20 October 2020

News Flash

(अ)हिंसा : साद आणि प्रतिसाद

गळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या गरजेसाठी हत्यारांची योजना करावी लागणार आहे.

निर्थक हिंसाचाराने प्रभावित झालेले डिस्नेचे जग बेकनच्या चित्रकलेप्रमाणेच थेट जाणवते!

नितीन अरुण कुलकर्णी nitindrak@gmail.com

हिंसा आणि अहिंसा यांच्या दरम्यान जाणिवेचे अनेक पदर असतात. त्यामुळेच आदिमानवाने जगण्यासाठी केलेली हिंसा निराळी आणि हिंसेचे अजिबात समर्थन न करतासुद्धा डिस्नेच्या सचेतपटांत अथवा फ्रान्सिस बेकनच्या  चित्रांत दिसणारी हिंसा वेगळी..

‘‘मी सोफ्यावर बसलो होतो आणि बंद टीव्हीच्या काळ्या स्क्रीनकडे पाहताना अचानक माझी नजर शून्यात गेली. शून्यातली नजर म्हणजे, एकटक समोरील दृश्याकडे पाहून न पाहता निर्वकिारपणे मान न हलवता बसणे; आपली नजर बाहेर थांबणे व आपण मात्र आत.. क्षणात हातावर सुई टोचल्यासारखी वेदना झाली व माझी नजर पुन्हा ठिकाणावर आली. लक्षात आले की, एक टपोरा डास हातावर आहे, तो आपली सोंड माझ्या त्वचेत खुपसतोय. क्षणार्धात माझा दुसरा पंजा निघतो आणि हातावर ‘ठाप’कन बसतो; थोडे कळवळून पंजा उचलला तर त्या डासाचे कलेवर रक्ताच्या डागात निपचित चिकटलेले दिसले. आनंदून, पण लगबगीने हात झटकून आणि पाण्याने स्वच्छ धुऊन स्वत:च्या मनात सूक्ष्माहून सूक्ष्म अशी तयार झालेली हिंसेच्या अपराधाची भावना पुसतो.’’ (- एका अप्रकाशित कथेतून!)

आपण बहुतेक सर्वानीच दुसऱ्या जिवाला मारण्याचा अनुभव घेतला असेलच.. म्हणजे मुंगी, डास, झुरळ, उंदीर, पाल वगैरे मारण्याचा आपण जणू काही अधिकारच मिळवलेला आहे किंवा आपल्याला तो जन्मजातच बहाल आहे. त्यामुळेच, आपला प्रतिवाद असेलच की, याला िहसा म्हणता येणार नाही आणि मांसाहाराशी निगडित असलेल्या हिंसेचा तर अजिबातच याच्याशी संबंधच नाही, आपण असे मानूनच चालू. आपल्याला हिंसा म्हणजे ‘दुसरे लोक जे करतात ते’च वाटतं; त्यातल्या त्यात माणसाला बेदम पिटणे वा जिवानिशी मारणे हीच खरी हिंसा. खरं तर हिंसा हा शब्द माणसाच्या हिंस्र ‘प्रवृत्तीचं’ (टेंडन्सी) कथन करतो. ही प्रवृत्ती माणसात असतेच, केवळ या प्रवृत्तीचा पुरावा आपल्याला कृतीतून व तिच्या परिणामातून मिळतो. म्हणजे प्रवृत्ती-कृती-परिणाम असा तो क्रम असतो. ‘आपल्याला डास चावण्याची वेदना होणे, त्यातून चीड येणे, यातून डास मारायला आपला हात उठणे (बौद्धिक प्रक्रियेविना) व त्यातून डास मरणे’ – या पूर्ण क्रमात चीड येऊन डास मारण्याची प्रतिक्षिप्त क्रिया घडण्यासाठी हात उठणे हेच जास्त महत्त्वाचे.

हिंसा अनादी कालापासून आपल्या जीवनाचा भाग आहे. पहिला मानव हिंसेखेरीज जगूच शकला नसता. त्याचे अन्न, निवारा व आयुधे यांची गरज प्राण्यांच्या संहाराखेरीज शक्यच नव्हती, अर्थात त्याने प्राण्यांनी केलेला माणसांचा व इतर प्राण्यांचा संहार बघितलेला होताच. यातूनच त्याला समजले की, मारण्यात आपले भले आहे, यातूनच त्याने हळूहळू मारण्याची कला आत्मसात केली. जीवाच्या शरीरातून रक्तपात झाला, की थोडय़ा अवधीतच तो निपचित पडतो हे ज्ञान तेव्हा थोडके नव्हते. प्राणी हा रक्तपात त्यांची नखे व दातांनी करतात व एकंदरीतच त्यांची ही ‘आयुधे’ किती महत्त्वाची असतात, हेही तो शिकला असावा. यातून तो पुरेपूर समजून चुकला असावा की, आपल्याकडे अशी शक्ती व नैसर्गिक आयुधं नाहीत व आपल्याला ती बाहेरून अंगीकारावी लागतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या गरजेसाठी हत्यारांची योजना करावी लागणार आहे.

हिंसा कशी संकल्पना म्हणून वापरली जाते याचे विश्लेषण वेधक ठरते. हिंसेच्या संकल्पनांचे असे ढोबळ भाग ठरतात- (१) प्रत्यक्ष हिंसा करणे (आयुधांची निर्मिती) (२) हिंसेचे कथन व नोंद (लेखन, चित्र व इतर कला माध्यमांमधून कथन) आणि (३) हिंसा न करणे (अहिंसा; त्याची शिकवण व आचार, प्रचार व त्यावर आधारित कला)

संकल्पना म्हटलं की, ओघाने ‘डिझाइन’ आलेच. डिझाइन म्हणजे ‘कल्पित’ आलेच. परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्यक्षात नसलेल्या वस्तूची अथवा व्यवस्थेची कल्पना आधी मनात करणे व नंतर त्याचे प्रत्यक्षात रूपांतर करणे, हे दोन्ही महत्त्वाचे. आपल्या आदिमानवाला एकदा अनुभवाने लक्षात आले की, पत्थराच्या अणकुचीदार धारेने अंग कापले जाते व त्या जखमेतून भळाभळा रक्त वाहून जाते व यातच जीव निपचित पडतो. मग आपण ही शिळा हातात पकडून हत्यार बनवले तर? कल्पना तर नामी आहे; पण अडचणी तेवढय़ाच- कारण अश्माला उपजतच धार नसते. जेव्हा आघाताने खपचा पडतो तेव्हाच त्या तुकडय़ाला धार तयार होते. दगडाने दगडावर आघात केला व यातूनच धारदार दगड बनला; यातूनच हातात चपखल बसणारे अश्मयुगातले पृथ्वीवरचे पहिले जीव घेणारे हत्यार बनले त्याचे नाव ‘हात कुऱ्हाड’ (हँड अ‍ॅक्स). ‘मारण्याचे आयुध’ या संकल्पनेत महत्त्वाचे आहे ते म्हणजे मारण्याची गरज वैध ठरवणे, नैतिक करणे; ‘जीवनावश्यक खाद्य’ किंवा ‘जिवाला धोका’ यापैकी एका तर्काचा वापर त्यासाठी करणे. ही पूर्वपीठिका झाल्यावर डिझाइनची तांत्रिक बाजू महत्त्वाची होते. जीव जाण्यासाठी रक्तपात- त्यासाठी रक्तवाहिन्या कापणारे सुटसुटीत आयुध- त्यासाठी लागणारी शारीरिक तयारी.. या सगळ्यात डिझाइन कार्यरत असते आणि संकल्पनांच्या वेगवेगळ्या मुद्दय़ांचे गुच्छ इथे एकमेकांवर आच्छादित होत असतात. इथून सुरू झालेला प्रवास अत्याधुनिक एके-४७ सारख्या एकाच वेळी अनेकांची हत्या करणाऱ्या मशीनच्याही पुढे चालू राहिलेला आहे.

पुढचा भाग येतो तो मरण येतानाची चित्रे काढण्याचा. याची सुरुवातही दिसते आदिम काळातच. अल्तामिरा (स्पेन) व लास्को (फ्रान्स) येथे सापडलेल्या पहिल्यावहिल्या भित्तिचित्रांचा विषय ‘प्राण्यांची शिकार’ हाच आहे. इथे हिंसेचे ‘चित्रण’ मनाची भारलेली अवस्था व मारण्यातली आशा-आकांक्षा या संदर्भाने येते. यापुढेही मरणाचे चित्रण दृश्यकलेत वेगवेगळ्या संदर्भात केलेले दिसते.

हिंसेचे अनेक अर्थ व संदर्भ संस्कृतीत वापरलेले दिसतात. फ्रान्सिस बेकन (१९०९-१९९२) या ब्रिटिश चित्रकाराच्या कामात हिंसेचा सुप्त स्रोत दिसतो. जॉन बर्जर (१९२६-२०१७) या प्रसिद्ध लेखक-समीक्षकाने त्याच्या ‘फ्रान्सिस बेकन अँड डिस्ने’ या निबंधात डिस्नेचे कार्टून्स व बेकनच्या चित्रांचे संकल्पनेच्या अंगाने असलेले साधर्म्य दाखवले आहे. यातला काही भाग पुढीलप्रमाणे.

‘‘डिस्नेचे जग निर्थक हिंसाचाराने प्रभावित आहे. त्याच्या प्राण्यांना विशिष्ट व्यक्तिमत्त्व आणि शारीर क्रिया-प्रतिक्रिया आहेत; त्यांच्याकडे कशाचा अभाव आहे तर मनाचा. बेकनच्या चित्रकलेप्रमाणेच डिस्नेची ही फिल्म अशीच दाहकपणे आपल्याला थेट जाणवते.’’

‘‘बेकन आपल्या चित्रांद्वारे कसले निवेदन करू इच्छित नाही. वास्तविक अनुभवातला एकाकीपणा, दु:ख किंवा तात्त्विक कूट यापैकी कशाचाही तो ऊहापोह करत नाही; तसेच सामाजिक संबंध, नोकरशाही, औद्योगिक समाज किंवा विसाव्या शतकाच्या इतिहासावरही तो टिप्पणी करीत नाही..  यांपैकी कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्याला ‘सजगतेशी’ संलग्न राहावे लागेल. डिस्नेच्या कार्टून्सचेही असेच आहे.. ज्यात वैचारिकतेपेक्षा शारीर क्रिया-प्रतिक्रिया आहेत. हे जणू काही ‘मनविहीनते’सारखे आहे. बेकनच्या कामात हे सत्य सातत्याने अभिव्यक्त होण्यापेक्षा प्रात्यक्षिकासारखे प्रदर्शित होते.’’ (हे उद्धरण ‘जॉन बर्जरचे निवडक निबंध’ या मूळ इंग्रजी पुस्तकातून घेतलेले आहे.)

अहिंसेचे कथन करण्यासाठीदेखील हिंसा करताना दाखवावी लागतेच. या संदर्भात ‘क्लॉकवर्क ऑरेंज’ (१९७१) हा स्टॅन्ले क्युब्रिक या नावाजलेल्या दिग्दर्शकाचा सिनेमा पाहायला हवा. अ‍ॅलेक्स हे या सिनेमातील मुख्य पात्र. बलात्कार व खुनाच्या अपराधासाठी अ‍ॅलेक्सला शिक्षा होते व शिक्षेचा भाग म्हणून त्याच्यावर मानसशास्त्राचे टोकाचे प्रयोग केले जातात. ‘लुडोविको’ नावाच्या तंत्रज्ञानाच्या प्रयोगात्मक प्रक्रियेसाठी अ‍ॅलेक्सला पहिलाच उमेदवार म्हणून निवडले गेलेले असते, डॉक्टर अ‍ॅलेक्सला अतिहिंसक चित्रफिती पाहण्यास भाग पाडतात (म्हणजे डोळे सतत उघडे ठेवायचा चाप बसवून) व त्यावरचा परिणाम अभ्यासतात. परिणाम अर्थातच गहिरा असतो.

हिंसा व अहिंसा यांच्या मध्ये, पुढे व मागे आकलनाचे अनेक पदर असतात व आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतात, ही नुस्ती जाणीव झाली तरी पुरे!

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 1:49 am

Web Title: violence appearing in paintings of francis bacon zws 70
Next Stories
1 भीतीपासून ‘कृती’कडे..
2 भावनांचे मानस-विश्व
3 हास्याच्या नाना छटा :)
Just Now!
X