाखवून देत असतो; विध्वंसाच्या बाबतीत असेच झाले.

रोजचा निरुपद्रवी वाटणारा चाळा आणि विरंगुळ्यातला, नवनिर्मिती व रंजनातला विध्वंस, विकासकामांसाठी समाजाने नैतिक बनवलेला विध्वंस, रूपकात्मक केलेल्या कृतीतला विध्वंस, निसर्गात कार्यकारणभावात दिसणारा विध्वंस अशा वेगवेगळ्या स्तरांवर विध्वंस व्यक्त झालेला दिसतो.

सर्वमान्य असलेले विध्वंसाचे स्वरूप बघितले, तर या शब्दाशी निगडित आपले पूर्वग्रह धुतले जातील. त्यातील काही स्थूल व सूक्ष्म भाग असे असतील- सहजपणे शांत, नितळ डोहात भिरकावलेला दगड व त्यामुळे उठलेल्या तरंगांची वाहवा, अंगणात सडा टाकताना जरा जास्तच वेगाने मारलेल्या लोटय़ातल्या पाण्याचा सपका व त्याचा चाबकासारखा आवाज, उंच वाढलेल्या गवताच्या माळरानातून वाट काढताना काठीने मारलेले फराटे व त्यातून तुटलेल्या फांद्यांची आवडलेली अगतिकता, आताच्या ‘बर्थडे पार्टी’च्या शेवटी अधाशाने फोडलेले सजावटीचे फुगे, पॅकेजिंगच्या बबल रॅपचे नखाने पुट्ंऽपुट्ंऽ फोडलेले प्लास्टिकचे हवाबंद बुडबुडे व त्याने मिळालेले मानसिक समाधान.. इत्यादी. हे बघितल्यावर असे वाटले, की विध्वंस इतका वाईट नसावा; कारण तो आपल्या रगारगांत भिनलेला असावा. त्यामुळेच की काय, असेही डोळ्यांसमोरून तरळून गेले की, जगण्यातले अनेक व्यवहार विध्वंसानेच चेतवले जात असावेत. इथे विध्वंसाचा विस्तृत अर्थ अभिप्रेत आहे; कुठलीही हानी व ऱ्हास या अर्थी आणि विध्वंस केवळ निमित्त. तसेही आपले जीवन केवळ या जगाचे निमित्तमात्र आहे. ऱ्हास होणे हा निसर्गनियम आहेच. परंतु याचा वेग व संथता यावर त्याचा परिणाम अवलंबून आहे.

गंभीरता व हलकेफुलके वास्तव या दोन्ही गोष्टी पूरकच असणार. विध्वंस आपल्याला रंजक वाटतो, हा याचाच भाग. आजकाल यूटय़ूबवरती वस्तू क्रमाक्रमाने तोडून नष्ट करण्याचे- ‘स्लो मोशन’मधील छोटी चलचित्रे लोकप्रिय होताना दिसतात. विध्वंसाच्या कृतीचे दृश्य आपल्याला आवडतेच अन् क्रिया करायलादेखील आवडते, याचे दाखले आपल्या काही लोकप्रिय खेळांमधून मिळतात. उदाहरणार्थ लगोरी हा खेळ. यात एकावर एक निमुळते होत जाणारे सात फरशीचे तुकडे रचले जातात व नेम धरून त्वेषाने चेंडूने फेकून तोडले जातात. एक संघ रचतो, तर दुसरा संघ तोडतो. या खेळातला उत्कर्षबिंदू हाच की, सात दगड-फरश्यांच्या कोनाकृती मनोऱ्याचा चेंडूने विस्फोट करायचा. कारण दुसऱ्या संघाला ते विखुरलेले फरशीचे तुकडे परत शोधणे मुश्कील व्हावे. जेवढा फटका वेगवान आणि आवेशपूर्ण, तेवढेच खेळातले यश व मजा जोरकस होणार. शोधून रचणे व मोडून विखुरणे या दोन्ही कृती एकाच मोठय़ा क्रियेचा.. ‘निर्मिती’चा.. भाग असणार. मोठय़ा कालचक्राचा विचार केला, तर या दोन्ही घटना एकच आहेत.

‘बिग बँग’ या अंतराळातल्या महाकाय स्फोटाने या जगाची निर्मिती झाली, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. या स्फोटाने अवकाशाचाच विस्तार झाला, ग्रह-ताऱ्यांचे पुंज दूर लोटले गेले. लोप-निर्मिती ही जोडी सूक्ष्म व स्थूल या दोन्ही दृष्टिकोनांतून बघता येऊ  शकते. दहा हजार दशलक्ष वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेचे वैज्ञानिक संकल्पन ‘हबल’ने केले. एका आदिम गोलाचा प्रचंड मोठा स्फोट झाला असावा आणि हे अंतराळ विस्तारले गेले असावे. अवकाशातले हे आत्ताचे जीवन म्हणजे त्या महास्फोटाचे अवशेषच आणि आपले पृथ्वीवरचे जीवन हे त्या महाविध्वंसाचाच परिणाम! हे सर्व अतक्र्य वाटते.. मानवी आकलनाचा कडेलोट करणारे! इथेच कला, कल्पनाशक्ती, मिथके व धर्मातल्या संकल्पना मदतीला येतात. तांडव नृत्य करणारा शंकर-नटराज अशीच संहार व निर्मितीची संकल्पना आहे. हे नृत्य शाश्वत ऊर्जेच्या पाच तत्त्वांचे सचित्र रूप आहे. यात सृष्टीच्या निर्मितीबरोबर संहाराचाही महत्त्वाचा सहभाग होतो. ‘तांडव’ सृष्टी आणि विनाश या वैश्विक चक्रांचे, तसेच जन्म आणि मृत्यूच्या दैनंदिन ताल व लयीचे प्रतीक आहे. प्राचीन कलेचे काम- अगम्य वाटणाऱ्या सांस्कृतिक संकल्पना मानवी आकलनाच्या कक्षेत आणून ठेवणे, हे होते. चोल साम्राज्यात दहाव्या शतकात तयार झालेल्या शिव-नटराज या शिल्पातून ही संकल्पना साकार झाली. शास्त्रज्ञांच्या ‘कॉस्मिक डान्स’ या ‘सबअ‍ॅटोमिक पार्टिकल्स’च्या शास्त्राशी याचे साधर्म्य सांगितले जाते.

वाढ, हालचाल, वेग व काल हे नेहमीच सापेक्ष राहणार. मानवाच्या बोधनक्षमतेची मर्यादा इथे लक्षात येते. यामुळेच आज तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरत आहे, मानवाच्या बोधनक्षमतेचा विस्तार होत आहे. अर्थात असेही दिसते की, माणसाचे पारंपरिक ज्ञान व स्मृतीची क्षमता लोप पावत आहे. नवनवीन अडचणी, तसेच नवीन सोयी तयार होत आहेत. या सगळ्यात मोठी अडचण जर काही असेल, तर ती म्हणजे ‘शाश्वततेचा माणसाचा हव्यास’ व यापोटी तयार झालेली चंगळवादी वृत्ती, यातून झालेली अगणित वस्तुनिर्मिती आणि यावर आधारित अर्थव्यवस्था. एक प्रकारे मंदी, पर्यावरणाचा असमतोल यातूनच विनाशाकडे वाटचाल दिसत आहे. नैसर्गिक व्यवस्थेत असलेले विनाशाचे नियोजन मानवी व्यवस्थेने नाकारलेले दिसते. यातच कला व कलाकाराचे कल हेही आलेच. कलाकार त्यांच्या कलेतून अनेक वस्तू तयार करतात आणि या वस्तूंचा खरा उपयोग योग्य संवेदना व विचार जोपासणे हा असतो. (१) काही कलाकार मानवाने केलेला विनाशाचा विचार त्यांच्या विनाशसूचक दृश्यभाषेतून अधोरेखित करतात. (२) काही जण चक्क विनाशाच्या प्रक्रियेलाच कलेचे रूप देतात. (३) तर काही चिन्हसंस्थेचा वापर करून आजच्या आपल्या संकल्पनेला उद्धृत करतात.

यातल्या पहिल्या प्रकारच्या कलाकारीचे उदाहरण म्हणजे नाझींच्या मानवी संहाराने पीडित वा प्रभावित होऊन केलेली कला. एक संयत व प्रभावी जर्मन कलाकार म्हणजे- एन्सेलम किफर! किफरला धातू आवडतात, विशेषत: गरम आणि वितळण्याच्या प्रक्रियेदरम्यान धातू कसे दिसतात, असे धातूचे दृश्य प्रतीकात्मक होते. त्याला व्यवस्था आणि अनागोंदी यातील संतुलन दर्शवणे महत्त्वाचे वाटते. विनाशानंतरच नवनिर्मिती होत असते.

दुसऱ्या प्रकारात ब्रिटिश कलाकार अँडी गोल्ड्सवर्दी येतो. याचे वैशिष्टय़ म्हणजे, निसर्गात जाऊन तेथील वस्तू- जसे काडय़ा, पालापाचोळा, हिरवी पाने, चिखल, दगड, बर्फ इत्यादी घेऊन त्याचे मांडणशिल्प तो करतो. अर्थात, याची छायाचित्रे बघायची असतात, कारण या रचना निसर्गात विलीन होऊन जातात. नष्ट होण्याचीच ही कला असते.

तिसऱ्या प्रकारात चिन्हांच्या वापराने कलाकृतीत विनाशाचे तांडव व त्याचे आधुनिक पैलू दर्शवले जातात. उदा.- एल. एन. तल्लूर यांचे ‘युनिकोड’ हे शिल्प. यात नटराजाचे संहारातून निर्मितीचे व त्याच्या जागतिकीकरणाचे दर्शन होते. ‘युनिकोड’ ही संगणकाची सार्वत्रिक भाषा. हे आहे जगातल्या संहाराचे युनिकोड चित्र! बोकाळलेला उपभोक्तावाद – ज्यापासून संस्कृतीसुद्धा वाचत नाही, असे हे कथन आहे. तल्लूर यांनी सांगितले की, चोल नटराजाची तद्दन अँटिक कॉपीची जशीच्या तशी गोलाकार कमान घेऊन, त्यात जगात दुसऱ्या क्रमांकाचे ग्रहण केले जाणारे साधन ‘सिमेंट’ नटराजाऐवजी गोल ओबडधोबड रूपात दाखवले आहे. शिवाच्या जागी हे बघून आपल्याला धक्का बसेल; पण हेच तल्लूर यांना अभिप्रेत आहे. सिमेंट व त्या रूपातून येणारे हे जागतिक निर्मिती व नंतर विनाशाचे स्वरूप खरे ठरू नये, अशी एक भाबडी आशा.

लेखक दृश्यकला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात. ईमेल : nitindrak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 2:10 am

Web Title: term destruction acts of destruction creative destruction nature of the destruction zws 70
Next Stories
1 हालचाल, वेग आणि धुंदी..
2 विरूपाची विविध रूपे..
3 बहुरूपी अस्तित्व
Just Now!
X